-
Sarmisal (सर मिसळ)
महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यात जसे एक मारुतीचे देऊळ असते, एक पार असतो, एक ओढा असतो, त्या मातीत पिकणारे खास पीक असते; तसा गावरान विनोदही असतो. गावओढ्यासारखाच तो सतत खळाळत असतो आणि हरेक पाण्याची चव वेगळी, तशी या विनोदाची चवही वेगळी असते, खास असते. भंपक माणसांनी मारलेल्या बढायांतून, अडाण्यांच्या आणि अश्रापांच्या सहज वागण्यातून, बेरकी लोकांच्या गप्पांतून, जुन्या माणसांच्या आठवणींतून, तरण्यांच्या हुंदडण्यातून विनोद उसळ्या घेत असतो. रोज हसावे असे काही घडत असते. उत्तम म्हणून गाजलेल्या मिरासदारांच्या कथांतून हा गावरान विनोद अगदी जसाच्या तसा आढळतो.
-
Bendbaja (बेंडबाजा)
अडाणीपणा, बेरकीपणा, मूर्खपणा, भोळसरपणा इ. माणसांचे "सदगुण` म्हणजे विनोदी लेखनासाठीचा कच्चा मालच. ग्रामीण आणि नागर दोन्ही भागात हा कच्चा माल भरपूर प्रमाणात असतो. प्रत्येक विनोदी लेखकामागे एक मिश्किल माणूस दडलेला असतो आणि तो हा कच्चा माल बरोब्बर हेरून त्यातली विसंगती खेळकर पद्धतीने शब्दबद्ध करतो. पंढरपूरसारख्या अर्धग्रामीण भागात बालपण घालवलेल्या द..मा. मिरासदारांना असा कच्चा माल भरपूर प्रमाणात गवसला असल्यास नवल नाही. अशा "सदगुणी` माणसांचे वेचक अनुभव ते आपल्या खुमासदार शौलीत कथन करतात. तेहा सामान्यांना अगदी साध्या सुध्या वाटणाया"ना सुद्धा मजेशीर परिमाण घेऊन आपल्यासमोर येतात. द.मां.च्या लेखनाचे एक वौशिष्ट्य असे की ते केवळ इतरांच्याच अनुभवाकडे मिश्किल नजरेने पाहतात असे नहे, तर स्वत:चीही फिरकी घेतात. अशा स्वत:च्या घेतलेल्या अनेक फिरक्यांचे हसवणारे सूर या "बेंडबाजा` मधुन ऐकू येतील.
-
Khade Aani Orakhade (खडे अणि ओरखडे)
राजकारण हे काही मिरासदारांचे क्षेत्र नाही. दैनंदिन राजकारणाशीही त्यांचा संबंध नाही. दैनंदिन वृत्तपत्रे वाचून आणि क्वचित प्रसंगी राजकीय नेत्यांची भाषणे ऐकून सामान्य माणसाला जे काही राजकारणाचे ज्ञान होते, तेवढेच त्यांचे ज्ञान आहे; पण पिंड विनोदी लेखकाचा आहे. माणूस नावाच्या प्राण्याबद्दल प्रचंड कुतूहल आहे. राजकारणातील माणसाकडेही याच कुतूहलाने ते पाहतात. त्यामुळे या क्षेत्रातल्या अनेक प्रकारच्या विसंगती आणि हास्यकारक घटना, वक्तव्ये याकडे त्यांचे लक्ष जाते. त्यातूनच या स्वरूपाच्या लेखनाचा किंवा टीकाटिप्पणीचा जन्म झाला. विडंबन, उपहास, अतिशयोक्ती, उपरोध या विनोदाच्या भात्यातील अस्त्रांचा वापर यात त्यांनी विपुलतेने केला आहे.
