-
Maitra (मैत्र )
लेखन, अभिनय, संगीतादी कला, वक्तृत्व अशा अनेक प्रांतात स्वच्छंद संचार करणाऱ्या पु. ल. देशपांडे यांच्याकडे मैत्रीची श्रीमंतीही भरपूर होती. या समृद्धीलाच त्यांनी या पुस्तकात शब्दबध्द केले आहे. केसरबाई केरकर, नानासाहेब गोरे, पंडित विष्णू दिगंबर, खानोलकर, गौरकिशोर घोष, शाहूमहाराज, माटे मास्तर, दादा धर्माधिकारी, ज्योत्स्ना भोळे, तसेच मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष, वसंत सबनीस, अशा अनेक थोरांशी जुळलेल्या स्नेहातून, आपुलकीतून हे सुंदर शब्द उमटले आहेत. या भावबंधामधून व्यक्तीमत्व उभी राहिली आहेत. या व्यक्तिरेखांची स्वभाववैशिष्ट्ये, गुण, त्यांच्या कलेची महती, कामावरील- साहित्य-कलेवरील श्रद्धा यांचा वेधही पुलंनी घेतला आहे. पु.लं. च्या पूर्वप्रकाशित निवडक लेखांचा संग्रह म्हणजेच ‘मैत्र’.... ‘मैत्र’ पुस्तक भाई म्हणजेच पु.ल. यांनी विषयाचा अनुसरुन त्याचे मित्र ‘नंदू नारळकर’, ‘मनू गर्दे’, ‘दत्तू गर्दे’ यांच्या मैत्रीला अर्पण केले आहे. सदर पुस्तकात समाविष्ट लेख : * केसरबाई : एका तेज:पुंज स्वराचा अस्त (महाराष्ट्र टाईम्स, २५ सप्टेंबर १९७७) * नानासाहेब गोरे : प्रफुल्ल होवोनि सुपुष्प ठेलें (महाराष्ट्र टाइम्स, १३ जून १९८२) * पंडित विष्णु दिगंबर (सत्यकथा, सप्टेंबर १९७२) * खानोलकरचे देणे (सत्यकथा, ऑगस्ट १९७६) * गौरकिशोर घोष (सुगंध, १९७७) * शाहूमहाराज : एक धिप्पाड माणूस (राजर्षी शाहू गौरव ग्रंथ, महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग १९७६) * माटे मास्तर (महाराष्ट्र टाइम्स, ३१ ऑगस्ट १९८६) * हमीद : एक श्रेष्ठ प्रबोधनकार (महाराष्ट्र टाइम्स, १५ मे १९७७) * जीवन त्यांना कळलें हो (महाराष्ट्र टाइम्स, २५ नोव्हेंबर १९८४) * दादा धमार्धिकारी (साधना, १७ जून १९७८) * शरदाचे चांदणे (महाराष्ट्र टाइम्स, २७ एप्रिल १९८६) * ज्योत्स्ना भोळे नावाची माझी एक बालमैत्रीण (संगीत-कला-विहार, एप्रिल १९७५) * रामकिंकरदा (महाराष्ट्र टाइम्स, वार्षिक १९८०) * सखे-सोबती गेले पुढती (हंस, मार्च १९७८) * मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष (सत्यकथा, जुलै १९६३) * स्नेहधर्मी वसंत सबनीस (महाराष्ट्र टाइम्स, २७ डिसेंबर १९८७) * स्थानबध्द वुडहाऊस (सुगंध, १९७६) * जाने क्यूं आज तेरे नाम पे रोना आया (मौज, दिवाळी १९७९)
-
Pannashicha Bhojya (पन्नाशीचा भोज्या)
माणसाच्या आयुष्यात पन्नासावं वर्ष हे स्थिरावण्याचं वर्ष आहे. लेखक रवी अभ्यंकर यांनी या वर्षात मागे वळून स्मरणरंजन केलं आहे. हे स्मरण वैयक्तिक असलं, तरी त्यात आसपासच्या समाजाचं प्रतिबिंब पडलेलं दिसून येतं. या शालेय आठवणी आहेत, आजूबाजूला घडलेल्या घटनांवर भाष्य आहे. 'नावाचा जुगार, शाळेसाठी वशिला,' 'ध्येय, तत्व, व्यवहार आणि सोय,' 'वास्तुशांतीचा नारळ,' 'ऐश्वर्या सुश्मिता युक्ता लारा चोप्राप्रिया,' 'घर घर की कहाणी,' 'एकटा जीव,' 'पहिली कमाई' अशा लेखांतून अभ्यंकर हलक्याफुलक्या, नर्म विनोदी शैलीने आठवणींचा खजिना समोर ठेवतात. आठवणी सांगताना त्यांनी विविध विषयांवर भाष्यही केले आहे.
-
Shyamini (श्यामिनी)
'श्यामिनी'ही शूर्पणखेच्या उध्वस्त जीविताची कहाणी आहे तशीच ती जानकीच्या-कनवाळू, हळव्या मनाच्या, भावनावश होणारया-व्यथेचीही. मिथकरुपात असलेल्या या कहाणीची, तारा वनारसे 'श्यामिनी'मध्ये पुनर्निर्मिती करत आहेत. कालाच्या गहन धुक्यातून मिथकाला वरती आणत,त्या कहाणीतले काव्य आणि कारुण्य अलवारपणे उलगडत,तिच्या मूलस्वरुपातला अदृश्य अवकाश अधिक भावगर्भ करत,तिला स्वतःची अशी तर्कसंगत दिशा देत,तारा वनारसे श्यामिनीचे आणि जानकीचे अविस्मरणीय दर्शन इथे घडवतात. तसेच 'अर्यमा'सारख्या नव्या मिथकाला जन्म देतात. मिथकाचा विस्तार करणारे लेखन आढळत असते; मात्र मिथकाच्या पुनर्निर्मितीचा योग सर्जनशील लेखकाच्या लेखनात भेटतो. तसा दुर्मिळ,आनंददायक अनुभव 'श्यामिनी' वाचताना येत राहतो.
