-
Gutenbargachya Savlya (गुटेनबर्गच्या सावल्या)
'गुटेनबर्गच्या सावल्या या पुस्तकात प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार यांनी भारतातील आणि मुख्यतः महाराष्ट्रातील प्रकाशन व्यवसायात कार्यरत असलेल्या स्त्रियांच्या कामगिरीचा आढावा घेतलेला आहे. हा आढावा महत्त्वाचा याच्यासाठी आहे की, ज्ञानप्रसाराचे एक माध्यम म्हणून स्त्रिया जेव्हा प्रकाशन व्यवसायाचा विचार करू लागल्या तेव्हा त्यांना आपल्या दुय्यमत्त्वाची जाणीव होती आणि या जाणिवेतून जगाला समतेचा विचार देण्यासाठी आणि मुख्यतः स्त्रियांच्या हक्काची, अधिकाराची मांडणी करण्यासाठी या व्यवसायात त्या उतरल्या. यातील काही स्त्रियांचे प्रयत्न या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. वृत्तपत्रात चालवलेल्या पाक्षिक सदराचे रूपांतर या पुस्तकात झाले आहे. त्यातून प्रकाशन व्यवसायात कार्यरत असलेल्या स्त्रियांच्या विचारविश्वाचा परिचय करून देण्याचा आणि त्यांची ऐतिहासिक कामगिरी मांडण्याचा प्रयत्न प्रवीण घोडस्वार यांनी केलेला आहे. या दृष्टीने या पुस्तकाचे महत्त्व निर्विवादपणे मान्य करावे लागेल. उर्वशी बुटालिया, रितू मेनन, चिकी सरकार, मिली ऐश्वर्या, नीता गुप्ता, कार्तिकी व्हीके, नाझिया खान यासारख्या महाराष्ट्राबाहेरील प्रकाशन व्यवसायात कार्यरत असलेल्या स्त्रियांच्या कामगिरीचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. या सर्व स्त्रिया स्त्रियांच्या अधिकारांचा पुरस्कार करणाऱ्या आणि स्त्रीवादी सिद्धांतनाची मांडणी करणाऱ्या स्त्रिया आहेत. ' --वंदना महाजन प्राध्यापक, मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई
-
Aamhi Swayampurna (आम्ही स्वयंपूर्णा)
चळवळीची पार्श्वभूमी लाभलेल्या डॉ. मेधा पुरव सामंत यांनी तीस वर्षांपूर्वी एका छोट्या खोलीतून 'अन्नपूर्णा परिवारा'ची सुरुवात केली. आज या परिवाराने पुण्या-मुंबईतल्या सव्वा लाख कष्टकरी महिलांना आपल्या कवेत घेतलं आहे. हा परिवार २०० कोटींहून जास्त उलाढाल करणारा सहा सामाजिक संस्थांचा समूह बनला आहे. 'अन्नपूर्णा'च्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभं करणारं, एवढंच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षितता पुरवणारं यशस्वी मॉडेल मेधाताईंनी उभं केलं आहे. हे कसं घडलं? रोज भेटणाऱ्या भाजीवाल्या बायकांना सावकारी चक्रातून बाहेर काढण्यासाठी मेधाताईंनी स्वतःच्या खिशातून नऊ महिलांच्या गटाला पहिलं कर्ज दिलं. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर कष्टकरी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी काम करायचं पक्कं करत मेधाताईंनी बँकेतली नोकरी सोडली आणि पूर्णवेळ कामात वाहून घेतलं. तीस वर्ष जीवाचं रान करत कल्पकता आणि धडाडीने संस्था वाढवली. महिलांच्या गरजा समजून घेत आरोग्यविमा, मुला-मुलींसाठी शिष्यवृत्ती आणि निवृत्तीनंतरच्या पेन्शनसारख्या अनेक योजना सुरू केल्या. अन्नपूर्णा परिवार हा एकखांबी तंबू होऊ नये यासाठी महिलांमधूनच नेतृत्वही घडवलं. महिलांनाच नव्हे, तर संस्थेलाही स्वतःच्या पायावर उभं केलं. या अफाट प्रवासाची गोष्ट सांगणारं एका सामाजिक उद्योजिकेचं प्रेरणादायी कार्यचरित्र.
