-
Kashmiriyat (काश्मिरीयत)
काश्मीरमधील भारत-पाकिस्तान सीमा म्हणजे जगातील सर्वात अशांत आंतरराष्ट्रीय सीमारेषांपैकी एक. या सीमारेषेवरील प्रत्यक्ष परिस्थिती आणि जनजीवन जाणून घेण्यासाठी एक मध्यमवर्गीय स्त्री एकटीने प्रवास करण्याचा निर्णय घेते. इतकेच नाही तर या प्रवासात अत्यंत गरजेपुरतेच सामान आणि पैसे जवळ ठेवते. तिचा भरवसा आहे सामान्य काश्मिरी माणसाच्या चांगुलपणावर आणि मानवतेच्या मूल्यांवर. कसा घडला तिचा हा प्रवास? या प्रवासात तिला आलेल्या अनुभवांनी तिचा भरवसा भंगला की मजबूत झाला? ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ असे सार्थ वर्णन असलेल्या काश्मीरमधील निसर्गसौंदर्य, आलेल्या पाहुण्याची घरच्यासारखी ‘मेहमाननवाजी’ करणारी काश्मिरी कुटुंबे, सीमारेषेच्या अलिकडे काय किंवा पलिकडे काय, सारख्याच जीवनाला सामोरे जाणारे जनसामान्य यांचे प्रत्ययकारी दर्शन घडवणारी सीमेवरच्या एकल प्रवासाची सत्यकथा –
-
Modi Avhan 2024 Che (मोदी आव्हान २०२४ चे)
2024ची लोकसभा निवडणूक ऐतिहासिक ठरू शकते. जर नरेंद्र मोदी, पंतप्रधानपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ सलग तिसर्यांदा मिळवण्यात यशस्वी झाले, तर जवाहरलाल नेहरूंनंतर सलग तिसर्यांदा पंतप्रधानपदी येणारे ते पहिलेच नेते असतील. 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंतच्या या समग्र आणि व्यापक आढाव्यात मिन्हाज मर्चंट यांनी, मोदींनी पंतप्रधानपदी असताना भारतीय राजकारण, अर्थव्यवस्था आणि संस्कृतीला कसा आकार दिला, याचं मार्मिक विश्लेषण केलं आहे. या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी केलेल्या एकजुटीची रणनीती भाजपाचा विजयरथ रोखू शकेल का, याची चाचपणीदेखील या पुस्तकात करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि विरोधी पक्षांचं शासन असलेल्या राज्यांचे धुरंधर राज्यकर्ते आपापसातील मतभेद बाजूला सारू शकतील? 2012पासून मिन्हाज मर्चंट मोदींना अनेकदा भेटले, त्यांची मुलाखत घेतली. लेखकाने मोदींच्या भौगोलिक राजकारण, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि सामाजिक सुधारणा आदि मुख्य विषयांसंदर्भातील धोरणांचं विश्लेषण केलं आहे. 10 विस्तृत विभाग आणि 31 प्रकरणं असलेल्या या पुस्तकात मोदींच्या मागील दशकातील एका प्रादेशिक नेत्यापासून वैश्विक राजनेता बनण्यापर्यंतचा प्रवास साकारण्यात आला आहे.
