-
Bibliophile (बिब्लिओफाइल)
एकोणिसाव्या शतकातले प्रख्यात विचारवंत लोकहितवादी यांनी लिहून ठेवलंय, की "सध्या समाजात नुसती पुस्तकं जमा करून संग्रही ठेवणाऱ्या माणसाला विद्वान समजलं जातं, पण विद्वत्ता येण्यासाठी ती वाचावीही लागतात ही गोष्ट ते विसरलेले दिसतात." "बिब्लिओफाइल' या पुस्तकाचा लेखक हा पुस्तकांचा संग्रह तर करतोच, पण ती वाचतोही, आणि त्यांच्याविषयी वाचकांशी संवादही साधतो. गणेश मतकरी हे समकालीन मराठी साहित्यातलं महत्त्वाचं नाव आहे. 'बिब्लिओफाइल' या पुस्तकात त्याचा एक वेगळा पैलू आपल्यासमोर येतो. हे लेखन म्हणजे वाचनसंस्कृतीबद्दल आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टींचं एक अचंबित करणारं कोलाज आहे. आजवर आपण वाचलेल्या, अनुभवलेल्या गोष्टींची देवाणघेवाण गणेश या लेखांमधून करतो ती अगदी सहजपणे, गप्पा मारल्यासारख्या शैलीत, पण त्यामागे असणारी त्याची साहित्याकडे पाहण्याची अभ्यासू वृत्ती आपल्याला सतत जाणवत राहते. असंख्य वाचनीय पुस्तकांशी आपली ओळख करून देणाऱ्या पुस्तकाच्या निर्मितीचं मूळ या वृत्तीमध्येच आहे. 'बिब्लिओफाइल' ही एका प्रचंड ग्रंथसंग्रहातून फिरवून आणणारी राइड आहे, एकाच वेळी आनंद देणारी आणि विचारही करायला लावणारी.
-
Free Fall (फ्री फॉल)
Free Fall - फ्री फॉल गणेशची कथा वास्तववादी, आधुनिकोत्तर, महानगरी अशा कोणत्याही एका डब्यात बंद करता येत नाही, हे तिचं महत्वाचं वैशिष्ट्य. या कथेत आशयाच्या अनुषंगाने काही सामाजिक मुद्दे येत असले तरी ही कथा हल्ली प्रतिष्ठित असलेल्या सामाजिक वास्तववादापासून दूर आहे. तिला कल्पनाशीलतेचं वावडं नाही. पण मानवी आयुष्य आणि त्याच्यावर परिणाम करणारे विविध घटक या कथांच्या आशयाच्या केंद्रस्थानी आहेत. या कथांचे ताणेबाणे अशा घटकांच्या ताणातून आणि सैलावण्यातून विणले गेले आहेत.
-
Love In The Time Of Corona (लव्ह इन द टाइम ऑफ करोन
Neeraja/ Ganesh Matkari/ Shreekant Bojevar/ Hrushikesh Palande/ Pranav Sakhadev/ Pravin Dhopat/ Manaswi Lata Ravindra/ Paresh Jayshree Manoharएका अदृश्य व्हायरसने अख्ख्या जगाचा कब्जा घेतला. सगळंच एकदम स्टॅच्यू होऊन गेलं... Standstill ! या अस्वस्थ वर्तमानामध्ये चहूकडे मरणाची दाट छाया पसरलेली असताना मनं कासावीस झाली. प्रेमाचा अंकुर मात्र सोशलडिस्टन्सिंगचा मुलाहिजा न पाळता बेभान पसरत गेला. सगळं जितकं जास्त बंद बंद होत गेलं तितकं कुणीतरी जास्त जवळचं असावं असं वाटू लागलं. या करोनाकाळात वेगवेगळ्या नात्यांमध्ये फुलणारं प्रेम हेच आता नव्याने जगण्याची उमेद देईल! ८ लिहिते लेखक.... त्यांच्या खास ८ कथा... कथा नव्याने फुलणाऱ्या प्रेमाच्या... शेवटच्या भेटीच्या..... गावाकडच्या ओढीच्या.... साठीत गवसलेल्या प्रेमाच्या.... करोनाच्या पार्श्वभूमीवर `प्रेम' ही संकल्पना कवेत घेणाऱ्या कथांचा संग्रह... लव्ह इन द टाइम ऑफ करोना!
-
Film Makers (फिल्म मेकर्स)
गणेश मतकरीची समीक्षणाची पद्धत अभ्यासपूर्ण आहे. त्याचबरोबर चित्रपटतंत्रातल्या शब्दांचा अतिवापर करून येणारा क्लिष्टपणाही त्याच्या शैलीत नाही. त्याची भूमिका ही वाचकांच्या, एका रसिक चित्रपटप्रेमी मित्राची आहे. हा मित्र वाचकांपर्यंत न पोचलेले चित्रपट पहातो, प्रत्यक्ष चित्रपटांमधून आणि इतर वाचनातून त्या दिग्दर्शकांचा अभ्यास करतो आणि वाचकाला त्या चित्रपटाविषयी आणि दिग्दर्शकाविषयी कुतूहल निर्माण व्हावे- बघण्याची दृष्टीही उमजावी अशी त्या अभ्यासाची मांडणी करतो. त्यामुळे सरावाच्या चित्रपटांबाहेर न पहाणार्या वाचकाला नव्या नजरेने या माध्यमाकडे पहायला लावणारं हे लिखाण आहे. म्हणून मला ते महत्त्वाचे वाटते. त्याच्या पहिल्याच पुस्तकात त्यानं हे साध्य केलं आहे. याबद्दल त्याचं विशेष अभिनंदन. -सुमित्रा भावे