-
Done That Been There (डन दॅट बीन देअर)
हे भुयार आहे की विवर हे समजत नाही. आणि दिवा दाखवायला कुणी नाही. आठवणींच्या गच्च रानात हरवल्यावर हाक द्यायला कुणी नाही. मडक्यांची पुन्हा माती होताना कुणीच सोबत नाही. आणि या वाहत्या नदीच्या पाण्याचा ठाव घेता येत नाही. हे नीट उमगल्यावर माणूस स्वतःशी बोलू लागतो का ? आणि हे असं स्वतःशी बोलणंच असतं का लिहिणं वगैरे ? लिहिणाऱ्या समोर ठाकणारे असे अनेक प्रश्न.. ज्यांची उत्तरं लिहिणाऱ्याला लिहिता लिहिताच उमगत जातात. दुसरे आपल्याला समजतात, तितके मूर्ख आपण खचितच नसतो. पण आपण स्वतःला समजतो, तितके शहाणेही आपण क्वचितच असतो ! लिहिताना आणि लिहिल्यावर काय काय झालं, यातली तथ्यं मी मांडताना हे शक्य आहे, की 'या तथ्यांच्या जबड्यातून निसटून, सत्य कदाचित् दूर कुठेतरी एकटंच बागडत असेल!'
-
Hans Akela
तसं तर काल उत्कटपणे ’जगलेलं’ सारं तितक्याच ताजेपणानं आपल्या नजरेसमोर आजही उभं असतं- नवे अर्थ हाती घेऊन! लक्षात येत असतं की, आपला बहुतेकांचा भोवताल वरवर सारखाच आहे, पण तरीही प्रत्येकाचं प्राक्तन निराळं, निर्णय निराळे, स्वीकार-नकार निराळे, कारण इथं प्रत्येक व्यक्ती दुसरीहून निराळी! स्वतंत्र! माणसाच्या जगण्यात प्रातिनिधिक असं काही नाही. अगदी आपणसुद्धा आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे असल्याचं अनुभवत असतोच की! जितकी आपली ’उमजण्या’ची ताकद मोठी, तितकं आपलं ’भंगणं’ अधिक! ’उमजून’ घेण्याच्या मनानं मांडलेल्या या खेळात म्हणूनच सोबत उरते ती फक्त एकटेपणाची तीप संवेदना! जाणिवेच्या अथांग आकाशात झेप घेऊ पाहणारा प्रत्येक हंस अकेला आहे, तो या अर्थानंच! वेगवेगळ्या माणसांचं वेगवेगळं, परंतु तरीही हे ’अकेलापन’ अधोरेखित करणार्या मेघना पेठेंच्या कथा.