-
Pratidwandi ( प्रतिद्वंद्वी )
त्याला अनूची तीव्र अशी आठवण आली. तो लवकरच पूर्ण बरा होत होता आणि आता तिची तशी गरज राहणार नव्हती. पण तिची ही आठवण त्या गरजेपलीकडचीच होती हे त्याला आतून लख्ख समजले. तिची आठवण तिच्या त्याला वाटणार्या स्पर्शाच्या ओढीचीही नव्हती. त्याही पलीकडली होती. त्याची वरची खोली, छत, भिंती, खिडकी, बाजूची गच्ची, ती बाई, तिचा व्यायाम, ते मूल, ती सळसळणारी झाडे आणि अनू, तिची नि त्याचा घडलेला, न घडलेला संवाद हे सगळे एकच चित्र होते. त्याच्यातल्या कार्तिक नसले या दुसर्या कोणीतरी ते काढले होते. त्याला गरज होती ती या सगळ्यांच्या एकत्रित असण्याची. भले त्या एकमेकांत काही अनुबंध न का असेना !
-
Davrani ( डवरणी )
विविध मानवी स्वभावांचा मार्मिक वेध, बदलत्या खेड्याचे अंतर-स्पर्शी सूक्ष्म तणाव, समाजाच्या आणि व्यक्तींच्या जीवनातील विपरीत नाट्य, सखोल गहिरे कारुण्य, उत्कट काव्यात्मकता, ग्रामीण शृंगार आणि अनघड पौरुष, स्पंदनशील मनाची प्रतिमायुक्त चिंतने आणि चैतन्यपूर्ण लवचिक भाषा यांनी यादवांची कथा इथे डवरलेली आहे. कलात्मकतेचे आणि सच्च्या सामाजिकतेचे संयमी भान त्यांनी या कथांतून सहजतेने सांभाळलेले जाणवते.
-
Rutuveglare ( ऋतूवेगळे )
स्त्री म्हणून जगताना येणार्या अनुभवांचे आणि प्रश्नांचे विश्लेषण करणारा, स्वातंत्र्योत्तर काळातील एका प्रतिनिधीक वर्गाचे चित्रण करणारा, गत शतकाअखेरीस विज्ञानाने जगण्याचा अर्थच बदलवून टाकला असला तरी माणसांच्या मनातील सनातन संघर्ष मात्र तसाच आहे हे दाखवणारा कथासंग्रह. हे सारे तात्विक वाटत असले आणि ह्यात कथा भरडली गेली असावी, असे वाटत असले तरी तसे झालेले नाही. तिने आपले एक वेगळेच विश्व निर्माण केले आहे न् तिच्या गुंगीतून सावरल्यावर लक्षात येते की लेखिका कळत-नकळत आपल्याला बरेच काही सांगून गेली आहे. ह्या लेखिकेचे शब्द मुळातच नादमधुर असतात, आणि त्यांना संगीताचा साज मिळाल्यावर ते अधिकच लयकारी निर्माण करून जातात ह्याचा प्रत्यय ह्या संग्रहांतील कथा वाचतानाही येतो जसे, "धुवाधार म्हणतात तसला हा पाऊस, मल्हार भराला यावा तसा". शेवटी आपले जीवनतही शिल्पासारखेच, लेखिका म्हणते त्याप्रमाणेच "आपणच आपले सारे संचित, सगळ्या भावना, आनंद, दु:ख या शिल्पात पाहतो आणि त्याला अर्थ देतो".
-
Pratiksha ( प्रतीक्षा )
प्रतीक्षा' ही कादंबरी रणजित देसाईंच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी प्रकाशित झाली. पुनर्लेखनासाठी देसाईंनी ती बाजूला ठेवून दिली होती. परंतू पुनर्लेखन होवू शकले नाही. या कादंबरीत एक भावपूर्ण प्रेमकहाणी चित्रित झालेली असून यातील वातावरण आध्यात्मिक स्वरूपाचे आहे. संपूर्ण कथानक हिमालयाच्या परिसरात घडते. कादंबरीचा नायक अतृत्प आणि असफल प्रेमजीवनातून आलेल्या निराशेपोटी भटकत असतो. खर्या प्रेमासाठी फिरत फिरत हिमालयात येतो आणि येथेच त्याची नायिकेशी गाठ पडते. नायक अतिशय हलक्या व भावपूर्ण अंत:करणाचा आहे. तर नायिका सुंदर, सत्वशील, प्रमळ, संयमी कर्तव्यदक्ष आणि विचारी आहे. अतिशय अलगदपणे या दोघांमधील भावबंध विणले जातात. ती हळूहळू घट्ट होणारी वीण वाचकाला मंत्रमुग्ध करते. प्रेमाचा संयमित आविष्कार हा अधिक शृंगारिक असतो याचा प्रत्यय ही कादंबरी वाचताना येतो. बाबांच्या व्यक्तिरेखेतून पाप, पुण्य, प्रेम जीवन परमेश्वर इत्यादी विषयांची वेगळी पण ठाम मते वाचकांपुढे येतात. कथेला आणि व्यक्तीरेखनाला पुष्टी देणारे विचार म्हणून कादंबरीत त्याला विशेष स्थान आहे. कादंबरीतील वातावरण निर्मिती ही लक्षणीय आहे. निसर्गवर्णनाबरोबरच लोकजीवनाचेही चित्रण येथे आढळते. एखाद्या चित्रपटात शोभेल अशा प्रकारचे रहस्यपूर्ण कथानक रंगवून लेखकाने ही छोटेखानी कादंबरी वाचकांच्या मनाला भिडवण्याचा प्रयत्न केला आहे.