-
Be Dune Panch ! (बे दुणे पाच!)
विविध दिवाळी अंकांतून वाचकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या ललित कथा लिहिणाऱ्या लेखिका म्हणून सारिका कुलकर्णी प्रसिद्ध आहेतच. साप्ताहिक मार्मिकमध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या बे दुणे पाच या लेखमालेतून त्या, विनोदी लिखाण देखील तितकंच उत्तम करू शकतात हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. सारिका कुलकर्णीच्या लेखणीतून उतरलेला विनोद हा अस्सल मध्यमवर्गीय मराठी मातीत जन्मलेला आहे. तो ओढूनताणून आणलेला नाहीये, तो खुलविण्यासाठी थिल्लरपणाची रासायनिक खते वापरली नाहीयेत, तो बहरण्यासाठी सवंगतेची कीटकनाशके फवारली नाहीयेत. आजच्या पिढीचा शब्द वापरायचा तर त्यांचा विनोद अगदी ऑरगॅनिक आहे. सामान्य माणसाच्या रोजच्या आयुष्यातील घटना, सण-उत्सव, त्यातील गमती, विसंगती ह्यांचं सूक्ष्म अवलोकन आणि त्यावर लेखिकेने केलेली मार्मिक नर्मविनोदी मल्लिनाथी वाचकांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आणते आणि बहुतेक सर्वच लेखांचा समारोप करताना त्यांनी केलेलं भाष्य वाचकांना अंतर्मुख करायला लावते हेच या पुस्तकातील लेखांचे यश आहे. मराठी साहित्यात सकस विनोदी लिखाणाला वाचकांकडून मागणी खूप असली तरी त्यामानाने पुरवठा अगदीच कमी आहे. विनोदी लिहिणाऱ्या लेखिकांची तर अक्षरशः वानवाच आहे. या पार्श्वभूमीवर दर्जेदार, निर्विष विनोदाच्या शोधात असणारे मराठी वाचक, सारिका कुलकर्णीींच्या 'बे दुणे पाच' या लेखसंग्रहाचे जोरदार स्वागत करतील अशी आशा आहे. --- सॅबी परेरा
-
Jagavegala Lindbergh (जगावेगळा लिंडबर्ग)
'तुमच्या वयांमध्ये अंतर बरंच आहे गं,' आईनं मुलीला विचारलेल्या प्रश्नाला बगल देत तिनं लग्न केलं पण आईची शंकाच खरी ठरली. विसंवादी असलेल्या (लिंडबर्ग) दांपत्याचा मुलगा पुढली अनेक वर्षे एकाकी आयुष्याचा 'भागीदार' ठरला. बालवयात त्यानं आकाशात उडणारं चिमुकलं विमान पाहिलं... काही वर्षांनी विमानांच्या स्पर्धा पाहिल्या. विमानविषयक प्रेमाचं बीज तेव्हाच त्याच्या मनात अंकुरलं... सुरुवातीच्या काळातील वेड्या साहसकृत्यांमुळे तो 'उडता वेडा' (Flying Fool) ठरला. त्याच वेडापायी त्यानं उत्तुंग झेप घेतली आणि तो जगातील सर्वोत्कृष्ट साहसवीर ठरला...सुखसमृद्धीची सोनेरी पहाट उगवली, मनाजोगती सुविद्य, सुसंस्कृत सहचारिणी मिळाली, संसार बहरला आणि एक दिवस वीजप्रपात झाला... आयुष्यानं नवं वळण घेतलं, नवी आव्हानं समोर ठाकली त्यांनाही तो पुरून उरला..पुन्हा नव्यानं जन्मला, पुनःपुन्हा जन्मला, खंडप्राय मातृभूमीच्या राष्ट्राध्यक्षांना आव्हान देत दंड ठोकून तो उभा राहिला. आयुष्याच्या मध्यावर उभा असताना प्रत्यक्ष युद्धाच्या धुमश्चक्रीत त्यानं पुन्हा एकदा 'साहसवीर' हे बिरुद सार्थ ठरवलं. सेनेमधला सर्वोच्च मान- 'ब्रिगेडियर जनरल' - मिळवला. पण ही तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाची केवळ एक बाजू... अनेक अंगांनी त्याचं व्यक्तिमत्त्व झळाळून उठलं. विमानक्षेत्रात भरीव कामगिरी करणारा कुशल प्रशासक, एक वैज्ञानिक, एक लेखक, एक पर्यावरणप्रेमी ही त्याची आणखी काही लोभस रूपं... असा हा कोण जगावेगळा पुरुषोत्तम ?