-
Sutti Ani Itar Ekankika (सुट्टी अणि इतर एकांकिका)
शाळेतील शिक्षक खोली मधल्या सुट्टी पूर्वीचा तास, शिक्षकांमध्ये चाललेले संभाषण. कोणीतरी मेल्याची बातमी येते आणि मधल्या सुट्टीच्या घंटेपर्यंत शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या तर्कवितर्काना कसे तोंड फुटते ते पाहा "सुट्टी` या एकांकिकेत. दवाखाना थाटला, पण रोगीच नाहीत. का येत नाहीत? कोणामुळे येत नाहीत. की गावात सर्वजण निरोगी आहेत? आपल्याला सापडतील, याची उत्तरं "निरोगी दवाखान्यात`... फर्स्ट क्लासच्या वेटिंग रूममध्ये प्रा. डोके प्रवेश करतात निवांत वाचन किंवा झोपण्यासाठी. पण त्यांना असा वाचनासाठी निवांतपणा, झोपण्यासाठी शांतपणा मिळतो का? पाहा "फर्स्ट क्लास वेटिंग रूम`मध्ये ... तालुक्याच्या शाळेचा निकालाचा दिवस. मुख्यायापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांना भेटायला येणाया माणसांकडून कशा निकालाबाबतच्या मागण्या असतात. वाचा "निकाल`मध्ये.
-
Porvay
गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोरांच्या ‘छेलेबेला’ ह्या आत्मकथनाचं ‘पोरवय’ हे मराठी भाषांतर आहे. वयाची ऐंशी वर्षं उलटून गेल्यावर ह्या कथनातून त्यांनी आपलं पोरवय उभं केलं आहे. पोरवयातल्या डोळ्यांनी जे पाहिलं, जे अनुभवलं, त्याची ही संस्मरणं आहेत. त्या काळी त्यांचा ज्यांच्याशी संबंध आला, लोभ जडला, त्या आप्तस्वकीयांची, गुरुजनांची, सेवकांची, जोराशांको येथील त्यांच्या भव्य वास्तूची, तिथल्या पुष्करिणीची, वृक्षलतांची, गच्चीत संध्याकाळी जमणार्या काव्य-शास्त्र-विनोदाच्या मैफिलींची रवीन्द्रांनी हळुवार शब्दांनी रेखाटलेली ही स्मृतिचित्रं आहेत. मराठी वाचकाला पोरवयातील रवीन्द्रांचं दर्शन घडावं ह्या हेतूनं मी हे भाषांतर केलं आहे. हे करताना बंगाली भाषा, साहित्य, संस्कृतीशी एकरूप झालेल्या श्री. अशोक शहाणे ह्यांनी या कामात मला खूप मदत केली. भाषांतर शक्य तितक निर्दोष व्हावं यासाठी त्यांनी कटाक्ष बाळगून मला सतत मार्गदर्शन केलं. हे भाषांतर करीत असताना बंगाली भाषेतील बारकावे समजून घेणं हा एक आनंददायक अनुभव होता. "प्रौढत्वीं निज शैशवास जपणें बाणा कवीचा असे" असं केशवसुत म्हणून गेले. ते जपणं किती हृदयस्पर्शी असतं याचं ‘पोरवय’ हे एक सुंदर उदाहरण आहे.
-
Pu.L.Ek Sathavan
पु. ल. देशपांडे यांच्या उत्कृष्ट साहित्यातून निवडलेले सर्वोत्कृष्ट साहित्य विनोदी लेख / कथा / नाट्य / व्यक्तिचित्रे / प्रवासचित्रे / पत्रे / भाषणे यातले जवळजवळ निम्मे साहित्य पुलंच्या इतर कुठल्याही पुस्तकात प्रसिद्ध झालेले नाही. हे पुस्तक म्हणजे पु. ल. देशपांडे यांचा अभिरुचिसंपन्न, सुखद सहवास.
