-
Spy Stories -Terror In Islamabad (स्पाय स्टोरीज -ट
टेरर इन इस्लामाबाद पाकिस्तानातल्या भारतीय दूतावासात सांस्कृतिक अधिकारी म्हणून काम करताना वीरसिंग भारताचा गुप्तचर एजन्ट म्हणूनही काम करत असतो . वीरसिंग एजंटकडे गुप्तचर विभागाने सीक्रेट मिशन सोपवलेलं असतं . तो ते फार सावधपणे पार पाडत असतो… आता त्याची भारतात परत जाण्याची वेळ जवळ येऊन ठेपलेली असतानाच… अचानक एका रात्री त्याला पकडण्यात येतं… पाकिस्तानच्या इंटेलिजन्स अधिकाऱ्यांकडून ही कारवाई झाली असते ! तिथून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रश्नच नसतो, प्रश्न असतो तो दुश्मनांच्या त्या प्रदेशात वीर आपली गुपितं , माहिती आणि सोर्सेस यांचं संरक्षण कसं करणार ? तो त्यात यशस्वी होणार का ? थरारक आणि स्वानुभवातून उतरलेली इंटेलिजन्स क्षेत्रातील खिळवून ठेवणारी कथा… टेरर इन इस्लामाबाद !
-
Bahar Manacha (बहर मनाचा)
आशावाद कसा जोपासावा? मानसिक ताण कसे हाताळावे? आपल्यातील सुप्त शक्ती कशी ओळखावी? आपल्या वागण्याचं विश्लेषण कसं करावं?
-
He Bandh Aathavaninche (हे बंध आठवणींचे )
काही नाती ही जन्मत:च मुरलेल्या स्वरूपात जुळली जातात. अगदी मुरांब्यासारखी! ही नाती ऊब, प्रेम किंवा मायेचा ओलावा अंगा-खांद्यावर घेऊनच आलेली असतात. विश्वासाचा भक्कम पाया असतो या नात्यांना! म्हणूनच कधी राग आणि गैरसमजुतीचं एखादं वादळ आलं आणि नात्यांचे धागे थोडे हेलकावले, तरी ते उसवत नाहीत किंवा तुटत नाहीत. कधी गोंजारून तर कधी फटकारुन ही नाती आयुष्य घडवणारे धडेही देत असतात. या नात्यांतून भरारी घ्यायला ऊर्जा मिळत असते आणि नंतर भरभरून कौतुकही मिळत असतं. आजोळची नाती ही अशी असतात, मग ती आईकडची असोत किंवा वडलांकडची! ‘आजोळचे दिवस’ या मालिकेत विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी याच नात्यांचे विविध पदर उलगडले आहेत. काही नाती असलेल्या नातेसंबंधांच्या पलीकडे जुळतात. या नात्यांत सखोलता असते आणि ही नाती आयुष्यभर अमीट ठसा उमटवून जातात. मालिकेतील या पुस्तकात अशाच काही नात्यांच्या आठवणी उलगडत आहेत…. गुलजार, सचिन तेंडुलकर, अभिषेक बच्चन, डॉ. पी. डी. पाटील, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, संजय राऊत, राजू परुळेकर, नितीन चंद्रकांत देसाई, सुशीलकुमार शिंदे, विनय सहस्रबुद्धे, अरविंद जगताप, प्रभा गणोरकर, मल्लिका अमरशेख, रश्मी कशेळकर आणि प्रगती बाणखेले ।
-
Chatur (चतुर)
चतुर खरंतर गोष्ट आहे तशी साधी… एका नवख्या लेखकाची इच्छा असते की, मरण्याआधी त्याने लिहिलेल्या गोष्टींचं पुस्तक व्हावं. पण तसं काही घडत नाही, तो मरतो.. मग त्याची बायको ठरवते, आपण करू त्याची इच्छा पूर्ण ! आणि तिला सापडतात त्याने लिहिलेल्या आणखी काही गोष्टी…. आता काय? तिला पडतो प्रश्न. मूळ पुस्तकात या नव्या गोष्टी घालता घालता ती स्वत:देखील लिहू लागते…..! तर ही गोष्ट आहे तशी साधी – मरणाची… आठवणींची… प्रेमाची… बालपणाची…. वयात येण्याची… मोठं होण्याची… तिची… त्याची…. आणि काडेपेटीत अडकलेल्या एका चतुराची…!
