-
Chaldhakal Karnyapasun Mukti (चालढकल करण्यापासून मुक्ती)
सगळेच जण कधी ना कधी कामाची टाळाटाळ करतात. आपण गोष्टी पुढे ढकलतो; कारण त्या कराव्याशा वाटत नाहीत, किंवा आपण इतर कामांना प्राधान्य देत असतो. कधी कधी काम सुरू करणंच खूप कठीण होऊन बसतं ! काही वेळा आपण स्वतःला समजावतो की अजून थोडा वेळ मिळाला तर वेगळा दृष्टिकोन बाळगून किंवा नव्या ऊर्जेने काम सुरू करू. लहान-मोठ्या कामांची टाळाटाळ करणं हा मनुष्य स्वभावच आहे. पण जेव्हा या कामाच्या दिरंगाईमुळे आपल्याला हताश वाटू लागतं आणि ते काम डोईजड होऊ लागतं. तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या कामावर, घरात किंवा नात्यांवर दिसू लागतो. अशा वेळी त्या दिशेने हातपाय हलवणं अनिवार्य ठरते. तुम्हाला प्रत्येक कामाची टाळाटाळ करण्याची सवय आहे का ? त्यावर उपाय आहे. पण एका रात्रीत तुमची सवय बदलेल अशी अपेक्षा ठेवू नका. तुम्ही एके दिवशी अचानक कामाची दिरंगाई करणं सोडून देणार नाही. पण हळू-हळू, एखाद-दोन सोपी कामं पार पाडू शकता, जेणेकरून तुमचे काम लवकर आणि अधिक त्रासाशिवाय पूर्ण होईल. दिरंगाईचा भार दूर केल्यावर, तुम्हाला जो मोकळेपणा जाणवेल त्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. याचे फायदे तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात पाहायला मिळतीलच.
-
Aatmasamman (आत्मसन्मान)
जर तुमचा स्वतःवरच विश्वास नसेल, तर लोकांनी तुमच्यावर विधार ठेवावा अशी अपेक्षा तुम्ही कशी ठेवू शकता? लोकांच्या मनातील तुमची प्रतिमा म्हणजे आत्म-सन्मान नव्हे- स्वतःकडे तुम्ही कसे पाहता याला आत्मसन्मान म्हणतात. आत्मसन्मान हा जन्मापासून जोपासला जातो. आणि जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने त्यामध्ये बदल केला जाऊ शकतो. जर तुमचा आत्मसन्मान उच्च असेल, तर तुम्हाला मिळणारे यशही तेवढेच मोठे असते. सकारात्मक आत्मसन्मानामुळे आत्मविश्वासाने कृती केल्या जातात आणि योग्य निर्णय घेतले जातात. नकारात्मक आत्म-सन्मान असल्यास आत्मविश्वासाचा अभाव, भित्रेपणा आणि निर्णय घेण्यात चालढकल करणे असे वर्तन दिसून येते. जसजसा तुमचा आत्मसन्मान वाढीस लागतो, तसतसे तुमचे खरे स्वरूप प्रकट होऊ लागते. तुम्ही जोखीम उचलू लागता आणि अपयशाचे भय कमी होते; तुम्हाला इतरांचा पाठिंबा आहे की नाही याची फारशी फिकीर वाटेनाशी होते; तुमचे नातेसंबंध अधिक अर्थपूर्ण होऊ लागतात; तुम्हाला ज्यातून आनंद आणि समाधान मिळते अशा कृती तुम्ही करू लागता: आणि तुम्ही समाजात एक सकारात्मक योगदान देऊ लागता. सर्वात महत्त्वाचे, उच्च आत्मसन्मान असल्यास तुम्हाला मनःशांती मिळते... प्रश्न असा आहे की, आपला आत्मसन्मान वाढवण्यासाठी मनापासून प्रयत्न करण्याची तुमची तयारी आहे का ?