-
Gun Gayen Aavadhi
माझ्या कुंडलीत ज्योतिष्यांना न दिसणारा एक फार मोठा भाग्ययोग आहे. मला प्रत्यक्ष किंवा असामान्य कर्तृत्वाच्या रूपाने अप्रत्यक्ष भेटलेली माणसे हे ह्याच भाग्ययोगाचे फळ आहे. त्यांपैकी काही माणसांचे हे गुणगायन आहे. त्यांच्या गुणांची आरास माझ्या अंत:करणात सदैव मांडलेली असते. पण ज्याच्यामुळे त्यांचे स्मरण अधिक तीव्रतेने व्हावे, असेही प्रसंग येतात. कधी त्यांच्या निधनाच्या दु:खाने गळणार्या अश्रूंच्या जोडीनेच ते शब्दचित्र रेखाटले जाते, तर कधी त्यांच्या पन्नासाव्या किंवा साठाव्या वर्षगाठीच्या दिवशी त्यांना जाहीर अभिवादन करावेसे वाटते. लोहियांवरचा लेख हा त्यांच्या लेखसंग्रहाला प्रस्तावना म्हणून लिहिला गेला आहे. मात्र हे गुणगान केवळ प्रासंगिक नाही. माझ्या मनाने लावलेल्या निकडीतून ही शब्दचित्रे तयार झाली. ह्यांतली अण्णासाहेब फडक्यांसारखी काही माणसे हयात असताना मी त्यांची शब्दमूर्ती घडवायचा प्रयत्न केला. आता अण्णा नाहीत. भास्करबुवा किंवा गडकरी ह्यांना मी कसा पाहणार? पण माझ्या लेखी मात्र ही सारी माणसे जिवंत आहेत. त्यांतल्या एखाद्याच्या कलेतून, नि:स्वार्थ जगण्यातून, निरपेक्ष स्नेहातून, सुरांतून, ग्रंथांतून, गीतांतून किंवा व्यक्तिमत्त्वाच्या एखाद्या देखण्या पैलूतून मला लाभलेला आनंद जिवंत आहे. त्या अरूप आनंदाला मी रूप देण्याचा प्रयत्न केला आ. ह्या गुणवंतांचे स्मरण मला फार मोठी कृतार्थता देत आले आहे. अशा कृतार्थतेच्या क्षणी मी नतमस्तक होऊन अज्ञाताला विचारीत असतो, की असल्या भाग्याची या जन्मी धणी करून देणारे गतजन्मीचे ते माझे कोणते सुकृत होते ते मला सांग. ह्या जन्मी तसले काही तरी करायचा प्रयत्न करीन, म्हणजे पुढच्या जन्मीच्या ह्या असल्या भाग्ययोगाची पूर्वतयारी तरी करता येईल.
-
Purchundi
पुलंच्या व्यक्तिमत्वाचे काही दुर्मिळ पैलू उलगडून दाखवणारे त्यांचे पूर्वप्रकाशित निवडक लेख तसेच मुलाखती यांचा अप्रतिम संग्रह म्हणजेच ‘पुरचुंडी’! सदर पुस्तकात समाविष्ट लेख: * बालपणीचा काळ सुखाचा (किशोर, दिवाळी १९७८) * माझे बालपण जागवणारे सदाशिवगड (शिवाजी एज्युकेशन सोसायटी, सदाशिवगड : स्मरणिका) * सुरूवातीचे दिवस (नाट्यदर्पण, डिसेंबर १९७९) * न मावळणारे दिवस (महाराष्ट्र टाइम्स, १ मार्च १९८१) * रंगभूमीवर आलेलं माझं पहिलं नाटक * प्रत्येक ‘चिंधी’नं मला खूप काही दिलं (रूपवाणी, दिवाळी १९९३) * दोन घाव (अभिरूचि, मार्च १९४७) * प्रळयातील पिंपळपाने (जरीपटका, मे १९७७) * सर्व काही आणि काही नाही... (मौज, दिवाळी १९७६) * कशासाठी? पोटासाठी... खंडाळ्याच्या घाटासाठी (बालगंधर्व रंगमंदिर पुणे, उद्घाटन समारंभ : ‘नमन नटवरा’ स्मरणिका, २६ जून १९६८) * ही घरं...