-
Periplus Of Hindusthan Khand 2 (पेरिप्लस ऑफ हिंदुस्थान - हिंदुस्थानची प्रदक्षिणा खंड २)
अज्ञाताचा शोध ही मानवाची आदिम काळापासूनची प्रेरणा. क्षितिजापारच्या अवकाशाची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही. म्हणून आपली वस्ती, आपली माणसं, आपला प्रदेश आणि सारं काही मागे ठेवून तो निघतो.... जग जिंकायच्या ईर्ष्यने खैबर खिंड ओलांडून आलेला अलेक्झांडर सिंधू नदीच्या खोऱ्यात उतरून परततो. त्यानंतर कुणी मेगॅस्थेनिस चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात सेल्युकस निकोटरचा ग्रीक राजदूत म्हणून राहतो आणि तत्कालीन भवताल 'इंडिका' नावाने नोंदवून ठेवतो. मेगॅस्थेनिसचा 'इंडिका', अज्ञात नाविकाचा 'पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी', अल्बेरुनीचा 'तहकिक-ए-हिंद' किंवा अफानासी निकितीनच्या 'नोटस'... अशा मूळ ग्रीक, लॅटिन, पर्शियन, अरबी, चिनी, रशियन दस्तावेजांतून सुमारे दोन हजार वर्षांचा तत्कालीन हिंदुस्थानचा सांस्कृतिक इतिहास नोंदवला गेला... खरं तर, फक्त सांस्कृतिक व्यवहारच नव्हेत तर सुमारे दोन हजार वर्षांतील तत्कालीन लहानमोठी राज्ये, राजेरजवाडे, शेतीवाडी, समाज, सणवार, चालीरीती, व्यापार, चलने... अगदी खाद्यसंस्कृतीपासून लढायांपर्यंत त्यांनी जे-जे काही पाहिले ते नोंदवून ठेवले, आपल्या देशात परतल्यावर इतरांना सांगितले, त्यातून पुढे ते ग्रंथरूप झाले. सुनंदा भोसेकर यांनी या परदेशी प्रवाशांच्या ग्रंथांमधून परिश्रमपूर्वक शोधून त्या त्या काळातील हिंदुस्थान या पुस्तकातून आपल्यासमोर ठेवला आहे. हा सारा दस्तऐवज हिंदुस्थानाचा इतिहास नक्कीच म्हणता येणार नाही, पण आपल्या आजच्या भारताचा इतिहास शोधणाऱ्यांसाठी तुकड्यातुकड्यांनी विणलेला सुंदर कोलाज आहे. सव्वीस जगप्रवाशांना दिसलेल्या हिंदुस्थानाची सुनंदा भोसेकर यांनी आपल्या कॅलिडोस्कोपमधून केलेली ही 'पेरिप्लस' म्हणजेच अक्षरप्रदक्षिणा!
-
Periplus Of Hindusthan Khand 1 (पेरिप्लस ऑफ हिंदुस्थान - हिंदुस्थानची प्रदक्षिणा खंड १)
अज्ञाताचा शोध ही मानवाची आदिम काळापासूनची प्रेरणा. क्षितिजापारच्या अवकाशाची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही. म्हणून आपली वस्ती, आपली माणसं, आपला प्रदेश आणि सारं काही मागे ठेवून तो निघतो.... जग जिंकायच्या ईर्ष्यने खैबर खिंड ओलांडून आलेला अलेक्झांडर सिंधू नदीच्या खोऱ्यात उतरून परततो. त्यानंतर कुणी मेगॅस्थेनिस चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात सेल्युकस निकोटरचा ग्रीक राजदूत म्हणून राहतो आणि तत्कालीन भवताल 'इंडिका' नावाने नोंदवून ठेवतो. मेगॅस्थेनिसचा 'इंडिका', अज्ञात नाविकाचा 'पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी', अल्बेरुनीचा 'तहकिक-ए-हिंद' किंवा अफानासी निकितीनच्या 'नोटस'... अशा मूळ ग्रीक, लॅटिन, पर्शियन, अरबी, चिनी, रशियन दस्तावेजांतून सुमारे दोन हजार वर्षांचा तत्कालीन हिंदुस्थानचा सांस्कृतिक इतिहास नोंदवला गेला... खरं तर, फक्त सांस्कृतिक व्यवहारच नव्हेत तर सुमारे दोन हजार वर्षांतील तत्कालीन लहानमोठी राज्ये, राजेरजवाडे, शेतीवाडी, समाज, सणवार, चालीरीती, व्यापार, चलने... अगदी खाद्यसंस्कृतीपासून लढायांपर्यंत त्यांनी जे-जे काही पाहिले ते नोंदवून ठेवले, आपल्या देशात परतल्यावर इतरांना सांगितले, त्यातून पुढे ते ग्रंथरूप झाले. सुनंदा भोसेकर यांनी या परदेशी प्रवाशांच्या ग्रंथांमधून परिश्रमपूर्वक शोधून त्या त्या काळातील हिंदुस्थान या पुस्तकातून आपल्यासमोर ठेवला आहे. हा सारा दस्तऐवज हिंदुस्थानाचा इतिहास नक्कीच म्हणता येणार नाही, पण आपल्या आजच्या भारताचा इतिहास शोधणाऱ्यांसाठी तुकड्यातुकड्यांनी विणलेला सुंदर कोलाज आहे. सव्वीस जगप्रवाशांना दिसलेल्या हिंदुस्थानाची सुनंदा भोसेकर यांनी आपल्या कॅलिडोस्कोपमधून केलेली ही 'पेरिप्लस' म्हणजेच अक्षरप्रदक्षिणा!
