Amerikechi CIA (अमेरिकेची सी.आय.ए)
भारतात एखादा दहशतवादी हल्ला झाला की त्याचे खापर भारतीय गुप्तचर संस्थांवर फोडले जाते. यावरूनच देशाच्या गुप्तचर संघटनांचे महत्त्व अधोरेखित होते. येथे काम करणाऱ्या व्यक्तींवर या संस्थेचे अस्तित्व अवलंबून असते. अमेरिकेच्या सी.आय.ए. या गुप्तहेर संघटनेचे मोठे वर्चस्व आहे. जगावर आपला दबदबा प्रस्थापित करणाऱ्या अमेरिकेच्या मागे सी.आय.ए. ही त्यांची गुप्तचर संस्था असल्याचे मानले जाते. जगभरात आपल्या हेरगिरीचे जाळे पसरविलेल्या या गुप्तचर संस्थेची माहिती, तिची कार्यपद्धती याचा आढावा पंकज कालुवाला यांनी ‘अमेरिकेची सी.आय.ए.’ या पुस्तकात घेतला आहे. ही संस्था सुरू होण्यामागची करणे, स्थापना आणि तिचा विकास व या संस्थेत काम करणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेल्या कार्याविषयीचा आढावा लेखकाने घेतला आहे. या संस्थेने भारतात केलेल्या गुप्त कारवाया, विविध देशांमध्ये केलेल्या कारवाया, या संस्थेत असलेल्या स्त्रियांच्या कार्याचा आढावाही लेखकाने घेतला आहे. हे पुस्तक वाचताना माणसाच्या बुद्धिमत्तेने, त्याच्या कार्यशक्तीने अचंबित व्हायला होते. या संस्थेविषयी वाचताना जागतिक राजकारण व त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी उलगडत जातात.