ती घरं... (दीपावली) * आंबा पिकतो...रस गळतो... (सुगंध, १९८०) * पाऊस : कधी असा, कधी तसा (स्वराज्य(वर्षाऋतू विशेषांक), जुलै १९७८) * संवाद : एका राजा लेखकाशी (ललित, जानेवारी १९७५) * मुलाखत : फ. मु. शिंदे यांना दिलेली (अजिंठा, दिवाळी १९८२)* मुलाखत : सुधीर बेडेकर यांना दिलेली (तात्पर्य, दिवाळी १९७८) * पहिलं प्रेम संगीतावर... (बखर, दिवाळी १९९२) * मला नाचणारे तरूण आवडतात (कॉलेज कट्टा, दिवाळी १९९६)
-
Ek Shunya Mi
श्री. पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या निवडक विचारप्रधान लेखांचा हा संग्रह आहे. त्यांच्या चतुरंग वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचे तुलनेने सहज लक्षात न येणारे पण महत्त्वाचे अंग त्यात व्यक्त झाले आहे. कोणत्याही पोथीनिष्ठ राजकीय, सामाजिक वा आर्थिक विचारव्यूहात त्यांची बुद्धी अडकली नाही की पारिभाषिक संज्ञांच्या विद्वज्जड जंजाळात त्यांची शैली फसली नाही. तो त्यांचा पिंडच नव्हता. समाजजीवनाचा व त्याच्या निरोगी, लावण्यपूर्ण विकासाचा विचार त्यांच्या मनात सतत असे आणि त्यासाठी त्यागपूर्वक झटणार्या कार्यकर्त्यांविषयी व नेत्यांविषयी, त्यांच्या वैचारिक भूमिकांची अटक न मानता, त्यांच्या मनात नितांत आदरभाव असे. त्यातून घोळणारे विचार व भावना त्यांनी वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्तांनी लिहिलेल्या लेखांत व भाषणांत आपल्या स्वाभाविक, सहज व अतिशय बोलक्या भाषेत व्यक्त केले.
-
Aghal Paghal
पु. ल. देशपांडे यांचं शब्दलेणं आणि वसंत सरावते यांचं मुखपृष्ठ आणि रेखाचित्र लाभलेलं हे पुस्तक म्हणजे जपून ठेवावं असा ठेवा आहे, मी आणि माझे पत्रकार, काही साहित्यिक भोग, आमचे भाषाविषयक धोरण, मी : एक मराठी माणूस, माझ्या भावी चरित्राची ऐतिहासिक साधने, विनोदी लेखन हे साहित्य आदी आदी लेखांचा समावेश असलेलं हे पुस्तक मनमुराद हसवतं. या सर्व लेखांची सुरवातही आगळीवेगळी. एकेकाचं मराठी मध्ये ते सुरवात करतात, '...यापुढे बायाबापड्यांनी मराठी लिहिलं पाहिजे. मराठी साहित्य संमेलनातील एक अध्यक्षीय आदेश. 'माझा एक अकारण वैरी'मध्ये ते लिहितात, 'माझ्याविषयी समाजात तसे कुठेही गैरसमज नाहीत. कचेरीत मी अजातशत्रू आहे. या साऱ्या अक्षरघनाचा साज रेखाचीत्रांमुळे खुलला आहे.
-
Hasavnuk
जन्म आणि मृत्यू ह्या दोन टोकांमधे पकडून नियतीने चालवलेली आपणा सार्यांची फसवणूक एकदा लक्षात आली की त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जमणार्या माणसांची ‘हसवणूक’ करण्यापलीकडे आणखी काय करायचं?