-
Safarnama Nivadak Kalakarancha (सफरनामा निवडक कलाकारांचा)
कलेच्या इतिहासाचा अभ्यास करताना एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात दृश्यकलेमध्ये महत्त्वाचे बदल होत गेलेले आपणास ठळकपणे जाणवतात. या कालखंडातील कलावंतांनी आपल्या कलेमध्ये आधुनिक मूल्यांचा जाणीवपूर्वक पुरस्कार केलेला आपणास दिसतो; त्यातही आपल्या कलेद्वारा त्यांनी जीवनवादी मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केलेले आपल्याला दिसते. सुरुवातीचा प्रागैतिहासिक काळ सोडला, तर एका बाजूला ग्रीक आणि रोमन संस्कृतीपासून तर्काधिष्ठित वास्तव चित्रणावर भर देणारा पाश्चात्त्य कलाविचार दिसतो तर दुसऱ्या बाजूला भारतीय, पौर्वात्य कलाविचार दिसतो, जो की अंत:प्रेरणेतून बाह्य जगाकडे पाहतो आणि काहीसा प्रतीकात्मकसुद्धा आहे. मात्र असे असले तरी कलाइतिहासाच्या त्या त्या टप्प्यांवर या कलाविचारांची सरमिसळ झालेली आपल्याला दिसते. रवीन्द्रनाथ टागोर, जामिनी राय, अमृता शेर - गील, कॅथे कोलविट्झ, फ्रिडा काहलो हे कलावंत त्याची प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. हे कलावंत केवळ रंजनवादी कलावंत नव्हते; तर कलेत जीवनाचे प्रयोजनमूल्य अधोरेखित करणारे कलाविचारक होते. ‘सफरनामा : निवडक कलाकारांचा' या पुस्तकातून मुळात चित्रकर्ती आणि कलाअभ्यासक असलेल्या पल्लवी पंडित यांनी जागतिक स्तरावरील अशाच काही कलाकारांच्या जीवनशैलीचा, त्यांच्या कलेचा आणि त्यामागील असलेल्या कला- विचारांचा धांडोळा अतीव चिकित्सकतेने व तितक्याच सूक्ष्मपणे घेतला आहे. कला आणि संस्कृतीच्या सर्वच अभ्यासकांना आणि जिज्ञासू वाचकांनाही हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल असे मला वाटते. - प्रमोदकुमार अणेराव
-
Anhad (अनहद)
अनहद' हा मनातील निःशब्द शांततेला शब्दांत उतरविण्याचा वैशिष्ट्यपूर्ण ललितघाट. चिमुकल्या काळातील हा हृदयसंवाद आहे. 'तो' आणि 'ती' यांच्याबरोबरच 'स्व'शी तसेच सृष्टिविषयीची ही अनावर अशी संवादरूपे आहेत. या लेखनविश्वात प्रत्यक्षातल्या जगापेक्षा एका वेगळ्या जगाची खेच आहे. ते जग म्हणजे भूतकाळ, आदिमता आणि अमूर्ताचे जग. प्रत्यक्षातले जग हे मानवी अस्तित्व छाटणारे जग आहे. या जगात आणि स्वप्नसृष्टीत ताणतणाव आहेत. त्यामुळे भोवतालच्या जगाला म्यूट करून विहिरीतळातील जिवंत झऱ्यांच्या सृष्टीबद्दलचा जिव्हाळाभाव त्यामधून प्रकटला आहे. त्याच्या जोडीला चंद्र चांदवा, चांदणं, चांदुकली, जलदेवता आणि झाडफुलांच्या मोहमायारूपी ऋतुचक्राच्या नांदवणुकीचे भरगच्च संदर्भ आहेत. एका अर्थाने या जगात झेपविसावा आहे. टेकडीबाईच्या त्रिकोणाची हवीहवीशी नजर आणि अनेक 'हाकां'चे ध्वनी - प्रतिध्वनी आहेत. याबरोबरच काव्यनिर्मितीची अनामिक हुरहुर आणि त्या तरुतळी विसरलेल्या गीतांचा आठव आहे. स्त्रीजीवनाच्या संदर्भात खास भारतीयत्वाचे संदर्भ आहेत. त्यामुळेच आभाळओल्या हळदकुंकवाच्या ओढीचा स्त्रीचिंतनाचा पैस त्यास लाभला आहे. स्वप्नील जगाबरोबर काही प्रमाणात गतकातरता, रोमँटिकतेच्या आकर्षणाबरोबरच सहजसंवादी सलगीची भाषा, काव्यात्मता, चिंतनशीलता, दृश्य रंगसंवेदनांचे घनदाट प्राचुर्य, संगीतादिचित्रांचे संदर्भ, हिंदी-उर्दूतील मिठीजुबान आणि मोहक शब्दकळेचे आकर्षण ही या गद्याची वैशिष्ट्ये होत. भाषेतील पद्मनादमेळाचे विलक्षण आकर्षण या गद्यशैलीस आहे. त्यामुळे, या ललितगद्यास खुल्या प्रसरणशील ललितगद्याचा घाट प्राप्त झाला आहे. 'अनहद' नादाचे प्रतिध्वनी वाचकांना बहुमुखी अर्थवलयांचा नक्कीच भरगच्च प्रत्यय देतील. - प्रा. डॉ. रणधीर शिंदे
-
Nani Palkhiwala (नानी पालखीवाला)
नानी पालखीवाला : एक सहृदयी, सुसंस्कृत वकील' हे पुस्तक नानी पालखीवाला यांच्या जीवनावर आधारित आहे. ते त्यांच्या जीवनाचे विविध पैलू आपणास दाखवते. या पुस्तकाचे हस्तलिखित वाचताना प्रकर्षाने जाणवले, की पुस्तकाचा आशय खूप विस्तृत व अंतरंगाला भिडणारा आहे. हे पुस्तक ॲड. विजय गोखले यांनी मोठ्या प्रयासाने, अभ्यासपूर्ण असे लिहिलेले आहे व मोठ्या खुबीने वाचकांसमोर मांडलेले आहे. नानाभॉय आर्देशीर पालखीवाला ह्यांना सर्व नानी पालखीवाला या नावाने ओळखतात. पुस्तकाचे नावच त्यातील आशय दर्शवते. नानी पालखीवाला यांच्या स्वभावातील व आयुष्यातील वेगळे पैलू लेखकाने वाचकांच्या समोर समर्पकपणे मांडले आहेत. 'नानी पालखीवाला ही परमेश्वराने भारताला दिलेली देणगी आहे' हे चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी काढलेले उद्गार यथोचित आहेत. नानी पालखीवाला यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. ते कायदेपंडित तर होतेच, शिवाय एक निष्णात अर्थतज्ज्ञ, करतज्ज्ञ व उत्कृष्ट वक्ते होते. त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व हे वादातीत व असामान्य होते. ही असामान्यता त्यांना मिळालेली जन्मजात किंवा निसर्गदत्त देणगी नव्हती तर त्यांनी प्रचंड मेहनत व प्रयत्न यांच्या साहाय्याने ती विकसित केली होती. लहानपणापासूनच ते महत्त्वाकांक्षी होते व एखादे काम करायचे ठरवल्यास ते यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा ध्यास घेत व ते पूर्ण झाल्यावरच स्वस्थ बसत. त्यांना लहान-पणापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती. विविध विषयांवरील पुस्तके ते वाचत असत. त्यांच्या वाचनछंदाच्या अनेक मार्मिक गोष्टी व किस्से लेखकाने या पुस्तकात उद्धृत केले आहेत.
