-
Lightning Kid (लाइटनिंग किड)
ही विशीची जीवनकथा आहे तेजस्वी कल्पना वेगवान चाली अढळ चिकाटी भारताचे पहिले बुद्धिबळ ग्रँडमास्टर आणि पाच वेळा विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकणारे विश्वनाथन आनंद यांनी आपल्या तेजस्वी बुद्धिमत्तेने आणि निर्भय खेळाने जगाला थक्क केलंय. चेन्नईमध्ये लहानपणी बुद्धिबळातील बालप्रतिभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विशीला, अतिशय वेगाने चाल खेळत असल्यामुळे 'लाइटनिंग किड' म्हणून एक नवीन ओळख मिळाली. तिथपासून ते जगातील सर्वात कठीण प्रतिस्पध्र्थ्यांना सामोरं जात जागतिक दिग्गज बनण्यापर्यंतचा, विशीचा प्रवास थरारक वळणांनी, कुशल डावपेचांनी आणि श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यांनी भरलेला आहे. हे पुस्तक आनंद यांच्या आयुष्यातील आणि कारकिर्दीतील सर्वात नाट्यमय क्षणांमध्ये डोकावतं. तसेच त्यांचा विजय, पराभव, पुनरागमन आणि अद्वितीय चाली यांचा वेध घेतं. बुद्धिबळाच्या पटावरील प्रत्येक घरासाठी एक अशा ६४ छोट्या पण अर्थपूर्ण धड्यांमुळे हे पुस्तक अधिक खास बनतं. दबावाच्या प्रसंगी शांत कसं राहायचं, पराभवानंतर पुन्हा उभं कसं राहायचं किंवा काही चालीच्या पुढील परिस्थितींचा विचार कसा करायचा, हे शिकवणारं हे एका खऱ्या विजेत्याचं कथन आहे. मोठा विचार करण्यासाठी, नम्र राहण्यासाठी आणि तुमचा सर्वोत्तम खेळ खेळण्यासाठी ही एक प्रेरणादायी मार्गदर्शिका आहे.
-
Eat That Frog Vidyarthyansathi (इट दॅट फ्रॉग विद्यार्थ्यांसाठी)
आपल्या 'टू-डू लिस्ट' मधली सगळीच कामं पूर्ण करण्याठी वेळ कधीच पुरेसा नसतो, आणि तो कधीच असणारही नाही. यशस्वी लोक सगळ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते सर्वात महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करतात आणि ती कामं पूर्ण कशी होतील हे पाहतात. ते आधी "फ्रॉग खातात". एक जुनी म्हण आहे, जर आपण सकाळी सर्वात आधी जिवंत फ्रॉग खाल्ला, तर दिवसभराच्या सर्वात वाईट कामातून आपण मोकळे झालात, ही समाधानाची भावना आपल्याला मिळते. "फ्रॉग" म्हणजे तुमचं सर्वात आव्हानात्मक काम, पण हेच काम तुमच्या आयुष्यावर सर्वाधिक सकारात्मक परिणाम करणारं असतं. या पुस्तकात, दिवसाचे वेळापत्रक कसे आखायचे? प्राधान्यक्रम कसा ठरवावा ? कामे प्रभावी व कार्यक्षम पद्धतीने कशी पूर्ण करावीत? अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करून घ्यायचा? लक्ष विचलित करणाऱ्या डिजिटल अडथळ्यांच्या काळात आपली एकाग्रता कशी टिकवून ठेवावी? निर्णयक्षमता, शिस्त आणि दृढनिश्चय अंगी कसा बाणवावा? हे आयुष्य बदलणारे पुस्तक तुम्हाला आजपासूनच तुमची महत्त्वाची कामं पूर्ण करण्यात मदत करेल ! लेखकाबद्दल ब्रायन ट्रेसी हे Brian Tracy International चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. प्रेरणादायक वक्ते आणि सेमिनार लीडर म्हणून ते दरवर्षी 2,50,000 हून अधिक लोकांना संबोधित करतात. ते 80 पेक्षा अधिक पुस्तकांचे बेस्टसेलिंग लेखक आहेत, जी अनेक भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. त्यांनी 1,000 हून अधिक कंपन्यांसाठी सल्लागार व प्रशिक्षक म्हणून काम केलं असून, 70 पेक्षा जास्त देशांतील 10,000 पेक्षा अधिक उद्योगांसाठी मार्गदर्शन करत आहेत.