-
Shikharratna Kanchanjunga (शिखररत्न कांचनजुंगा)
शिखररत्न कांचनजंगा जगभरातल्या गिर्यारोहकांना खुणावणारं शिखर…. त्याचं दर्शन विलोभनीय खरं , पण ते सर करणं तितकंच खडतर , तितकंच आव्हानात्मक… ‘गिरिप्रेमी’च्या दहा गिर्यारोहकांनी हेच आव्हान स्वीकारलं आणि मोहीम फत्ते केली ती अनेक विक्रम नोंदवत! त्यासाठी शारीरिक, मानसिक, आर्थिक तयारी करण्याबरोबरच विजीगीषु वृत्तीही ठेवायची होती. ही गोष्ट साहसी वृत्तीची जशी, तशीच ती अपार मानवतेचीही आहे आणि निसर्गसंवर्धनाच्या जागरुकतेबद्दलचीही आहे. पुस्तकात या थरारक मोहिमेचं रोचक वर्णन केलं आहे ते, निष्णात गिर्यारोहक भूषण हर्षे आणि मोहिमेचे नेते ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी. साहसी आणि विक्रमी मोहिमेची गोष्ट …. ‘शिखररत्न कांचनजुंगा!”
-
Dimitri Riyaz Kelkarchi Goshta (दिमित्री रियाझ केळ
प्रणव सखदेव हे समकालीन मराठी कथेला आपल्या वेगळ्या आशयाविष्काराने नवे परिमाण प्राप्त करून देणारे महत्त्वाचे कथाकार आहेत. या संग्रहातल्या त्यांच्या कथा गोष्टी सांगण्यातली सहजता घेऊन येतात. त्या मराठीतील रूढ मध्यमवर्गीय कथेला छेद देत, या जगण्यातील दाहकता आणि अंतरंगातील तळकोपरे धुंडाळत जीवनाशयाला वैशिष्ट्यपूर्ण आयाम मिळवून देतात, बाजारू काळातील अस्थिरतेच्या जीवघेण्या वास्तवाला चित्रित करतात. दांभिकता, हिंस्रता आणि हतबलता यांसह समाजकेंद्रित आणि श्रमिकांशी जोडलेपणातून येणारा अपराधभावदेखील या कथांमधून दिसून येतो. मराठी कथासाहित्यात मध्यमवर्गीयांची कथा हा अलीकडे हेटाळणीचा विषय झाला होता. परंतु या कथा मध्यमवर्गीय जगण्यातील नेमके कंगोरे वास्तव-कल्पितातून उजागर करतात. समकाळाने प्रभावित केलेल्या मानवी जीवनाच्या अनेक मिती या कथनऐवजातून साकार होतात. व्यवस्थेचे अजस्त्र रूप आणि मानवी जीवनानुभवाची क्षुद्रता आकळल्याने सखदेव वास्तवाला अनेक कोनांतून प्रक्षेपित करण्यासाठी या कथांचा वापर करतात. त्यामुळे या कथा एकरेषीयता ओलांडून अनेक दिशांचे पसरलेपण घेऊन येतात. मानवी जीवनाच्या जाणीव-नेणिवांचा शोध घेत या पसरलेपणात समाजभान व्यक्त करणं हे सखदेव यांच्या कथेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट या संग्रहातून पुढे येते.” – दत्ता घोलप
-
Emozeal (इमोझील)
