Tawala Aavade Vidamban (टवाळा आवडे विडंबन)
श्री. अरविंद बुधकर यांचा 'टवाळा आवडे विडंबन' हा एक विडंबन कवितासंग्रह आहे. त्यात एकूण ६७ रचना आहेत. विडंबन म्हणजे वक्रोक्ती. आशय, विषय किंवा शैली ह्या विशेषांचा उपरोध, उपहासात्मक निर्विष विपर्यास येथे आहे. त्यात निव्वळ थट्टा आहे. विधायक टीकेच्या स्वरूपाची अनुकरणात्मक नक्कल म्हणजे ही विडंबने आहेत. विकृतानुकरण हा त्यांचा गाभा आहे. अहिंसात्मक वध हे 'टवाळा आवडे विडंबन'चे वैशिष्ट्य आहे. जे विषय सर्वश्रुत परिचित आहेत त्याबाबत श्री. बुधकरांची शैली आकर्षक आहे. कोणत्याही संकेतांचा अतिरेक त्यांच्या विडंबनाला जन्म देतो. त्यातून शब्द, रूप, आशय, विषय आणि लकबी यांची विडंबने उद्भवतात. तसे पहाता विडंबने ही सामाजिक जाणीवेची कृती आहे. म्हणून त्यात व्यक्ती, संस्था, अश्लाघ्य राजकारण इत्यादींचे वैयक्तिक, सामूहिक स्वरूपाचे प्रतिबिंब उमटते. मिश्किलीचे तंत्र श्री. अरविंद बुधकर यांना उत्तमरित्या अवगत आहे. ते कुणालाही दुखवत नाहीत, हसवितात मात्र नक्की. सर्वज्ञात गोष्टींचा अतिरेक जो 'दोष' आहे त्याचे अतिशयोक्ती रुपांतर म्हणजे हे दर्शन आहे. एकप्रकारे ही 'शब्दप्रधान व्यंगचित्रे'च आहेत. ती प्रासंगिक आहेत. विडंबन वाङ्मयाच्या इतिहासात श्री. अरविंद बुधकर यांचे 'टवाळा आवडे विडंबन' शोभून दिसणारे आहे. अंतर्मुख करणारे आहे. मी त्यांना सुयश चिंततो.