-
Niragastecha Najarana (निरागसतेचा नजराणा)
बालकांच्या मनोविश्वातील स्वर्गीय रंगांची दुनिया कलावंत किती संवेदनशीलतेने... तरलतेने आपल्यासमोर खुली करतात. बालमनाची निरागसता केवळ मौनातून, मंद-स्मितातून बोलती करतात. बालकांचे निरभ्र... नितळ... निर्मळ मन... जाती, धर्म, देश, रंग, रूप यांच्या सीमा पार करून आपल्याशी संवाद साधतं. कोमेजलेल्या मनाला पुलकित करण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यांचं रूपडंच मुळात आरस्पानी! त्यांच्या पारदर्शीपणात आपण आपलं प्रतिबिंब पहावं... आणि आपणच लख्ख होऊन जावं !!
-
Ranbhuliche Pradesh (रानभुलीचे प्रदेश)
विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी लिहिलेलं 'रानभुलीचे प्रदेश' हे पुस्तक अतिशय सुंदर आहे. यामध्ये हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेल्या अनेक रचनांविषयी अतिशय रसाळ पद्धतीनं मांडणी केलेली आहे. त्या रचनांचं संगीत आणि काव्य आणि त्या रचनांमध्ये किस्से, त्यातल्या संगीतामधले बारकावे हे अतिशय छान पद्धतीनं उलगडून सांगितलेलं आहे.
-
Shubhparva (शुभपर्व)
रघुकुलातील, आमच्या घरातील, पहिले अपत्य, माझी सर्वात मोठी चुलत बहीण शुभदा. जिच्या आगमनाने आमच्या घराची भरभराट सुरू झाली. बाबाकाकांच्या कष्टाने लक्ष्मी प्रसन्न होऊ लागली आणि ताईच्या विद्वत्तेला सरस्वतीचा कृपाप्रसाद प्राप्त झाला. शालेय जीवनापासून ताईच्या यशाची कमान उंचावत गेली. टिळकनगर विद्यामंदिरातील आदर्श विद्यार्थिनी, रुईयामध्ये तत्त्वज्ञान विषयात सुवर्णपदक विजेती झाली. मुंबई विद्यापीठामध्ये शुभाताई रुजू झाली आणि दोन-तीन वर्षांपूर्वीच सुरू झालेल्या तत्त्वज्ञान विभागाच्या अंकात्मक आणि गुणात्मक विकासामध्ये विभाग प्रमुख म्हणून तिने मोलाचे योगदान दिले. तिने तत्त्वज्ञान विभागाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोचवले. संपूर्ण आयुष्य तत्त्वज्ञान या विषयासाठी काम करत राहावे आणि तेच तत्त्वज्ञान जगण्याचा एक भाग होऊन जावे, असे हे 'शुभ पर्व' !
-
Jina Shoshitanchan (जिणं शोषितांचं)
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षं झाली. त्याचा उत्सवही दिमाखात झाला. परंतु गांधी-नेहरू-आंबेडकर यांच्या स्वप्नातील सामाजिक-आर्थिक न्यायाची गाडी पुढे सरकली का हा प्रश्न उरतोच. नेमक्या याच प्रश्नाला थेट भिडणारं हे पुस्तक आहे. ज्यावेळी एखादा आयएएस अधिकारी ‘मला या शहरात एकही झोपडी नको` असं म्हणतो तेव्हा या लेखिकेची होणारी तगमग काळजाला हात घालते. बलात्कार, बाललैंगिक शोषण, आरोग्याविषयीचे प्रश्न, मुस्लिमांचे सामाजिक, आर्थिक खच्चीकरण अशा प्रश्नांवर जमिनीवर लढतानाचे सजग प्रसंग विलक्षण अस्वस्थ करून जातात. गेल्या साडेतीन दशकांत वृषाली मगदूम यांनी शोषितांच्या प्रश्नाला हात घालत ते धसास लावताना आलेले अनुभव दाहक आहेत, म्हणूनच ते वेधक ठरतात. आपल्याबरोबरच पण आडबाजूला जगणाऱ्या एका समुदायाच्या शोषणाची, हतबलतेची, संघर्षाची ही जिवंत चित्रे तर बोलतातच, पण राज्यकर्ते, प्रशासन आणि समाजाच्या तळातली माणसे यांच्यातले वाढत जाणारे अंतर विदीर्ण करणारे आहे. अशा परिस्थितीत लेखिकेचा हात त्या अंधाऱ्या विश्वाला आश्वासक वाटतो, हे खरे आहे