-
Nad Sanvad (नाद संवाद)
प्रिय श्री. सुभाष डोंगरे ह्यांना सस्नेह, '… तुमची संगीतविषयक आस्था अतिशय प्रामाणिक आहे. शिवाय तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या सांगीतिक आस्वादाला शास्त्रीय, उपशास्त्रीय, भावगीत, चित्रपटसंगीत, गायन, वादन हि सर्व क्षेत्रं मोकळी आहेत. त्याला कुठल्याही वैचारिक सोवळेपणाची कुंपणं नाहीत. तुम्ही निवडलेल्या व्यक्ती पाहताना हि गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती सगळी कलाकार मंडळी तुम्हांला वेळोवेळी भेटली, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकलात या सर्वच गोष्टी नि:संशय अभिनंदनिय आहेत. संगीतकार खय्याम, रवि, नौशाद, रसिकप्रिय संगीतकार-जोडीतले प्यारेलालजी, हृदयनाथ मंगेशकर, हरिप्रसाद चौरासिया, जितेंद्र अभिषेकी, श्रीनिवास खळे, जी. एन, जोशी ही नामावली नुसती वाचली तरी या पुस्तकाच्या अभिप्रेत आशयाची आणि आवाक्याची कल्पना येइल. पखवाजवादक अर्जुन शेजवळ, भावगीतगायक रतिलाल भावसार आणि विशेषतः तबलावादक उस्ताद निजामुद्दीन खां या तिघांचा या पुस्तकात झालेला समावेश तर फार अपूर्वाईचा आणि म्हणून प्रशंसनीय वाटतो. तुमच्या पुस्तकात सामावलेल्या या सर्व व्यक्ती या मुळात एकेक स्वतंत्र पुस्तकाचे विषय आहेत. तो संपूर्ण अनुभव इथे एका लेखात देणे अशक्य आहे. - सुधीर मोघे.
-
Sahavas (सहवास)
कॉलेजजीवनात आणि 'आकशवाणीवर'वर कार्यरत असताना कृ.द. दीक्षितांना जी गुणी,कलावंत माणसे भेटली. त्यांच्या सहवासात आलेल्या हृद्य, स्मरणीय अनुभवांना दिलेले 'सहवास' हे शब्दरूप आहे. ह्यात राजकीय नेते,सुरेल गायक,प्रतिभावंत संगीतदिग्दर्शक,थोर साहित्यिक आणि कर्तबगार अधिकारी व सहकारीही आहेत. गुणग्राही दीक्षितांनी आपल्या रसपूर्ण, वेधक शैलीत हि व्यक्तिचित्रे वाचकासमोर जिवंत उभी केली आहेत. ब्रिटीश काळापासूनची 'आकाशवाणी'ची कार्यपद्धती आणि तिच्यात झालेला बदल जाणून घेण्यासाठी हे पुस्तक निश्चितच महत्वाचे ठरेल.
-
Ucchad (उच्छाद)
संस्थांनी कारभारातल्या कपट- कारस्थानांमुळे आयुष्य उध्वस्त झालेल्या सल्लागार चिटनिसांच्या - देसाईंच्या मुलाची 'उच्छाद' ही हृदयद्रावक कहाणी. चित्रकार आणि गुप्तहेरकथालेखक असलेला श्री कोवळ्या मनात बसलेल्या मानसिक धक्क्यांनी मनोरुग्ण झाला आहे. आत्मविश्वास आणि सहानुभूती ह्यांच्या अभावाने त्याचे आयुष्य भरकटलेले. कधी निराश तर कधी नको एवढे आक्रमक असे हे व्यक्तिमत्व मुलतः सत्प्रवृत्त आहे. त्याच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींच्या वर्तनाचा पाया लैंगिक अनुभवांत, असमाधानात किंवा विकृतीत दडलेला आहे. त्र्यं. वि. सरदेशमुखांचा सखोल मनोविश्लेषण करण्याचा प्रत्यय 'उच्छाद' या कादंबरीत येतो.
-
Vichar Vilasite (विचार विलसते)
आजवरच्या वाचनातून, चिंतनातून आणि अल्पजीवी अनुभवातून मला विचार मिळाले. विचार आले तसे ते तुटक अनुभव लुप्त झाले. तपशिलांप्रमाणे बरेच विचारही गहाळ झाले; परंतु त्यांनी आपल्यातील सार शिल्लक ठेवले. विचार गेले पण सरणी राहिली. व्यवहारात या तत्वांना मी माझी मते म्हणतो. ही प्रमेये चिरंतन आहेत. त्यांनी माझ्या मनाची व जीवनाची घडण केली आहे. यांनीच माझ्या अस्मितेला आकार दिला आहे. ही तत्वे आणि त्यांच्याभोवती गुंतलेल्या व गुरफटलेल्या माझ्या भावना हे माझ्या जीवनाचे मर्मबंध अहेत. त्यांच्या बळावरच मी जगात आहे.