मनोबल उंचावणाऱ्या कथा करोनाच्या संकटकाळात जागतिक स्तरावरील मानवी जीवनाला एक नवीन वळण मिळाले . सर्व स्तरांतील जनतेपुढे नवी आव्हानं उभी राहिली. आणि त्याचबरोबर जीवनातील प्रत्येक आव्हान हे आत्मपरीक्षणाची एक संधी असते , हेही या काळात प्रकर्षाने जाणवून गेलं . जगातील जवळपास प्रत्येक व्यक्तीने कमी अधिक प्रमाणात मानसिक दोलायमान स्थिती अनुभवली. सामान्य दिसणाऱ्या लोकांनी ह्या असामान्य परिस्थितीला कसे तोंड दिले , अडखळत , धडपडत का असेना , पण या काळात त्यांनी नव्या दिशा शोधल्या , असे सर्व दर्शविणाऱ्या कहाण्या म्हणजेच ‘ इमोझील ‘ अर्थात मनोबल उंचावणाऱ्या कथा. वैद्यकीय सल्लागार डॉ . महेश अभ्यंकर आणि मानसिक विकास सल्लागार आरती भार्ज ह्यांनी ह्या काळात केलेल्या समुपदेशनावर आधारित या बारा कथा आहेत . या कहाण्या कुठल्याही कठीण काळात मार्गदर्शक ठरतील अशा आहेत . SP ह्या कथांतील पात्रांकडून तुम्हाला नवी उमेद , आयुष्य जगण्यासाठी नवीन दिशा मिळत राहील . नवनिर्माण करण्याची शक्ती आपल्याकडे आहे याची जाणीव होईल.’ आपल्यातील सुप्त मानसिक बळ ओळखा आणि सजगतेने कार्यरत राहा …. ‘ हेच सूत्र आपलं मनोरंजन करता करता सांगणारा कथासंग्रह ‘इमोझील’. आयुष्य एक निरंतर प्रवास, आशा, अपेक्ष, भावना आणि भास एक दिवस सूर्योदय आपला असेल मनात ठेवावा नेहमी हा विश्वास!
-
Rojgarnirmitchi Disha (रोजगारनिर्मितीची दिशा)
दिवसेंदिवस वाढत चाललेली बेरोजगारी रोजगार कमी होत गेल्यास आर्थिक विषमता ही आज देशापुढची एक गंभीर समस्या …. वाढीला लागणार आणि आर्थिक विषमता वाढली की सामाजिक प्रश्नही निर्माण होणार , यावर उपाययोजना करून रोजगारनिर्मिती वाढीस कशी लागेल याचा ऊहापोह या पुस्तकात आनंद करंदीकर अभ्यासपूर्णरित्या करतात. बेरोजगारीची आर्थिक सामाजिक – राजकीय कारणं , बेरोजगारीचे दुष्परिणाम याचं सरधोपट विश्लेषण न करता , अर्थशास्त्रीय सिध्दांतांचा आधार घेत करंदीकर विषयाची मांडणी करतात . सोप्या भाषेत कधी कवितांचा आधार घेत ते वस्तुस्थितीचं आकलन करतात . शिक्षण , आरोग्य , शेती , बांधकाम , हरित उद्योग , हस्तव्यवसाय , छोटे उद्योग अशा विविध क्षेत्रांत तब्बल ३ कोटी ६० लाख रोजगारनिर्मिती होण्यास देशात वाव आहे , हे ते साधार पटवून देतात . संख्याशास्त्रीय पध्दतीने आखणी केल्यास रोजगारनिर्मितीचं उद्दीष्ट आपण गाठू शकतो याचा ते विश्वास देतात . विविध तक्ते , आलेख यांच्या साहाय्याने ते विषयाची उकल सोप्या रितीने करतात. हे पुस्तक एम.पी.एस.सी. , यू.पी.एस.सी. च्या विद्यार्थ्यांनाही अतिशय उपयोगी ठरणार आहे. सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या एका ज्वलंत समस्येची गंभीरपणे दखल घेत , त्यावर शास्त्रीय पध्दतीने उपाययोजना सांगणारं पुस्तक …
