-
Ranbhuliche Pradesh (रानभुलीचे प्रदेश)
विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी लिहिलेलं 'रानभुलीचे प्रदेश' हे पुस्तक अतिशय सुंदर आहे. यामध्ये हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेल्या अनेक रचनांविषयी अतिशय रसाळ पद्धतीनं मांडणी केलेली आहे. त्या रचनांचं संगीत आणि काव्य आणि त्या रचनांमध्ये किस्से, त्यातल्या संगीतामधले बारकावे हे अतिशय छान पद्धतीनं उलगडून सांगितलेलं आहे.
-
Shubhparva (शुभपर्व)
रघुकुलातील, आमच्या घरातील, पहिले अपत्य, माझी सर्वात मोठी चुलत बहीण शुभदा. जिच्या आगमनाने आमच्या घराची भरभराट सुरू झाली. बाबाकाकांच्या कष्टाने लक्ष्मी प्रसन्न होऊ लागली आणि ताईच्या विद्वत्तेला सरस्वतीचा कृपाप्रसाद प्राप्त झाला. शालेय जीवनापासून ताईच्या यशाची कमान उंचावत गेली. टिळकनगर विद्यामंदिरातील आदर्श विद्यार्थिनी, रुईयामध्ये तत्त्वज्ञान विषयात सुवर्णपदक विजेती झाली. मुंबई विद्यापीठामध्ये शुभाताई रुजू झाली आणि दोन-तीन वर्षांपूर्वीच सुरू झालेल्या तत्त्वज्ञान विभागाच्या अंकात्मक आणि गुणात्मक विकासामध्ये विभाग प्रमुख म्हणून तिने मोलाचे योगदान दिले. तिने तत्त्वज्ञान विभागाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोचवले. संपूर्ण आयुष्य तत्त्वज्ञान या विषयासाठी काम करत राहावे आणि तेच तत्त्वज्ञान जगण्याचा एक भाग होऊन जावे, असे हे 'शुभ पर्व' !
-
Jina Shoshitanchan (जिणं शोषितांचं)
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षं झाली. त्याचा उत्सवही दिमाखात झाला. परंतु गांधी-नेहरू-आंबेडकर यांच्या स्वप्नातील सामाजिक-आर्थिक न्यायाची गाडी पुढे सरकली का हा प्रश्न उरतोच. नेमक्या याच प्रश्नाला थेट भिडणारं हे पुस्तक आहे. ज्यावेळी एखादा आयएएस अधिकारी ‘मला या शहरात एकही झोपडी नको` असं म्हणतो तेव्हा या लेखिकेची होणारी तगमग काळजाला हात घालते. बलात्कार, बाललैंगिक शोषण, आरोग्याविषयीचे प्रश्न, मुस्लिमांचे सामाजिक, आर्थिक खच्चीकरण अशा प्रश्नांवर जमिनीवर लढतानाचे सजग प्रसंग विलक्षण अस्वस्थ करून जातात. गेल्या साडेतीन दशकांत वृषाली मगदूम यांनी शोषितांच्या प्रश्नाला हात घालत ते धसास लावताना आलेले अनुभव दाहक आहेत, म्हणूनच ते वेधक ठरतात. आपल्याबरोबरच पण आडबाजूला जगणाऱ्या एका समुदायाच्या शोषणाची, हतबलतेची, संघर्षाची ही जिवंत चित्रे तर बोलतातच, पण राज्यकर्ते, प्रशासन आणि समाजाच्या तळातली माणसे यांच्यातले वाढत जाणारे अंतर विदीर्ण करणारे आहे. अशा परिस्थितीत लेखिकेचा हात त्या अंधाऱ्या विश्वाला आश्वासक वाटतो, हे खरे आहे
-
Charles Darwin (चार्ल्स डार्विन)
डार्विन या शास्त्रज्ञाच्या आठवणीचा कोलाज असं या आत्मचरित्राच्या अनुवादाचं वर्णन करता येईल. एका थोर वैज्ञानिकाचं जगणं सर्वसामान्य जनतेसमोर त्याच्याच शब्दांतून मांडण्याचा हा अनुवादी प्रयत्न निःसंशय कौतुकास्पद आहे. विज्ञान आणि वैज्ञानिक याविषयी आपल्या समाजातील उदासीनता दूर करण्यासाठी अशाप्रकारच्या वेधक शैलीतील लिखाणाची आज खरोखरच गरज आहे. एका वैज्ञानिकाच्या आत्मचरित्राच्या निमित्तानं वैज्ञानिकाचं अंतरंग, त्याची मानसशास्त्रीय जडणघडण, विज्ञान क्षेत्रातील त्याचा सर्जनशील प्रवास याला भिडणारं असं हे पुस्तक आहे
