-
Firangoji Narsala Hiroji Indulkar Balaji Aavaji (फिरंगोजी नरसाळा हिरोजी इंदुलकर बाळाजी आवजी)
फिरंगोजी नरसाळा हे एक चाकणचे अतिशय शूर किल्लेदार होते. त्यांनी शाहिस्तेखानाच्या वीस हजार सैन्याला अवघ्या तीनशे मावळ्यांनिशी तब्बल छप्पन दिवस झुंजवले! त्यांच्या पराक्रमाची दखल घेऊन शिवरायांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. वास्तूविशारद हिरोजी इंदुलकर यांनी आरमारी राजधानी सिंधुदुर्ग व रायगड यांची केलेली रचना म्हणजे वास्तूकलेचा उत्तम नमुना होय. एवढे मोठे कार्य करुनही 'सेवेचे ठायी तत्पर ' एवढे जगदीश्वराच्या मंदिरावर लिहून आपली स्वामीनिष्ठा व उदारपणा त्यांनी दाखवला. शिवरायांना राजापुरात गवसलेले सर्वात अनमोल रत्न म्हणजे बाळाजी आवजी चिटणीस होय. त्यांनी स्वराज्याची सेवा अतिशय निष्ठेने केली. त्यांचे मोत्यासारखे अक्षर व पत्राचा मायना यामुळे राज्यातील व परराज्यातील अनेक नाजुक प्रश्न त्यांनी सोडवले होते. शिवरायांनी त्यांना चिटणीसी व पालखीचा मान दिला होता.
-
Tanaji Malusare (तानाजी मालुसरे)
तानाजी मालुसरे’ हे नाव ऐकले तरी मराठी माणसाच्या मनात स्वाभिमान जागृत होतो.अगदी आधुनिक काळातही कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना आपले काम निष्ठेने व प्राधान्यक्रमाने कसे करावे,हे तानाजी मालुसरे यांच्या जीवनकार्याचा अभ्यास केल्यावर समजते. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तळकोकण मोहिमेच्यावेळी सूर्यराव सुर्वे यांनी रात्रीच्या वेळी अचानक हल्ला केला तरीही तानाजीराव विचलित झाले नाहीत.प्रतिकूल परिस्थितीतही धैर्याने विजय संपादन करता येतो,हेच तानाजी मालुसरे यांनी आपल्या पराक्रमाने दाखवून दिले. अफजलखान प्रसंग,कारतलबखान व शायिस्तेखान वधाप्रसंगी तानाजी मालुसरे हे सावलीसारखे शिवरायांबरोबर होते.या प्रसंगांत त्यांनी गाजवलेला पराक्रम विलक्षण होता.सिंहगड मोहिमेत तानाजीराव व उदयभान यांची झालेली झुंज मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झाली. युद्धस्थळी तानाजी मालुसरे यांच्यासमोर कोणाचाही टिकाव लागणे शक्य नसे.कितीही संकटे आली तरी आपल्या छातीचा कोट करुन ते संकटांना सामोरे जात.शिवरायांच्या एकनिष्ठ मावळ्यांमध्ये तानाजीराव हे केवळ इतिहासातच नव्हे,तर लोककथांमध्येही अजरामर झाले.
-
Hambirrav Mohite (हंबीरराव मोहिते)
हंबीरराव मोहिते म्हटले की , डोळ्यासमोर येतो एक रांगडा मराठा गडी! उंच देहयष्टी ,चेह-यावर राकट व करारीपणा , गालावर मोठ्या मिशा असलेले मर्दगडी ,डोक्यावर सरसेनापती पदाचा मुकुट, गळ्यात मोत्यांच्या माळा व हाती दुधारी तलवार असलेले एक रुबाबदार व्यक्तीमत्व होय.! छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभू महाराजांच्या काळात आपल्या अमोघ कार्याचा ठसा उमटवणारे हंबीरराव मोहिते हे एक विलक्षण व्यक्तीमत्व होते. 'मोडेल पण वाकणार नाही' या वृत्तीचे तसेच आपल्या तत्वांशी कधीही प्रतारणा न करणारे हंबीरराव मोहिते यांचा मृत्यू रणांगणावर शत्रूशी लढताना झाला. आपल्या मृत्यूआधिही मुघलांना धूळ चारत त्यांनी विजयश्री संपादन करुन हिंदवी स्वराज्याला शेवटचा मुजरा केला.
-
Murarbaji Deshpande (मुरारबाजी देशपांडे)
जावळीच्या मोऱ्यांशी लढताना शत्रूसेनेतील मुरारबाजी देशपांड्यांची आवेशपूर्ण लढत पाहून महाराज इतके प्रभावित झाले की, जणू त्यांना हिराच गवसला! पुढे पुरंदरच्या लढाईत मुरारबाजींनी गाजवलेले शौर्य पाहून दिलेरखानही थक्क झाला. या लढाईत त्यांनी प्रचंड पराक्रम गाजवला आणि अखेर ते धारातीर्थी पडले. खेडेबारेतील नऱ्हेकर देशपांड्यांच्या तीन पिढ्यांनी स्वराज्यासाठी आपले प्राण वेचले. बापूजी देशपांडे यांनी दोन वेळा सिंहगड स्वराज्यात आणून मोलाची कामगिरी केली. त्यांचे पुत्र चिमणाजी आणि बाळाजी यांनी लालमहालावरील हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याच परंपरेतील नारो देशपांडे यांचा मुलगा केसो नारायण आणि नातू नारायण देशपांडे हे आजोबा, पुत्र आणि नातू हिंदवी स्वराज्यासाठी वेगवेगळ्या लढायांत धारातीर्थी पडले.