-
Crypto Currency (क्रिप्टो करन्सी)
आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिप्टोकरन्सीचा वापर वाढत चालला आहे. क्रिप्टोकरन्सीने भारतामध्येही भक्कमपणे पाय रोवायला सुरुवात केली आहे. म्हणूनच क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय आणि ती कशी काम करते हे समजून घेणं ही काळाची गरज आहे. या विषयावर सखोल आणि सर्वांगीण माहिती देणारे पुस्तक... या पुस्तकात * क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? * क्रिप्टोकरन्सीचे प्रकार * क्रिप्टोकरन्सी कशी काम करते? * ब्लॉकचेन म्हणजे काय आणि त्याचे सर्व आयाम * क्रिप्टोकरन्सीची उत्पत्ती, उत्क्रांती आणि भविष्यात होणारा उत्कर्ष. * क्रिप्टोकरन्सीचे अर्थशास्त्र आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढतं महत्त्व * आर्थिक प्रगतीच्या उपलब्ध झालेल्या नवनवीन संधी * क्रिप्टोकरन्सीच्या अवैध वापराच्या शक्यता आणि त्यावर उपाययोजना * क्रिप्टोकरन्सीमध्ये सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूकीचे मार्ग
-
15 Minute Method (15 मिनिट मेथड)
आधुनिक आयुष्यामुळे आपल्याला सतत गोंधळलेलं आणि दबावाखाली असल्यासारखं वाटतं. स्वप्नं आणि उद्दिष्टांच्या दिशेने पुढे कसं जायचं आणि त्याचवेळी रोजची कामं कशी सांभाळायची, हेच समजेनासं होतं. कारण यादीत कितीतरी गोष्टी बाकी असतात आणि कामांची यादी सतत वाढतच जात असते. यावर उपाय म्हणून सॅम बेनेट एक अत्यंत सोपी पण प्रभावी कल्पना मांडतात : फक्त १५ मिनिटांची छोटी कृतीदेखील तुमच्या आनंदात, समाधानात आणि अखेरीस संपूर्ण आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. या पुस्तकात परफेक्शनिझम, स्वतःवर शंका घेणं, इम्पोस्टर सिंड्रोम आणि स्वतःलाच मागे खेचणाऱ्या सवयींपासून मुक्त कसं व्हायचं आरोग्य किंवा इतर समस्यांमुळे आयुष्य विस्कळीत वाटत असताना स्वतःला कसं सांभाळायचं अवघड आणि मोठी वाटणारी कामं छोट्या, सहज हाताळता येतील अशा टप्प्यांत कशी विभागायची गरजेच्या वेळी ठामपणे आणि नम्रपणे "नाही" कसं म्हणायचं दिवसातील फक्त पंधरा मिनिटं स्वतःसाठी काढून संतुलित आयुष्यासाठी नवीन सवयी कशा तयार करायच्या सॅम बेनेट या लेखिका, वक्त्या आणि सर्जनशीलता-उत्पादकता विषयातील तज्ज्ञ आहेत. व्यावसायिक अभिनेत्री आणि इम्प्रोव्हायझर म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कामात विनोदबुद्धी, उत्साह आणि हजरजबाबीपणा यांची खास छाप निर्माण केली. सहज, व्यवहार्य आणि प्रेरणादायी शिकवणीमुळे त्या आज लिंक्डइन लर्निंगवरील जागतिक स्तरावरील लोकप्रिय प्रशिक्षकांपैकी एक असून, त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ दहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
-
Brave New Words (ब्रेव्ह न्यू वर्ड्स)
आपल्याला आवडो वा न आवडो, शिक्षण क्षेत्रात एआयची क्रांती दार ठोठावत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि GPT तंत्रज्ञानामुळे शिकण्याची प्रक्रिया बदलणार आहे. ती कशी, हे या पुस्तकात खान अॅकॅडमीचे संस्थापक सलमान खान सांगतात. एआयच्या या रोमांचक नव्या जगात पुढे जाण्यासाठी हे पुस्तक शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. शिक्षण क्षेत्रातील अग्रणी या नात्याने लेखक सलमान खान या अत्याधुनिक साधनांतील सूक्ष्म गोष्टी समजावून सांगतात. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात शिकण्याची व शिकवण्याची पद्धत कायमची कशी बदलणार आहे, हेही सांगतात. या ChatGPT क्रांतीकडे भीतीने पाहण्याऐवजी, पालक आणि शिक्षकांनी एआयला स्वीकारावे आणि त्याच्याशी जुळवून घ्यावे असे ते सुचवतात. खान सर यावर भर देतात की, शिक्षणात एआयचा वापर मानवी संवाद संपवण्यासाठी नव्हे, तर तो अधिक समृद्ध करण्यासाठी आहे. यामुळे पुढील गोष्टी घडतीलः प्रत्येक विद्यार्थी आपल्या सध्याच्या कामाला पूर्णपणे नवीन आणि सर्जनशील पद्धतींनी पूर्ण करू शकेल. शिकण्याची प्रक्रिया अधिक वैयक्तिक (Personalized) करता येईल. विद्यार्थ्यांचं मूल्यांकन अधिक अचूकपणे करता येईल. झपाट्याने डिजिटल होत असलेल्या भविष्याकरिता विद्यार्थ्यांना तयार करता येईल.
