-
Hindu (हिंदू)
कित्येक शतकांपूर्वी सिंधु नदीच्या तीरावर आर्यांच्या आगमनाबरोबर एका संस्कृतीची पाळेमुळे रुजली. आणि नंतरच्या काळात संपूर्ण भारतीय उपखंडात 'हिंदू संस्कृतीची' म्हणून ती अनेक अंगांनी बहरली. वेगवेगळ्या काळातील समाजरचनेच्या गरजांनुसार आणि अनेक विचारवंत, तत्त्वज्ञांनी मांडलेल्या तात्त्विक विचारधारांमुळे यात नवनवी भर पडत गेली, बदल होत गेले. संस्कृतीची मूळ बैठक कायम राहिली तरी येणारी प्रत्येक नवीन विचारधारणा सामावून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे संस्कृतीची वीण बहुरंगी होत गेली आणि रूढी, परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा, चालीरीती, कुटुंबव्यवस्था, परस्पर नातेसंबंध यांचा एक पट निर्माण होत गेला. शतकानुशतके या संस्कृतीने माणसांचे अवघे जीवन व्यापून टाकले. या संस्कृतीचा सगळा पसारा, अनेक चांगल्या वाईट गोष्टींची ही अडगळच माणसाचे आयुष्य समृद्ध करीत असते. म्हणूनच ही 'जगण्याची समृद्ध अडगळ' असे नेमाडे यांनी म्हटले आहे. या 'समृद्ध अडगळीचे' चकित करून सोडणारे सुरम्य दर्शन 'हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीतून घडते. जीवनाची व्यापकता, व्यामिश्रता यांचे दर्शन घडवणे जसे महाकाव्याकडून अपेक्षित आहे तसेच ते कादंबरीकडूनही अपेक्षित असते. 'कोसला' आणि नंतरच्या 'चांगदेव चतुष्टय' मधल्या 'बिढार', 'हूल', 'जरीला', 'झूल' प्रमाणेच ही कादंबरीदेखील ही अपेक्षा पूर्ण करते. आणि 'हिंदू चतुष्टया' तील पुढच्या प्रत्येक कादंबरीविषयची उत्सुकता निर्माण करते. वाचनाचे समाधान देतानाच वाचकाला जीवनाच्या अनेक अंगांचा नव्याने विचार करायला लावण्याचे सामर्थ्य या कादंबरीत आहे. मुखपृष्ठावरचे सुभाष अवचट यांचे उत्कृष्ट पेंटिंग, पुठ्ठा बांधणी, उत्तम छपाई ही या कादंबरीची बाह्य वैशिष्ट्ये म्हणता येतील.
-
Janamanatala Manus Nilu Phule ( जनामनातला माणूस निळू फुले)
आयुष्यभर सामाजिक बांधिलकी हे मूल्य ठामपणे अंगी बाळगून; लोकरंजनातून लोकप्रबोधनात कार्यरत असणारा 'निळू फुले' यांच्यासारखा कलावंत विरळच! पाच दशकं मराठी चित्रपटसृष्टी खलनायक म्हणून वर्चस्व गाजवणारा हा कलावंत, प्रत्यक्ष जीवनात मात्र अतिशय मावळ वृत्ती असणारा, तळमळीचा सामाजिक कार्यकर्ता होता. त्याहीपेक्षा अखेरच्या श्वासापर्यंत माणूसपण जपणारा एक सच्चा 'माणूस' होता. निळू फुलेंना एक माणूस म्हणून समजून घेताना कुटुंबप्रमुख, सामाजिक कार्यकर्ता ते अभिनेता असा सर्वांगाने वेध घेण्याचा हा प्रयत्न.
-
Bidhar
बिढार' आत्मचरित्र व कादंबरी यांच्या समन्वयाने बनवलेला साहित्यप्रकार आहे. एका सीमित जगाचा घेतलेला अनुभव नेमाड्यांनी अतिशय नेटकेपणाने, प्रभावीपणाने पुढे मांडला आहे, हे या कादंबरीचे यश आहे. साहित्य जीवनानुगामी आहे, असे आवर्जून म्हणणारे काही लेखक जीवनातील घाणच उपसत बसतात, तिरकस शैलीदारपणे आपण काही वैशिष्ट्यपूर्न सांगतो आहे असे भासवतात. नेमाड्यांनी असे काहीच केलेले नाही. पण जीवन व साहित्य यांच्यामधली दरी एका बाजूने नष्ट करून, दुसर्या बाजूने जीवन अधिक सामर्थ्याने व खोलपणे प्रस्तुत करून नेमाड्यांनी खूपच उंच झेप घेतली आहे यात शंका नाही. कितीतरी प्रसंग इतके प्रभावशालीपणे त्यांनी रेखाटले आहेत की, शिल्पचित्रांची मूर्तता, भरीवपणा त्यात येऊन दृक्प्रत्यय येतो. अनुभवाला विकृत करणारे, भडक करणारे, कृतिमता आणणारे साहित्याचे संकेत एकीकडे त्यांनी तोडले आहेत, पण ते तोडतांना कुठेही अतिरेकीपणा केलेला नाही. प्रदर्शन केलेले नाही. ही एका मनाची मोडतोड व जडणघडण आहे, असे एकाच वेळी 'बिढार' वाचतांना वाटते.