Himalyatil Tera Mahine (हिमालयातील तेरा महिने)
माझ्या हृदयामध्ये अतोनात आनंदाची भावना येण्यासाठी फक्त तिथली विलक्षण शांतत्ता कारणीभूत नव्हती, याचं खरं कारण होते स्वातंत्र्य, मी आता माझ्या आजूबाजूच्या लोकांशी बांधील नव्हतो किंवा मी त्या सांसारिक बेड्यांनी जखडलेलोही नव्हतो, ज्या सतत तुम्हाला या जगाप्रमाणे वागण्यासाठी प्रवृत्त करत असतात. कोणतंही सांसारिक बंधन नाही. सादरीकरण नाही, समयसीमा नाहीत, टार्गेट, मीटिंग यापैकी काहीही नाही. असाल फक्त तुम्ही आणि तुमचं स्वतःच जग. अर्थात, स्वातंत्र्य हे फक्त माझ्या आनंदाचं कारण नव्हतं किंवा ते माझ्या आनंदाला चिरकाल टिकवू शकणार नव्हतं. मला वाटते, याचं मुख्य कारण होतं माझ्यामध्ये असलेली आशा. दिव्य माता खरोखरच आहे. यावर माझा विश्वास होताच, याचबरोबर ती मला भेटेल यावरही माझा ठाम विश्वास होता. मला आशा होती की, मी दिवसरात्र तिची साधना करेन आणि एक दिवशी ती माझ्यासमोर प्रगट होईल. आपल्या धर्मग्रंथांमध्येही हेच सांगितलं आहे.