-
Manvi Mendu (मानवी मेंदू)
अनेक वर्षांपासून असा समज होता की मेंदूच्या पेशींची वाढ बालपणानंतर थांबते आणि वृद्धत्वात त्या आपोआप क्षीण होऊन नष्ट होतात. परंतु अलीकडील वैज्ञानिक संशोधनाने या गैरसमजुती आणि नियतीवादाला छेद दिला आहे. संशोधनाने दाखवून दिले आहे की मेंदूला प्रशिक्षण, संवर्धन आणि जीवनातील प्रत्येक दिवस चपळ व सतर्क ठेवण्याचे मार्ग आपण अवलंबू शकतो. मेंदूचे संवर्धन म्हणजे आपल्या नैसर्गिक क्षमता वृद्धिंगत करणे, ज्यामुळे स्मरणशक्ती टिकून राहते आणि बळकट होते. मेंदू हा असा यंत्रमाग आहे, जो विचारांचे आणि भावनांचे सुंदर रेशीम विणतो. तो मज्जासंस्था आणि पाठीच्या कण्याला नियंत्रित करतो. इतकेच नव्हे, तर हृदयाचे ठोके, शरीराचे तापमान आणि रक्तदाब यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रक्रियांचा तो संचालक आहे. मेंदूच्या संवर्धनासाठी मज्जासंस्था, पाठीचा कणा आणि एकंदरीत आरोग्य यांच्यात सुसंवाद असणे आवश्यक आहे. हे छोटेसे पुस्तक तुम्हाला मेंदूच्या कल्याणासाठी काय करता येईल याबाबत नवीन दृष्टिकोन आणि उपाय सुचवते, जेणेकरून तुमचा मेंदू तुम्हाला उत्तम आणि परिपूर्ण जीवनाचा मार्ग खुला करेल.
-
Manovrutti Ekagrata(मनोवृत्ती एकाग्रता)
सकारात्मक मन हे आनंद, सुख, आरोग्य आणि प्रत्येक परिस्थितीत यशस्वी परिणामांची अपेक्षा करते. सकारात्मक विचारसरणी म्हणजे अशी मानसिकता, जी मनात वाढ, प्रगती आणि यशाला पोषक असे विचार, शब्द आणि प्रतिमा आणते. ही एक अशी मनोवृत्ती आहे, जी चांगल्या आणि अनुकूल परिणामांची अपेक्षा करते. ज्याची जशी मनोकामना, त्याची तशी प्राप्ती. पण तुम्हाला माहीत असलेल्या किती जणांनी सकारात्मक विचारसरणीच्या सामर्थ्यावर खरोखर विचार केला आहे? बहुतेक लोक या शब्दांना गांभीर्याने घेत नाहीत किंवा त्यांच्या आयुष्यात याचा अर्थ काय, हे समजून घेण्यासाठी वेळ देत नाहीत. तुमच्या सध्याच्या आयुष्याकडे एकदा नजर टाका; तुमचे आरोग्य, आर्थिक स्थिती, जीवनशैली, म्हणजेच तुमच्या चांगल्या आणि वाईट सर्व गोष्टी. या साऱ्या तुमच्या विचारांनी घडवलेल्या आहेत. जर तुमचे सध्याचे आयुष्य तुमच्या इच्छांशी पूर्णपणे जुळत नसेल, तर कदाचित आत्मचिंतनाची वेळ आली आहे. झेप मालिकेतील हे पुस्तक तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोन आणि सकारात्मक आयुष्याच्या मार्गावर घेऊन जाईल.