-
Maza Brand Aazadi (माझा ब्रँड आज़ादी)
परंपरांची ओझी वाहणाऱ्या हरयाणा प्रदेशातली एक मुलगी…अनुराधा. एका क्षणी तिचं मन ‘आज़ादी’ मिळवण्याचा अनुभव घेण्यासाठी बंड करून उठतं आणि ती स्वतःतला एकांत सोबत घेऊन बाहेरच्या जगात प्रवासासाठी निघते… हा प्रवास ती करते, ते ज्ञानप्राप्तीसाठी नव्हे की डोक्यात माहितीची खोगीरभरती करण्यासाठी! तिच्या भ्रमंतीमागे कोणताही विशिष्ट उद्देश नाही. बस, आपल्या आतल्या मनात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जाता जाता मिळतात का, यासाठीचा हा शोध होऊन जातो. या प्रवासादरम्यान आपल्या आत दडलेल्या अनेक ‘स्थळांना’ ती भेट देत जाते. आपली संस्कृती, समाज आणि आध्यात्मिकता याबाबत स्वतःला प्रश्न विचारत राहते. त्यापैकी एक प्रश्न म्हणजे “कोणतीही भारतीय मुलगी ‘चांगली शहाणी मुलगी’ ही साचेबंद चौकट तोडू शकेल का?” प्रश्नांच्या शृंखलेची उत्तरं शोधत आयुष्याचे आनंदी पैलू अनुभवत ती प्रवास करते…. ‘व्यक्तिगत स्पेस’ची अनुभूती घेते, जी या देशात तिने कधी अनुभवली नसते. बाहेरच्या देशांत हे फिरून हे अनुभव उत्सवासारखे ती साजरे करते. तेच हे अनुभव…. तुम्हालाही आपल्या सभोवतालच्या ‘हिपोक्रसी ला सामोरं जाण्यासाठी हे अनुभव बळ देतील आणि मग तुम्हीही म्हणाल…माझा ब्रँड… आज़ादी !
-
Kafkacha Metamorphosis (काफ्काचं 'मेटॅमॉर्फोसिस')
फ्रांझ काफ्का हा विसाव्या शतकातील एक महत्त्वाचा लेखक. त्याच्या ‘मेटॅमॉर्फोसिस’चे भाषांतर उपलब्ध करून द्यावे, याकरता डॉ. सुहास भास्कर जोशी हे अभिनंदनास पात्र आहेत. त्यांनी केलेले भाषांतर सुबोध आहे. मूळ कथेची आकृती आणि प्रकृती भाषांतरात उत्तम रीतीने आली आहे. प्रस्तुत भाषांतर मराठी वाचकांना एका अपूर्व व महान साहित्यकृतीच्या वाचनाचे समाधान देणारे आहे. याशिवाय या ग्रंथात काफ्काचा जीवनपट आणि त्याचे लेखन, ‘मेटॅमॉर्फोसिस’चे आस्वादक विश्लेषण, त्याच्याशी नाते सांगणाNया साहित्यकृतींचा परामर्श यांचा समावेश केलेला आहे. थोडक्यात, या ग्रंथाचा पैस मोठा आहे. ग्रंथाच्या शेवटी सुहास भास्कर जोशी म्हणतात, ‘काफ्का आणि आणि ‘मेटॅमॉर्फोसिस’ला मरण नाही, किंबहुना ‘मेटॅमॉर्फोसिस’चे गारूड अजूनही कमी झालेले नाही. सुहास जोशींनी अत्यंत परिश्रम घेऊन हे गारूड मराठी वाचकांसमोर उभे केले
-
Avismarniya Bhartiya Itihasatil Avismaraniya Yoddh
भारतातले पंधरा शूर स्त्री-पुरुष ज्यांनी आक्रमणकर्त्यांपुढे कधीही शरणागती पत्करली नाही. पण इतिहास त्यांना विसरला आणि हरवून बसला. या कथा आहेत, आपल्या अधिकाराचं, श्रद्धेचं आणि स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी लढलेल्या निडर योद्ध्यांच्या ! काश्मीरचा ललितादित्य मुक्तपीड • आसामचा लचित बारफुकान राजाराज चोल आणि राजेंद्र चोल • कान्होजी आंग्रे गुजरातची राणी नायकी देवी • बंदासिंह बहादूर वारंगलची राणी रुद्रमा देवी त्रावणकोरचे मार्तंड वर्मा मेवाडचा महाराणा कुंभा • इंदोरच्या देवी अहल्याबाई होळकर• उल्लालची राणी अब्बाक्का चौटा • मणिपूरचे राजर्षी भाग्यचंद्र जयसिंग• अहमदनगरची चांद बीबी . शिवगंगा इथली वेलू नचियार. अवधची बेगम हजरत महल
