-
Kunachya Khandyavar (कुणाच्या खांद्यावर)
रवींद्र, ज्यांच्या नावातच रवी आणि इंद्र आहेत, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल काय वर्णावे! सूर्यपुत्र कर्णाला जशी जन्मजात कवचकुंडले लाभली होती तद्वत या गायकाला खर्जातील आवाज जन्मतःच मिळाला आहे. इंद्रपुत्र अर्जुनाच्या लक्ष्यभेदी बाणासारखे या गायकाचे शब्दोच्चार मर्मभेदी आहेत. या गुणांच्या जोरावरच रवींद्र साठे यांनी अनेक थीम साँग्स अजरामर केली आहेत. ध्वनिमुद्रण, रंगमंच आणि पार्श्वगायन या तीन ही लोकांत मुक्त संचार करणारा हा गानयक्ष आहे ; यक्ष अशासाठी की खुद्द रवींद्र यांचेच असे म्हणणे आहे की कोणत्यातरी यक्षाचा वरदहस्त असल्यानेच एका 'क्ष' चे (साधारण माणसाचे) यक्षात रूपांतर झाले. रवींद्रजींच्या आवाजाची भुरळ भल्याभल्यांना पडली होती; म्हणूनच साक्षात गानसरस्वती किशोरी अमोणकरांना त्यांना आपला शिष्य करून घेण्याची मनीषा होती.. रवींद्रजींच्या आवाजातील 'घाशीराम कोतवाल' मधील ठुमरी ऐकण्यासाठी निळू फुलेसारख्या दिग्गजांचे कान आसुसलेले असायचे. रवींद्र साठेंच्या आवाजातील संस्कृत श्लोक रांगड्या नाना पाटेकरांना इतके भावतात की त्यांच्यामते रवींद्र लोकप्रिय गायक नाही तर श्लोकप्रिय गायक आहे.. अशा गुणी गायकाचा मित्रपरिवारही मोठा आहे व याच मित्रपरिवाराने त्यांना ‘बुवा' सारखे खास उपनाम बहाल केले आहे. या आत्मचरित्रामध्ये अनेक गोष्टींचा उलगडा वाचकांना होणार आहे जसे की या भारदस्त आवाजाच्या गायकाचा सद्दाम हुसेन किंवा म्युझिक थेरपी या दोन भिन्न गोष्टींशी काय संबंध होता; पुरुष असूनदेखील जावा- जावांच्या भांडणात हा अजातशत्रू गायक कसा ओढला गेला. वयाचा अमृतमहोत्सव साजरा करणाऱ्या रवींद्रजींचे आत्मचरित्र शब्दबद्ध करत असताना मला कळलेली गुपिते आता तुम्हीसुध्दा जाणून घ्या. -- डॉ. प्रशांत दांडेकर
-
Shivcharitra Bhav Ani Aashay (शिवचरित्र भाव आणि आशय)
शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्याच नव्हे; तर अवघ्या देशाच्या प्रेरणेचा विषय आहेत. शिवाजी महाराजांच्या चरित्राचा आणि तत्कालीन घटनांचा सहज आणि सोप्या भाषेत आढावा घेण्यासाठी हे पुस्तक लिहिण्यात आले आहॆ. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र, मराठ्यांचा स्वभावधर्म, शाहजीराजे यांचे कार्य, स्वराज्यस्थापनेचा सुरुवातीचा काळ, त्या वेळी आलेल्या अडचणी आणि त्यावर महाराजांनी कशा प्रकारे मात केली, यांचा आढावा या पुस्तकातून घेण्यात आला आहॆ. बिकट प्रसंगी शिलेदारांनी दाखवलेली निष्ठा, त्याग आणि बलिदान या साऱ्या गोष्टींमुळे शिवाजी महाराजांना स्वराज्यस्थापनेत यश आले, हे शिवचरित्राचे अंतरंग समजून घेणे गरजेचे आहॆ. शिवाजी महाराजांचा झालेला राज्याभिषेक म्हणजे, मध्ययुगीन कालखंडातील अत्यंत महत्त्वाची घटना. या घटनेने अनेकांना स्वतंत्र राज्यस्थापनेसाठी प्रेरणा दिली, आणि परकीय सत्तेला आव्हानही दिले. आजचा भारत देश, महाराष्ट्राचा स्वाभिमान, आणि हिंदू संस्कृती अबाधित राखण्याचे कामही शिवाजी महाराजांनी केले. या सर्वांचा वेध घेण्यासाठी या पुस्तकाचे वाचन करणे गरजेचे आहॆ.
