-
Everest 1953 (एव्हरेस्ट 1953)
राणी एलिझाबेथच्या राज्याभिषेका दिवशी 2 जून 1953 रोजी एव्हरेस्टवरच्या पहिल्या चढाईची बातमी आली. गिर्यारोहणाच्या इतिहासातला हा सुवर्णक्षण. तसं पाहता ही एक सुनियोजित मोहीम होती, पण तरी अनेक अडथळ्यांनी आणि विरोधाभासानं ती अधिकाधिक खडतर होत गेली. गिर्यारोहकांच्या डायऱ्या, त्यांची पत्रं अशा असंख्य दस्तावेजातून एव्हरेस्ट चढाईची पट उलगडत जातो. या थक्क करणाऱ्या प्रवासाचा पुनर्अनुभव देत हे पुस्तक 1953च्या इतिहासाची सफर घडवतं.
-
Kulamamachya Deshat( कुलामामाच्या देशात)
कोरकु भाषेत ‘कुला’ म्हणजे वाघोबा. मेळघाटच्या जंगलातला हा कुलामामा जेवढा काळजात धडकी भरवणारा, तितकीच त्याच्याबद्दलची उत्सुकताही अधिक. रानवाटा तुडवत कुलामामाचं दर्शन घेताना इथं वनअधिकाऱ्यांनाही जद्दोजहद करावी लागते...पण त्यातूनच काही खुसखुशीत प्रसंग, पेचप्रसंग निर्माण होतात. असेच हे ‘कुलामामाच्या देशातले’ रंगतदात प्रसंग. वनाधिकारी रवींद्र वानखडे यांच्या सुरस जंगलकथा आणि जी.बी. देशमुख यांच्या खुमासदार लेखनशैलीचा हा अद्भुत मिलाफ.
-
Aajcha Divas Majha (आजचा दिवस माझा )
स्पर्धा परीक्षा म्हणेज संयम आणि प्रयत्नांचीच परीक्षा. पण जिद्द आणि मेहनतीची तयारी असल्यास यश पायाशी लोळण घेतं, याचं उदाहरण म्हणजे आयएएस विजय अमृता कुलांगे. कुलांगे यांच्या ‘आजचा दिवस माझा’ पुस्तकातून त्यांच्या याच यशाची गुरूकिल्ली आपल्या समोर येते. ग्रामीण व शहरी भागांतील विद्यार्थ्यांनी खडतर परिस्थितीतही जिद्द न सोडता संकटांवर मात करून यश कसं संपादन करायचं, याचा वस्तुपाठ म्हणजेच लेखकाचे जीवन. प्राथमिक शिक्षक ते आयएएस अधिकारी हा प्रवास अगदी थक्क करणारा. काळाच्या मुशीत तावून सुलाखून निघालेले लेखकाचे आयुष्य आपणा सर्वांपुढेच सकारात्मकतेचा, प्रसन्नतेचा व नवनवीन आव्हानांचा दीप प्रज्वलित करते. जीवनजाणिवा समृद्ध करते.
-
Sthalantar (स्थलांतर)
युरोपला स्थलांतरित होण्याचं, तिथे एक सुस्थिर जीवन जगण्याचं स्वप्न डोळ्यांत घेऊन आफ्रिकेतील एरिट्रिया या देशातून बाहेर पडलेली सेमिरा... नंतर सुदान ते छादमधील अंजामेना असा झालेला प्रवास....अंजामेनात खिसशी झालेली भेट... दोघांत निर्माण झालेले शरीरसंबंध... त्यानंतर बोटीने इटलीला जात असताना लिबियाकडून बोट पकडली जाऊन दोन महिन्यांचा घडलेला असहनीय तुरुंगवास...तुरुंगवासात असताना लक्षात आलेलं गरोदरपण...तुरुंगातून सुटल्यावर परत अंजामेनाला गेली असताना खिसने फसवणूक केल्याचं कळलेलं सत्य...तिथेच निर्वासित कार्यालयाच्या निवासात राहत असताना जडलेला स्मृतिभ्रंशाचा आजार... तिची रुग्णालयात झालेली रवानगी...अशातच तिने मुलीला दिलेला जन्म...मुलीच्या जन्मानंतर काही दिवसांनी रुग्णालयातून केलेलं पलायन...निर्वासित कार्यालयाच्या अधिकारी रेमा बुस्तानी आणि तिच्या भावाने तिच्या शोधासाठी केलेले अथक प्रयत्न...नाट्यमय वळणांनी पुढे सरकत राहणारी सेमिराची सत्यकथा ‘स्थलांतर.’
-
Bhintina Jibhahi Astat (भिंतींना जिभाही असतात)
डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस अमृतराव मोहिते यांना गुन्ह्यांच्या तपासामध्ये डॉ. कौशिक यांनी केलेली मदत, या सूत्रातून साकारलेल्या कथा... ‘वाचेवीण संवादु?’ या कथेमध्ये बलात्काराच्या धक्क्याने ‘कोमा’सदृश स्थितीत गेलेली महिला... तिच्याशी ‘फंकक्शनल मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग’ तंत्राद्वारे शब्दांविना संवाद साधून डॉ. कौशिक गुन्हेगाराला समोर आणतात... धाकट्या भावाने मोठ्या भावाचा गोळी घालून खून करून आत्महत्येचा रचलेला बनाव; पण ‘कार्पल टनेल सिन्ड्रोम’चा आधार घेऊन डॉ. कौशिक यांनी केलेला पर्दाफाश म्हणजे ‘हातचलाखी’ ही कथा... चीफ ऑफ आर्मी स्टाफने पंतप्रधानांना पाठवलेले गोपनीय पत्र लीक होते, त्याचा आणि त्या पत्राचे डिक्टेशन घेणाऱ्या महिला सेक्रेटरीने नेसलेल्या ऑप्टीकल फायबरयुक्त धाग्याचा संबंध डॉ. कौशिक सिद्ध करतात, याची हकिकत येते ‘ए फॅब्रिकेटेड स्टोरी’ या कथेत...विविध गुन्ह्यांचा विज्ञानाच्या आधारे केलेला पर्दाफाश... विज्ञानाधारित रहस्यकथांचा उत्कंठावर्धक संग्रह
-
George And The Blue Moon (जॉर्ज एण्ड द ब्लू मून)
‘जॉर्ज अॅन्ड द ब्ल्यू मून’ या कादंबरीतील जॉर्ज व अॅनी या शाळकरी मुलांचे जीवन म्हणजे साहसी जीवनाची गाथाच! विश्वाचे अंतरंग उलगडून दाखवणारी सुंदर सफर आपण या कादंबरीतून अनुभवतो. अवकाशातील चित्तथरारक स्पंदने, अचानक समोर उभं राहणारं अनोखं विश्व आणि त्यातील खगोलशास्त्रीय, वैज्ञानिक गमती-जमती आणि विश्वाच्या अंतरंगात मुशाफिरी करणारी दोन अफलातून मुलं यांची धाडसी सफर म्हणजेच हे पुस्तक.