-
Gruhabhang (गृहभंग)
गृहभंग ही स्वातंत्र्यपूर्व भारतात 1920 ते 1940 सालादरम्यान घडणारी कादंबरी. याचं कथासूत्र एका चारी बाजूंनी समस्यांनी ग्रासलेल्या महिलेच्या, नंजम्माच्या संघर्षाभोवती फिरतं. मूर्ख नवरा, खाष्ट सासू, अंधश्रद्धाळू शेजार आणि भीषण गरिबी अशी ओढाताण सहन करत नंजम्माचा जीवनसंघर्ष सुरू आहे. नंजम्माची सासू प्रत्येक दुर्दैवाला नंजम्माला जबाबदार धरते. नवरा घरची जबाबदारी नाकारतो. अशात आपल्या निर्भेळ स्वभावानं आणि धैर्यानं नंजम्मा परिस्थितीवर मात करू पाहते. घरसंसार उभा करू पाहते. आत्मनिर्भरपणे उभं राहत असतानाच आपल्या मुलांना चांगलं आयुष्य आणि चांगले संस्कार देण्यास धडपडते. मानवी मनाच्या अतर्क्य व्यापारांमुळे आणि नियतीच्या घावांमुळे घायाळ झालेल्या नंजम्माची हदयाला पीळ पाडणारी कथा.
-
Amnesty (अमेन्स्टी)
श्रीलंकेचा मूळ रहिवासी असलेला धनंजय ऊर्फ डॅनी सिडनीत बेकायदेशीर स्थलांतर करतो. साफसफाईची कामं करून किराणा मालाच्या स्टोअर रूममध्ये लपून राहतो. एके दिवशी डॅनीला आपल्या एका मालकिणीचा - राधा थॉमसचा सुरा भोसकून खून झाल्याचं कळतं. त्याला हेही कळतं की, खून झाला, तेव्हा तिच्या अंगावर एक जॅकेट होतं. डॅनीच्या कल्पनेनुसार ते जॅकेट त्याच्या आणखी एका मालकाचं होतं. डॅनीला माहीत होतं की, त्या बाईचं त्या माणसाबरोबर प्रेमप्रकरण चाललेलं आहे. आता त्याच्यासमोर आकस्मिकपणे एक यक्षप्रश्न उभा आहे. खुनामागील ही हकिगत माहीत असणारा साक्षीदार म्हणून पुढे येऊन मायदेशी रवाना होण्याचा धोका पत्करावा की गप्प राहून अन्याय घडू द्यावा? डॅनीचा स्वतःच्याच सदसद्विवेकबुद्धीबरोबर झगडा सुरू होतो. एका देशांतरित माणसाच्या मनोवस्थेचा, आजच्या जगातील त्याच्या एका विशिष्ट अवघड आणि म्हणूनच निकडीच्या झालेल्या अवस्थेचा रहस्यपूर्णतेने तरी व्यामिश्रतेने घेतलेला वेध
-
Udayast (उद्यास्त)
एकीकडे कामाठीपुऱ्यातलं बदनाम वास्तव, तर दुसरीकडं विठोबाची भक्ती. या दोन्हीचा अनोखा संगम साधत रचलेलं दमदार कथानक म्हणजे, उद्यास्त (अवसान) ही कादंबरी. कामाठीपुऱ्यातल्या वेश्येच्या पोटी जन्मलेल्या सत्याची ही कहाणी. सत्याचं भविष्य उज्वल असावं म्हणून त्याची कामाठीपुऱ्यातून एका आश्रमात रवानगी होते. तिथं त्याच्यात विठुभक्तीचे नवे संस्कार रुजतात. सत्याचं आयुष्य नवी उभारी घेतं. पण त्याचं भागदेय तरीही त्याला सुखासीन आयुष्य बहाल करत नाही. तो नोकरी करत असलेल्या कारखान्याच्या मालकाचा मृत्यू होतो आणि त्याच्या आयुष्यात नवं वादळ येतं. मानवी नात्यातली गुंतागुंत आणि नैतिक-अनैतिकाच्या संकल्पनांमध्ये भरडल्या जाणाऱ्या आयुष्यांची ही आगळीवेगळी कहाणी.