-
Ashwathama (अश्वत्थामा)
बा अश्वत्थामा, माणसानी आत्तापर्यंत अपार दुःख भोगले आहे. आजवरच्या मानव जातीच्या इतिहासात, किती तरी युद्धे लढाया झाल्या, किती तरी अश्रू वाहून गेले आणि मोठा विनाशकारी आविष्कार या पृथ्वीतलावर अवतरला. पण अजूनही आपण युद्धाला, हिंसेला, संघर्षाला नकार देत नाही आहोत, ही वस्तुस्थिती आहे. अरे अश्वत्थामा, सर्वांचे दुःख एकच आहे. माझं दुःख, तुझं दुःख वेगवेगळं नाहीये! अखिल मानवजातीचं दुःखं एकच आहे. मी म्हणजेच ही पृथ्वी आहे, मी म्हणजेच हे जग आहे! अखेरीस संपूर्ण मानव जातीचे मानसिक जग हे एकच असते! मानवाच्या विघातक वृत्ती महाभारतकालात जेवढ्या अस्तित्त्वात होत्या, तेवढ्या आजही आहेत. तू अत्यंत मूर्खपणाने, पित्याने तुला सावध केले असतानाही, सूड-वैर भावनेच्या भरात, ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि पांडवांच्या कुळाचा नाश करायला निघालास ! दुर्योधनाने मोठ्या हट्टाने युद्ध आपल्या अंगावर ओढून घेतले आणि स्वतः बरोबरच सर्वांना खाईत लोटले. आश्रितपणाच्या भावनेने कौरव-पांडवांच्या युद्धात, तू आणि तुझा पिता सामील झालात! कुरूकुलाचा नाश झाला. युद्धाने तू मात्र तुझ्या पित्याला गमावलेस आणि अंगावर वासुदेवाचा शाप ओढून घेतलास! द्रुपद-द्रोण यांच्या सूडचक्राचाही तू एक भाग झालास ! सतत द्वेष-सूड-दुष्ट शक्ती तसेच वैर यांच्या सोबतीत राहिल्यामुळे, तुझ्या मागे उभ्या असलेल्या विनाशाने तुझ्यावरच झडप घातली. म्हणून कित्येक हजार वर्षे, तू तुझे शापित चिरंजीवित्व सांभाळत, या पृथ्वीवर वणवण फिरतो आहेस. फिरणार आहेस!' व्यासमुनी
-
Me Sharebajarat 2 Million kase Milavale (मी शेअर बाजारात दोन मिलियन डॉलर्स कसे मिळवले)
मी शेअर बाजारात दोन मिलियन डॉलर्स कसे मिळवले?' हे अतिशय विलक्षण पुस्तक आहे. ते शेअरबाजाराच्या इतिहासातील एक असामान्य यशोगाथा सांगते. निकोलस दर्वास हे कोणी शेअरबाजारातील अंतर्गत माहितीवर आधारित व्यवसाय करणारे व्यवसायिक नव्हते, तर ते सर्वोच्च पगार मिळवणारे देखण्या व्यवसायातील एक नर्तक होते. तरीही त्यांनी स्वतःला कित्येक वेळा मिलिनॉयर बनवले, ते गुंतवणुकीविषयीच्या इतर तथाकथित कार्यपद्धतींच्या ऐवजी त्यांच्या एकमेव "गुंतवणूक-दृष्टिकोनामुळे'. शेअरबाजार तेजीचा आहे का मंदीचा, याची पर्वा न करता त्यांनी काम केले. जेव्हा त्यांच्या आश्चर्यजनक नफा आणि कार्यपद्धती यांच्या बातम्या येऊ लागल्या, तेव्हा त्यांच्यावर 'टाईम' मासिकात खास लेख आला. मग त्यांचे मन हे पुस्तक लिहिण्याकरिता वळवण्यात आले. हे पुस्तक अल्पावधीतच सर्वाधिक खपाचे पुस्तक झाले. आठ आठवड्यांत या पुस्तकाच्या २ लाख प्रती विकल्या गेल्या. या पुस्तकात ज्यांचा उल्लेख आहे, अशा अनेक कंपन्या आता अस्तित्वात नाहीत. तरीही, यातील मूलभूत तत्त्वे आजही तितकीच भक्कम आहेत.