-
How To Control the Uncontrollable (हाऊ टू कंट्रोल अनकन्ट्रोलेबल)
“आपल्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींना आपण जितकं जास्त महत्त्व देतो, तितकं आपलं नियंत्रण कमी होतं.” – एपिक्टेटस आयुष्यात कठीण प्रसंग येणार, हेच माणूस असण्याचं वास्तव आहे. पण त्यांना अधिक मजबूतपणे सामोरं जाण्याचा काही मार्ग असेल तर? तो मार्ग आहे, स्टोईक तत्त्वज्ञान ही प्राचीन ग्रीक विचारसरणी आजही तितकीच उपयुक्त आहे, जितकी ती दोन हजार वर्षांपूर्वी होती. याचा मूलभूत उद्देश एकच आहे तो म्हणजे, आपल्याला अधिक चांगलं आयुष्य जगायला मदत करणं. स्टोईक तत्त्वज्ञानाचं सूत्रमंत्र सांगतो: “आपण बाह्य घटनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण त्यांना कसा प्रतिसाद द्यायचा हे मात्र आपण ठरवू शकतो.” व्यावहारिक तत्त्वज्ञ आणि सल्लागार व्यक्तिमत्त्व बेन ऑल्ड्रिज स्टोईक विचारांतील १० महत्त्वाच्या तत्त्वांद्वारे तुम्हाला अधिक लवचिक, संतुलित आणि समृद्ध जीवन कसं घडवायचं हे शिकवतील. हे पुस्तक केवळ विचार करण्यासाठी नाही, तर कृती करण्यासाठी आहे. बेन तुम्हाला काही आव्हानात्मक पण उपयुक्त सरावही सुचवतात, ज्यामुळे तुम्ही स्टोईक तत्त्वज्ञान प्रत्यक्षात उतरवू शकता. जसे की, • स्वतःची अँटी-बकेट लिस्ट तयार करणं • जाणूनबुजून थोडंसं अस्वस्थ अनुभव घेणं • निःस्वार्थी दृष्टीकोन विकसित करणं • स्वतःच्या मृत्यूचा विचार करणं (मेमेंटो मोरी) “तुमचं नियंत्रण तुमच्या मनावर आहे-बाह्य घटनांवर नाही. हे ओळखा, आणि तुम्हाला तुमच्यातील खरी ताकद सापडेल. – मार्कस ऑरेलियस”
-
Dnyanendriyantun Jivan (ज्ञानेंद्रियातून जीवन)
हे पुस्तक केवळ वाचण्यासाठी नाही, ते अनुभवण्यासाठी आहे. दैनंदिन धावपळीत आपण आपल्या विचारांमध्ये आणि इतर कामांमध्ये इतके गुंतून जातो की, आजूबाजूच्या सुंदर जगाकडे आपलं लक्षच जात नाही. लेखिका ग्रेचेन रुबिन यांच्या बाबतीतही असंच झालं. इंद्रियाच्या बाबतीतील एका धक्कादायक घटनेमुळे त्यांना अचानक लक्षात आलं की, त्या आसपासचं जग अनुभवतच नव्हत्या. त्या म्हणतात, गंध, चव, स्पर्श, दृष्टी आणि श्रवण या इंद्रियांना जाणीवपूर्वक अनुभवायला शिकलं, तर आयुष्य समृद्ध आणि आनंदी होऊ शकतं. मग त्यांनी या पंचेंद्रियांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. कसं, ते या पुस्तकात वाचायला मिळेल. या पुस्तकात, पंचेंद्रियांचं महत्त्व दैनंदिन छोट्या गोष्टींत (जसे आवडते अन्न, गाणी) आनंद शोधण्याची कला छोट्या सवयी आणि प्रयोगांमधून स्वतःला नव्याने ओळखण्याचा अनुभव वर्तमान क्षणात पूर्णपणे कसं जगायचं अधिक ऊर्जा, उत्साह आणि प्रेमाने जगण्याचा मार्ग "वर्तमान क्षणात जगण्याची प्रेरणा देणारं आणि प्रत्यक्षात उपयोगी पडणारं मार्गदर्शक" - सुसन केन, क्वाएटच्या लेखिका
-
12 Varsh Mazi Viskalit Premkatha (12 वर्षं माझी विस्कळीत प्रेमकथा)
तो ३३ वर्षांचा. ती २१ची. तो एक स्ट्रगलिंग स्टैंड-अप कॉमेडियन, ती खाजगी कंपनीमधील प्रतिभावान अधिकारी. तो पंजाबी. ती रूढीपरंपरा जपणाऱ्या जैन कुटुंबातील. तो घटस्फोटित. तिच्या आयुष्यात कधी बॉयफ्रेंडही आला नाही. खरंतर त्यांनी एकत्र यायलाच नको होतं. पण ते वेगळे राहूच शकत नव्हते. '१२ वर्षः माझी विस्कळीत प्रेमकथा' साकेत आणि पायल; वय, राहणीमान, संगोपन, विचारसरणी यापैकी कशातच साम्य नाही, तरीही ते एकमेकांकडे का आकर्षित झाले? याचं उत्तर त्यांच्याकडेही नाही. ही फक्त केमिस्ट्री आहे की मनाच्या अंतरंगातील वेगळं काही... हा निव्वळ वेडेपणा आहे, की नुसतीच वासना, की निखळ प्रेम ? वाचकांना गुंतवून ठेवणारी आणि मनोरंजक अशी ही कादंबरी. एखादी व्यक्ती तुमच्यासाठी योग्य आहे हे कसं ओळखायचं, या मूलभूत आणि महत्त्वपूर्ण प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न ही कादंबरी करते, विशेषतः तेव्हा, जेव्हा आजूबाजूचे सगळेच लोक आणि परिस्थितीही ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य नाही असं जोरजोरात सांगत असेल. भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकांचे लेखक चेतन भगत यांची एक नवीन, शक्तिशाली प्रेमकथा जी तुम्हाला हसवेल, कधी कधी रडवेलही आणि प्रेमाबद्दल तुम्हाला माहीत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर पुनर्विचार करायला लावेल.
