Katha Sanhita (कथा संहिता)
मराठी कथा साहित्यामध्ये आजच्या घडीला कथा अभ्यासकाची वानवा आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री. सुनील साळुंके यांच्या पुस्तकातील कथालेख वाचल्यानंतर एक आश्वासकता त्यात आढळते. त्यांनी निवडलेल्या कथेकडे कथा अभ्यासक कोणत्या परिप्रेक्ष्यातून पाहतो हे पाहणे अधिक उद्बोधक आहे. एखादी कथा आपल्या अभ्यासासाठी निवडताना तिच्याकडे आस्वाद म्हणून पहायचे की, चिकित्सा म्हणून पहायचे, की या दोन्हीच्या सरमिसळीतून त्या कथेकडे बघायचे ? त्यापेक्षाही श्री. साळुंके हे कथांतर्गत आशय आणि त्याकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन ठेवतात. त्यांनी निवडलेली कथा, त्यातील भाषा सौष्ठव, विस्तार, वळणे, लावलेला अन्वयार्थ अचूकपणे आपल्यासमोर ठेवतात. कथेचा आस्वाद घेताना कथांतर्गत असलेल्या सौंदर्य स्थळांचा तिच्या आशयासह उकल आस्वादक या नात्याने करतात. या पुस्तकात त्यांनी निवडलेल्या कथा या मराठीतल्या "मास्टरपीसच" आहेत. यावरून श्री. सुनील साळुंके यांच्या अभिरूचीची, परिपक्वतेची कल्पना येते. कथेचा परिचय करून देताना त्यांनी आपली भूमिका आस्वादक ठेवलेली आहे आणि त्यामध्ये वाचक देखील पूर्णपणे सहभागी होईल याचे भान त्यांनी जपलेलं आहे. मधल्या काळात कथा वाङमयाची पीछेहाट होण्यापाठीमागे अनेक वाङमयीन व्यवहार कारणीभूत ठरले आहेत. तरीही श्री. साळुंके यांच्या कथाभ्यास- संहितामुळे कथा विरोधी प्रवाहाला निश्चितच आळा बसून, नवे कथालेखक आणि अभ्यासक कथा वाङ्मयाकडे गांभीर्याने पाहतील. कथा निर्मितीला पूर्वीसारखाच सूर प्राप्त होईल. इतकी आश्वासकता त्यांच्या कथाभ्यास-संहितेमध्ये असल्याचे दिसून येते.