-
Abhinay Sadhana An Actor Prepares (अभिनय साधना ॲन ॲक्टर प्रिपेअर्स)
मॉस्को आर्ट थिएटरची स्थापना करणारे निर्माता-दिग्दर्शक कॉन्स्टिन्टिन स्टॅनिस्लाव्हस्की यांनी अभिनयाचा व नाट्यप्रक्रियेचा सखोल विचार मांडला. नटांनी पात्रे सजीव करावीत, नाटक करताना आपण अभिनय करीत नसून प्रत्यक्ष ते जगतो आहोत, इतका अभिनय स्वाभाविक व वास्तव असणार्या नटांनी भर द्यावा, असे स्टॅनिस्लाव्हस्कींचे सांगणे होते. ‘अभिनय साधना’ या ग्रंथात त्यांचा अभिनय कलेविषयी सर्वांगीण विचार समाविष्ट झाला आहे. या विचारांनी पुढे जगभरातील नाट्य परंपरेत-स्वरुपात मूलगामी बदल घडवून आणला. व्यक्तिरेखांमधील बाह्यवर्तन आणि अंतर्मनाचा शोध घेणं, स्टॅनिस्लाव्हस्कीला निकडीचं वाटू लागलं! कुठलीही भूमिका रंगमंचावर वठविण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी वा त्याचा पुरेसा रियाझ, हा अभिनेत्याला करावाच लागतो. या रियाझामध्ये संपूर्ण शरीराचा वापर कसा करायचा, शरीराच्या विशिष्ट हालचाली (देहबोली) कशा आणि कितपत करायच्या, हे अभिनेत्याला समजून घ्यावेच लागते. इतकेच नाही तर, शब्दांची निवड, त्याचे उच्चारण, गायनाचा पुरेसा सराव, चेहर्यावरील हावभाव (एक्सप्रेशन) तसेच स्वतःवरचे संपूर्ण नियंत्रण... या आणि या सारख्या गोष्टी नटाला आत्मसात कराव्या लागतात. यातही अभिनय करताना आपला आविर्भाव, अभिनिवेश आणि प्रकट होणारा भूमिकेचा (प्राण)‘मी’पणा व त्याचा विस्तार यांचे भान व जाण असणे, अभिनेत्याला अत्यंत आवश्यक आहे, असेही तो सांगतो. एकूणच, नाटकातून साधेपणा आणि प्रसंगातील वास्तवता व्यक्त होण्यावर स्टॅनिस्लाव्हस्कीचा भर होता. सर जॉन गिलवुड, इज्युइन वख्तांगोव्ह यांच्यासारखे अभिनेते या पद्धतीने प्रभावित झाले. फक्त नाट्याभिनय नाही, तर चित्रपटातील अभिनयासाठीसुद्धा स्टॅनिस्लाव्हस्की पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला. याची मोठी साक्ष मार्लन ब्रँन्डो, रॉबर्ट डी निरो, अल पचिनो व भारतातील स्मिता पाटील, नसिरुद्दीन शहा, ओम पुरी या सारखे अभिनेते देतात.
