-
Urmi (उर्मी)
साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या या कथासंग्रहात गेल्या 50 वर्षांत प्रसिद्ध झालेल्या कथांमधून 25 कथा निवडण्यात आल्या आहेत. या मंडळाने यापूर्वी "स्त्री साहित्याचा मागोवा' घेणारा खंड प्रसिद्ध केलेला आहे. त्यानंतर "भारतीय भाषांतील स्त्री साहित्याचा मागोवा' हा खंड प्रसिद्ध केला. मंडळाचा "ऊर्मी' हा प्रातिनिधिक असा कथासंग्रह लक्षणीय असा आहेच, पण अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. मुक्ता दीक्षित, शांताबाई किर्लोस्कर यांच्यापासून आताच्या लेखिका लीना दामले यांच्यापर्यंतच्या अनेक सिद्धहस्त लेखिकांच्या कथा निवडणे अवघड काम होते. पण प्रत्येक कथा योग्यपणे निवडून हा संग्रह सिद्ध झाला आहे. या कथांमधून गेल्या 50 वर्षांतील महाराष्ट्राचे बदलते समाजजीवनच समोर येते.