-
Ashwathama (अश्वत्थामा)
बा अश्वत्थामा, माणसानी आत्तापर्यंत अपार दुःख भोगले आहे. आजवरच्या मानव जातीच्या इतिहासात, किती तरी युद्धे लढाया झाल्या, किती तरी अश्रू वाहून गेले आणि मोठा विनाशकारी आविष्कार या पृथ्वीतलावर अवतरला. पण अजूनही आपण युद्धाला, हिंसेला, संघर्षाला नकार देत नाही आहोत, ही वस्तुस्थिती आहे. अरे अश्वत्थामा, सर्वांचे दुःख एकच आहे. माझं दुःख, तुझं दुःख वेगवेगळं नाहीये! अखिल मानवजातीचं दुःखं एकच आहे. मी म्हणजेच ही पृथ्वी आहे, मी म्हणजेच हे जग आहे! अखेरीस संपूर्ण मानव जातीचे मानसिक जग हे एकच असते! मानवाच्या विघातक वृत्ती महाभारतकालात जेवढ्या अस्तित्त्वात होत्या, तेवढ्या आजही आहेत. तू अत्यंत मूर्खपणाने, पित्याने तुला सावध केले असतानाही, सूड-वैर भावनेच्या भरात, ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि पांडवांच्या कुळाचा नाश करायला निघालास ! दुर्योधनाने मोठ्या हट्टाने युद्ध आपल्या अंगावर ओढून घेतले आणि स्वतः बरोबरच सर्वांना खाईत लोटले. आश्रितपणाच्या भावनेने कौरव-पांडवांच्या युद्धात, तू आणि तुझा पिता सामील झालात! कुरूकुलाचा नाश झाला. युद्धाने तू मात्र तुझ्या पित्याला गमावलेस आणि अंगावर वासुदेवाचा शाप ओढून घेतलास! द्रुपद-द्रोण यांच्या सूडचक्राचाही तू एक भाग झालास ! सतत द्वेष-सूड-दुष्ट शक्ती तसेच वैर यांच्या सोबतीत राहिल्यामुळे, तुझ्या मागे उभ्या असलेल्या विनाशाने तुझ्यावरच झडप घातली. म्हणून कित्येक हजार वर्षे, तू तुझे शापित चिरंजीवित्व सांभाळत, या पृथ्वीवर वणवण फिरतो आहेस. फिरणार आहेस!' व्यासमुनी
-
Abhinay Sadhana An Actor Prepares (अभिनय साधना ॲन ॲक्टर प्रिपेअर्स)
मॉस्को आर्ट थिएटरची स्थापना करणारे निर्माता-दिग्दर्शक कॉन्स्टिन्टिन स्टॅनिस्लाव्हस्की यांनी अभिनयाचा व नाट्यप्रक्रियेचा सखोल विचार मांडला. नटांनी पात्रे सजीव करावीत, नाटक करताना आपण अभिनय करीत नसून प्रत्यक्ष ते जगतो आहोत, इतका अभिनय स्वाभाविक व वास्तव असणार्या नटांनी भर द्यावा, असे स्टॅनिस्लाव्हस्कींचे सांगणे होते. ‘अभिनय साधना’ या ग्रंथात त्यांचा अभिनय कलेविषयी सर्वांगीण विचार समाविष्ट झाला आहे. या विचारांनी पुढे जगभरातील नाट्य परंपरेत-स्वरुपात मूलगामी बदल घडवून आणला. व्यक्तिरेखांमधील बाह्यवर्तन आणि अंतर्मनाचा शोध घेणं, स्टॅनिस्लाव्हस्कीला निकडीचं वाटू लागलं! कुठलीही भूमिका रंगमंचावर वठविण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी वा त्याचा पुरेसा रियाझ, हा अभिनेत्याला करावाच लागतो. या रियाझामध्ये संपूर्ण शरीराचा वापर कसा करायचा, शरीराच्या विशिष्ट हालचाली (देहबोली) कशा आणि कितपत करायच्या, हे अभिनेत्याला समजून घ्यावेच लागते. इतकेच नाही तर, शब्दांची निवड, त्याचे उच्चारण, गायनाचा पुरेसा सराव, चेहर्यावरील हावभाव (एक्सप्रेशन) तसेच स्वतःवरचे संपूर्ण नियंत्रण... या आणि या सारख्या गोष्टी नटाला आत्मसात कराव्या लागतात. यातही अभिनय करताना आपला आविर्भाव, अभिनिवेश आणि प्रकट होणारा भूमिकेचा (प्राण)‘मी’पणा व त्याचा विस्तार यांचे भान व जाण असणे, अभिनेत्याला अत्यंत आवश्यक आहे, असेही तो सांगतो. एकूणच, नाटकातून साधेपणा आणि प्रसंगातील वास्तवता व्यक्त होण्यावर स्टॅनिस्लाव्हस्कीचा भर होता. सर जॉन गिलवुड, इज्युइन वख्तांगोव्ह यांच्यासारखे अभिनेते या पद्धतीने प्रभावित झाले. फक्त नाट्याभिनय नाही, तर चित्रपटातील अभिनयासाठीसुद्धा स्टॅनिस्लाव्हस्की पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला. याची मोठी साक्ष मार्लन ब्रँन्डो, रॉबर्ट डी निरो, अल पचिनो व भारतातील स्मिता पाटील, नसिरुद्दीन शहा, ओम पुरी या सारखे अभिनेते देतात.