-
Yesterday Night I Killed My Husband (यस्टरडे नाईट आय किल्ड माय हजबंड)
कबुली दिली गेली आहे.... पण रहस्याची खरी सुरुवात तर आत्ता होत आहे. एका वादळी रात्री, एका दुर्गम गावात मोनिका एक धक्कादायक कबुली देतेः "काल रात्री मी माझ्या नवऱ्याचा खून केला." पण इन्स्पेक्टर तिथे पोहोचतो तेव्हा तिचा नवरा तिच्या शेजारी अगदी जिवंत उभा असतो. मग खरे काय?, मोनिका भ्रमात आहे?, खोटं बोलतेय? की या सगळ्यामागे अजूनच भयंकर सत्य दडलंय ? इन्स्पेक्टर एका अशा रहस्याच्या जाळ्यात ओढला जातो, ज्याचा सामना त्याने याआधी कधीच केलेला नसतो एक काळोखाने भरलेला प्रवास... जो भीषण रहस्यांनी व्यापलेला आहे. तुम्ही हे रहस्य उलगडू शकता का ? एक स्त्री खुनाची कबुली देते. पण ज्याचा खून झाल्याचं ती म्हणते, तो अजूनही जिवंत आहे. आणि एक सिरीयल किलर मोकाट फिरत आहे. पण सत्य तुमच्या कल्पनेपेक्षाही अधिक भयानक आहे. कोण खोटं बोलतंय?, गुन्हेगार कोण आहे? आणि खरा राक्षस कोण? गडद अंधारात लपलेली रहस्यं, थरारक वळणं आणि असा एक खुनी, ज्याला तुम्ही कधीच विसरू शकणार नाही - अशी ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. सायकोलॉजिकल सस्पेन्स आणि रहस्याचा अप्रतिम संगम असलेली यस्टरडे नाईट आय किल्ड माय हजबंड ही कादंबरी शेवटच्या हादरवून टाकणाऱ्या द्विस्टपर्यंत तुम्हाला सतत अंदाज बांधायला लावेल.
-
Krodhagni Rajendra Choal Cha(क्रोधाग्नी राजेंद्र चोल चा)
इ.स. १००१. वयाच्या ३०व्या वर्षी महमूद गझनवी साम्राज्याची सूत्रे हाती घेतो आणि आपली नजर पूर्वेकडे वळवतो. मज़हबी उन्मादाने प्रेरित होऊन, तो भारतवर्षावर (ज्याला त्या वेळी भिन्नधर्मीयांची आणि काळ्या जादूची भूमी, तसेच अमाप संपत्ती आणि कीर्तीचे स्थान मानले जात होते) अराजकता आणि हत्याकांडांची एक भयानक मालिका सुरू करतो. असा अत्याचाराचा कहर जगाने यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. इ.स. १०२५. चेरा आणि पांड्यांना पराभूत केलेला, गंगा जिंकलेला, आणि वंग प्रदेशाचा अधिपती असलेला राजेंद्र चोल आपली समुद्री मोहीम श्रीविजय साम्राज्याकडे सुरू करायला तयार असतो. तेव्हाच सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाची बातमी त्याच्यापर्यंत पोहोचते. याच दरम्यान, अनाकलनीय लिपीतील एक प्राचीन पुस्तक त्यात दडलेली रहस्यं उलगण्यासाठी त्याच्या पालनकर्त्याला साद घालत असते. तर इकडे क्रोधाने भरलेला एक युवक युद्धासाठी अतिशय आतूर असतो. त्याचे प्रारब्ध अजून पूर्ण झालेले नाही. तो जिथे जातो, तिथे विध्वंस माजवतो आणि विनाशाच्या खुणा मागे सोडत पुढे जातो. आदिम परंपरेतील एक घातक योद्धा स्त्री, आपल्या सुलतानाच्या लालसेने भरलेल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्याची कृपा मिळवण्यासाठी आपल्या कौशल्यांचा उपयोग करते. या वैकल्पिक कालरेषेत, सोमनाथ मंदिराच्या विध्वंसामुळे चोल राजा प्रचंड क्रोधित होतो, आणि तो अचानक आपली योजना बदलतो. तो महमूदला थेट सामोरे जाण्याचा निर्णय घेतो. राजेंद्र चोलच्या या एका निर्णयामुळे भविष्य बदलेल का, भविष्यातील घौरी, खिलजी, बाबर यांना रोखता येईल का आणि वारंवार होणाऱ्या हत्याकांडांना आळा बसेल का? की भारतवर्षच अस्तित्वात राहणार नाही? ही पूर्वपक्ष, स्वयंबोध आणि शत्रुबोध यांची कथा आहे... धर्म आणि अधर्म यांच्या युद्धाची कहाणी. हे युद्ध प्रत्यक्षात कधी झाले नाही, पण झाले असते तर इतिहासाची दिशा पूर्णपणे बदलण्याची क्षमता त्यात होती.