-
Reminiscences Of A Stock Operator (रिमिनिसन्स ऑफ ए स्टॉक ऑपरेटर)
गेल्या शतकातील अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध शेअर ट्रेडर आणि गुंतवणूकदार तसेच शेअर विश्वातील सुरक्षा विश्लेषक, जेसी लिव्हरमोर यांच्या आर्थिक जीवनाचा अत्यंत मनोरंजक आणि नाट्यमय अनुभव, स्मृती रुपात स्टॉक ऑपरेटरच्या आठवणी या व्यावसायिक अभिजात ग्रंथात आपल्याला आढळतील. एकूणच, लिव्हिरमोरच्या वॉल स्ट्रीटवरील संपूर्ण आर्थिक प्रवासाचा आढावा प्रस्तुत पुस्तकात तुम्हाला आढळेल. लिव्हरमोर यांना शेअर बाजारात अफाट कीर्ती लाभली! त्यांनी शेअर ट्रेडिंगमध्ये अनेक वेळा लाखो डॉलर्सची कमाई केली आणि गमावली देखील! एके क्षणी त्यांच्या वाट्याला दिवाळखोरीही आली. एके ठिकाणी ते म्हणतात ‘कोणत्याही शेअर ट्रेडरचे ध्येय नियमितपणे नफा मिळवणे, हेच असते. सातत्यपूर्ण विजेते असलेले शेअर ट्रेडर इतर सर्वांपेक्षा निश्चितच वेगळा विचार करतात. जे ट्रेडर्स इतरांच्या सल्यापेक्षा स्वत:च्या कृतींवर विश्वास ठेवून न डगमगता जे करायला हवे, ते करण्यावर भर देतात, तेच नेहमी यशस्वी होतात. शेअर मार्केटमधील शेअर्सच्या किंमती किती वेळात आणि कशा बदलतील, या विषयी कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. तुमचा अंदाज कधी खरा ठरेल आणि कधी तो फसेल, हे ही कोणी सांगू शकणार नाही. या सर्वांच्या पलीकडे तुम्हाला व्यावहारिक ज्ञान घेऊन पुढे चालत राहायचे आहे. जेणेकरून बाजारपेठेमध्ये अमर्याद वाव असलेल्या वातावरणात, तुम्ही स्वत:चं नुकसान करुन घेणार नाही. ट्रेडिंग ह्या विचारधारेचा अनुभव घेणे, हे तुमच्या दृष्टिकोनाचे, तुमच्या समजुतींचे, तुमच्या मनोवृत्तीचे तसेच तुमच्या मानसिकतेचे फलित आहे.’
-
Vidur (विदुर)
'हे विदुरा, धृतराष्ट्रादी कौरवपुत्रांच्या राज्यात राहूनही तू नेहमीच धर्मशीलतेने, मोठ्या नीतिमत्तेने जगलास! द्रौपदी वस्त्र हरणाच्या प्रसंगी, इतर सारे ज्येष्ठ तोंड बंद करून बसलेले असताना, तू मात्र धृतराष्ट्राला, दुर्योधन- दुःशासनाला स्पष्टपणे आणि थेट बोललास! तू नेहमीच सत्याची बाजू घेतोस. प्रांजलतेची तू मूर्तीच आहेस. तू कधीही आणि केव्हाही कौरव आणि पांडव यात भेद केला नाहीस. गांधारीने आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली असेल, पण तू, व्यासांच्या आदेशानुसार धृतराष्ट्राच्या सावलीत, सताड डोळे उघडे ठेवून त्याच्या सोबत राहतो आहेस. धृतराष्ट्राप्रमाणं कुंतीचीही तू अगदी मातापित्यांप्रमाणं काळजी घेतो आहेस. तू नेहमीच राजाला योग्य आणि नेमका सल्ला देत आलास ! मुख्य म्हणजे, महामंत्री या नात्याने तू आपला राजधर्म, स्वधर्म प्राणपणाने जपलास! सर्व प्रकारचे मिंधेपण तू नाकारलेस! दुर्योधन- धृतराष्ट्रानी तुला पांडवधार्जिणा म्हणून संबोधले, तरी तू कधीही पक्षपातीपणा केला नाहीस. तू सदैव ताठमानेने वावरलास ! खरोखरीच तू धन्य आहेस. कितीही आणि कसाही प्रसंग वा परिस्थिती आली, तरी तू आपला चांगुलपणा - भलेपणा, सात्विकता, साधेपणा, समंजसपणा, सत्यनिष्ठा, कर्तव्यपरायणता, सभ्यता कधीही आणि केव्हाही सोडली नाहीस. म्हणूनच तू मला आवडतोस!'
