-
Nivdak Gomaji (निवडक गोमाजी)
गोमाजी गणेशन या नावाने काही वर्षांपूर्वी 'साप्ताहिक अॅमॅच्युअर' मध्ये लिहिलेल्या काही निवडक स्फूट लेखांचा हा संग्रह आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर हलकी-फुलकी टिप्पणी करणारे हे प्रासंगिक लिखाण दहा-पंधरा वर्षापूर्वीचे असले तरी आजही ते कालबाह्य वाटत नाही. अर्थात याचे श्रेय बदलत्या जमान्यातही न बदलणाऱ्या आपल्या आजकालच्या राजकीय व सामाजिक संस्कृतीला द्यावे लागेल. या पुस्तकातील लेख आणि त्यातील व्यक्ती व प्रसंग हे काल्पनिक असले तरी त्यांचे कोणत्याही जिवंत वा मृत व्यक्तींशी साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजू नये. किंबहुना त्यांच्यातील साधर्म्य वाचकांच्या लक्षात आणून द्यावे, याच हेतूने हे लिखाण केलेले आहे. हे पुस्तक म्हणजे आरसा असून त्यात पाहून कोणाच्या भावना दुखावणार नाहीत अशी अपेक्षा आहे.
-
Gajlelya Jagatik Rajkiya Hatya (गाजलेल्या जागतिक राजकीय हत्या)
गाजलेल्या जागतिक राजकीय हत्या' हे पुस्तक म्हणजे अब्राहम लिंकन (१८६५) ते बेनझीर भुत्तो (२००७) असा प्रदीर्घ रक्तरंजित इतिहास आहे. लेखक धनंजय राजे यांनी अतिशय कौशल्याने जगात गाजलेल्या १५ राजकीय हत्यांचा अभ्यासपूर्ण वेध घेतला आहे. या पंधरा व्यक्तिपैकी म. गांधी आणि मार्टीन ल्यूथर किंग यांना वगळता बाकीच्या तेरा व्यक्ती त्या त्या देशात सर्वोच्च पदावर होत्या. जगात खळबळ माजविणाऱ्या या क्रूर हत्यांमागचे कटकारस्थान, घटनांचे चित्रदर्शी वर्णन वाचकांना खिळवून ठेवेल. जग जसजसे आधुनिकतकडे जात गेले तसतसे खून करण्याच्या पद्धती, खुनासाठी वापरलेली हत्यारे यांमध्येही बदल होत गेले. म्हणजे विषप्रयोग, तलवार, सुरा, खंजीर इथपासून ते मानवी बाँबपर्यंत हा कलंकित मानवी प्रवास येऊन ठेपतो. ज्येष्ठ संपादक, पत्रकार श्री. कुमार केतकर लिहितात-हे पुस्तक केवळ सुजाण वाचकांसाठी मर्यादित नाही, केवळ करमणुकीसाठी नाही तर हे अभ्यासाचे पुस्तक आहे. विविध परीक्षांना (यूपीएससी इत्यादी) ते अगदी केबीसी (कौन बनेगा करोडपती) साठी तयारी करणाऱ्यांनाही हे उपयोगी पडेल. राजकीय हत्या या राजकारणाचा, सत्तेचा समतोल बदलण्यासाठी केल्या जातात. त्या घडत नाहीत, घडविल्या जातात. राजे यांच्या या पुस्तकाबद्दल इतकेच म्हणता येईल की, हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास आहे आणि तो एखाद्या रहस्यकथेसारखा सादर केला आहे.