-
Char Shabad
एखादी घटना, एखादा अनुभव किंवा एखादी साहित्यनिर्मिती मला आवडली की दुसर्या कुणाला तरी त्याबद्दल सांगून, त्याविषयी लिहून, इतरांना त्या आंनदात सामील करुन घ्यावे ह्याची माझ्या मनाला ओढ लागते. मग ती घटना कुठल्याही क्षेत्रातली असो नाही तर विषयातली असो. एखादे चांगले पुस्तक वाचले, चांगली कविता वाचली किंवा चांगल्या गाण्याची मैफिल जमून गेलेली पाहिली की, तिच्याविषयी बोलायचा किंवा लिहायचा मला अनावर मोह होतो. ‘चार शब्द’ ह्या संग्रहातील या प्रस्तावनादेखील माझ्या स्वभावातल्या ह्या अनावर मोहापोटीच निर्माण झालेल्या आहेत. गेली पन्नासएक वर्षे कलानिर्मितीच्या निरनिराळ्या क्षेत्रांत मला वावरायला मिळाले. ह्या काळात मी लिहिलेल्या या प्रस्तावना आहेत. मात्र ह्या प्रस्तावना म्हणजे एखाद्याच्या लेखनातले गुणदोष दाखवणारे चिकित्सक समीक्षण नाही. मला आवडलेल्या पुस्तकांचे आस्वादकाच्या भूमिकेतून केलेले हे स्वागत आहे. मीच एका ठिकाणी प्रस्तावनांना ‘स्वागतपर गद्य’ असे म्हटलेले आहे. ह्यामागे, स्वत:च्या लेखनाने ज्यांनी आपल्याला आनंद दिला, त्या लेखकांविषयीची कृतज्ञतेची भावना आहे. सुंदर कलाकृती वाचकाचे, श्रोत्याचे किंवा प्रेक्षकाचे जीवन अधिक सुंदर करून जाते. माझ्या सुदैवाने, अचानक धनलाभ व्हावा तशी ही पुस्तके मला वाचायला मिळाली. ह्या प्रस्तावना लिहिण्याचा मुख्य हेतू, निरनिराळ्या पुस्तकांकडे वाचकांचे लक्ष जावे हाच आहे.
-
Vyakti Aani Valli
१९४३ साली ’अभिरुची’ च्या एका अंकात पुरुषोत्तम देशपांडे नामेकरून कोण्या नवख्या लेखकाचे ‘अण्णा वडगावकर’ हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले तेव्हा त्या मासिकाचे मर्यादित पण जाणकार वाचक-मंडळ चमकून उठले. विनोदाच्या देशात ‘हा कोण संप्रति नवा पुरुषावतार? ’ अशी सोत्कंठ पृच्छा होऊ लागली. हा प्रदेश तेव्हा अत्रे, शामराव ओक, चिं. वि. जोशी यांच्यासारख्या मानकर्यांनी गजबजलेला होता. अन्य विनोदकारही होते आणि ते जनताजनार्दनाला हसविण्याची यथाशक्ती खटपट करीत होते. मराठी विनोदाची पेठ अशी तेजीत असूनही, देशपांड्यांचे न्यारे कसब डोळ्यात भरले. ते कसब तेथेच न थबकता, अनेक अंगांनी फुलून आले. त्याला नवे नवे धुमारे फुटले, एकेकसुद्धा भान हरवील असा; ‘किमु यत्र समुच्चयम्’? साहित्याचे विविध ढंग, संगीत रंगभूमी, चित्रपट असा या प्रतिभेचा चौरस आणि मुक्त संचार. चोखंदळ रसिकांनाही थक्क करणारा आणि ‘जन-साधारण’ भारुन जातील असा. आज तर, असे साक्षर मराठी घर नसेल की ‘पु. ल.’ म्हटले की कौतुकादराची लाट उसळत नाही! अशी आपुलकी ललाटी असणारा कलावंत एखादाचं! देशपाड्यांनी खूपखूप पाहिले. कंठाळी एकसुरी चाल टाकून जीवनाच्या तर्हातर्हा धुंडाळल्या आणि तिखट नजरेने माणसामाणसांतील विसंगती हेरली. ती अशा रंगतीने सांगितली की महाराष्ट्र खळखळून हसला. ती रंगत जातिवंत विनोदाची. त्याला करुणेची किनार असते. विसंगती हा मनुष्य स्वभावाचा धर्मच आहे ही उदार समज त्यात आहे. त्याने या विनोदाला गहिरेपण मिळते आणि नाट्यही. माणसे सहसा तशी सपाट नसतात चांगल्या-वाईटाचा शिक्का सहज उठवावा अशी. कोपरे-कंगोरे निघतात! आत कोठेतरी ‘वल्ली’ दडलेली असते. दोषांच्या राशीत गुणाची एखादी अकल्पित रेषा गवसते. देशपांड्यांनी या व्यक्ति आणि वल्ली टिपल्या त्या माणुसकीखातर. या वल्लींनाही व्यक्तित्व आहे. त्यांतील बर्या-वाईटाचे अंतर्नाटय देशपांडयांनी सराइतपणे पकडले आहे. कानामात्रेच्या फरकाने तसले नाट्य तुमच्या आमच्यांत आहे आणि लेखकातही!