-
Narsinha Mahaavatar - Part 1 (नरसिंह महावतार - भाग १)
नशिबाने वेगळे झालेले आणि दुःखाने एकत्र आलेले - विष्णूचा अवतार. असुरांचा राजा. एक विष्णूभक्त. एकेकाळचा शूर योद्धा नरसिंह युद्ध सोडून एका खेड्यात वैद्य म्हणून छुपेपणाने राहू लागतो. पण त्याच्या भूतकाळातील एक परिचित चेहरा त्याच्याकडे अंध राजपुत्र अंधकाच्या जुलमापासून मदतीची याचना करतो. जर नरसिंहाने नकार दिला तर, हे जगच उद्ध्वस्त होणार असतं. आता तो काय करेल? आणि मुळात त्याने युद्ध सोडण्यामागे काय कारण होतं? प्रल्हाद, काश्यपुरीचा अंतरिम राजा, त्याच्या वडिलांचे अन्याय्य विचार आणि विष्णूदेवांबद्दलचं त्याचं प्रेम यांच्या रस्सीखेचीत अडकलेला असतो. तो कोणाची निवड करेल? हिरण्यकश्यप, असुर साम्राज्याचा अधिपती, याला आपल्या पत्नीच्या मृत्यूचा सूड घ्यायचा असतो. त्यासाठी त्याला चाचण्या पार करणे आणि ब्रह्मशस्त्र मिळवणं गरजेचं असतं. पण या चाचण्यांमध्ये यापूर्वी अनेकजण मृत्यूमुखी पडलेले असतात. हिरण्यकश्यप त्यात तग धरून राहू शकेल? लेखक केविन मिसाल यांच्या विष्णूदेवांच्या चौथ्या अवताराच्या बाबतीतल्या पुनर्कल्पनेमध्ये तुमचं स्वागत आहे.
-
Narsinha - Hiranya Kashyap Part -2 (नरसिंह - हिरण्य कश्यप भाग - २)
सूडाने पेटलेला हिरण्यकश्यप इंद्राचं राज्य उद्ध्वस्त करू इच्छित होता. परंतु मुलानेच आपल्याला विरोध करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तो त्रस्त होता. नरसिंह प्रल्हादचा शोध घेण्यास निघतो, परंतु या प्रवासात त्याला त्याचा एक जुना मित्र भेटतो आणि एक प्राचीन विष ज्यामुळे त्याच्या योजनांमध्ये अडथळा निर्माण होतो. क्रोधाने पेटून उठलेली होलिका आपल्या भाच्याचा शोध घेते, परंतु त्याच्या बालपणीविषयीच्या वेदनादायी परिस्थितीबद्दलचं वर्णन तिच्या वाचनात येतं. आणि त्यामुळे आपल्या कृतींवर पुनर्विचार करायला तिला भाग पडतं. हिरण्यकश्यप इंद्राला हरवू शकेल का? होलिका आपल्या भाच्याप्रति असणारा राग विसरू शकेल का? नरसिंह प्रल्हादला शोधू शकेल का आणि त्याच्याबाबतीत सांगितलं गेलेलं भविष्य खरं ठरेल का? हा अद्भुत रोमांचकारी प्रवास बेस्टसेलर लेखक केविन मिसाल यांच्या नरसिंह या पुस्तकत्रयीच्या दुसर्या पुस्तकात सुरूच आहे.
-
Narsinha - Pralhad Part -3 (नरसिंह - प्रल्हाद भाग - ३)
सूड. क्रोध. धार्मिकता. तीन व्यक्ती, नशिबाने एकमेकांशी बांधल्या गेलेल्या, पण प्रभावांमुळे विभक्त झालेल्या. कोण टिकून राहणार? आपल्या आयुष्यात नरसिंहाला इतका राग कधीच आला नव्हता. हिरण्यकश्यपच्या मृत्यूनंतर आता तो काश्यपुरीवर राज्य करत आहे आणि सूड घेण्याची योजना आखण्यातच आपला वेळ घालवत आहे. चेनचेनच्या मृत्यूमागे असलेल्या इंद्रदेवाला मारण्याची त्याने शपथ घेतली आहे. नरसिंहाचा क्रोध जास्तच वाढत असल्याचं जेव्हा प्रल्हादाच्या लक्षात येतं तेव्हा, नरसिंहाने आणखी काही निरपराध लोकांचा जीव घेण्यापूर्वी आणि सर्वत्र अराजकता माजण्यापूर्वी त्याला थांबवायला हवं हे प्रल्हादला जाणवतं. परंतु जे आवश्यक आहे, ते तो करू शकेल? स्वतःला अंधारात न गमवता तो आपल्या एकमेव पित्यासमान व्यक्तीला मारू शकेल? केविन मिसाल यांच्या सर्वाधिक खपाच्या नरसिंह पुस्तकत्रयीच्या या अंतिम पुस्तकात भगवान नरसिंह आणि प्रल्हादच्या हृदयस्पर्शी, प्रेरणादायी आणि थरारक गोष्टीची सांगता होते.
-
Shambhudnya (शंभूज्ञा)
"शंभुज्ञा म्हणजे स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रतिज्ञा" यामध्ये अटळ धैर्य आहे, बलिदानाची प्रेरणा आहे, अन्यायाची चीड आहे अन् स्वराज्याप्रति अखंड निष्ठा आहे. संकटाशी लढण्याची वृत्ती, अपयशासमोर न झुकता उभे राहण्याची ताकद, संकटाशी दोन हात करण्याचे सामर्थ्य. "शंभुज्ञा म्हणजे जीवनयुद्धात विजय मिळविण्यासाठी लागणारी आतली ज्वाला - एक शौर्यगाथा."
