-
Swaryatra (स्वरयात्रा)
मानव जातीच्या उपकारासाठी ओमकारातून संगीताची निर्मिती झाली. षड्रिपू हे सात स्वरांनी शांत होतात, यावर आज पूर्ण जगाने शिक्कामोर्तब केले आहे. स्वर, ताल, लय आणि शब्द यांच्या मीलनातून जगातील सर्व संगीत तयार झाले आणि मानव जातीला उपकारक ठरले. दिव्य अशा स्वरानुभूतीतून शांती आणि आनंद माणसाच्या मनामध्ये पेरले गेले. भारतीय शास्त्रीय संगीत हे स्वराधिष्ठित असल्यामुळे मनोरंजनाबरोबरच त्यातील वेगवेगळ्या रागांमुळे मानसिक रोगही शांत होत जातात. भारतीय शास्त्रीय संगीतास हजारो वर्षांची परंपरा असून ते प्रामुख्याने धृपद, धमार, ख्याल, ठुमरी इत्यादी माध्यमांतून सादर केले जाते. अशा अनेक रागांचा लहानपणापासूनच सहवास लाभल्याने श्री. किरण फाटक यांना रागांचा अत्यंत दिव्य असा आशीर्वाद लाभला. श्री. किरण फाटक यांचे वडील आणि संगीतातील गुरु कैलासवासी भास्कर बुवा फाटक यांचा अत्यंत पवित्र असा आशीर्वाद आणि आत्या कैलासवासी इंदिराबाई केळकर यांचा आशीर्वाद, सहवास आणि मार्गदर्शन त्यांना मिळाले. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या कृपाशीर्वादाने, श्री. किरण फाटक यांच्याकडून शास्त्रीय संगीतावर तेवीस पुस्तके लिहिली गेली. श्री. किरण फाटक हे स्वतः ग्वाल्हेर घराण्याचे गायक असून त्यांच्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही अनेक मैफिली झाल्या आहेत. प्रस्तुत पुस्तकात त्यांनी शास्त्रीय संगीतातील अनेक पैलूंवर अत्यंत अनुभवसिद्ध आणि अत्यंत सोप्या शब्दांत भाष्य केले आहे. संगीतातील रसिकांना आणि विद्यार्थ्यांना हे पुस्तक नक्कीच आवडेल असा विश्वास व्यक्त करतो.