-
Asa Me Asaami
तुळशीवृंदावनापासून ते कॅक्टसच्या कुंडीपर्यंत कळत न कळत काळाबरोबर वाहत वाहत गेलेल्या एका कारकूनाचे हे आत्मचरित्र आहे. निरनिराळ्या मासिकांतून त्यातला बराचसा भाग यापूर्वीच आला आहे. मुख्यत: ‘दीपावली’च्या दिवाळी अंकांतून ‘असा मी असामी’ व त्यानंतर ‘पुन्हा मी पुन्हा मी’ असे दोन भाग प्रसिद्ध झाले होते. ह्या काल्पनिक आत्मचित्राचा नायक माझ्या मनात अनेक वर्षे घर करून बसला आहे. निरनिराळ्या लेखांतून तो डोकावतो. त्याला मी इथे ह्या पुस्तकात पकडून ठेवला तरी माझ्या मनातले घर सोडायला तो तयार नाही. ह्या अफाट मुंबई शहरातल्या ज्या मध्यमवर्गीय समाजात मी वाढलो त्यातलाच हा एक! कुठल्यातरी हपिसासाठी जगायचे आणि पेन्शनीसाठी किंवा प्राविडंट फंडाकडे डोळे लावून दिवसादिवसाने म्हातारे होत जायचे याहून मोठी महत्त्वाकांक्षा त्याला परवडलीच नाही. लोकलगाडीसाठी धावताना, ट्राम गाठताना किंवा बसच्या रांगेत आमच्या भेटीगाठी झाल्या-आजही होतात; यापुढेही होतील. बटाट्याच्या चाळीतसुद्धा ह्याच्या नात्याची माणसे आहेतच. ह्याचेही बरेचसे आयुष्य तसल्याच खास मुंबई फ्याशनीच्या वास्तूत गेले आहे. त्याच्या ह्या आठवणी आहेत. नव्या जगाशी जुळवून घेताना लागलेल्या धापा आहेत. रक्तातूनच आलेल्या कोकणी खवटपणाला हा काही अगदीच पारखा नाही. आणि म्हणूनच वैतागाच्या क्षणीही तो थोडासा हसतो आणि थोडासा हसवतोही. मात्र कुणी हसल्याबद्दल त्याला मुळीच राग येणार नाही. त्वेषाने चिडून वार करायला जाणे त्याला जमणार नाही. असल्या स्वभावाला कोणी डरपोकपणा म्हणेल; त्यालाही त्याची हरकत नाही. आपले चरित्र सांगण्याचे त्याने धारिष्ट्य दाखवले हेच पुष्कळ झाले. ह्या चरित्रातल्या निरनिरळ्या घटनांच्या संदर्भात आलेल्या माणसांच्या नावांशी कुण्या वाचकाचे नाव जुळून आले तर तो केवळ योगायोग आहे असे त्याने अगर तिने समजण्याची कृपा करावी.