-
Sankshipt Ramayan Swarup Ani Kathashay (संक्षिप्त रामायण स्वरूप आणि कथाशय)
प्राचीन भारताच्या दोन हजार वर्षांपूर्वी रचलेल्या पहिल्या दोन महाकाव्यांपैकी वाल्मीकिरामायण हे आहे. दुसरे महाकाव्य महाभारत होय. कमीतकमी दोन हजार वर्षे भारताच्या राष्ट्रीय, सांस्कृतिक वैभवाला या दोन महाकाव्यांनी शोभा आणली आहे कारण विविध आकृतिबंध असलेल्या साहित्यसंपदेच्या निर्मितीचे ही दोन महाकाव्ये मूलस्त्रोत बनले आहेत. संस्कृतमधील काव्याच्या अभिजात आकृतिबंधाचा पहिला व उत्कृष्ट नमुना म्हणजे वाल्मीकिरामायण होय. रामायणाचे मुख्य महत्त्व म्हणजे ते उत्कृष्ट काव्य आहे. भारतीय आणि विशेषतः संस्कृत काव्यरचनेचा पहिला आदर्श म्हणून त्याला मान्यता मिळाली. वाल्मीकी मुनी हे आदिकवी ठरले. वाल्मीकी मुनीने नारदाला प्रश्न विचारला, की ‘या पृथ्वीमध्ये गुणसंपन्न, सर्वश्रेष्ठ, शूर, दृढव्रत, चारित्र्यवान कोण आहे?’ या प्रश्नाचे या त्रैलोक्यसंचारी देवर्षी नारदाने उत्तर दिले, की ‘इक्ष्वाकू कुलातील राम हा आदर्श पुरूष आहे. सुंदर मस्तक, भव्य ललाट, विशाल नेत्र, मध्यम उंचीचा, सर्व देहावर अवर्णनीय कांती असलेला, विद्यापारंगत, राजनीतिज्ञ, सज्जनांचा संग्रह आणि दुर्जनांचा निग्रह करणारा, धर्म-अर्थ व काम या तिन्ही पुरुषार्थाचे योग्य पद्धतीने सेवन करणारा, प्रजाहितदक्ष व प्रजाजनांना अत्यंत प्रिय, देवासुरांना ज्ञात असलेली सर्व अस्त्रे जाणणारा व संग्रामात अजिंक्य, असा राम हा श्रेष्ठ पुरूष होय.’
-
Sankshipt Mahabharat (संक्षिप्त महाभारत)
श्रेष्ठ साहित्य हे संस्कृतीचं आधारतत्त्व असतं, कारण ते संस्कृतीवर पसरणार्या कालिक तवंगाशी नव्हे, तर तिच्या मूलभूत मूल्याशी बांधलेलं असतं! महान लेखक-कवी अशा मूलभूत मूल्यांचा शोध घेणारे मानवी जीवनाचे भाष्यकार असतात. तमाचं आकलन आहे, पण ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ ही त्यांची प्रतिज्ञा आहे. सैतान अनेक लढाया जिंकतो, पण अखेर युद्ध जिंकतो तो परमेश्वर, हा त्याचा सांगावा आहे. पृथ्वी नामक ग्रहावर वावरणार्या माणसाला दिलेलं हे आश्वासन आहे’, असे वि.वा.शिरवाडकर म्हणतात. महान विदूषी दुर्गाबाई भागवत तर म्हणतात, ‘महाभारतासारखी महान प्रगल्भ तसेच श्रेष्ठ कलाकृती आपल्या जनसामान्यांच्या समाज-संस्कृतीचा अत्यंत अविभाज्य व अभिमानास्पद भाग झाली आहे. त्यातील वासुदेवाची भगवद्गीता तर आपल्या जीवनाची मार्गदर्शिका झालेली आहे. व्यासांसारखा प्रगल्भ प्रतिभेचा ग्रंथकार शतकाशतकांतून वाहत आणि विकसित होत चाललेल्या वैचारिक, तात्विक व भावनिक सूत्रबंधांशी स्वतःला असा निःसंदिग्ध गोवून टाकतो. त्यावेळी कळतनकळत साहित्यपणाचे-काव्याचे त्रिकालतीर्थच सहजपणे आकाराला येते. मानवी जीवनाचे महावस्त्र हे, अटळ यातना दुःख, सचेतनत्व आणि परस्परमैत्र या तिहेरी धाग्यांनी अतूट पण अत्यंत व्यामिश्रतेने गुंफले गेलेले आहे. वनवास-अज्ञातवास तसेच जीवनातील अनंतमयी दुःखाचे, सूडाचे, शापवचनांचे तसेच स्वरूप आणि विश्वरूप यांच्या प्राणबंधाचे सौभाग्य-तत्त्वदर्शन महाभारतासारख्या महान कलाकृतीत ठायी ठायी आढळते’.
