Ramayan Kathasar (रामायण कथासार)
रामायण कथासार या 'रामायण कथासार' पुस्तकाचे मूळ नाव प्रथम 'श्रीराम चरीत्र' असे होते. प्रसिद्ध नेते व हायकोर्ट न्यायाधीश चिंतामणराव वैद्य यांनी ते लिहीले होते. आम्ही फक्त पुस्तकाचे नाव बदलले आहे. मूळच्या चोवीस हजार श्लोकांच्या रामायणाचे हे उत्तम प्रकारे काढलेले सारच आहे. उदाहरणार्थ युद्धकांडाच्या शेवटी सर्ग 130 पर्यंतचा सारांश आहे असा उल्लेख आहे. श्रीराम ईश्वररूप झाला असला तरी तो इतिहासातील पूर्ण पुरूष होता. त्याचे जीवनध्येय दाखविणारा एक श्लोक पहिल्या पानावर दिला आहे. त्याचा अर्थ, 'मला राज्य मिळविण्याची इच्छा नाही, मला स्वर्गलोक नको किंवा पुन्हा जन्मही नको. जे प्राणी संकटाने आणि दुःखाने तापले आहेत त्यांची दुःखे व संकटे दूर व्हावीत एवढीच माझी इच्छा आहे.' श्रीराम कसा होता ? हे या एका श्लोकात पहायला मिळते. हे जरी कथासार असले तरी मुळातील सर्व प्रसंग व घटना येथे दिलेल्याच आहेत. म्हणजे हे कथासार वाचून मूळ संपूर्ण रामायण वाचल्याचे श्रेय तुमच्या पदरात सहज पडणार आहे. श्री रामायण दूरदर्शनवर मालिकेच्या रूपात पुन्हा-पुन्हा येत आहे. तरीही पुस्तक वाचल्याशिवाय मूळ रामायणाची गोडी समजणार नाही. रामायण हा आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे. रामायणातील सर्व व्यक्ती आदर्श असल्या तरी त्या संपूर्ण मानवी आहेत. त्यांच्या भावभावना सर्वसामान्य माणसांच्या भावनांशी समरस होणाऱ्या आहेत. म्हणूनच 24000 श्लोकांचे महाकाव्य हजारो वर्षे टिकले आहे. आणि जनमानसावर आपले अधिराज्य गाजवत आहे. प्रत्येक मराठी घरात हे रामायण कथासार असलेच पाहिजे.