-
Kashmirchya Lokakatha (काश्मीरच्या लोककथा)
रेव्हरंड जे. हिंटन नोल्स (Knowles) है पंजाबमध्ये काम करणारे एकोणिसाव्या शतकातले अतिशय प्रसिद्ध असे ब्रिटिश मिशनरी होते. जिथे काम करायचे, आपले धर्मतत्त्व लोकांना पटवून द्यायचे, त्या लोकांची भाषा, चालीरीती वगैरेचे ज्ञान धर्मप्रचारकाला आवश्यक असते. ही गोष्ट नोल्स यांना चांगलीच माहीत होती. संस्कृतीचे ते जाणकार होते. लोकसाहित्य हे संस्कृतीच्या अभ्यासाचे प्रमुख अंग आहे याची जाण त्यांना होती. काश्मिरी म्हणींचा कोश त्यांनी प्रथम तयार केला. 1886 च्या सुमारास A Dictionary of Kashmiri Proverbs and Saying या नावाने तो प्रसिद्ध आहे. दूरुबनर आणि कंपनीने तो लंडनला प्रकाशित केला. लोकसाहित्याचे जाणकार म्हणून या कोशामुळे ते प्रसिद्धीला आले. रे. नोल्स यांचा Folks-Tales of Kashmir हा दुसरा ग्रंथ 1888 साली टूरुबनर आणि कंपनीनेच प्रकाशित केला. त्याचेच भाषांतर मी केले आहे.;Indian Antiquary या अतिशय पांडित्यपूर्ण आणि जगभर आदरास पात्र झालेल्या मासिकात यातल्या काही गोष्टी आलेल्या आहेत. माझे लक्ष प्रथम त्यांनीच वेधून घेतले. मेरी फ्रियर नंतर जे पाच-सात लोककथा-संग्राहक पाश्चात्त्य लोकसाहित्याच्या अभ्यास प्रथेत भारतीय लोककथाकारांचे अग्रदूत म्हणून गणले जातात त्यापैकी नोल्स हे एक आहेत. भारतीय लोककथांचा सर्वकष अभ्यास अद्याप झालेला नाही. भारतीय लोककथांचे संग्रह, त्यातल्या त्यात आता दुर्मिळ झालेले संग्रह भारतीय भाषांत अनुवाद होऊन पुढे आले तरच हा अभ्यास आता शक्य आहे. या हेतूने मी हा अनुवाद केला आहे.
-
Umbarkhind (उंबरखिंड)
इतिहासातील सर्वांत मोठा गनिमी कावा #उंबरखिंड वाचकांसाठी सज्ज शाहिस्तेखानाने कोकण जिंकण्यासाठी तीस हजारांची फौज पाठवली. सोबत दीड लाख तलवारी, एक लाख ढाली, बारा हजार बंदुका, चाळीस हजार भाले आणि दहा लाख रूपयांचा खजिना सोबत पाठवला. हजार मुडदे पडले तरी चालतील पण कोकण जिंकायचंच या इराद्याने शाहिस्तेखानाने कारतलबखान नावाच्या सरदाराकडं ही मोहीम सोपवली. कारतलबखान म्हणजे हाती तलवार नसेल तर दातांनी शत्रूचा गळा फोडणारा शूर आणि तेवढाच क्रूर सरदार. मोठ्या रुबाबात आणि विजयीभावानं मुघलांचा ताफा पुण्याहून निघाला आणि दोन दिवसांनी लोणावळ्यात पोहचला. पण, लोणावळ्याच्या पुढे असलेल्या उंबरखिंडीत सह्याद्रीचे वाघ मुघलांची वाट पाहतच थांबले होते आणि या वाघांचं नेतृत्व करत होते स्वत: छत्रपती शिवाजी महाराज. तीस हजार सैनिक, दहा सरदार आणि शाहिस्तेखानाचीही मती गुंग करणारा इतिहासातील सर्वांत मोठा गनिमी कावा म्हणजेच उंबरखिंड. आजपासून ही कादंबरी वाचकांसाठी उपलब्ध करुन देत आहोत. उन्हाळ्याच्या सुट्टीत ही कादंबरी अवश्य वाचा आणि घरातील लहान मुलांनाही वाचायला द्या. साधी, सोपी आणि सुटसुटीत लेखनशैली...