-
Reminiscences Of A Stock Operator (रिमिनिसन्स ऑफ ए स्टॉक ऑपरेटर)
गेल्या शतकातील अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध शेअर ट्रेडर आणि गुंतवणूकदार तसेच शेअर विश्वातील सुरक्षा विश्लेषक, जेसी लिव्हरमोर यांच्या आर्थिक जीवनाचा अत्यंत मनोरंजक आणि नाट्यमय अनुभव, स्मृती रुपात स्टॉक ऑपरेटरच्या आठवणी या व्यावसायिक अभिजात ग्रंथात आपल्याला आढळतील. एकूणच, लिव्हिरमोरच्या वॉल स्ट्रीटवरील संपूर्ण आर्थिक प्रवासाचा आढावा प्रस्तुत पुस्तकात तुम्हाला आढळेल. लिव्हरमोर यांना शेअर बाजारात अफाट कीर्ती लाभली! त्यांनी शेअर ट्रेडिंगमध्ये अनेक वेळा लाखो डॉलर्सची कमाई केली आणि गमावली देखील! एके क्षणी त्यांच्या वाट्याला दिवाळखोरीही आली. एके ठिकाणी ते म्हणतात ‘कोणत्याही शेअर ट्रेडरचे ध्येय नियमितपणे नफा मिळवणे, हेच असते. सातत्यपूर्ण विजेते असलेले शेअर ट्रेडर इतर सर्वांपेक्षा निश्चितच वेगळा विचार करतात. जे ट्रेडर्स इतरांच्या सल्यापेक्षा स्वत:च्या कृतींवर विश्वास ठेवून न डगमगता जे करायला हवे, ते करण्यावर भर देतात, तेच नेहमी यशस्वी होतात. शेअर मार्केटमधील शेअर्सच्या किंमती किती वेळात आणि कशा बदलतील, या विषयी कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. तुमचा अंदाज कधी खरा ठरेल आणि कधी तो फसेल, हे ही कोणी सांगू शकणार नाही. या सर्वांच्या पलीकडे तुम्हाला व्यावहारिक ज्ञान घेऊन पुढे चालत राहायचे आहे. जेणेकरून बाजारपेठेमध्ये अमर्याद वाव असलेल्या वातावरणात, तुम्ही स्वत:चं नुकसान करुन घेणार नाही. ट्रेडिंग ह्या विचारधारेचा अनुभव घेणे, हे तुमच्या दृष्टिकोनाचे, तुमच्या समजुतींचे, तुमच्या मनोवृत्तीचे तसेच तुमच्या मानसिकतेचे फलित आहे.’
-
Vidur (विदुर)
'हे विदुरा, धृतराष्ट्रादी कौरवपुत्रांच्या राज्यात राहूनही तू नेहमीच धर्मशीलतेने, मोठ्या नीतिमत्तेने जगलास! द्रौपदी वस्त्र हरणाच्या प्रसंगी, इतर सारे ज्येष्ठ तोंड बंद करून बसलेले असताना, तू मात्र धृतराष्ट्राला, दुर्योधन- दुःशासनाला स्पष्टपणे आणि थेट बोललास! तू नेहमीच सत्याची बाजू घेतोस. प्रांजलतेची तू मूर्तीच आहेस. तू कधीही आणि केव्हाही कौरव आणि पांडव यात भेद केला नाहीस. गांधारीने आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली असेल, पण तू, व्यासांच्या आदेशानुसार धृतराष्ट्राच्या सावलीत, सताड डोळे उघडे ठेवून त्याच्या सोबत राहतो आहेस. धृतराष्ट्राप्रमाणं कुंतीचीही तू अगदी मातापित्यांप्रमाणं काळजी घेतो आहेस. तू नेहमीच राजाला योग्य आणि नेमका सल्ला देत आलास ! मुख्य म्हणजे, महामंत्री या नात्याने तू आपला राजधर्म, स्वधर्म प्राणपणाने जपलास! सर्व प्रकारचे मिंधेपण तू नाकारलेस! दुर्योधन- धृतराष्ट्रानी तुला पांडवधार्जिणा म्हणून संबोधले, तरी तू कधीही पक्षपातीपणा केला नाहीस. तू सदैव ताठमानेने वावरलास ! खरोखरीच तू धन्य आहेस. कितीही आणि कसाही प्रसंग वा परिस्थिती आली, तरी तू आपला चांगुलपणा - भलेपणा, सात्विकता, साधेपणा, समंजसपणा, सत्यनिष्ठा, कर्तव्यपरायणता, सभ्यता कधीही आणि केव्हाही सोडली नाहीस. म्हणूनच तू मला आवडतोस!'