-
Veleche Parinamkarak Vyavasthapan (वेळेचे परिणामकारक व्यवस्थापन)
वेळ व्यवस्थापन म्हणजे तुमची व्यावसायिक आणि वैयक्तिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तुमच्या वैयक्तिक वेळेचा कार्यक्षम आणि प्रभावी वापर होय. याचा अर्थ केवळ तुमच्या तातडीच्या कामांनाच नव्हे तर महत्त्वाच्या गोष्टींनाही प्राथान्य देणे. तुम्ही तुमच्या वेळेचं व्यवस्थापन करण्यासाठी दैनंदिन प्लॅनर आणि करायच्या कामांची यादी वापरू शकता. ही साधनं निश्चितच उपयुक्त आहेत; परंतु ती महत्त्वाची कामे आणि तातडीची कामं कोणती यातला फरक स्पष्ट करत नाहीत. महत्त्वाच्या उपक्रमांचा एक परिणाम असतो ज्यामुळे तुमची उद्दिष्टे साध्य होतात. तातडीच्या उपक्रमांकडे त्वरित लक्ष देण्याची गरज असते. आणि बऱ्याचदा ते उपक्रम इतरांची उद्दिष्टे पूर्ण करण्याशी संबंधित असतात. लक्षात ठेवा, की विलंब हा प्रभावी वेळ व्यवस्थापनाचा सर्वात मोठा शत्रू आहे. गोष्टी लांबवल्याने किंवा टाळल्याने, तुमच्या कामाचा ढीग होत राहील / तुमचे काम साचून राहील. प्रभावी वेळ व्यवस्थापनामुळे तुम्हाला खालील फायदे मिळू शकतात. प्राधान्यक्रम ठरवून, तुम्ही वेळखाऊ आणि अनावश्यक उपक्रम वगळ शकता. एकाच वेळी अनेक कामं हाताळण्यापेक्षा तुम्ही दररोज असलेल्य कामाचे योग्य व्यवस्थापन करू शकता. तुमच्या कामांच्या दैनंदिन प्रगतीचं तुम्ही अवलोकन करू शकता. या पुस्तकात 'वेळ' या मौल्यवान साधनाचा उपयोग आणि व्यवस्थाप अधिक चांगल्या रीतीने करण्याचे उपाय सांगितलेले आहेत.
-
Rag Samjun Ghetana (राग समजून घेताना)
राग येणं ही नैसर्गिक भावना आहे. पण तो अनावर झाल्यावर आपण हिंसक कधी बनतो हे आपल्या लक्षातही येत नाही. रागामुळे आपल्या कामाच्या ठिकाणचं वातावरण बिघडू शकतं, आपल्या इतरांशी असलेल्या नात्यावर परिणाम होतो आणि एकूणातच आपल्या आयुष्याची लय बिघडून जाते. अनावर झालेला राग आपल्या मनाचा ताबा घेतो आणि अतिशय तीव्र भावनांची आपण शिकार होतो. आपल्या मनातली खळबळ कोणत्या दिशेला जाईल याचा काहीही अंदाज बांधता येत नाही. मनातला राग स्पष्टपणे व्यक्त करणं हा सगळ्यांत योग्य मार्ग आहे. हे करण्यासाठी आपल्याला नक्की काय हवंय आणि जे हवं आहे ते इतरांना न दुखावता कसं मिळवता येईल हे आपण जाणून घ्यायला हवं. एखादी आपल्याला हवी असलेली गोष्ट इतरांना स्पष्टपणे आणि ठामपणे सांगणं म्हणजे खऱ्या अर्थानं स्वतःचा आब राखून इतरांशी आदराने वागणं होय. रागाचं नियमन कसं करायचं हे शिकवता येतं. रागाला कारणीभूत ठरणाऱ्या भावनिक आणि शारीरिक आवेगांची तीव्रता कमी कशी करायची हेच तर शिकवलं जातं.. आपल्याला संताप आणणाऱ्या गोष्टींना किंवा माणसांना किंवा परिस्थितीला आपण टाळू शकत नाही. आपण त्यांच्यात काही बदलही घडवू शकत नाही. पण त्यांच्याशी आपल्या वागण्यावर परिणामकारक पद्धतीनं नियंत्रण कसं ठेवायचं हे शिकणं आपल्या हातात आहे.