-
Mumbai After Ayodhya (मुंबई आफ्टर अयोध्या)
गेल्या तीन दशकांत मुंबईने जे अनपेक्षित असे पाहिले, भोगले, अनुभवले त्याचा दस्तऐवज म्हणजे हे पुस्तक. अयोध्या घटनेनंतर माफिया जगतातील घडामोडींनी समाजकारण आणि राजकारणही बदलले. सोबतच मुंबईचे भौगोलिक रूपदेखील बदलले. नवीन उपनगरांची आणि वस्त्यांची निर्मिती झाली. शहर दंगलीतून बाहेर पडून नि:श्वास सोडत नाही, तोच पुन्हा २००२मध्ये झालेली बॉम्बस्फोट मालिका आणि २००८मधील २६/११चा दहशतवादी हल्ल्यामुळे हिंसेने परमोच्च सीमा गाठली. जीतेंद्र दीक्षित हे याच शहरात जन्माला आले आणि इथेच वाढले. ज्या तीन दशकातील घडामोडींबद्दल त्यांनी वर्णन केले आहे, त्यातील बराच काळ त्यांनी स्वत: अनुभवला आहे. त्यांचे हे पुस्तक म्हणजे जणू मुंबई शहराची आत्मकथा. गिरण्यांचे शहर ते मॉलचे शहर झालेली मुंबई, इथे गगनचुंबी इमारती वैÂक पटींनी वाढल्या. शहराची जीवनवाहिनी असणारी लोकल ट्रेन लांबीने वाढतच गेली, तरीही गर्दीला सामावून घेणे, मुंबईला अवघड जात आहे. जगातील सर्वांत मोठं सिनेजगत असणारं बॉलिवुडही या विळख्यातून सुटले नाही. इथं चित्रपटकारांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. येथील पारंपरिक, ऐतिहासिक गणेशोत्सव आणि दहीहंडीसारखे उत्सव भक्तिभावरहित झाले आहेत आणि त्यांचे व्यापारीकरण झाले आहे. अत्यंत महत्त्वाचे घटनाक्रम, शहराला मुंबई म्हणून घडवणार्या लोकांची माहिती आणि मुंबईच्या व्यक्तिमत्त्वातील बदलाचे वर्णनही या पुस्तकात अनुभवास येते. शहराची भौगोलिक स्थिती, नागरी समस्यांचा चढता आलेख, गजबजलेले अर्थकारण, रिअल इस्टेटचा बुजबुजाट आणि राजकारणाची शंभर शकले, असे सगळे एकत्रित वाचायला मिळते.
-
Mansamazavan (मनसमझावन)
या अनेकपदरी कथेचं कथानक चिन्मय, त्याचे आई-वडील, मैत्रीण, सामाजिक कार्यकर्ते अशा व्यक्तीपासून लालबाबाचा दर्गा, त्याचा शेजारचा म्हसोबा, दखनी भाषा यांनी वेगवेगळ्या कोनांतून केलेल्या कथनांद्वारे उलगडत जातं. ट्विटरवरचं चिन्मयचं अकाऊंट, व्हॉट्सअॅप, ‘लोकमत’ इतकेच नव्हे, तर कारसेवेसाठी बाभूळगावातून गेलेली एक वीट हेदेखील आपापल्या कथनांमधून स्वतःचं अंतर्विश्व उघड करतात. एक रहस्यकथा सांगता सांगता भोवतालच्या गुंतागुंतीच्या सामाजिक परिस्थितीची उकल करण्याचा प्रयत्न ही कादंबरी करते. ती वाचताना उत्तरोत्तर वाढत चाललेल्या धार्मिक कट्टरपणाच्या उन्मादी वातावरणात आपण कोणत्या मूल्यांचा वारसा हरवून बसतो आहोत, याचं भान वाचकाला येतं.. ‘हिंदू’, ‘मुस्लिम’ या कप्पेबंद अस्मितांच्या पलीकडे जाणाऱ्या सामायिक, सांस्कृतिक धाग्यांनी बनलेल्या ‘भारतीयत्वा’ चा शोध ही कादंबरी घेते. हिंदू-मुस्लिम सहजीवनाची कल्पना मूळच्या सोशिक, उदार, सहिष्णु अशा पारंपरिक लोकधर्माला अनुसरल्याने प्रत्यक्षात येईल की त्यासाठी आधुनिक मूल्यांचा अंगीकार करणं गरजेचं आहे, असा कळीचा प्रश्न लेखकाने या कादंबरीत उपस्थित केला आहे.