-
Mitta Kalokh...Lakkha Ujed (मिट्ट काळोख... लख्ख उज
उजड काळोख्या वाटेवरून प्रवास करता करता प्रकाशाचे किरण दिसू लागतात काय आणि तो प्रवास एक एक अकल्पनीय वळसे घेत घेत उजेडाकडे झेपावतो काय…. लहानपणापासून दत्ता श्रीखंडेला असलेल्या व्रात्य सवयी अधिक व्रात्य संगती … त्याला जोड दुर्दैवी प्रसंगांची आणि प्रतिकूल परिस्थितीच… मग घरून पळून जाणं, कमाईसाठी लहान-सहान कामं करणं , तिथले खचवून टाकणारे अनुभव घेणं हे सर्व अपरिहार्यपणे आलंच. त्यातूनच मग दत्ता अवैध धंद्यांतील नोकरीत गुरफटत जातो आणि नकळतपणे अधोविश्वात प्रवेश करतो. चोऱ्या, पाकीटमारीचे धंदे, दारू – गर्दच्या व्यसनांचा विळखा, जेलच्या वाऱ्या अशा न संपणाऱ्या दुर्दैवी फेऱ्यांत दत्ता अडकून जातो . काळोख्या गल्ल्यांमधून प्रवास करता करता मिट्ट काळोखाच्या हमरस्त्यावर जाऊन पोचतो… पण एके दिवशी त्याला’ मुक्तांगण’ नावाचं मोकळं पटांगण सापडतं… आणि त्याला स्वतःमधल्याच नवीन दत्ताचा शोध घेण्याची संधी मिळते. मग सुरू होतो लख्ख उजेडाकडे जाण्याचा त्याचा प्रवास ! थक्क करणारी आत्मकथा – मिट्ट काळोख … लख्ख उजेड !
-
Koos (कूस)
ऊस तोडणीसाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांमध्ये निम्मे प्रमाण महिलांचे आहे. एक जोडप्याचा मिळूनच 'कोयता' होतो. ऊस तोडणीच्या काळात पाळीच्या दिवसातही महिला कष्टप्रद काम करतात. पाळीची कटकट नको म्हणून गर्भाशय काढून टाकण्याचा दु:सह मार्ग असंख्य महिलांनी असहायपणे स्वीकारला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्व यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. ऊस तोडणी करणाऱ्या महिलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला. या महिलांनी जे भोगले, ज्या भोगत आहेत त्याचे यथार्थ चित्रण 'कूस' या कादंबरीत आले आहे. हा विषय कथात्म साहित्यात आणताना ज्ञानेश्वर जाधवर यांनी आपल्याकडील अनुभवांचे आंतरिकीकरण करून तपशीलांना सघन असा अर्थ प्राप्त करून दिला आहे. या कादंबरीत सुरेखा या व्यक्तिरेखेचा संघर्ष प्रभावीपणे आला आहे. एका अर्थाने अशा असंख्य सुरेखा जगण्याच्या चरकात पिळून निघतात आणि त्यांच्या आयुष्याचेच चिपाड होते. एका सुरेखाची ही प्रातिनिधिक कहाणी म्हणजे जणू राबणाऱ्या बाईच्या वाट्याला आलेल्या अंतहीन यातनांचे दर्शन आहे. जिथे कादंबरी संपते तिथून ती वाचकांच्या मनात सुरू होते. आपल्याकडे स्थित्यंतरासाठी सुद्धा 'कूस बदलणे' हा शब्दप्रयोग केला जातो, तो किती सार्थ आहे !