-
Atal Avichal (अटल अविचल)
ब्रिटिश काळातल्या गोऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एका अर्थाने विपुल असं लेखन केलेलं आढळतं. यापैकी काही लेखन ब्रिटिश प्रशासनाला साहाय्यभूत ठरणारं असं होतं, उदाहरणार्थ ‘अँडरसन मॅन्युअल'. हे पुस्तक तर आजही महसूलातलं बायबल आहे. काही गोऱ्या साहेबांनी भारतीय संस्कृतीबद्दल, भारतीय इतिहासाबद्दल, भाषांबद्दल कुतुहल दर्शवून त्या संदर्भात बरचसं लिखाण केलं आहे. काहींनी सामाजिक अंगानेसुद्धा लिहिलं आहे. अन्य ब्रिटिश लेखकांनीसुद्धा तत्कालिन समाज, भारतीय माणसाची मनोवृत्ती, राजे-महाराजे यांच्या सवयी इत्यादींबद्दल लिहिलेलं आहे. तद्नंतर, भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी काहीएक महत्त्वाचं लेखन केलेलं आहेच. याच परंपरेमध्ये आता ‘अटल-अविचल' या डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या आत्मकथनाची भर पडलेली आहे. औरंगाबादल विभागीय आयुक्त कार्यालयात मी त्यांच्या सोबत काम केलेलं आहे. शिस्तप्रिय, पद्धतशीर काम करणारा (चशींहेवळलरश्र) आणि स्वच्छ चारित्र्याचा अधिकारी म्हणून डॉ. दिपक म्हैसेकरां ओळख सर्वत्र प्रचलित होती. ‘अटल अविचल' मध्ये त्यांनी लोकाभिमुख प्रशासनाची कहाणी रसपूर्ण भाषेत आणि ओघवत्या शैलीत सांगितली आहे. महसूल विभागाच्या सर्वोच्च पदाला स्पर्श करताना आलेल्या अनेक अवघड प्रसंगात ते अटल आणि अविचल राहिले याचा त्यांना रास्त अभिमान आहे. त्यांचं हे आत्मकथन अनेक अंगांनी वाचनीय, स्मरणीय असं असून महसूल विभागामध्ये ‘अटल' राहण्याची काय किंमत मोजावी लागते याचा लेखाजोखा या कथनात अतिशय प्रांजलपणे मांडलेला आहे. इतकंच नाही तर, डॉ. म्हैसेकर यांनी मराठी रसिकवाचकाला या प्रशासनातल्या आंतरविश्वाचं समर्थपणे दर्शन घडविलं आहे. त्या योगे मराठी साहित्यविश्वातील आत्मकथनाच्या परंपरेत मोलाची भर पडलेली आहे.
-
Sadhuputra Shambhu (साधूपुत्र शंभू)
आगऱ्यावरून माघारी येताना शंभूराजे वाटेत मरण पावले. त्यांच्या पार्थिवाला आम्ही स्वत: अग्नी दिला.' शिवाजीराजांनी असं जाहीर केलं आणि सारा राजगड धाय मोकलून रडू लागला. खेड्यापाड्यातल्या मायमाऊल्यांनी डोळ्याला पदर लावला. म्हतारेकोतारे मुसमुसू लागले. पण, प्रत्यक्षात... प्रत्यक्षात शंभूराजे जिंवत होते, ठणठणीत होते आणि राजगडाकडं येण्यासाठी सज्ज होते. दुर्दैव फक्त एवढेच की शंभूराजांच्या वाटेवर काट्यांची रांगोळी काढण्यासाठी औरंगजेबही सज्ज होता. कारण शंभूराजांच्या मृत्यूवर औरंगजेबाला अजिबात विश्वास नव्हता. मुघली सैनिक, दरोडेखोर, गुप्तहेर, धन- दौलत, प्रतिष्ठा सारं काही त्याने शंभूराजांच्या शोधासाठी पणाला लावलं. उसाचा फड पेटवावा तसा सारा मुघली प्रांत पेटवून दिला. पण, साऱ्या मुघलांची धुळदाण उडवत शंभूराजे राजगडी पोहचले. कसे ? उत्तर हेचि #शंभू
-
Gosht Reserve Bankechi (गोष्ट रिझर्व्ह बँकेची)
विद्याधर अनास्कर यांच्या 'गोष्ट रिझर्व्ह बँकेची' या पुस्तकातून बँकिंग आणि वित्त क्षेत्रातील आकर्षक जगाचा शोध घ्या. हे सर्वसमावेशक मराठी पुस्तक आपल्या देशाच्या मध्यवर्ती बँकिंग संस्थेच्या रिझर्व्ह बँकेच्या रंजक कथेचा उलगडा करते. आकर्षक कथा आणि तपशीलवार अंतर्दृष्टीद्वारे, लेखक भारताच्या आर्थिक परिदृश्यात आरबीआयची उत्क्रांती, कार्ये आणि महत्त्व यांचा शोध घेतात. हे पुस्तक वाचकांना चलनविषयक धोरणे, बँकिंग नियम आणि आर्थिक स्थिरता राखण्यात रिझर्व्ह बँकेची महत्त्वाची भूमिका याबद्दल सखोल समज देते. तुम्ही अर्थशास्त्राचे विद्यार्थी असाल, बँकिंग व्यावसायिक असाल किंवा भारताच्या वित्तीय व्यवस्थेबद्दल उत्सुक असाल, हे पुस्तक सुलभ मराठी भाषेच्या स्वरूपात मौल्यवान ज्ञान प्रदान करते.