-
Dheyanichiti (ध्येयनिश्चिती)
तुमच्या आदर्श भविष्याचा विचार करण्यासाठी, तसेच तुमच्या भवितव्याचे हे स्वप्न प्रत्यक्षात आणायची प्रेरणा मिळून ते सत्यात आणण्यासाठी ध्येय ठरवणे ही एक प्रभावी प्रक्रिया आहे. तुम्हाला आयुष्यात जो पल्ला गाठायचा आहे त्याचा विचार करा. ही तुमची आयुष्यभराची ध्येयं असतात. तुम्हाला काय साध्य करायचं आहे ते तुमच्या लक्षात आलं की तुमच्या प्रयत्नांची दिशा तुम्हाला ठरवता येईल. तुमच्या मार्गात येणारे अडथळे तुमच्या लगेच लक्षात येतील. विचारपूर्वक ठरवलेली ध्येयं ही अत्यंत प्रेरक असतात. जसजशी तुम्हाला ध्येय ठरवण्याची आणि ती साध्य करण्याची सवय होईल, तसतसा तुमचा आत्मविश्वासही वाढल्याचे तुमच्या लक्षात येईल. कालानुरूप आपली ध्येयं बदलत जातात हे लक्षात घेणंही महत्त्वाचं असतं. तुमची ध्येयं ठरवत असताना आधी शिकलेले धडे लक्षात घ्या. आपले ज्ञान आणि अनुभव यांच्यात वाढ होण्याच्या दृष्टीने आपली ध्येयं समायोजित करा. काही वेळा जेव्हा काही विशिष्ट ध्येय तुमच्यासाठी निरुपयोगी ठरतात तेव्हा ती सोडून देण्याचा विचार करा. तुम्ही जर यापूर्वीच आपली ध्येयं ठरवली नसतील तर आता ठरवा. एकदा का तुम्ही तुमच्या जीवनात या तंत्राचा समावेश केलात की हे यापूर्वीच का केलं नाही असच तुम्हाला वाटत राहील!
-
Khagolshastratil Nobel Paritoshike (खगोलशास्त्रातील नोबेल पारितोषिके)
आतापर्यंत ११ वर्षे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक खगोलशास्त्रज्ञांना दिले गेले आहे. नवीनतम तंत्रे व उपकरणे वापरून विषयाच्या आघाडीवर केलेले त्यांचे शोधकार्य, हायस्कूल पास केलेल्या विद्यार्थ्यांनाही समजेल अशा प्रकारे अतिशय सोप्या भाषेत या पुस्तकात समजावून सांगितले आहे. असे करताना प्रत्येक परितोषिकाच्या विषयाची संपूर्ण पार्श्वभूमी आधी विशद केली आहे. यामुळे या पुस्तकात संपूर्ण खगोलशास्त्राचा आढावा आलेला आहे. शोधकार्य समजण्यासाठी गरजेच्या असलेल्या भौतिकशास्त्रातील संकल्पना अधिक तपशिलाबरोबर चौकटीत दिल्या आहेत. अनेक किस्से समाविष्ट केल्याने वाचकांची गोडी शेवटपर्यंत कायम राहते. विद्यार्थी तसेच खगोलशास्त्रात रुची असलेल्या सर्वांसाठी, खगोलशास्त्रातील नवीनतम घडामोडी जाणून व समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगी पडेल.
-
Iranchya Gupt Nondi (इराणच्या गुप्त नोंदी)
इराणच्या गुप्त नोंदी' हे एका पत्रकाराचे स्वानुभवावर आधारित पुस्तक आहे, ज्याने अमेरिका-इराण यांच्यातील ताणलेल्या संबंधांच्या काळात, एका सामान्य पर्यटकाच्या वेशात इराणची भ्रमंती केली. सध्या इराणला अमेरिकेसोबत पूर्ण युद्धाची शक्यता भेडसावत असताना, हे पुस्तक इराणच्या जागतिक पटलावरील सद्यस्थितीचे गहन भूराजकीय विश्लेषण करते. वाचकाला इराणच्या विस्तृत प्रदेशाची रोमांचक सफर घडवते, जिथे इराणमधील प्रसिद्ध ठिकाणे स्थानिकांच्या भावविश्वाचे आणि त्यांच्या उलथापालथींनी भरलेल्या जीवनाचे स्तर अलगद उलगडून सांगतात. या कथनाला तेहरान, शिराज, इस्फहान, पर्सेपोलिस, बंदर अब्बास आणि इतर अनेक ठिकाणी काढलेल्या खास छायाचित्रांची जोड आहे. पुस्तकात तेलविषयक राजकारणाचे विश्लेषण, युद्धाविषयी सखोल चर्चा, संवेदनशील सामाजिक मुद्यांचा बारकाईने अभ्यास आणि जागतिक ख्यातीचे भूराजकीय लेखक आणि इराणबाबतचे तज्ज्ञ भाष्यकार, विजय प्रशाद, तसेच प्रसिद्ध हिजाब विरोधी इराणी कार्यकर्त्या आणि लेखिका मसीह अलीनेजाद यांच्या प्रेरणादायी मुलाखतींचा समावेश आहे.