-
Kanhoji Jedhe Jivaji Mahala (कान्होजी जेधे जिवाजी महाला)
कान्होजीराव जेधे हे स्वराज्यातील जुने जाणते व्यक्तिमत्त्व होते. ते शहाजीराजे भोसले यांचे विश्वासू सरदार होते. शहाजीराजे नेहमी म्हणत, 'मावळात सर्वांत जबरदस्त वतनदार असेल तर ते कान्होजी होय'. कान्होजी हे आदिलशाहच्या दरबारी वतनदार होते. त्यामुळे अफजलखान प्रकरणी कान्होजी जेधेंना आपल्या बाजुला वळवण्यासाठी आदिलशहा व अफजलखानाने प्रयत्न केला. कान्होजींनी स्वराज्याशी एकनिष्ठता दाखवत शिवाजी महाराजांना साथ दिली त्याबरोबरच मावळ भागातील सर्व देशमुखांना एकत्र करुन स्वराज्यात आणले. भेदक नजर, भरभक्कम शरीरयष्टी असलेल्या जिवाजी महाला या दांडपट्टा बहाद्दराने अत्यंत चपळाईने शिवाजी महाराजांवर हत्यार उगारलेला सय्यद बंडाचा हात क्षणार्धात हत्यारासह कलम केला. त्यानंतर पुन्हा दांडपट्टा फिरवून त्याची जागेवरच खांडोळी केली. क्षणाचाही विलंब जिवावर बेतला असता. कान्होजीराव जेधे व जिवाजी महाला यांचे जीवन संघर्षाने भरलेले होते. तरी त्यांनी नशीब व भाग्य या गोष्टींना दोष न देता या संघर्षातून मार्ग काढला त्यामुळे ते मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झाले.
-
Yesaji Kank Kondhaji Farjand (येसाजी कंक कोंडाजी फर्जंद)
येसाजी कंक हे चपळ, निर्भय व धाडसी व्यक्तिमत्त्व जे महाकाय हत्तीसमोरही दिमाखात जमिनीवर पाय रोवून उभे होते. शिवरायांचा प्रत्येक मावळा हत्तीएवढ्या ताकदीचा आहे, याचे हे प्रत्यक्षदर्शी उदाहरण होय. कोंडाजी फर्जंद म्हणजे अचाट धाडस, शत्रूच्या हद्दीत जाऊन त्याला तुंबळ युद्धासाठी पुकारणारा महावीर होय. भीती हा प्रकारच जणू या वीराला माहीत नव्हता. पन्हाळगड मोहीम यशस्वी करणार्या या वीराला जंजिरा मोहिमेत वीरमरण आले. या दोन्ही स्वामीनिष्ठ वीरांनी स्वराज्यासाठी जगायचे अन् स्वराज्यासाठीच मरायचे, हे आपल्या कृतीतून दाखवून दिले.
-
Guptaher Bahirji Naik (गुप्तहेर बहिर्जी नाईक)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख 'बहिर्जी नाईक' हे एक अनोखे व्यक्तीमत्व होते. स्वतः बहिर्जी नाईक हे फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत असे वेगवेगळे सोंग घेऊन शत्रूच्या गोटात शिरुन आवश्यक ती माहिती काढून आणत असे.त्यानंतर शिवराय आपल्या मोहिमेचे एकूण नियोजन करत असे.हेरगिरी करणे ही साधी गोष्ट नव्हती. एक चूक आणि मरणाची गाठ अशी स्थिती असूनही अनेक अवघड मोहिमेंवर बहिर्जी यांनी यश मिळवले होते.विजापूरचा आदिलशाह असो अथवा क्रुरकर्मा औरंगजेबसारखा संशयी मुघल बादशहा,सर्वांना अनेकवेळा बहिर्जींनी हुलकावणी दिली होती .यातून बहिर्जी यांची बुद्धिमत्ता , चातुर्य व साहस याचे दर्शन घडून येते. सदर पुस्तकात स्वराज्याच्या स्थापनेपासून जालना लूटीपर्यंत बहिर्जी नाईकांच्या कामगिरीचा थोडक्यात आढावा घेतला आहे.शिवकालीन इतिहासात बहिर्जी नाईक यांचे कार्य अविश्वसनीय, थरारक व मन थक्क करणारे आहे.असे बहिर्जी नाईक पुन्हा होणे नाही.
-
Baji Pasalkar Prataprav Gujar Ramaji Pangera (बाजी पासलकर प्रतापराव गुजर रामजी पांगेरा)
बाजी पासलकर हे मोसे खोर्यातील भारदस्त व्यक्तिमत्त्व होते. जुलमी सुलतानी राजवट संपवून न्यायाचे हिंदवी स्वराज्य निर्माण करणार्या शिवरायांच्या महान यज्ञातील पहिली समिधा म्हणजे बाजी पासलकर होय! हिंदवी स्वराज्याचे तिसरे सरसेनापती प्रतापराव गुजर एक धाडसी वीर होते. त्यांचे मूळ नाव कुडतोजी होते. त्यांच्या पराक्रमाने प्रेरित होऊन शिवरायांनी त्यांना 'प्रतापराव' हा किताब दिला अन् पुढे हेच नाव रूढ झाले. साल्हेर येथे खुल्या मैदानात त्यांनी मुघलांचा पराभव केला. रामजी पांगेरा यांच्या पराक्रमामुळे त्यांचे वर्णन शिवभारतात परमानंदानी 'अग्नीप्रमाणे वीर' असे केले आहे. कण्हेरगडावर रामजी पांगेरा यांच्या अवघ्या सातशे सैनिकांनी मुघल सरदार दिलेरखानाच्या हजारोंच्या सैन्याच्या तोंडचे पाणी पळवले.शेवटी दिलेरखानाला माघार घ्यावी लागली!