-
Patra Ani Maitra (पत्र आणि मैत्र)
गेली सात दशकं मराठी साहित्यविश्वात डौलदार वाटचाल करणारी प्रकाशनसंस्था ‘राजहंस प्रकाशन’. गेली चाळीस वर्षं ‘राजहंस’चं सुकाणू समर्थपणे सांभाळणारे कप्तान दिलीप माजगावकर. अशा दिलीप माजगावकरांचा विविध नामवंतांशी ‘या ह्रदयीचे त्या ह्रदयी’ घातले असा चिंतनशील, भावगर्भ पत्रसंवाद : ‘सप्रेम नमस्कार’. ‘राजहंस’च्या वाटचालीचं विस्तृत सिंहावलोकन करणारी आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रपटाचा गेल्या पाऊण शतकाचा मागोवा घेणारी दिलीप माजगावकरांची प्रदीर्घ मुलाखत : ‘प्रवास श्रेयसाकडे’. ‘दिगमा’ या चतुरस्र अन् लोभस व्यक्तिमत्त्वाला न्याहाळणारे त्यांच्या सुह्रदांचे लेख : ‘असे दिसले दिगमा’. या सा-याचा अंतर्भाव असलेलं – महाराष्ट्राच्या साहित्यिक अन् सांस्कृतिक संचिताच्या इतिहासाचा जणू तुकडा वाटणारं – पत्र आणि मैत्र
-
Neurosurgerychya Paulkhuna (न्यूरोसर्जरीच्या पाऊलखुणा)
मेंदू आणि त्याला जोडून असलेला मणका हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचे; तितकेच नाजूक अवयव. पण त्यांच्या आजारांबद्दल, त्यावरील उपचारांबद्दल आपल्याला फार कमी माहिती असते. याबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने प्रदीर्घ अनुभव असलेले न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. ते या पुस्तकातून मेंदू व मणक्याशी संबंधित आजार, त्यांची लक्षणं, कारणं आणि त्यावरील योग्य उपचार यांची ओळख सहजसोप्या भाषेत करून देतात. पुस्तकातले काही महत्त्वाचे विषय – ब्रेन ट्यूमर चेहऱ्याची असह्य वेदना (ट्रायजेमिनल न्यूराल्जिया) डोळा मारण्याचा आजार व त्यावरील उपचार वरदान ठरलेली एमव्हीडी शस्त्रक्रिया एमआरआयचं तंत्रज्ञान स्लिप डिस्क मेंदूचं कामशास्त्र साठीनंतरची मणक्याची शस्त्रक्रिया इत्यादी…. मेंदू आणि मणका यांची कार्य, त्यांचे आजार आणि त्यावरील शस्त्रक्रिया यांबद्दल तसेच त्या अनुषंगाने रंजक, उद्बोधक आणि उपयुक्त माहिती देणारं पुस्तक न्यूरोसर्जरीच्या पाऊलखुणा….