-
Maharudra (महारूद्र)
पहिल्या प्रयत्नातच कुशल खेळाडूप्रमाणे कुठल्याही खेळाची लय भीमरावांना साधत असे. या दैवी देणगीला कठोर कष्टांची जोड देऊन भीमरावांनी फुटबॉल बहरवला. या खेळाचा स्थायीभाव आहे, त्या खेळाची विलक्षण गती. भीमरावांना सहजसाध्य असलेले अनेक खेळ होते, परंतु फुटबॉलकडे लक्ष द्यायचं असं न ठरवताही भीमराव फुटबॉलमध्येच रमले. कारण या खेळाची नैसर्गिक गती आणि भीमरावांच्या व्यक्तिमत्त्वातील असामान्य वेग यातील ताळमेळ सहज होता. फुटबॉलमध्ये नावारूपास येणं हे त्यांच्या अंतर्बाह्य व्यक्तिमत्त्वाचं सहजसुंदर प्रकटीकरण होतं. फुटबॉलशी त्यांचं नातं ही सर्वात नैसर्गिक गोष्ट होती.
-
Solapur Malshal Law 1930 (सोलापूर मार्शल लॉ १९३०)
"सत्याग्रहाची विलक्षण देणगी महात्माजींनी देशाला दिली. महात्माजींच्या सत्याग्रही तंत्राचा पूर्ण विकसित अविष्कार १९३० सालच्या सोलापूरच्या स्वातंत्र्यलढ्यात दिसला. याची अखेर महात्माजींच्या कल्पनेतले ‘लोकराज्य` सोलापूरात अस्तित्वात येण्यात झाली. चाणाक्ष साम्राज्यसत्तेने यामधला धोका ओळखत सोलापूरात मार्शल लॉ जारी करून तब्बल एकोणपन्नास दिवस राबवला. सोलापूरात जे घडले ते सोलापूरबाहेर कधी आलेच नाही. खुद्द महात्माजींना व त्यांच्या अनुयायांना आपल्या सत्याग्रही तंत्राचा हा विजय अखेरपर्यंत समजला नाही. समज गैरसमजाच्या या कल्लोळात सोलापूरच्या लढ्याबाबतची तमाम भारतीयांची धारणा ही सिसेरोच्या वरील वचनाप्रमाणे राहिली. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सुवर्णपान ठरावे अशी ही घटना सजगपणे नोंद न झाल्याने विस्मृतीच्या अडगळीत गेली. सोलापूर मार्शल लॉ १९३० या पुस्तकात या अज्ञाताचा शोध घेतलेला आहे. "
-
Swamikar (स्वामीकार)
सरदार घराण्यात जन्मूनही लेखणी हातात घेतलेले रणजित देसाई...पद्मश्रीसारखा नागरी सन्मान मिळालेला साहित्यिक...लहानपणीच मातृसुखाला मुकलेल्या रणजितजींनी आपल्या दोन्ही मुलींना आईचंही प्रेम दिलं, दोन्ही मुलींबाबतची कर्तव्यं मन:पूर्वक निभावली. कनवाळू पिता, दिलदार मित्र, कोवाडच्या लोकांवर मायेची पाखर घालणारा गावप्रमुख, मेहता पब्लिशिंग हाऊसशी घट्ट ऋणानुबंध असलेला लेखक, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे यांच्यासारख्या कलावांतांशी स्नेहबंध जोडणारा कलासक्त रसिक, प्रचंड लोकप्रियता लाभून, मानसन्मान मिळवूनही मनाचं नितळपण जपणारा माणूस... तर रणजित देसाई यांच्या व्यक्तिमत्त्वाचे त्यांच्या कन्या मधुमती शिंदे यांनी हृद्यतेने उलगडलेले हे पैलू आहेत.
