-
Anagatachya Talashi (अनागताच्या तळाशी)
सजगपणे मराठी इंग्रजी साहित्य वाचणाऱ्यांना श्री. श्रीनिवास शारंगपाणी हे नाव सुपरिचित आहे. कथा, कादंबरी, नाटक, कविता इत्यादी साहित्य प्रकारांमध्ये त्यांनी आपली लेखणी समर्थपणे चालवली आहे. त्यातील विषय वैचित्र्यामुळे त्यांची सर्वच पुस्तके वेधक ठरली आहेत. अनागताच्या तळाशी हा त्यांचा प्रस्तुत कथासंग्रह नावापासूनच वाचकांची उत्सुकता प्रचंड वाढवणारा आहे. या कथा भयकथा, चातुर्यकथा, विज्ञानकथा की आणखी काही अशी लेबले त्यांना लावण्याची गरज मला वाटत नाही. यातील प्रत्येक कथेला आपला स्वतंत्र जीव, स्वतंत्र भावविश्व आणि स्वतंत्र कालौघातील माहोल आहे. प्रत्येक कथा अनोख्या विश्वातील अनोख्या विषयावरची आणि अनोख्या शैलीतून प्रगटली आहे. या कल्पक (फॅन्टसी) कथा असल्या तरी त्यांना विज्ञानाचा आणि मानसशास्त्राचा भक्कम आधार आहे, त्यामुळे त्या आपल्याला दूरस्थ वाटत नाहीत. आपण त्यांच्या कथनाबरोबर पटकन एकरूप होऊन वाहत जातो. व्यवसायाने अभियंता असले तरी यांत्रिक जगाने त्यांच्या सर्जनशीलतेवर मात केलेली नाही, उलट त्यांच्या प्रतिभाशक्तीला अनेक आयाम प्राप्त करून दिले आहेत. केवळ मनोरंजन आणि वाचनीयता या पातळीवर न राहता या कथा आपल्याला विचार करायला लावतात, आपल्या मनात रेंगाळत राहतात हीच या कथांच्या यशस्वितेची पावती आहे.
-
Kavitetalya Shantabai (कवितेतल्या शांताबाई)
शान्ताबाई शेळके यांच्या कविता आणि गीतांच्या सोबतीने केलेली शोधयात्रा आठ दशके वाचकांवर-रसिक मनांवर गारुड करणारे हे नाव ! लोकप्रियता व साहित्य विश्वातील सर्वोच्च सन्मान शान्ताबाई शेळके यांना मिळाले. परंतु कवीचा सर्वात मोठा सन्मान म्हणजे त्याच्या कवितेतून त्याला नव्याने जाणून घेणे. उत्कट जिज्ञासेने कवितेच्या अंतहृदयापर्यंत जाणे. त्याच आदराने कवितेतील शान्ताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाला जाणून घेण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. शान्ताबाई शेळके यांची बहुआयामी कविता समजून घेणे हाही एक सृजनशील प्रवास आहे. शिणवणारा व समृद्ध करणाराही ! आनंद देणारा नि आर्त करणाराही !
-
Kshitijgami (क्षितिजगामी)
ही कहाणी आहे एका स्त्रीची, जिने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. तिचा प्रवास केवळ खेळाचा नव्हता, तर समाजाच्या चौकटी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि स्वतःच्या मर्यादांवर मात करण्याचा होता. क्रिकेटच्या मैदानापासून पॉवरलिफ्टिंगच्या स्पर्धापर्यंत आणि स्विमिंगच्या जलविश्वापर्यंत तिच्या जिद्दीची चुणूक सर्वत्र दिसली. खेळ तिच्यासाठी केवळ एक आवड नव्हती, तर ती तिच्या अस्तित्वाची ओळख होती. या प्रवासात तिला अनेक अडथळे आले- कधी निवडीतील अपयश, कधी आर्थिक अडचणी, तर कधी मानसिक संघर्ष. समाजाच्या चौकटींमध्ये अडकलेल्या मानसिकतेला छेद देत, तिने स्वतःचा मार्ग स्वतःच तयार केला. अनेकदा परिस्थिती प्रतिकूल होती, संधी मर्यादित होत्या, पण तिच्या जिद्दीने तिला पुढे जाण्याची ताकद दिली. अपयशाच्या छायेत हरवण्याऐवजी, तिने त्यालाच आपल्या विजयाचं पाऊल बनवलं. 'क्षितिजगामी : एक प्रवास अपराजित जिद्दीचा' हे पुस्तक केवळ आत्मकथन नाही, तर एक प्रेरणादायी प्रवास आहे.