-
Ammachya Dayaritil Kahi Pane (अम्माच्या डायरीतील काही पाने)
तेलुगू भाषेत प्रकाशित झाल्यानंतर अतिशय अल्पावधीत ही कादंबरी बेस्टसेलर ठरली , एवढंच नाही तर ही कादंबरी आजही बेस्ट सेलर च्या श्रेणीत आहे. आता ही कादंबरी तुमच्यासमोर मराठीत उपलब्ध आहे. ज्या प्रकारे दक्षिणेतील लोकांनी मूळ तेलुगू कादंबरीला आणि तिच्या कथेला प्रतिसाद दिला आहे, त्याचप्रमाणे मराठी वाचकही या कादंबरीला भरभरून प्रतिसाद आणि प्रेम देतील अशी आम्हाला खात्री आहे. ही एक अशी प्रेमकथा आहे, जी प्रत्येकाला स्वतःमध्ये डोकावून पाहण्यासाठी प्रेरित करेल. पुस्तकातील काही ओळी मला एक सांगा... तुम्हाला कधी कुणी पत्र लिहिलं आहे का? प्रेमपत्र किंवा अगदी साधं पत्र? बरं, ते जाऊ दे... तुम्ही कधी कुणाला पत्र लिहिलं आहे का? मला वाटतं, आपण रोज एकमेकांशी जे बोलत असतो, तेच जर शब्दांत मांडून कागदावर लिहिलं, तर ते पत्र होतं, असं समजणारा मी एक सरळसाधा माणूस आहे. माहीत नाही का, पण आज मला तुम्हाला एक प्रेमकथा सांगाविशी वाटतेय, अर्थात तुम्हाला पत्र वाचायची सवय आहे की नाही, हे मला माहीत नाही, पण तरीसुध्दा मी लिहितोय अम्माची प्रेमकहाणी. जेव्हा मला वाटलं की एका आईचीही प्रेमकथा असू शकते, तेव्हापासूनच ही यात्रा सुरु झाली. ही एका आईच्या डायरीमधील काही पानं आहेत. चांदण्या रात्री, लाटा पाहताना, आपल्या स्वप्नांना लपवून ठेवत मी लिहिलेलं हे एक प्रेमपत्रच आहे
-
Apghat Te Aavishkar (अपघात ते आविष्कार)
या पुस्तकामध्ये अशा ५० शोधांचा समावेश आहे जे शोध अपघाताने लागले आहेत. शास्त्रज्ञ दुसऱ्याच कुठल्यातरी वस्तूच्या किंवा रसायनाच्या शोधात असताना काहीतरी वेगळे घडले आणि हे शोध लागले. सुरुवातीला कदाचित प्रयोग फसल्यासारखे वाटले असले, तरीही नंतर याच शोधांनी मोठी क्रांती केली आणि जगाला मोठी दिशा दिली. कोणत्याही फसलेल्या प्रयोगामधून नवीन क्रांती घडण्यामागील मुख्य कारण होते त्या शास्त्रज्ञांची चिकाटी, सातत्य, चिकित्सक वृत्ती आणि समर्पण. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे याची लेखनशैली अतिशय सहज सोपी आहे आणि अतिशय मनोरंजक पद्धतीने हे शोध मांडले आहेत. या पुस्तकामुळे आपल्या सर्वांमध्ये दडलेल्या शास्त्रज्ञाला नक्कीच एक नवीन दृष्टी मिळेल आणि कदाचित आपल्यापैकीच कोणीतरी रोज घडणाऱ्या गोष्टींमधून जगाला नवीन दिशा देणारा एखादा शोध लावू शकेल. काही आविष्कार पेनिसिलीन, कॉर्नफ्लेक्स, आईसक्रीम कोन, काडेपेटीच्या काड्या, भूलशास्त्र, मायक्रोवेव्ह ओव्हन, कोका कोला, सुरक्षा काच, विद्युत चुंबक, स्टेनलेस स्टील, झेरॉक्स मशीन, सुपर ग्लू
-
Good Energy (गुड एनर्जी)
*वैद्यकशास्त्र आज केवढं प्रगत झालंय पण तरीदेखील आधुनिक मानव निरोगी नाही. असं का ? *पूर्वीचे लोक जितके आरोग्यसंपन्न असायचे तितके आत्ताचे लोक का नाहीत ? याचं कारण, सध्या जी औषधोपचार पद्धती वापरली जाते त्यामध्ये दुर्दैवाने आजाराच्या मूळ समस्येकडे लक्ष दिलं जात नाही. वरवरच्या लक्षणांवरच उपाय केला जातो. मुळात, कोणताही आजार पेशींमधील उपयुक्त ऊर्जा कमी होऊन उपद्रवी ऊर्जा वाढल्यामुळे होत असतो. या मूळ समस्येकडे लक्ष दिलं गेलं नाही, तिचं निराकरण केलं गेलं नाही तर आपलं आरोग्य सुधारणं अवघड आहे. यावर लेखिकेने सखोल संशोधन केले आहे. या आधुनिक आरोग्य समस्यांवरील उपाय त्यांनी शोधून काढला आणि तो पुस्तकरूपाने आपल्यासमोर मांडला आहे. त्यांनी पेशीविज्ञानाचा अभ्यास करून "गुड एनर्जी अर्थात उपयुक्त ऊर्जा"ची संकल्पना मांडली आहे. आपल्या पेशींचं कार्य सुधारलं, त्यातील बिघाड दुरुस्त झाला तर आपलं शरीर आणि मन दोन्हीही आरोग्यसंपन्न राहतं, ते कसं याबद्दल या पुस्तकात सांगितलं आहे. *गुड एनर्जी म्हणजे काय आणि ती कशी टिकवायची ? *मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरोग, संधिवात.... अशा असंख्य आजारांची सखोल माहिती व त्यावरील उपाय *आरोग्य क्षेत्रातील अनेक व्यावसायिकांकडून (औषध कंपन्या, फुड प्रॉडक्टस् कंपन्या, डॉक्टर्स) होणारी दिशाभूल *स्वतःचे मेडिकल रिपोर्ट (लिपिड प्रोफाईल, शुगर रिपोर्ट वगैरे...) कसे समजून घ्यावेत. *गुड एनर्जी वाढवणारा आहार *झोप, जैविक घड्याळ आणि चयापचय यांच्यातील महत्त्वाचे दुवे *उत्तम आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात सहज चालता-बोलता करता येण्याजोगे व्यायाम प्रकार
