-
Lokmanaya Tilak Darshan (लोकमान्य टिळक दर्शन)
`लो. टिळक दर्शन’ हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं चरित्र आहे. प्राधान्याने टिळकांच्या राजकीय जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांतून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा या चरित्रातून घेतला आहे. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतु:सूत्रीच्या आधारे स्वातंत्र्य मिळविण्याचं आवाहन टिळकांनी जनतेला केलं आणि ती चतु:सूत्री राबवण्यासाठी ते सक्रिय झाले ते शेवटपर्यंत. या पुस्तकात टिळकांनी केलेली होमरूल चळवळ, मवाळ पक्षाशी त्यांचा झालेला सघर्ष, त्यांनी वेळोवेळी लिहिलेले अग्रलेख, त्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया, विविध सभांमध्ये त्यांनी घेतलेला भाग, त्यांनी वेळोवेळी जनतेच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्याचा केलेला प्रयत्न, त्यांचे गाजलेले वेदोक्त प्रकरण, ताई महाराज प्रकरण, त्यांना वेळोवेळी घडलेले तुरुंगवास, मंडालेची काळ्या पाण्याची शिक्षा, रँडच्या खून खटल्यात त्यांना गोवण्याचा झालेला प्रयत्न, टिळकांनी इंग्रज सरकारवर भरलेला अब्रूनुकसानीचा खटला, त्यामुळे त्यांना झालेला मनस्ताप आणि सोसावा लागलेला आर्थिक भुर्दंड, त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत केलेली न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसनची स्थापना आणि नंतर केवळ तत्त्वासाठी त्या संस्थेच्या सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा, राजकीय जीवनात टिळकांना लाभलेले अनुयायी, टिळकांची लोकप्रियता, त्यांच्या विचारांनी क्रांतिकारकांना पुरविलेलं बळ आणि जनतेत पसरलेलं चैतन्य, मुस्लिम समाजाबद्दल त्यांना वाटणारी आस्था इ. अनेक मुद्दे, घटना, प्रसंग अधोरेखित करण्यात आले आहेत, ज्यातून टिळकांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचं आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाचं यथार्थ दर्शन घडतं. योगी अरविंद, मंडालेच्या तुरुंगात त्यांना स्वयंपाक करून जेवायला घालणारा कुलकर्णी इ. लोकांनी टिळकांबद्दल लिहून ठेवलं आहे.
-
Palavarcha Jag (पालावरचं जग)
‘पालावरचं जग’ या पुस्तकातून लक्ष्मण माने यांनी शोषित-पीडितांच्या व्यथा-वेदना मांडल्या आहेत. या प्रत्येक लेखांतून अंगावर शहारा उमटणारं जगणं दृष्टीस पडतं. भटक्या-विमुक्तांचं अमानवी जगणं, अन्याय, दुःख-दैन्य आणि अपेक्षा यांनी पछाडलेला हा समाज. सर्वस्व नष्ट झालेल्या समाजाचा उद्धार व संघर्षगाथा-‘यल्लपाचा चंग’मधून दिसते. ‘मरण येत नाही, म्हणून जगायचं!’ हे पालावरचं बेभरवशाचं हीन व शोषित जगणं, भटक्या-विमुक्तांचं स्वत्वं-स्वाभिमान हिरावून घेणारं. (वैदू, कैकाडी, कोल्हाटी, गोसावी-बैरागी, डवरी गोसावी, भराडी-कानफाटे, किंग्रीवाले, बालसंतोषी, पारधी, टकारी भामटा, रजपूत भामटा, कंजारभाट या व इ. अठरापगड जातींना) उच्चभ्रू समाजाने हीन व उपरं ठरवलेलं. या समाजाचा वाली कोण? कधी जाग येणार या पतितांना? त्यांची मनं कधी पेटून उठणार? त्यांच्यासाठीचा तीव्र संघर्ष, चळवळ व आंदोलने लेखकाने व कार्यकर्त्यांनी छेडलेली, तुरुंगवास पत्करलेला. त्यांच्या स्वातंत्र्याचा ध्यास, हेच लेखकाचे जगणे बनले आहे. म्हणूनच माणुसकीची नवी वाट, जाहिरनामा : नंदीवाल्यांच्या दु:खाचा, मरणानंतरही जात आडवी, फाटलेलं आभाळ या लेखांतून मानवी जीवनातील दारिद्र्य, लाचारी, त्यांच्या समस्या, संघर्ष व अवहेलनेला लेखक वाचा फोडतो. गुन्हेगारीचा शाप मागं लेवून जगणारा हा समाज दिवसेंदिवस दु:खाच्याच दलदलीत फसलेला आणि पिचलेला. दलित चळवळीला नेतृत्वस्पर्धेचा शाप आणि या समाजाला अनिष्ट चालीरीति-रूढीं-परंपरांचा शाप. त्यामुळे गावगाडा उचकटून लाचारांच्या/बेरोजगारांच्या फौजा तयार झालेल्या. सत्यानास, अन्नानदशा व कपाळावर गुन्हेगारीचा शिक्का जगणं नकोसं करतो; शिवाय स्त्री जातीचे धिंडवडे, अन्यायाची परिसीमा-बलात्काराने पोखरलेलं हीन-दीन जगणं, दहशत, अपमान व स्त्री जन्माला मिळालेला शाप म्हणजे हे नकोसं वाटणारं, पालावरचं जग. लक्ष्मण माने यांनी ‘उपरा`मधूनही या दु:खाला वाचा फोडली आहेच. व्यासपीठावरूनही भटक्या विमुक्तांचे प्रश्न लेखकाने मांडले ते ‘बंद दरवाजा` या नावाने. लेखकाने सच्च्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून हे ‘पालावरचं जग’ आपल्यासमोर मांडलंय, त्यातील धगधगते दाहक सत्य काळजाला पीळ पाडते. भटक्या-विमुक्तांच्या वस्त्या-पालं यांचा शोध घेऊन, लेखकाने त्यांच्याशी गप्पा मारून, त्यांची स्थितिगती जाणून घेऊन, त्यांच्या अन्यायाला वाचा फोडली आहे... मानवी हक्क व न्याय यांपासून भटका-विमुक्त समाज वंचित राहू नये, हीच तळमळ या सर्व लेखनातून स्पष्ट होते. समाजासाठी सामाजिककार्यांतून चळवळींना बळ देऊन मानवी उन्नत्ती व माणुसकीचं, साक्षरतेचं-सुसंस्कृत जगणं भटक्या-विमुक्तांचं असावं, अज्ञानाला थारा नसावा, हाच लेखकाला ध्यास आहे. म्हणूनच या अत्याचाराच्या कहाण्या, मसणजोग्यांचं अपरिमित दु:ख, अंगात देव येणं, एका लाडवाची गोष्ट, वहिवाटीसाठीची लढाई, आभाळाएवढ्या छत्रपतींचा आदर्श लेखक लक्ष्मण माने समाजापुढे उभा करतात. या पालावरच्या जगण्याला निश्चितच एके दिवशी आकार प्राप्त होईल, हा दुर्दम्य विश्वास लेखकाला आहे. म्हणूनच ‘पालावरचं जग’ म्हणजे धगधगतं-भयानक अमानवी वास्तव म्हणता येईल.