-
Don Shinge Aslela Rushi (दोन शिंगे असलेला ऋषी)
देवादिकांचे आपापसातले भांडणतंटे असोत, नाहीतर महान ऋषी महर्षींच्या हातून घडलेले प्रमाद असोत, लोककल्याणकारी राजे असोत, नाहीतर सामान्यातील सामान्य माणसांच्या अंगातील सद्गुण असोत, भारतीय लोकप्रिय लेखिका सुधा मूर्तींनी भारतीय पुराणातल्या या तुम्हाला-आम्हाला फारशा परिचित नसलेल्या कथा शब्दबद्ध करून आपल्यासमोर ठेवल्या आहेत. ‘दोन शिंगे असलेला ऋषी’ हा सुंदर चित्रांनी नटलेला, साध्या-सोप्या, अतिशय प्रवाही आणि प्रत्ययकारी भाषेतल्या कथांचा संग्रह आहे. या संग्रहातल्या सर्वच कथा आबालवृद्धांच्या लाडक्या लेखिका सुधा मूर्ती यांच्या लेखणीतून उतरलेल्या असून, या कथा वाचकांची मनं जिंकून घेतील यात शंकाच नाही.
-
Humber Boy B (हम्बर बॉय बी)
बेन एक बाल गुन्हेगार आहे जो आठ वर्षांचा तुरुंगवास भोगून नुकताच बाहेर पडलेला आहे. तो दहा वर्षांचा असताना त्याच्याच वयाच्या दुसऱ्या मुलाचा नोहाचा खून केल्याचा आरोप सिद्ध होऊन तो तुरुंगात गेलेला होता. नोहाची आई फेसबुकवर बेनला शोधण्याची एक मोहीम सुरू करते. त्या मोहिमेत नोहाच्या आईला मदत करण्याच्या नावाखाली जेसिका या पात्राचा स्वत:चा असा एक सुडाचा प्रवास सुरू आहे. वर्तमानात हे घडत असताना मागे काय घडलं याचा एक धागा या कादंबरीत सतत विणलेला आहे. बेनची परिविक्षा अधिकारी असलेली केट आहे जी तिच्या भूतकाळाचं ओझं घेऊन जगते आहे आणि बेनला सुरक्षित ठेवण्याकरता धडपडते आहे. लिऑन आणि इस्सी हे बेनच्या नव्या आयुष्यातील पहिलं महत्त्वपूर्ण जोडपं आहे. नोहासारख्या निष्पाप, सरळमार्गी मुलाचा खून का केला गेलाय, याची जिज्ञासा जशी नोहाच्या आईला असते तशीच ती वाचकालाही लागून राहते. वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी उत्कंठावर्धक कादंबरी.
-
Hrishikesh Mukherjee : Bemisal Chitrapatanchi Khub
हृषिकेश मुखर्जी... हिंदी सिनेमात लोकप्रियता आणि दर्जा यांची सांगड घालणाऱ्या मध्यममार्गी दिग्दर्शकांमधला एक अढळ तारा. ‘मुसाफिर’पासून ‘झूठ बोले कौवा काटे’पर्यंतच्या प्रदीर्घ कारकिर्दीत हृषिदांनी कधी खळखळून हसवलं, तर कधी ढसढसा रडवलं. जय अर्जुन सिंग यांनी लिहिलेल्या या पुस्तकातून संकलक-दिग्दर्शक हृषिदांच्या चित्रकारकिर्दीचा समग्र आढावा घेताना ते आल्हाददायी चित्रपटच डोळ्यांसमोरून तरळून जातात.