-
Shelka Saj (शेलका साज)
हा आहे ‘मृत्युंजयकार’ शिवाजी सावंत यांच्या विविधरंगी ललितलेखनाचा संच : ‘शेलका साज’! इथं सावंतांच्या खास रसश्रीमंत शैलीत वेध घेतलेले महाराष्ट्रवैभव कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जसे भेटतील, तसाच लेखकाला चकवा देऊ बघणारा वाचक अशी झूल पांघरलेला लपंगाही भेटेल. छ. शिवराय, शंभूराजे, महाराणी येसूबाई, सरलष्कर संताजी घोरपडे यांच्या जीवनझुंजीतील आजवर मराठी वाचक मनाला अज्ञात राहिलेल्या मनामनांच्या अणीदार वंगोऱ्यांना केलेला रसबाळा, तरल ललितस्पर्श भेटेल. तसाच कसा होता - असेल शिवकालीन रणसंमुख सामान्य मावळा यावर टाकलेला डोळस व वास्तव प्रकाशझोत असेल. इथं आर्य चाणक्याचा वेगळ्याच दृष्टीनं केलेला विचार दिसेल, तसंच, दीनदलितांना ‘आधारवड’ झालेल्या राजर्षी शाहूंचं क्षणदर्शन घडेल. सावंतांनी कथा मोजक्याच बेतल्या. मालिश, भिजाणे यांतून त्यांचं या आकृतिबंधाचं बळ दिसेल. ‘मुकी’ ही कथा तर अल्बर्ट कामूची आठवण करून देईल - यासाठीच या संचाचं शीर्षक : शेलका साज!!
-
Moravala (मोरावळा)
हा आहे ‘शब्द- मोरावळा’. लेखक मनोगतात म्हणतो : शरीरस्वास्थ्याच्या शास्त्राप्रमाणं साधा आवळा अति गुणकर असतो, हे सिद्ध झालंय. हा तर आहे साखरेच्या मधुर पाकात अंगभर मुरलेला मोरावळा. गुणकर, तसाच तुरटपणा टाकून चविष्ट झालेला. त्यातही हा शब्दमोरावळा, साहित्यिकमोरावळा आहे. मानवी मनाचा सारा अहंपणा, मत्सर, द्वेष अशा षड्रिपूंचा बेचव तुरटपणा टाकून ललितरम्य भाषेत सादर केलेला. श्री. शिवाजी सावंत यांच्या सशक्त भाषाशैलीत हा ‘शब्दमोरावळा’ साकारला आहे, त्यांच्या खास कोल्हापुरी बाजात नि ढंगात. इथं सावंतांच्या जीवनयात्रेत भेटलेली राजकारण, शिक्षण, प्रकाशन व साहित्य अशा विविध क्षेत्रांतील बलदंडांची आखीव रेखांकने आहेत. त्यांत एक-दोन खास ठाामीण अफलातूनही भेटतात. मोरावळ्याचा पहिलाच तुकडा जिभेवर ठेवताच खरा रसज्ञ मिटकी मारत नकळतच म्हणतो, ‘व्वा!’ तसंच काही हा ‘शब्दमोरावळा’ चाखताना रसिक वाचकाला वाटलं, तर आश्चर्य वाटायला नको!!
-
Prematun Premakade (प्रेमातून प्रेमाकडे)
मैत्री, प्रेम यावर जग जगात असते. मैत्रीत वयाचे बंधन नसते; पण मैत्रीलाही काही वेळा समाजबंधन असते. विशेषतः मैत्री स्त्री - पुरूषांमधील असेल तर हे नाते नितळपणे सांभाळावे लागते. सार्वजनिक क्षेत्रातील थोरामोठ्यांचे अतिशय नाजूक संबधातील मैत्र अरुणा ढेरे यांनी 'प्रेमातून प्रेमाकडे ' मधून वाचकांपुढे उलगडले आहे. मार्गारेट नोबेलने विवेकानंद यांना प्रथम पहिले तेव्हाच त्यांना जीवन समर्पण करण्याच्या निश्चय केला. स्वामींनी समाजकार्यासाठी निवेदिताच्या रुपात तिला शिष्यत्व बहाल केले. निवेदिता व गोपाळ कृष्ण गोखले यांचे सौहार्दाचे मित्रत्व, गोखले व सरोजिनी नायडू यांचे स्नेहसंबंध, 'वंदे मातरम्' या राष्ट्रगीताला स्वररचना देणाऱ्या व महात्मा गांधी यांची अधार्मिक प्रेरणा बनलेल्या सरलादेवी घोषाल, ब्रिटनमधील मेडेलिन स्लेड उर्फ मीरा बेन हिची गांधीजींवरील उत्कट प्रेमभक्ती, रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेतून व्यक्त झालेली अॅना उर्फ नलिनी तसेच त्यांची वहिनी कादंबरी, रवींद्रनाथांसाठी काहीही करण्यास तयार असणारी व्हिक्टोरिया ओकॅम्पो, सुभाषचंद्र बोस व एमिली यांचा विवाह, सेनापती बापट व त्यांची रशियन मैत्रीण अना, डॉ. आंबेडकर व फॅनी यांच्यातील नाते, यावर यात प्रकाश टाकला आहे.
-
Mauli (माऊली)
।। माऊली ।। ‘माऊली’ ही अगदीच वेगळी कादंबरी. तिची नायिका आहे एक मांजरी; लेखकाने माया लावलेली. या मायेच्या पसायात लेखकाचे कुटुंबीय, स्नेहीसोबती आणि त्या क्रूर काळ्या बोक्यासह मांजरीचा गोतावळाही समाविष्ट होतो आणि कादंबरीची वीण एक वेगळं रंगरूप घेऊ लागते. यादवांचे निरीक्षण वाचकाला स्तिमित करील असे आहे. हे निरीक्षणच त्यांना एक रस्ता सापडवून देते. स्वत:चे भान शाबूत ठेवून यादव हळूहळू मार्जारविश्वाचा शोध घेऊ लागतात. साधा वाटेल अशा तपशिलाची पेरणी करीत या शोधवाटेने लेखक स्वरक्षण आणि स्ववंशवर्धन या दोन मजबूत पख्यांवर विसावलेल्या निसर्गसिद्ध आदिम प्रेरणेशी वाचकाला नेऊन भिडवतो तेव्हा वाचक पछाडल्यागत होतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्याच फक्त अंकित असलेले एक थेट असे नरमादीच्या नात्याचे अस्तित्व न्याहाळताना आदिनिरणाच्या वाटेकडे वळतो. मग मांजरी ही मांजरी राहत नाही; तिथे साकारत जाते आदिमायेचेत्या जगन्माऊलीचे आत्मजन्मा नि आत्मभोगी असे कृतार्थ रुपडे. चिंतनगर्भ जीवनेच्छेचा कलारूप आविष्कार म्हणजे ‘माऊली.’ दार्शनिक तत्त्वज्ञान, लोकसाहित्यपरंपरा, सनातन भारतीय समाजमन यांचा हळुवार आणि तलम स्पर्श झालेली मराठी भाषेतील ही पहिलीच साहित्यकृती असावी, इतकी ती वेगळी आहे. – प्रा. अरविंद वामन कुलकर्णी