-
Diabesity Thopavanyasathi (डायबेसिटी थोपवण्यासाठी)
‘डायबेसिटी’ हा शब्द आपण ऐकला आहे का? बहुतेक नसावा…. सर्वसामान्यांच्या आज दोन प्रमुख आरोग्य समस्या म्हणजे डायबेटिस (मधुमेह) आणि ओबेसिटी (स्थूलत्व)… या दोन्ही समस्या अनेक वेळा एकमेकांशी निगडित असतात, मग या दोन समस्यांच्या नावातून जगभर नवी संज्ञा निर्माण झाली…’डायबेसिटी’! आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मुंबईस्थित मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदीप तळवलकर यांनी नेमक्या याच आरोग्य समस्यांना केंद्रबिंदू मानून या पुस्तकाची रचना केली आहे. त्यातूनच पुस्तकाचं नामकरण झालं… डायबेसिटी थोपवण्यासाठी. पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्थूलता व मधुमेह टाळण्यासाठी किंवा त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी केलेलं मार्गदर्शन. त्याचप्रमाणे पुस्तकात मधुमेहाची सर्वसाधारण माहिती ते ‘लेटेस्ट’ उपलब्ध माहिती दिली असून त्याबरोबर आहार नियोजन, व्यायाम, औषधोपचार आणि इतर सर्व मार्गदर्शनही केलं आहेच. एक अत्याधुनिक व परिपूर्ण मार्गदर्शक पुस्तक डायबेसिटी थोपवण्यासाठी.
-
Mein Freund (माईन फ्रॉईन्ड)
माइन फ्रॉईन्ड डोळ्यासमोर प्रसंग जिवंतपणे उभे करण्याची विलक्षण ताकद … वाचकाला खेळवत ठेवणारी लेखनशैली… भन्नाट तरीही उत्कटतेने भारलेली कथानकं… वावटळी व्यक्तिरेखा… अनंत सामंत या सर्व पैलूंचं कोलाज करून एकेक कथानक उभारतात… अशा सात कथांचं सुपर कोलाज म्हणजेच माईन फ्रॉईन्ड
-
Vishwamitra Syndrome (विश्वामित्र सिण्ड्रोम)
विसाव्या शतकाच्या अखेरीला जागतिकीकरण नामक काहीतरी झालं आणि त्याचे पडसाद समाजाच्या सर्व थरात उमटले. जग लहान झालं. इंटरनेटच्या माध्यमातून हव्या नको त्या बऱ्याचशा गोष्टी थेट आपल्या दारात येऊन पोचल्या आणि त्यांनी आपल्या जगण्याचं तंत्रच बदलून टाकलं. ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’मधल्या जोडकथा या अशा मोठ्या बदलाच्या साक्षीदार आहेत. वरवर पाहता त्या मुंबईनजीकच्या एका वस्तीत इंटरनेटवरून अवतरलेल्या पोर्नोग्राफीचा आणि त्यामुळे वरकरणी पापभीरू वाटणाऱ्या समाजातल्या विविध वृत्तीदर्शनाचा धांडोळा घेतात, पण प्रत्यक्षात तो त्यांचा केवळ एक पैलू आहे. तंत्रज्ञानापासून संगीतापर्यंत आणि राहणीमानापासून नातेसंबंधांपर्यंत आपला भवताल कसा बदलत गेला, याचं हे एकाच वेळी धक्कादायक तरीही गमतीदार असं दर्शन आहे. पंकज भोसले हा पत्रकार असण्याबरोबर सिनेमा आणि साहित्याचा चाणाक्ष अभ्यासक आहे, एका अस्वस्थ काळाचा निरीक्षक आहे. आणि त्याचं हे टोकदार निरीक्षण ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’मधल्या कथांना त्यांच्या साऱ्या विक्षिप्तपणासह जिवंत करतं.