-
The Art Of Choosing (द आर्ट ऑफ चूझिंग)
निवडप्रक्रिया...जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया. निवड करण्याची कला काय काय नाही करत? ती तुमच्या व्यक्तिमत्त्वाला, जीवनाला आकार देते. अगदी दैनंदिन जीवनातील गोष्टींपासून ते जीवनातील महत्त्वाच्या निर्णयापर्यंत हे निवड करण्याचं कौशल्य तुम्हाला उपयुक्त ठरतं आणि तुमच्या जीवनात सुसूत्रता आणून तुम्हाला आनंदही देतं. क्षेत्र कुठलंही असो, निवडीची कला तुम्हाला यशस्वितेच्या मार्गावर नेऊन ठेवते. तर असं सुसूत्र, आनंदी, समतोल, यशस्वी जीवन साध्य करायचं असेल तर ‘द आर्ट ऑफ चूझिंग’ हे पुस्तक तुम्हाला नक्कीच मदत करेल; कारण हे पुस्तक करतं निवडीची कला अंगात कशी बाणवावी याचं शास्त्रशुद्ध मार्गदर्शन. शीना अयंगार यांनी अंध असूनही डोळस लोकांच्यात वावरून आपलं ‘निवडप्रक्रिये’चं संशोधन चिकाटीने पूर्णत्वास नेलं व सत्य निष्कर्ष काढून जगासमोर ठेवले. अर्थातच या निष्कर्षांना सुयोग्य अशा उदाहरणांची जोड दिली आहे
-
Eka Aparichit Gandhichi Aatmakatha (एका अपरिचित गा
नटवर गांधी यांचं हे आत्मकथन आहे. गुजरातमधल्या एका खेड्यातून मुंबईत येऊन त्यांनी बी.कॉम.पर्यंत घेतलेलं शिक्षण, ओढग्रस्तीची आर्थिक परिस्थिती, धाकट्या सहा भावंडांची जबाबदारी त्यांनी घ्यावी, अशी वडिलांची अपेक्षा, नोकरीसाठीचा संघर्ष, लग्नानंतर भाड्याच्या एका खोलीसाठी करावा लागलेला संघर्ष, तुटपुंज्या पगारात प्रपंच चालवताना होणारी असह्य ओढाताण, अशातच अमेरिकेत मित्राच्या मदतीने एम.बी.ए.साठी मिळालेला प्रवेश, एम.बी.ए.नंतर अमेरिकेत प्रोफेसरची मिळालेली नोकरी, यथावकाश अमेरिकेत स्वत:चं घर, गाडी, अपत्यांसह संपन्न जीवनाचा घेतलेला अनुभव, तेथील नोकरीचे, पीएच.डी.चे अनुभव, वॉशिंग्टन डी. सी.च्या टॅक्स विभागात कमिशनर आणि सीएफओ पदावर केलेलं महत्त्वपूर्ण काम, अमेरिका आणि भारताची विविध बाबतीत तुलना इ. बाबींतून ओघवत्या भाषेतून हे आत्मकथन उलगडत जातं. तत्कालीन मुंबई, तत्कालीन अमेरिकेचं दर्शन घडतं. अंतर्मुख करणारं प्रेरणादायक आत्मकथन.