-
Glokal Lekhika (ग्लोकल लेखिका)
आपल्या सुशिक्षित सुसंस्कृत समाजात अजूनही जगातील साहित्याबद्दल, सांस्कृतिक वैविध्याबद्दल आणि सामाजिक जीवनशैली आणि भावविश्वाबद्दल खूप कुतूहल आहे. तितकेच किंवा त्याहूनही अधिक कुतूहल आहे लेखिका, महिला कलाकार, महिला नाटककार यांच्याबद्दल अधिक कुतूहल असण्याचे कारण गेली सुमारे दीड-दोनशे वर्षं या साहित्य- कला विश्वावर वर्चस्व आणि प्रभुत्वसुद्धा पुरुष लेखक- नाटककारांचे राहिले आहे. जगभर, अगदी भारतात, आफ्रिकेत व चीन- जापानमध्येसुद्धा. ही ' पुरुषी प्रभुत्ववादी' साहित्य चौकट संजीवनी खेर यांनी एकप्रकारे मोडली आहे. त्यातूनच हा 'ग्लोकल लेखिका' प्रकल्प त्यांनी सुदेश हिंगलासपूरकर यांच्या मदतीने सिद्धीस नेला आहे. - कुमार केतकर
-
Yoddha Karmayogi : Eknath Sambhaji Shinde (योद्धा
"माझी आई कधी कधी मला म्हणायची, “बाबासाहेब, माणसानं नेहमी समजून वागायचं.” हे समजून वागणं जे काही आहे नं, ते एकनाथरावांमध्ये आहे. एकनाथी हा ज्ञानी मनुष्य आहे. हवाहवासा मनुष्य आहे. त्यांच्या मनात आलं की, जी काही मदत करायची ती ते तुम्हाला करणार. त्याबद्दल कुठलाही गाजावाजा करणार नाहीत. मी हे केलं, मी एवढं केलं, हा मीपणा त्यांच्यात नाही. अहंकाराचा दुर्गंधही येणार नाही. फार चांगला मनुष्य आहे. नेता असावा तर असा! ... आणि इतकं करूनसुद्धा भोळेबिचारे असंही नाहीये. त्यांच्यामध्ये जेवढे राजकारणी गुण हवेत, तेवढे नक्की आहेत. सात्त्विक आहेत. एक शिस्त आहे. ती ते बरोबर पाळणार. स्वत:चं दुःख हे आपल्यापाशी मनाच्या कपाटात ठेवायचं आणि दुसऱ्याच्या सुखाचा सतत विचार करायचा. दुसऱ्याच्या सुखात आपला आनंद व्यक्त करणं, तेही प्रामाणिकपणे, हे एकनाथरावांना जमलं आहे. हसत हसत दुःख ओलांडून पलीकडे जाण्याची ताकद परमेश्वरानं त्यांना दिलीय. - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
-
Marathi Bhasha : Lekhan-Margadarshan (मराठी भाषा :
श्री. सलील वाघमारे हे शासनमान्य मराठी लेखनविषयक नियमांचे केवळ अभ्यासकच नाहीत, त्या विषयावर त्यांचे प्रभुत्व आहे. हे या लेखांच्या स्वरूपावरूनच लक्षात येते. शिवाय, शालेय विद्यार्थ्यांना, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, इतकेच नव्हे तर, मराठी भाषेत लेखन करणाऱ्या लेखकांना, वृत्तपत्रांना, औपचारिक लेखन करणाऱ्यांना, शासकीय लेखन करणाऱ्यांना अशा सर्वांना निर्दोष लेखन करता यावे, या उद्देशाने सोप्या शब्दांत केलेले विवेचन हे ह्या पुस्तकातील लेखांचे वैशिष्ट्य आहे. या सर्व लेखांतून मराठीच्या विविध शब्दांचे लेखन, त्यासंदर्भात येणारे काही व्याकरणातील शब्द, सामान्य वाचकाला अपरिचित शब्द, यांचे स्पष्टीकरण श्री. वाघमारे यांनी इतक्या सोप्या, सुलभ पद्धतीने केले आहे, की त्यामुळे सर्वसामान्य मराठी भाषकांना हे पुस्तक अतिशय आवडेल, ते संग्राह्य वाटेल, इतकेच नव्हे, तर त्या पुस्तकाचे वारंवार वाचन करून मराठीच्या विविध शब्दांचे अनुकरण करावे, असे वाटेल. यास्मिन शेख (ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ)
-
Lavnaya Nakshatra (लावण्य नक्षत्र...)