-
Karnaputra Ani Janmarahasya Part - 2 (कर्णपुत्र आणि जन्मरहस्य - भाग 2)
कर्णपुत्र आणि अस्त्र'या पहिल्या भागाला आपण जो अभूतपूर्व प्रतिसाद दिलात त्यासाठी आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. पहिल्या भागासाठी अनेकांनी लिखित अभिप्राय पाठवले. त्याअभिप्रायातून मला काहींनी प्रश्नही विचारले. त्यात सर्वात जास्त जे प्रश्न आले ते म्हणजे, सुवेधच्या जन्माचं रहस्य काय ? तो नक्की कोणाचा पुत्र आहे? नदीकाठावर त्याच्याशी कोण बोलतं ? वगैरे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आला, धर्माक्षीबरोबर त्याचा विवाह दुसऱ्या भागात तरी होणार की नाही ? प्रस्तावनेत ही कादंबरी काल्पनिक आहे हे सांगूनदेखील अनेकांना ही सत्य घटनेवर आधारित आहे असं वाटलं किंवा वाचताना त्यांना ती तशी वाटली. तर एका चोखंदळ वाचकाने पहिल्या भागाइतकाच किंबहुना त्याहूनही सरस असा दुसरा भाग व्हायला पाहिजे हे ठणकावून सांगितलं. तर आमच्या एका सहृदय मित्राने 'इतर सर्व कामे बाजूला ठेवा, आधी दुसरा भाग पूर्ण करा' असंही सांगितलं. अशा शेकडो अभिप्रायामुळे दुसरा भाग लिहिण्यास प्रेरणा मिळाली. मला विश्वास वाटतो की, दुसरा भागही आपल्याला तेवढाच आवडेल, किंबहुना जास्तच भावेल. त्याच्याही प्रतिसादाच्या प्रतीक्षेत मी आहे.
-
Accounting For Dummies (अकाउंटिंग फॉर डमीज)
हसत-खेळत अकाउंटिंग छोटा किंवा मोठा, कोणताही व्यवसाय असला तरी त्यात अकाउंटिंगला फार महत्त्व असतं. अकाउंटिंग हा विषय अतिशय विस्तृत आहे. प्रत्येक व्यावसायिकाला आपल्या व्यवसायाच्या फायद्यातोट्याचं गणित बसवण्यासाठी अकाउंटिंगची ओळख असणं गरजेचं आहे. अर्थात, त्याचं ज्ञान प्रत्येकाला असेलच असं नाही. अच्युत गोडबोले यांच्या या पुस्तकात अकाउंटिंग या विषयाचे सर्व पैलू अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितले आहेत. या पुस्तकात... अकाउंटिंगच्या भाषेची तोंडओळख फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे काय? कंपनीची फायनान्शिअल पोझिशन कशी समजून घ्यायची? जर्नल आणि लेजर पोस्टिंग कसं करतात? ट्रायल बॅलन्स म्हणजे काय? कॅश फ्लो स्टेटमेंटची माहिती शेअर कॅपिटलचे विविध घटक रेशो अॅनॅलेसिस कसा करावा? लायबिलिटीज आणि अॅसेट्स
-
Epidemic Of Careerism
It is my heartfelt hope that this book will give you the necessary insight to pause, reflect, and introspect on this vital topic. - Achyut Godbole In this book, I aim to share my personal observations and professional insights, gleaned over three decades of experience in the educational field. Through my interactions, I have seen the profound impact that career decisions have on mental health, emotional well-being, and overall life satisfaction.
-
Himalayatil Tera Mahine (हिमालयातील तेरा महिने)
माझ्या हृदयामध्ये अतोनात आनंदाची भावना येण्यासाठी फक्त तिथली विलक्षण शांतत्ता कारणीभूत नव्हती, याचं खरं कारण होते स्वातंत्र्य, मी आता माझ्या आजूबाजूच्या लोकांशी बांधील नव्हतो किंवा मी त्या सांसारिक बेड्यांनी जखडलेलोही नव्हतो, ज्या सतत तुम्हाला या जगाप्रमाणे वागण्यासाठी प्रवृत्त करत असतात. कोणतंही सांसारिक बंधन नाही. सादरीकरण नाही, समयसीमा नाहीत, टार्गेट, मीटिंग यापैकी काहीही नाही. असाल फक्त तुम्ही आणि तुमचं स्वतःच जग. अर्थात, स्वातंत्र्य हे फक्त माझ्या आनंदाचं कारण नव्हतं किंवा ते माझ्या आनंदाला चिरकाल टिकवू शकणार नव्हतं. मला वाटते, याचं मुख्य कारण होतं माझ्यामध्ये असलेली आशा. दिव्य माता खरोखरच आहे. यावर माझा विश्वास होताच, याचबरोबर ती मला भेटेल यावरही माझा ठाम विश्वास होता. मला आशा होती की, मी दिवसरात्र तिची साधना करेन आणि एक दिवशी ती माझ्यासमोर प्रगट होईल. आपल्या धर्मग्रंथांमध्येही हेच सांगितलं आहे.