-
Bipin Ganaveshamagacha Manus (बिपिन गणवेशामागचा माणूस)
साधारण १९७८ चा काळ. भारतीय लष्करी अकादमीमध्ये एक किरकोळ शरीरयष्टीचा आणि मध्यम उंचीच्या 'जंटलमन कॅडेट' कडे याआधी फारसं कुणाचं लक्ष नव्हतं. याच छात्राची त्याच्यापेक्षा सर्वार्थानं बलाढ्य म्हणता येईल, अशा कॅडेटनं बॉक्सिंगमध्ये निदर्यतेनं 'पिटाई' केली. त्यामुळं या किरकोळ कॅडेटच्या नाका-तोंडातून अक्षरशः रक्त यायला लागलं. आता तरी तो माघार घेईल, असं सामना पाहणाऱ्या सर्वांनाच वाटत होतं. परंतु हार मानण्याची मानसिकताच नसलेल्या त्या किरकोळ कॅडेटनं अवघा सामनाच पलटवून टाकला आणि अखेरीस विजय मिळवला. आता प्रेक्षकांना उत्सुकता होती, हा मुलगा आहे तरी कोण हे जाणून घेण्याची! तो होता झोजिला कंपनीचा आणि मितभाषी 'जंटलमन कॅडेट' बिपिन रावत ! भविष्यात लाजाळू तोच भारताचा पहिला सरसेनाध्यक्ष बनला ! ही आहे त्या पहिल्या सरसेनाध्यक्षांची कथा !!
-
Yuktahaar (युक्ताहार)
या पुस्तकामध्ये मुनमुन दहा आठवड्यांचा, सहज पाळता येण्यासारखा एक कार्यक्रम आपल्याला आखून देते. ती आपल्याला आपल्या आतड्यांचं आरोग्य सुयोग्य राखण्यास मदत करते. ज्यासाठी ती ऋतुमानाप्रमाणे अन्नाचं नियोजन, पाककृती, व्यायामाचे नियमन, झोपण्याच्या सवयी आणि योग करणे याचं पालन करायला सांगते. या पुस्तकामध्ये, मुनमुनसोबत काम करून, अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्यात आमूलाग्र बदल कसा झाला या विषयीही सांगितलं आहे. यात ती भर द्यायला सांगते ते पारंपरिक, प्रादेशिक पाककृतींवर. त्यासोबत ती पुरावा देऊन काही सूचनाही करते. 'युक्ताहार' तुमचं अन्नासोबतचं नातं घडवतं आणि त्यातूनच तुमच्या आतड्याचं आरोग्य सुधारतं. ते अधिक सुयोग्य (Lean) आणि सुदृढ बनतं....
-
Himalyatil Tera Mahine (हिमालयातील तेरा महिने)
माझ्या हृदयामध्ये अतोनात आनंदाची भावना येण्यासाठी फक्त तिथली विलक्षण शांतत्ता कारणीभूत नव्हती, याचं खरं कारण होते स्वातंत्र्य, मी आता माझ्या आजूबाजूच्या लोकांशी बांधील नव्हतो किंवा मी त्या सांसारिक बेड्यांनी जखडलेलोही नव्हतो, ज्या सतत तुम्हाला या जगाप्रमाणे वागण्यासाठी प्रवृत्त करत असतात. कोणतंही सांसारिक बंधन नाही. सादरीकरण नाही, समयसीमा नाहीत, टार्गेट, मीटिंग यापैकी काहीही नाही. असाल फक्त तुम्ही आणि तुमचं स्वतःच जग. अर्थात, स्वातंत्र्य हे फक्त माझ्या आनंदाचं कारण नव्हतं किंवा ते माझ्या आनंदाला चिरकाल टिकवू शकणार नव्हतं. मला वाटते, याचं मुख्य कारण होतं माझ्यामध्ये असलेली आशा. दिव्य माता खरोखरच आहे. यावर माझा विश्वास होताच, याचबरोबर ती मला भेटेल यावरही माझा ठाम विश्वास होता. मला आशा होती की, मी दिवसरात्र तिची साधना करेन आणि एक दिवशी ती माझ्यासमोर प्रगट होईल. आपल्या धर्मग्रंथांमध्येही हेच सांगितलं आहे.
