-
Divyangachi Jeth Prachiti (दिव्यांगाची जेथ प्रचिती
हे पुस्तक म्हणजे, ‘दिव्यांग’ बालकाने जगातील संघर्षांना तोंड देण्यासाठी, स्वतःच्या वैगुण्यावर मात करून आयुष्याचा आनंद घेण्याच्या प्रयत्नांचा अविश्वसनीय, तसेच कौतुकास्पद असा प्रवास आहे. डाऊन्स सिन्ड्रोम व त्यासारख्या इतर व्याधी असणाऱ्या मुलांच्या पालकांसाठी किंबहुना भविष्यात जे जन्मदाते होणार आहेत, त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त, मार्गदर्शनपर व प्रेरणादायी पुस्तक.
-
Covidmukticha Marg (कोविडमुक्तीचा मार्ग)
सन २०२० या वर्षाची सुरुवात कोरोना (कोव्हिड-१९) या आजाराच्या उद्भवाने झाली. पुढे या संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या छायेने अवघे विश्व व्यापले. परिणामी, कोव्हिडमुक्तीच्या दिशेने संपूर्ण विश्वाचा खडतर असा प्रवास सुरू झाला, तो अजूनही सुरूच आहे. या संपूर्ण प्रवासातील अनेक स्थित्यंतरे, समस्या, तसेच एकूणच जीवनमानावर त्याचा दिसून आलेला प्रभाव ह्यांसारख्या महत्त्वाच्या अनेक मुद्द्यांना हे पुस्तक स्पर्श करते. या अनुषंगाने लसींची उपलब्धता, लस घेण्याबाबत लोकांच्या मनातील साशंकता, तसेच हर्ड इम्युनिटी खरोखरच तयार होईल का, असे महत्त्वपूर्ण संदर्भ स्पष्ट करते. त्याचप्रमाणे, मास्क वापरणे, हात धुणे व सामाजिक-भौतिक अंतरभान राखणे ही त्रिसूत्री आणि त्यासोबत लसीकरण हे अत्यावश्यक घटक या पुस्तकात चर्चिले गेले आहेत. कोव्हिड-१९ संदर्भात अत्यंत वस्तुनिष्ठ स्वरूपात समग्र माहिती या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर येते. कोव्हिड-१९ रोगाबाबत जनमानसामध्ये असणाऱ्या गैरसमजुती, अपप्रचार व शंका दूर करणारे मार्गदर्शनपर पुस्तक. कोव्हिड प्रश्नग्रस्तांसाठी विश्वासाची, अभ्यासपूर्ण आणि वैज्ञानिक माहिती देणारे पुस्तक.
-
Shetkaryacha Asud (शेतकऱ्याचा असूड )
थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांनी महाराष्ट्रात भयमुक्त, शोषणमुक्त व न्यायाधिष्ठित समाजरचनेचे स्वप्न पेरले. धर्मव्यवस्था व राज्यव्यवस्था यांच्या दुहेरी जाचात अडकलेल्या शेतकरी समाजाची दुर्दशा त्यांनी 'शेतकऱ्याचा असूड' या प्रबंधात मांडली. शेतकऱ्याच्या अधोगतीची सामाजिक व आर्थिक बाजू विशद करताना त्यांनी तत्कालीन व्यवस्थेवर कोरडे ओढले आणि शेतकऱ्यांच्या उत्थानाचे मार्गही सांगितले. १३७ वर्षांपूर्वी त्यांनी मांडलेले या ग्रंथातील विचार आजही प्रस्तुत आहेत, कारण शेतकरी आजही दैन्य चक्रातून बाहेर पडलेला नाही. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा याचा ढळढळीत पुरावा आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महात्मा जोतीराव फुले अध्यासनाचे चेयर प्रोफेसर प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी या ग्रंथाचे संपादन केले असून आपल्या संपादकीयात वर्तमानाच्या उजेडात ग्रंथातील विचार उलगडले आहेत.
-
Mitramayajagat (मित्रमयजगत )
पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी मुंबईत पत्रकारितेत चार दशके व्यतित केली. आपल्या बातमीदारीच्या संपन्न अनुभवात भेटलेल्या माणसांची व्यक्तिचित्रे त्यांनी या पुस्तकात रंगवली आहेत. त्यात गोविंद तळवलकरांसारखे साक्षेपी संपादक, दिनू रणदिवेंसारखे हाडाचे बातमीदार, बाळासाहेब ठाकरे ते शरद पवार असे स्वतःचा ठसा निर्माण केलेले बडे नेते, देव आनंद, सुनील दत्त यांच्यासारखे कलावंत भेटतात. अकोलकर मूळ नाशिकचे, तेथील मूळ वाड्याच्या, तेथे घडलेल्या संस्कारांच्या, जडणघडणीच्या आठवणी त्यांनी जाग्या केल्या आहेत. बातमीदारी करताना जागवलेल्या रात्रींचे किस्से सांगितले आहेत. अकोलकरांची भावगर्भ व ललितरम्य शैली, ओघवती भाषा व ठोस भूमिका यांमुळे पुस्तक वाचनीय झाले आहे. चार दशकांत पत्रकारितेची बदलत गेलेली रूपेही इथे नकळत उलगडलेली आहेत.