-
Sanjivani (संजीवनी)
स्थलांतरित साहित्यिकांच्या या कथा - संजीवनीत आशय आणि अभिव्यक्तीचे अनेकविध आविष्कार आहेत. इथे भारत-पाक युद्धांच्या संदर्भातून काही कथा साकारतात, तर काही कथा दहशतवाद्यांच्या अनपेक्षित बंदिवासातल्या जुलमाच्या असह्य झळा किंवा रोजच्या आयुष्यात आतंकवाद्यांच्या अवतीभोवती वावरण्यातला चकवा दाखवून जातात. पिढ्यापिढ्यांतला अपरिहार्य संघर्षही कथाविषय होतो. कोणत्याही देशातल्या माणसाला भेडसावणाऱ्या लुकीमियापासून आल्झायमरपर्यंत आणि अंधत्वापासून अल्कोहॉलिझमपर्यंत अनेक आधीव्याधींचाही समाचार वेगवेगळ्या अंगांनी घेत काही कथा अवतरतात. समलिंगी जोडपी, मध्यवयीन स्थलांतरितांच्या जीवनातील अपरिहार्य असे विविध वंशातील मुलामुलींचे विवाह, आणि छुपा वंशविद्वेष असे विषयही या कथाकारांनी संवेदनशीलतेने आणि समर्थपणे हाताळलेले आहेत. वेश्याव्यवसायासारख्या किंवा अजाण बालकांच्या छळासारख्या गंभीर विषयांपासून अगदी बाहुलीच्या लग्नासारख्या हलक्याफुलक्या, खेळकर गमतीजमतींचीही इथे उपस्थिती आहे. काही कथा जीवन आणि मरण या सनातन विषयांना कवेत घेतात, तर आणखी काही कथा सत्यासत्यतेच्या सर्वच पातळ्यांवर मुक्त संचार करतात. ही कथावली पानोपानी प्रतिभेचे नवनवोन्मेष दाखवत राहते. वाचनीय, लक्षणीय आणि अविस्मरणीय अशा या कथांची ही संजीवनी आता तुमची आमची, सर्वांची मिरास आहे.
-
Ayodhya Te Varanasi (अयोध्या ते वाराणसी)
भारतीय जनता पक्षाचा सत्तेपर्यंत पोचण्याचा खऱ्या अर्थाने प्रवास सुरु झाला तो १९९० च्या ‘सोमनाथ ते अयोध्या’ रथयात्रेपासून… तेव्हा ‘भाजप’चं नेतृत्व होतं वाजपेयी अडवाणी यांच्याकडे. नंतर १९९८ पासून सहा वर्षं सत्तेवर राहिल्यानंतर २००४ साली ‘भाजप’ला सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं… आणि तेव्हापासून पक्षसंघटना ढवळून निघायला सुरुवात झाली . पुढे नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली अधिक आक्रमक होत , ‘भाजप’ ने २०१४ ची लोकसभा निवडणूक लढवली… आणि हा पक्ष पुन्हा सत्तारूढ झाला… व तेथून ‘भाजप २.०’ची सुरुवात झाली . २०१४ च्या निवडणूकीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मोदी यांनी ‘वाराणसी’ येथूनही लोकसभेची जागा लढवली आणि त्याच जागेचं प्रतिनिधित्व कायम ठेवलं… हा सर्व प्रवास ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी ‘दिसलं तसं… बघितलं जसं’ या शैलीत पुस्तकात मांडला आहे. पंचवीस वर्षांचा हा प्रवास सांगता – सांगता अकोलकर दीनदयाळ उपाध्याय, शामा प्रसाद मुखर्जी, जनसंघ… अशा पूर्वेतिहासाचाही आढावा घेतात आणि या सर्व प्रवासाचं वस्तुनिष्ठपणे विश्लेषणही करतात. भाजपच्या वाटचालीचा समग्रपणे मागोवा घेणारं मराठीतलं महत्वाचं पुस्तक… अयोध्या ते वाराणसी !