-
Aapulki
पुलंनी त्यांना भेटलेल्या काही निवडक व्यक्तिंबद्दल आपुलकीने केलेल्या काही पूर्वप्रकाशित लेखांचा संग्रह म्हणजेच ‘आपुलकी’! सदर पुस्तकात समाविष्ट लेख * एक वडीलधारा माणूस (हमारी बात (महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे), डिसेंबर १९७९) * बालगंधर्व : एक अटळ स्मरण (स्वराज्य, ६ नोव्हेंबर १९७६) * दादा (महाराष्ट्र साहित्य पत्रिका, एप्रिल-मे-जून १९७४) * मुशाफिर टिकेकर (महाराष्ट्र टाइम्स, १६ ऑगस्ट १९७६) * ‘किमया’कार माधव आचवल (अप्रकाशित) * नाट्यरंगी रंगलेला शरद तळवळकर (महाराष्ट्र टाइम्स, १ नोव्हेंबर १९८१) * आमची आवाबेन (महाराष्ट्र टाइम्स, २ जुलै १९७२) * अब्द अब्द मनीं येतें (स्वराज्य, ४ ऑगस्ट १९८४) * अनंत काणेकर (वीणा, मे १९५७) * शिक्षकांचे शिक्षक (मौज, दिवाळी १९९८) * शंकर घाणेकर : एक हसवणारा फकीर (महाराष्ट्र टाइम्स, १० फेब्रुवारी १९७४) * शुक्ल कवी (परचुरे, जुलै १९६२) * माधवराव (अप्रकाशित) * अग्रलेखक गोविंदराव तळवळकर (ललित, मे १९७५) * कोल्हापूरचे नाट्यप्रेमी लोहिया (कोल्हापूरदर्शन, २३ जानेवारी १९७१)
-
Gangot
यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महौदधौ। समेत्य च व्यपेयतं तद्वद्भूतसमागम:॥ वाढत्या वयाबरोबर पुढे पाहण्याऐवजी मन मागेच पाहण्यात रमते... आयुष्याच्या ह्या प्रवासात कितीतरी माणसे भेटली. नात्याची, बिननात्याची, कुणी पोटापाण्याच्या व्यवसायात भेटली. कुणी मैफिलीत भेटली. कुणाकुणाच्या बैठकीत सामील होण्याचे योग आले. कुणी प्रवासात भेटले. कुणी शेजारी म्हणून लाभले. कुणी आळीतले आळीकर, कुणी गावातले गावकर. कुणी जवळ आले, कुणी खेचून जवळ घेतले. काहींचे आकर्षण वाढले, काहींचे अचानक कमीही झाले. वर्ड्स्वर्थच्या ‘यारो रीव्हिजिटेड्’ यासारखी काही माणसे पुनर्भेटीत निराळीच वाटली. काहींच्या वेव्ह्लेंग्थ्स पटकन जमल्या, काहींच्या नाही जमल्या. काहींनी कधीही न फेडता येणार्या ऋणाचा भार अलगद खांद्यावर ठेवला. प्रत्येकाला हे असे कधी जवळीक तर कधी दुरावा अशा हेलकाव्यात तरंगणारे गणगोत लाभतच असते. माणूस कधीही एकटा नसतो. त्याने तसे असूही नये. माझे ‘गणगोत’ फार मोठे आहे. अनिलांनी म्हटल्याप्रमाणे ‘इथे सखे नि सोबती कुणी इथे कुणी तिथे!’ पुढल्या शे-दोनशे पानांतून दिसणारी माणसे खरोखरीच तशी आहेत की नाहीत हे मला ठाऊक नाही. आपुलकीच्या डोळ्यांनी पाहताना त्यांचे जे मला दर्शन घडले त्याची ही चित्रे आहेत. न जाणो, त्यांचा आणि माझा जो सहवास घडला, त्या सहवासाचीच ही चित्रे असतील एखादे वेळी! ह्या पुस्तकातली सुरेख चित्रे काढणारे आणि पुस्तकाला सुंदर वेष्टण देणारे माझे चित्रकार मित्र श्री. ओक यांचा मी अत्यंत आभारी आहे. २३ एप्रिल १९६६ ह्या दिवशी हे पुस्तक प्रसिद्ध व्हावे अशी माझी इच्छा होती. ज्योतिषाने काढलेला मुहूर्त म्हणून नव्हे तर आम्हा उभयतांवर वडीलधार्या माणसासारखी माया करणारे डॉ. भाई व सौ. इंदूताई दिवाडकर यांच्या लग्नाचा आज पंचविसावा वाढदिवस आहे, तो मुहूर्त गाठायचा होता म्हणून. ही इच्छा पुरी केल्याबद्दल मी प्रकाशक रा. ज. देशमुख आणि कल्पना मुद्रणालयाचे लाटकर बंधू, भालोबा खांडेकर आणि सहकारी मुद्रक वर्गाचा ऋणी आहे. ह्या पुस्तकात घालण्यासाठी जी रेखाचित्रे काढली आहेत त्यांचे मूळ फोटो ज्यांनी ज्यांनी दिले, त्या सर्वांचा मी आभारी आहे. विशेषत: रावसाहेबांचा फोटो दुर्मिळ होता; तो श्रीमती काशीबाईंनी दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.