-
Vidrohi Leki (विद्रोही लेकी)
हे पुस्तक म्हणजे विविध काळांमधल्या आणि संस्कृतींमधल्या स्त्रीवादी इतिहासाची एक अनोखी रोमहर्षक यात्राच आहे.ज्या व्यक्तींनी प्रचलित अन्यायकारक सामाजिक व्यवस्थांना झुगारून देण्याचं धाडस केलं आणि ज्यांनी नवीन सामाजिक घडी बसवण्यासाठी अनन्यसाधारण लढे दिले अशा महान व्यक्तींच्या, अंगावर सरसरून काटा आणणाऱ्या संघर्षाच्या कहाण्या या पुस्तकात वाचायला मिळतील. या महान व्यक्तींनी केलेल्या अचाट संघर्षामुळे आणि समर्पणामुळे नंतरच्या पिढ्यांचं आयुष्य सुखकर झालं. पुस्तकाचं प्रत्येक पान, धैर्य आणि टोकाची चिकाटी दर्शवणाऱ्या घटनांनी ओतप्रोत भरलेलं आहे. अतिप्राचीन काळापासून ते आधुनिक काळातल्या स्त्रीवादाचे स्वरूप आणि संदर्भ कसे बदलत गेले हे पुस्तक वाचताना लक्षात येतं. या पुस्तकात, स्त्रीवादाच्या विविध पैलूंचे पदर अनेक उदाहरणं देऊन उलगडले आहेत. या गोष्टींपासून प्रेरणा घेऊन प्रचलित चालीरीतींचा आणि परंपरांचा डोळसपणे विचार करायला लावण्याची क्षमता या गोष्टींमध्ये आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात या स्त्रीवादी लढ्यांची फलश्रुती अनुभवतो, हे पुस्तक वाचताना लक्षात येतं. या समाजव्यवस्थेत होणाऱ्या बदलांचा आपण केवळ साक्षीदार न होता, या बदलांचा एक भाग झालं पाहिजे अशी प्रेरणा हे पुस्तक वाचताना नक्कीच मिळते.
-
Bhutkalantun Mukti Vartamanashi Maitri (भूतकाळातून मुक्ती वर्तमानाशी मैत्री)
* तुम्हीच आहात तुमचे उत्तम डॉक्टर * मन आणि शरीरावरील उपचारांचा अभ्यास * आघातांमधून (ट्रॉमा) बाहेर कसे यावे * विश्वासाची शक्ती * स्व जागरूकता * तुमच्यात लपलेल्या लहान मुलाची भेट आणि पुनर्पालकत्व * मन, शरीर आणि आत्मा यांच्या आरोग्यासाठी वेगळा शास्त्रीय दृष्टिकोन
-
Karna Putra - Part 1 (कर्ण पुत्र - भाग १)
“आचार्य आपण मला शिकवण्यास नकार का दिला?” आचार्य शांतच होते. काही क्षण तसेच गेले. “युगंधर कुठे आहे? त्याला तुम्ही कुठे पाठवलंय का? नक्की काय चाललंय? माझ्याशी कोणी बोलत का नाही?” तो एकामागे एक प्रश्न विचारत होता. आचार्य मात्र शांत होते. “सुवेध एक मोठा श्वास घे...” आचार्यांनी आपलं मौन तोडलं. “तुझ्यासारखा शिष्य मिळणं हे कुठल्याही गुरूचं भाग्यच असेल. तुला मी नाकारत नाहीये. परंतु माझ्या मनात दुसरीच काही योजना चालली आहे. तुझ्या क्षमतांचं योग्य प्रकटीकरण करायचं असेल तर त्याला त्याच ताकदीचा गुरू हवा. मी तुला कदाचित शस्त्रांमध्ये पारंगत करेन. परंतु तुझी क्षमता अस्त्रांवर प्रभुत्व मिळवण्याची आहे. पण त्यासाठी तुला योग्य स्थानी जावंच लागेल.” “अस्त्र?” सुवेधच्या शब्दांमध्ये प्रश्न डोकावत होता. “शस्त्र ही कला आहे, कौशल्य आहे. पण अस्त्र ही विद्या आहे. शस्त्रांचं कौशल्य आत्मसात करता येतं. पण अस्त्रांची विद्या मिळवण्यासाठी मात्र योग्य गुरू लागतात. अर्थात हे मिळवण्यासाठी तुला खूप संघर्ष करावा लागणार आहे. पण...” असं म्हणून शैलाचार्य शांत झाले. काही काळ शांततेत गेला. “काय आचार्य?” सुवेधला ही शांतता सहन होत नव्हती. “काही प्रश्नांची उत्तरं मिळवल्याशिवाय मला पुढचा मार्ग दिसत नाही आणि तुला कोणाकडे पाठवावं याचा संकेतही मिळत नाही.”