-
The New BJP (दि न्यू बीजेपी)
"२०१४ पासून भाजपने केंद्र आणि राज्य दोन्ही पातळ्यांवर निवडणुकांमागे निवडणुका जिंकल्या आहेत. हे त्यांच्या हिंदू परिघापलीकडच्या विस्ताराचे संकेत आहेत. प्रश्न असा आहे की, जात, धर्म आणि लिंगाधारित विभागणीच्या पुढे जात इतके लोक अनाकलनीय आक्रमक हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या पक्षाला मत का देतात? त्यांच्या बहुचर्चित विकास योजनांमध्ये दोष काहीही असोत, त्या योजनांच त्यांच्यासाठी लक्षवेधी ठरताहेत का? की आरएसएस केडरचे सक्रिय एकत्रीकरण कारणीभूत ठरतेय? या आकर्षक सुधारणावादी इतिहासात, राजकीय शास्त्रज्ञ आणि पत्रकार नलिन मेहता भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष कसा बनला याचे परीक्षण करतात. पक्षाच्या हिंदुत्वाच्या राजकारणाच्या नेहमीच्या कथनाच्या पलीकडे जाऊन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात त्यांनी स्वत:च्या सोशल इंजिनिअरिंगचा ब्रँड वापरून भारतीय राजकारणाचा आकार कसा बदलला हे स्पष्ट केले. ही पुनर्रचना चतुराईने नवीन जातीय युती, उपेक्षित सामाजिक गटांवर लक्ष केंद्रित करणार्या नवीन कल्याणकारी राज्याचा दावा आणि महिला मतदारांचा आधार बनवण्याद्वारे करण्यात आली. भारतीय राजकीय पक्षांच्या जातीय रचनेचा अभ्यास करणार्या तीन अनन्य निर्देशांकांच्या डेटावर आधारित मांडणी मेहता करतात. पक्ष आणि देश या दोहोंच्या कार्यपद्धतीबद्दल द न्यू बीजेपी पुस्तक चकित करणारी नवी अंतर्दृष्टी देते. पूर्वी न वापरलेल्या ऐतिहासिक नोंदी, पक्षाच्या नेत्यांच्या विशेष मुलाखती आणि संपूर्ण भारतातील सर्वसमावेशक अहवाल यातून देशातल्या राजकीय स्थित्यंतराचा आलेखच समोर येतो. भाजप आणि आजच्या भारताचा स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ अभ्यास करणारे हे पुस्तक आहे जे राजकीय विभाजनाच्या सर्व बाजूंनी सहभाग आणि वादविवादाची मागणी करते. "
-
Murtichor (मूर्तिचोर)
तामिळनाडूतील दोन मंदिरांतील धाडसी मूर्तिचोरी प्रकरणी न्यू यॉर्क येथे पुराणवस्तू विक्री करणार्या सुभाष कपूर यांचा हात असल्याचं लक्षात घेऊन भारताने त्यांच्या अटकेसाठी काही आठवडे आधी ‘रेड-कॉर्नर-नोटीस’ जारी केली होती. त्यानुसार, यूएस अधिकार्यांनी न्यू यॉर्कयेथील कपूर यांच्या वेअरहाउसवर धाड घातली असता मोठं घबाड त्यांच्या हाती लागलं. ‘br>जगातील स कुप्रसिद्ध तस्करांपैकी एक’ अशी यूएसने त्यांची संभावना केली. एक मूर्तिप्रेमी वर्षानुवर्षं कपूरच्या मागावर होता. आजही तो कपूरच्या हातून विकल्या गेलेल्या मूर्तींचा शोध घेत आहे. ही त्यानेच सांगितलेली, अशक्यप्राय वाटणारी सत्यकथा आहे. दक्ष पोलीस ऑफिसर, म्युझियमचे भ्रष्ट अधिकारी, प्रियकराचा सूड घेणारी मैत्रीण, दुतोंडी अभ्यासक, मंदिरात लुटमार करणारे भुरटे चोर आणि तस्कर अशा अनेक व्यक्तिरेखांची या पुस्तकात रेलचेल आहे. भारतीय मंदिरात झालेल्या 21व्या शतकातील या लुटमारीने आणि समाजकंटक गुन्हेगारांच्या धाडसाने थक्क करणारे असे हे पुस्तक आहे.