-
Ek Hoti Ritu (एक होती रितू)
रितू नंदा….. राज कपूरची लाडकी लेक आणि उद्योजक राजन नंदा यांची प्रिय पत्नी…. पण एवढीच होती का रितूची ओळख ? तर नाही… हे पुस्तक वाचल्यावर जाणीव होते की, रितूची ओळख कित्येक कोस या पलीकडची आहे. सुप्रसिद्ध संपादिका व लेखिका सत्या सरन यांनी रितूच्या आयुष्याचा धांडोळा रसाळ भाषेत सखोलतेने घेतला आहे. शिवाय त्यांनी रितूचे कुटुंब सदस्य, जवळचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, व्यवसायातले सहकारी, इलाज करणारे डॉक्टर्स आणि अनेक सुहृद यांना बोलतं करत तिचं असामान्य कर्तृत्व, व्यक्तिमत्त्वातले अनेक पैलू, स्वभावातल्या बारीक छटा यांचा उलगडा केला आहे…. यातूनच समजतं…. मृदु मनाची रितू एक उत्तम गृहकर्तव्यदक्ष गृहिणी तर होतीच; पण त्याचबरोबर ती स्वतः एक कल्पक व मेहनती उद्योजिका होती आणि कठीण प्रसंगांना धैर्याने भिडणारी, आयुष्याला सामोरी जाणारी कणखर स्त्री होती. तिचीच ही प्रेरणादायी कहाणी एक होती रितू…
-
Gothanyatlya goshti (गोठण्यातल्या गोष्टी)
गोष्टी सांगण्यापूर्वी… ‘….प्रत्येक गावात काही आख्यायिका आणि दंतकथा असतात . एक लेखक म्हणून या आख्यायिका मला भुरळ पाडतात . कोणताही लेखक त्याच्या कानावर पडलेल्या आख्यायिका निव्वळ कपोलकल्पित प्रदेशात राहू देत नाही . कधी चिमूटभर आशयाच्या सूतावरून कल्पनेचा स्वर्ग गाठत , तर कधी आशयाच्या स्वर्गात कल्पनेचं सूत कातत या आख्यायिकांना लेखक कागदावर उतरवत राहतो . कधी कल्पनेतल्या माणसांना तो खरेखुरे सदरे चढवतो . तर कधी खऱ्या मानवी स्वभावांना लेखक कल्पित नियती देतो . नाव , गाव , देश , वेष बदलत ही माणसं , या आख्यायिका मग सर्वदूर पसरत जातात आणि चिरायू होतात . ” गोठण्यातल्या गोष्टी’तली ही माणसं खरी असली नसली तरीही जन्मापासून ही माणसं माझ्यासोबत आहेत . या माणसांना आदि – अंत नाही. म्हणूनच ही माणसं स्वयंभू आणि चिरायू आहेत …..’
-
Story Tailor (स्टोरी टेलर)
स्टोरी’ टेलर’ हे पुस्तक म्हणजे एका मनस्वी दिग्दर्शकाचा सर्जनशील प्रवास होय. दिग्दर्शक म्हणून वीस वर्षांच्या कारकिर्दीत गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शित केलेल्या साठ चित्रपटांपैकी १२ निवडक चित्रपटांच्या निर्मितीमागच्या कथा हे पुस्तक सांगतं. कथालेखन, निर्मात्याचा शोध, कलाकार निवड, प्रत्यक्ष चित्रीकरण, संकलन, प्रसिद्धी अशा अनेक आघाड्यांवर चित्रपट दिग्दर्शकासमोर असलेली आव्हानं या पुस्तकातून आपल्याला समजतात. प्रत्येक चित्रपटाच्या निर्मितीशी अनेक रंजक किस्से आणि बरे-वाईट अनुभव यांचं नातं जुळलेलं असतं… ते किस्से, ते अनुभव सांगता सांगता गजेंद्र दिग्दर्शक म्हणून या सगळ्या सिनेमांच्या ‘मेकिंग ‘कडे पुन्हा एकदा बघतात आणि स्वतःला तपासतात. त्याचप्रमाणे या क्षेत्रातील आघाडीचे कलाकारही पुस्तकात या स्टोरी’ टेलर ‘विषयी मनमोकळेपणे बोलतात. एकंदर सांगायचं तर, सिनेरसिक आणि अभ्यासक यांच्या हाती या पुस्तकाच्या निमित्ताने मोठा ऐवज पडणार आहे. तो ऐवज चित्रपटरसिकांना रंजक तर वाटेलच; पण त्याचबरोबर चित्रपटनिर्मिती क्षेत्रात येऊ इच्छिणारे आणि चित्रपटनिर्मितीच्या वेगवेगळ्या विभागांत प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, तसेच या क्षेत्रातले नवोदित अशा सगळ्यांसाठी स्टोरी’ टेलर’ जणू संग्राह्य असं ‘गाइड’ही ठरणार आहे.