-
Vidrohi Leki (विद्रोही लेकी)
हे पुस्तक म्हणजे विविध काळांमधल्या आणि संस्कृतींमधल्या स्त्रीवादी इतिहासाची एक अनोखी रोमहर्षक यात्राच आहे.ज्या व्यक्तींनी प्रचलित अन्यायकारक सामाजिक व्यवस्थांना झुगारून देण्याचं धाडस केलं आणि ज्यांनी नवीन सामाजिक घडी बसवण्यासाठी अनन्यसाधारण लढे दिले अशा महान व्यक्तींच्या, अंगावर सरसरून काटा आणणाऱ्या संघर्षाच्या कहाण्या या पुस्तकात वाचायला मिळतील. या महान व्यक्तींनी केलेल्या अचाट संघर्षामुळे आणि समर्पणामुळे नंतरच्या पिढ्यांचं आयुष्य सुखकर झालं. पुस्तकाचं प्रत्येक पान, धैर्य आणि टोकाची चिकाटी दर्शवणाऱ्या घटनांनी ओतप्रोत भरलेलं आहे. अतिप्राचीन काळापासून ते आधुनिक काळातल्या स्त्रीवादाचे स्वरूप आणि संदर्भ कसे बदलत गेले हे पुस्तक वाचताना लक्षात येतं. या पुस्तकात, स्त्रीवादाच्या विविध पैलूंचे पदर अनेक उदाहरणं देऊन उलगडले आहेत. या गोष्टींपासून प्रेरणा घेऊन प्रचलित चालीरीतींचा आणि परंपरांचा डोळसपणे विचार करायला लावण्याची क्षमता या गोष्टींमध्ये आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात या स्त्रीवादी लढ्यांची फलश्रुती अनुभवतो, हे पुस्तक वाचताना लक्षात येतं. या समाजव्यवस्थेत होणाऱ्या बदलांचा आपण केवळ साक्षीदार न होता, या बदलांचा एक भाग झालं पाहिजे अशी प्रेरणा हे पुस्तक वाचताना नक्कीच मिळते.
-
Bhutkalantun Mukti Vartamanashi Maitri (भूतकाळातून मुक्ती वर्तमानाशी मैत्री)
* तुम्हीच आहात तुमचे उत्तम डॉक्टर * मन आणि शरीरावरील उपचारांचा अभ्यास * आघातांमधून (ट्रॉमा) बाहेर कसे यावे * विश्वासाची शक्ती * स्व जागरूकता * तुमच्यात लपलेल्या लहान मुलाची भेट आणि पुनर्पालकत्व * मन, शरीर आणि आत्मा यांच्या आरोग्यासाठी वेगळा शास्त्रीय दृष्टिकोन
-
Karna Putra (कर्ण पुत्र)
“आचार्य आपण मला शिकवण्यास नकार का दिला?” आचार्य शांतच होते. काही क्षण तसेच गेले. “युगंधर कुठे आहे? त्याला तुम्ही कुठे पाठवलंय का? नक्की काय चाललंय? माझ्याशी कोणी बोलत का नाही?” तो एकामागे एक प्रश्न विचारत होता. आचार्य मात्र शांत होते. “सुवेध एक मोठा श्वास घे...” आचार्यांनी आपलं मौन तोडलं. “तुझ्यासारखा शिष्य मिळणं हे कुठल्याही गुरूचं भाग्यच असेल. तुला मी नाकारत नाहीये. परंतु माझ्या मनात दुसरीच काही योजना चालली आहे. तुझ्या क्षमतांचं योग्य प्रकटीकरण करायचं असेल तर त्याला त्याच ताकदीचा गुरू हवा. मी तुला कदाचित शस्त्रांमध्ये पारंगत करेन. परंतु तुझी क्षमता अस्त्रांवर प्रभुत्व मिळवण्याची आहे. पण त्यासाठी तुला योग्य स्थानी जावंच लागेल.” “अस्त्र?” सुवेधच्या शब्दांमध्ये प्रश्न डोकावत होता. “शस्त्र ही कला आहे, कौशल्य आहे. पण अस्त्र ही विद्या आहे. शस्त्रांचं कौशल्य आत्मसात करता येतं. पण अस्त्रांची विद्या मिळवण्यासाठी मात्र योग्य गुरू लागतात. अर्थात हे मिळवण्यासाठी तुला खूप संघर्ष करावा लागणार आहे. पण...” असं म्हणून शैलाचार्य शांत झाले. काही काळ शांततेत गेला. “काय आचार्य?” सुवेधला ही शांतता सहन होत नव्हती. “काही प्रश्नांची उत्तरं मिळवल्याशिवाय मला पुढचा मार्ग दिसत नाही आणि तुला कोणाकडे पाठवावं याचा संकेतही मिळत नाही.”
