-
Sattantar (सत्तांतर )
काळाप्रमाणेच संघर्षही सतत वाहतच असतो. त्याला खंड असा नसतोच. असलीच, तर भरती असते, पूर असतो. जेव्हा जेव्हा खाणारी तोंडं भरमसाट वाढतात, गर्दी होते. तेव्हा तेव्हा संघर्ष बळावून उठतो. जेव्हा उपलब्ध अन्नात, भूमीत वाटेकरी निर्माण होतात, तेव्हा संघर्ष उचल खातो. जेव्हा अस्थिरता निर्माण होते, एखादी जात धोक्यात येते, बाहेरून परकं कोणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं. तेव्हा संघर्ष उतू जातो. ज्यांना बोलता येतं, ते हा राग, उद्दामपणा, संघर्ष शब्दांतून दाखवतात. ज्यांना बोलता येत नाही, त्यांचे राग-लोभ प्रेम हावभावांतून, स्पर्शातूनच सांगितले जातात. संघर्ष पेटला, की शस्त्रास्त्रं वापरली जातात ज्याना शस्त्रास्त्र माहीतच नसतात, ते सुळे, नख वापरतात. संघर्ष सर्वत्र भरून राहिलेला असतो.
-
Jangalatil Diwas (जंगलांतील दिवस )
...मी माणदेशातल्या लहानशा खेड्यात जन्मलो आणि तिथंच, वाढलो. खेडं सोडून मी शहरी वातावरणात राहू लागलो, त्याला आता चाळीस वर्षं होत आली, तरीही मी मनानं माणदेशातल्या रानावनांतच असतो. मी एक छांदिष्ट माणूस आहे. जनलोकांतून थोडं बाजूलाच असावं, काही नाद लावून घ्यावा आणि त्याचा पाठपुरावा करीत राहावं, यात मला विशेष आनंद वाटतो. आपल्या जीवनाला फुरसदीचा एक लांबलचक, भरजरी पदर असावा, असं मनापासून वाटत असलं, तरी चरितार्थ चालविण्यासाठी कामधंदा करण्यातच आपण फार खर्ची पडतो. आपलं सगळं जीवन एका विलक्षण यांत्रिक गतीनं झपाटून टाकलं आहे. कधी अंगावर चांदणं पडत नाही, कधी झाडाच्या पानांची सळसळ ऐकू येत नाही, कधी ओढ्यात अंघोळ होत नाही, कधी उताणं झोपून चांदण्यांनी गच्च भरलेलं आभाळ पाहता येत नाही. मी कुणी मृग-पक्षी-शास्त्रवेत्ता नव्हे किंवा वनशास्त्राचा अभ्यासकही नव्हे. परंतु तरीही रानावनांतील अद्भुत जगाविषयी माझ्या छांदिष्ट मनात जे अनिवार आणि न संपणारं कुतूहल आहे, त्यामागं लागून, रोजच्या यांत्रिक धावपळीतून एखादी झुकांडी मारून, चौर्याहत्तर सालापासून चौर्याऐंशी सालापर्यंतच्या दहा वर्षात मी कुठं कुठं हिंडलो, मला काय काय दिसलं, काय काय जाणवलं, त्याचा हा वृत्तान्त आहे. जंगलांतल्या दिवसांच्या या कहाण्या वाचून कुणी वाचक रानभैरी झाला आणि त्यानं निसर्गाची भव्यता, श्रीमंती व सौंदर्य यांचा आनंद घेतला, तर बरंच आहे......’
-
Shantaram (शांतारामा)
भारतीय चित्रपटसृष्टीने शताब्दीत पदार्पण केले आहे. अशा वेळी या क्षेत्राच्या उभारणीत महत्वाचा वाटा उचलणा-यांचे स्मरण होणे साहजिक आहे. ज्याने या चित्रपटसृष्टीचा इतिहास घडविला, अंतरराष्ट्रीय सिनेक्षेत्रात भारतीय भारतीय सिनेमाचा पाया रोवला, अशा चित्रपटमहर्षी व्ही. शांताराम यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. शांताराम नावाच्या माणसाच्या आयुष्याचा जीवनपट व्ही. शांताराम यांनी 'शांतारामा' या आत्मचरित्रात रेखाटला आहे. अनेक खाचखळग्यांनी भरलेल्या या जीवनमार्गात आनंदाचे, समृद्धीचे क्षण त्यांनी उपभोगले. तसेच संकटांचा डोगरही त्यांना चढावा लागला. वयाच्या एकोणिसाव्या वर्षापासून त्यांनी आपल्या एकसे ऐक कलाकृतींनी रसिकांना तृप्त केले. 'प्रभात फिल्म कंपनी' स्थापन करून पौराणिक,ऐतिहासिक, मूक व बोलपट त्यांनी निर्माण केले. ते आजही रसिकांना आठवतात. प्रभात व व्ही. शांताराम यांचे नाते या आत्मकथेतून उलगडते.तसेच 'राजकमल कला मंदिर' च्या प्रगतीची वाटचाल समजते. कलावंत, दिग्दर्शक, संस्थाचालक या नात्याने त्यांनी केलेले हे आत्मकथन म्हणजे चित्रपट सृष्टीचा आत्मा आहे.