-
Origin Of Species (ओरिजिन ऑफ स्पेसीज)
माणसांचा उगम व त्यांचा इतिहास यावर प्रकाश टाकला जाईल. चार्ल्स डार्विन हे निसर्गाचे अभ्यासक , भूविज्ञानशास्त्रज्ञ व जीवशास्त्रज्ञ होते व त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे , जीवांच्या सर्व जाती या एकाच पूर्वजाच्या वंशज आहेत हा त्यांचा सुप्रसिद्ध सिद्धांत विज्ञानाची पायाभूत संकल्पना आहे . जीवसृष्टीच्या भौतिक परिस्थितीचा परस्पर संबंध याविषयीचे रूढीप्रिय विचार आणि कल्पना किंवा विश्वास याना आव्हान देणारा सिद्धांत या पुस्तकातून ते मांडतात . गुंतागुंतीचे व क्लिष्ट असे जातींचे एकमेकांवरील तसेच सभोवतालच्या परिस्थितीवरील किंवा वातावरणावरील परस्परावलंबन या पुस्तकातून उघड होते. ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसीज हे पुस्तक जेंव्हा प्रसिद्ध झाले तेंव्हा त्यासंबंधी खूपच विवाद होते व आजही ते तसेच आहेत .परंतु हे पुस्तक काळाच्या ओघात सर्व कसोट्याना उतरले आहे व मनुष्याच्या उत्क्रांतीसंबंधी शास्त्रीय स्पष्टीकरण देण्यात अग्रगण्य ठरले आहे
-
Prahar Bramhastracha (प्रहार ब्रम्हास्त्राचा)
प जुनी गोष्ट नाही. १९८० आणि १९९० च्या दशकांत, भारताची व्यावसायिक राजधानी असलेली मुंबई – गुन्हेगारी टोळ्यांतील आपापसातील संघर्ष, हिंसाचार, खंडणी, अपहरण... अशा विविध कारणांनी त्रस्तलेली आणि ग्रासलेली होती. नागरिक भयग्रस्त झाले होते. कायदा व सुव्यवस्थेचे चित्र निराशाजनक होते. ...त्याचवेळी एका दृढ आणि कठोर धोरणाच्या माध्यमातून, या भीतीच्या साम्राज्याचा अंत करणारा, एक आशेचा किरण निर्माण झाला. तो म्हणजे – ज्यांनी आपल्या अभेद्य रणनीतीने गुन्हेगारी टोळ्यांचे साम्राज्य उद्ध्वस्त केले आणि हतबल झालेल्या मुंबईकरांच्या आयुष्यात पुन्हा एकदा शांततेची पहाट आणली ते मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डी. शिवानंदन! त्यांनी स्वतःच कथन केलेली मुंबईतील संघटित गुन्हेगारीच्या समूळ उच्चाटनाची ही चित्तथरारक, विस्मयजनक आणि तितकीच प्रेरणादायी कहाणी!
-
Gavasalelya Goshti (गवसलेल्या गोष्टी)
परदेशी भाषेतील कथाकारांच्या कथा वाचताना अशा काही कथा काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात आल्या ज्या वाचल्यावर काहीतरी अद्भुत असं गवसल्याचा मला आनंद झाला. या कथा माझ्या देशाच्या भूमीपासून हजारो मैल दूर असलेल्या भूमीत घडतात. यातील बर्याचशा माझ्या काळाच्या शंभर वर्षांपूर्वीच्या काळात घडतात. पण त्या मला माझ्या, आपल्या, सगळ्या जगाच्या वाटल्या. काल, आज आणि उद्याच्याही वाटल्या. मला गवसलेल्या या कथा माझी भाषा बोलणार्यांपर्यंत पोहोचवणं मला आवश्यक आणि आनंददायी वाटणं हा असं वाटण्याचाच परिपाक...
-
Sobati (सोबती)
दीर्घकाळ चालणाऱ्या वैद्यकीय उपचारात रुग्ण आणि त्यांचे स्नेही अशा दोघांचाही कस लागतो. रुग्णांची देखभाल करीत असताना स्वतःचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य जपणे सोबत्यांसाठी आव्हान असते. त्याविषयी चर्चा करताना हे पुस्तक दीर्घकालीन उपचारात आवश्यक असलेले आर्थिक नियोजन तसेच डॉक्टर, रुग्ण व सोबती यांच्यातील सुसंवाद आणि समन्वय इत्यादी मूलभूत विषयांना हात घालते. आपल्या देशाचा विचार करता गरजू लोकांसाठी सेवाभावी आरोग्य सेवकांची फळी उभारण्याची गरज यात अधोरेखित केली आहे. डॉ. तुषार दिघे, किडनी विकार, डायलिसिस आणि ट्रान्सप्लांट विशेषज्ञ