लावणी आणि तमाशा कलावंतांच्या जीवनावर आधारित ही कथा आहे. आजवर तमाशा कलावंतांच्या आयुष्यावर अनेक चित्रपट, कादंबऱ्या लिहिल्या गेलेल्या आहेत. मात्र ही कादंबरीदेखील प्रत्येकाप्रमाणेच वेगळी आहे हे निश्चित. यात एक नायक, एक नायिका आणि त्यांचं प्रेम आहे. तसंच दोन बहिणींचं घट्ट नातं कसं असतं हे देखील यात दाखवलं आहे. मात्र तरीही ही केवळ एक प्रेमकहाणी आहे असं मी म्हणणार नाही. अर्थात असं का, ते वाचकांच्या ही कादंबरी वाचल्यानंतरच लक्षात येईल. या कहाणीमध्ये फक्त प्रेम नाहीये. तर विरहही आहे, दुःख आहे, वेदना आहेत, ताटातूट आहे. त्याच जोडीला लावणीची साधना आहे, त्याग आहे, घुंगरांचा नाद आहे, ढोलकीचा आवाज आहे, गरिबी आहे, प्रसिद्धी आहे, अन्याय आहे, विद्रोह आहे, समर्पण आहे आणि समाधानसुद्धा. म्हणूनच ही फक्त प्रेमकहाणी नसून जीवनकहाणी आहे.
-
Patanjalyogdarshan (पातंजलयोगदर्शन )
उपनिषदांचा काळापासूनच भारतीय तत्त्वचिंतकानी मानवी अस्तित्वाचा अर्थ शोधण्याचा गंभीर प्रयत्न सातत्याने केला आहे. भौतिक जगापलिकडे असलेल्या गूढ अशा सृष्टीच्या परमतत्त्वापर्यंत मानवी अस्तित्व पोहोचू शकते का? विस्तारू शकते का, याचा शोध घेण्याचे सर्वोत्तम साधन म्हणजे योगसाधना! याची जाणीव झाल्यावर भारताच्या आध्यात्मिक इतिहासाचा फार मोठा भाग योगसाधनेच्या अनेक मौलिक प्रणालींनी व्यापला आहे. पातंजल महाभाष्याबरोबरच योगसूत्रांचेही कर्तृत्व ज्यांच्याकडे जाते ते पतंजली इसवीसनापूर्वी सुमारे दीडशे वर्षे होऊन गेलेले महापंडित. त्यांचे योगदर्शन म्हणजे भारतीय योगविषयक तत्त्वाचिंतनाचा सर्वमान्य आणि सर्वाधिक प्रमाण मानला गेलेला ग्रंथ आहे. पूर्वाभ्यासांच्या आधारे या योगसूत्रांचे साधे आणि आकलनसुलभ असे विवेचन इथे केले आहे. साधनेच्या मार्गावर पाऊल ठेवणाऱ्या सर्वांना योगशास्त्राची ओळख करून देण्याचे काम या पुस्तकाने केले आहे असे लक्षात येते. एक महत्त्वाचा योगविषयक ग्रंथ सर्वसामान्यांच्या आकलन कक्षेत यावा ही या पुस्तकामागची प्रेरणा अभिनंदनीय आहे. - डॉ. अरुणा ढेरे