-
Aabhjan Priyajan (अभिजन प्रियजन)
बहुआयामी, बहुरंगी व्यक्तिचित्रांचा किंवा शब्दचित्रांचा हा संग्रह म्हणजे एका अर्थाने जयराज साळगावकरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा आरसाच आहे. त्यांच्या व्यासंगाचा आवडीचा आवाका बघून अचंबित होणे एवढेच आपल्या हाती उरते. चोखंदळ वाचन, नुसते पाहणे नाही तर खोलात जाऊन पूर्ण माहितीसह जीवनाचा आस्वाद घेणे या वृत्तीमुळेच असे लिखाण करणे शक्य होते आणि सोबत वाचकालाही समृद्ध करते ! -- रघुवीर कुल
-
Jane Kaha Gaye Wo Din (जाने कहां गये वो दिन)
वर्तमानकाळ चैतन्यशीलपणे जगतानाही आपल्या प्रत्येकाच्या मनात लहानपणी किंवा तरुणपणी जी पुस्तके वाचली, जे संगीत ऐकले अथवा जे नाटक वा चित्रपट पहिले, त्यांच्या आठवणी मनात रुतलेल्या असतात. `जाने कहाँ गये वो दिन' या पुस्तकात नामवंत लेखक बाबू मोशाय उर्फ हेमंत देसाई यांनी अमिताभ, प्राण, वहिदा रहमान, धर्मेंद्र, शशी कपूर, राजेश खन्ना, ऋषी कपूर, विनोद खन्ना, प्रदीपकुमार असे अनेक कलावंत तसेच गीतकार आनंद बक्षी यांच्यावर देखील आपल्या रसिल्या शैलीत लिहिले आहे. दुर्मिळ माहिती, भन्नाट किस्से आणि वेधक व्यक्तिचित्रे हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य.
-
Kanya Zali Ho (कन्या झाली हो)
भारतीय समाजाने स्त्रियांवर हजारो वर्षे अनन्वित अत्याचार केले. याविरूद्ध राजाराम मोहनरॉय, महात्मा फुले वगैरेंनी आवाज उठवला आणि स्त्रियांच्या प्रगतीचा मार्ग हळूहळू मोकळा होत गेला. मात्र विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात असं लक्षात आलं की स्त्रियांवर अन्याय फक्त भारतातच होतात असं नाही, युरोप/अमेरिकासारखे प्रगत देशसुद्धा याला अपवाद नाहीत. ही वस्तुस्थिती लक्षात घेत संयुक्त राष्ट्रसंघाने १९७५-१९८५ हे 'स्त्रीमुक्तीचे दशक' म्हणून घोषित केले. यामुळे स्त्रीमुक्तीला जागतिक आयाम प्राप्त झाला. याचे जगभर परिणाम झाले तसेच पडसाद उमटले. असेच पडसाद मुंबईच्या उपनगरात राहणाऱ्या, एका विवाहित, मध्यमवयीन, लेकुरवाळ्या, ब्राह्मणेतर, प्राथमिक शाळेत शिकवत असलेल्या स्त्रीच्या जीवनात उमटले. स्त्रीमुक्तीच्या या जागतिक वाऱ्यांनी तिच्या आयुष्याची दिशाच बदलली. त्याची ही कहाणी.