-
Sankshipt Ramayan Swarup Ani Kathashay (संक्षिप्त रामायण स्वरूप आणि कथाशय)
प्राचीन भारताच्या दोन हजार वर्षांपूर्वी रचलेल्या पहिल्या दोन महाकाव्यांपैकी वाल्मीकिरामायण हे आहे. दुसरे महाकाव्य महाभारत होय. कमीतकमी दोन हजार वर्षे भारताच्या राष्ट्रीय, सांस्कृतिक वैभवाला या दोन महाकाव्यांनी शोभा आणली आहे कारण विविध आकृतिबंध असलेल्या साहित्यसंपदेच्या निर्मितीचे ही दोन महाकाव्ये मूलस्त्रोत बनले आहेत. संस्कृतमधील काव्याच्या अभिजात आकृतिबंधाचा पहिला व उत्कृष्ट नमुना म्हणजे वाल्मीकिरामायण होय. रामायणाचे मुख्य महत्त्व म्हणजे ते उत्कृष्ट काव्य आहे. भारतीय आणि विशेषतः संस्कृत काव्यरचनेचा पहिला आदर्श म्हणून त्याला मान्यता मिळाली. वाल्मीकी मुनी हे आदिकवी ठरले. वाल्मीकी मुनीने नारदाला प्रश्न विचारला, की ‘या पृथ्वीमध्ये गुणसंपन्न, सर्वश्रेष्ठ, शूर, दृढव्रत, चारित्र्यवान कोण आहे?’ या प्रश्नाचे या त्रैलोक्यसंचारी देवर्षी नारदाने उत्तर दिले, की ‘इक्ष्वाकू कुलातील राम हा आदर्श पुरूष आहे. सुंदर मस्तक, भव्य ललाट, विशाल नेत्र, मध्यम उंचीचा, सर्व देहावर अवर्णनीय कांती असलेला, विद्यापारंगत, राजनीतिज्ञ, सज्जनांचा संग्रह आणि दुर्जनांचा निग्रह करणारा, धर्म-अर्थ व काम या तिन्ही पुरुषार्थाचे योग्य पद्धतीने सेवन करणारा, प्रजाहितदक्ष व प्रजाजनांना अत्यंत प्रिय, देवासुरांना ज्ञात असलेली सर्व अस्त्रे जाणणारा व संग्रामात अजिंक्य, असा राम हा श्रेष्ठ पुरूष होय.’
-
Sankshipt Mahabharat (संक्षिप्त महाभारत)
श्रेष्ठ साहित्य हे संस्कृतीचं आधारतत्त्व असतं, कारण ते संस्कृतीवर पसरणार्या कालिक तवंगाशी नव्हे, तर तिच्या मूलभूत मूल्याशी बांधलेलं असतं! महान लेखक-कवी अशा मूलभूत मूल्यांचा शोध घेणारे मानवी जीवनाचे भाष्यकार असतात. तमाचं आकलन आहे, पण ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ ही त्यांची प्रतिज्ञा आहे. सैतान अनेक लढाया जिंकतो, पण अखेर युद्ध जिंकतो तो परमेश्वर, हा त्याचा सांगावा आहे. पृथ्वी नामक ग्रहावर वावरणार्या माणसाला दिलेलं हे आश्वासन आहे’, असे वि.वा.शिरवाडकर म्हणतात. महान विदूषी दुर्गाबाई भागवत तर म्हणतात, ‘महाभारतासारखी महान प्रगल्भ तसेच श्रेष्ठ कलाकृती आपल्या जनसामान्यांच्या समाज-संस्कृतीचा अत्यंत अविभाज्य व अभिमानास्पद भाग झाली आहे. त्यातील वासुदेवाची भगवद्गीता तर आपल्या जीवनाची मार्गदर्शिका झालेली आहे. व्यासांसारखा प्रगल्भ प्रतिभेचा ग्रंथकार शतकाशतकांतून वाहत आणि विकसित होत चाललेल्या वैचारिक, तात्विक व भावनिक सूत्रबंधांशी स्वतःला असा निःसंदिग्ध गोवून टाकतो. त्यावेळी कळतनकळत साहित्यपणाचे-काव्याचे त्रिकालतीर्थच सहजपणे आकाराला येते. मानवी जीवनाचे महावस्त्र हे, अटळ यातना दुःख, सचेतनत्व आणि परस्परमैत्र या तिहेरी धाग्यांनी अतूट पण अत्यंत व्यामिश्रतेने गुंफले गेलेले आहे. वनवास-अज्ञातवास तसेच जीवनातील अनंतमयी दुःखाचे, सूडाचे, शापवचनांचे तसेच स्वरूप आणि विश्वरूप यांच्या प्राणबंधाचे सौभाग्य-तत्त्वदर्शन महाभारतासारख्या महान कलाकृतीत ठायी ठायी आढळते’.