-
Nigeria (नायजेरिया)
डॉ. राजेश कापसे ह्यांचे हे पुस्तक नायजेरिया देशावर एक नवा प्रकाशझोत टाकते. एका वैद्यकीय व्यावसायिकाच्या दृष्टीकोनातून. ह्यापूर्वी मी मराठीमध्ये, शोभाताई बोंद्रे आणि शेतीतज्ञ धोंडेसर ह्यांची पुस्तके वाचली आहेत. काळाबरोबर देश आणि तिथले वास्तव बदलत असते. व्यवस्थाही बदलत असतात. ह्या सा-याचे यथातथ्य पण ललित शैलीमध्ये वर्णन राजेशच्या लिखाणात आहेच. त्याच्या मिश्कील, परंतु अभ्यासू स्वभावाचा प्रत्ययसुद्धा वारंवार येत रहातो. ह्यापुढे फक्त प्रवासवर्णनच नव्हे तर विविध विषयांवरचे त्याचे लिखाण वाचायला मिळावे अशा शुभेच्छा ! - डॉ. आनंद नाडकर्णी (मनोविकास तज्ञ)
-
कशा कशाच्या नावाने
डिसेंबर १९९२: इरा दीक्षित आणि ओमर सिद्दिकी ही मुंबईत राहणारी स्वप्नाळू आणि खेळकर, किशोरवयीन जोडी होती. अयोध्येत सुरू असलेल्या दंगलींचे तीव्र पडसाद मुंबईमध्ये उमटल्यामुळे त्या दोघांचंही आयुष्य उध्वस्त झालं. डिसेंबर २०१७: लंडनमध्ये स्थायिक झालेली डॉ. इरा गोडसे आणि तिचा मुलगा समीर, विमानातून अस्थिकलश घेऊन, मुंबईत येतात. सूडाच्या भावनेने पेटलेला, गांधीहत्येला जबाबदार असणाय नथुराम गोडसेंचा, त्यांच्या कुटुंबाशी असलेला संबंध शोधून काढण्याची शपथ घेत समीर फरार होतो. इरा आपल्या मुलाचा वेडीपिशी होऊन शोध घेते. तिचा हा शोध अखेरीस पोलंडला येऊन संपतो. या प्रवासात तिला ध्रुवीकरण झालेलं वेगळंच जग दिसतं. त्या जगात आपलं अस्तित्त्व टिकवून ठेवण्याच्या नावाखाली वर्ण, देवदेवता, मूर्तिपूजक, मूर्तिभंजक, गायी, डुकरं यांच्या नावाखाली एकमेकांशी संघर्ष करणारे लोक आढळतात. About the Author: मंजिरी गोखले जोशी या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या साईद बिझनेस स्कूलमधील विविधता आणि समावेशन विभाग प्रमुख आणि ग्लोबल टॅलेंट ट्रॅकच्या माजी सीईओ आहेत. मंजिरी त्यांच्या एलिफंट कनेक्ट या कंपनीद्वारे लोकांना नेतृत्व प्रशिक्षण देतात. त्यांची लिंक्डइनमार्फत, सर रिचर्ड ब्रेन्सन (व्हर्जिनचे संस्थापक) यांच्यासाठी योग्य उद्योजकांची निवड करणाऱ्या सल्लागार समितीमध्ये निवड करण्यात आली होती. त्यांनी वृद्ध लोकांसाठी माया केअर नावाची धर्मादाय संस्था सुरू केली. त्या संस्थेचे नेतृत्व करणाऱ्या दिव्यांगांच्या गटाला त्यांनी नेतृत्व प्रशिक्षणाचे धडे दिले. या कार्यासाठी त्यांना 'शी इन्स्पायर्स' तर्फे 'एजंट ऑफ चेंज' या इंग्लंडच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमधून 'मेजर प्रोग्राम मॅनजमेंट' या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे, तसेच ब्रिटिश उच्च आयोगाची 'शेवनिंग' शिष्यवृत्तीही मिळवली आहे. त्यांच्या (मॅकग्रा हिल, सेज) पुस्तकांचा उपयोग नेतृत्व प्रशिक्षणासाठी केला जातो. हे त्यांचे सहावे पुस्तक आहे. सौ. मंजिरी यांचा श्री. अभय जोशी यांच्याशी विवाह झाला आहे. त्यांना तन्वी व मही या दोन मुली आहेत.
-
Shivratna Shiva Kashid (शिवरत्न शिवा काशीद)
त्या अंधाऱ्या रात्रीला, कोठेतरी मोडून पडलेल्या त्या पालखीला, आजही जिवंत असलेल्या त्या वाटेला, पन्हाळ्याच्या बुरूज-कड्यांना आणि एके काळी सिद्दी जौहरची छावणी ज्या ठिकाणी होती त्या भूमीला, बस, यांनाच तो वीर आज स्मरणात असेल. त्याचा पराक्रम आजही त्यांच्या आठवणीत असेल. शिवाजीराजांवर धावून आलेला काळ त्याने आपल्या अंगावर झेलला. आपले बलिदान देऊन त्याने आपल्या स्वामीला पन्हाळ्यातून निसटण्यास मार्ग मोकळा करून दिला; पण त्याच्या धाडसाची आणि शूरत्वाची ही एवढीशी गोष्ट मुळीच नव्हती. तो जन्मलाच होता शिवाजी राजा म्हणून मरण्यासाठी ! इतिहासात नेऊन शिवा काशीद या विराच्या शौर्याचा आणि बलिदानाचा इतिहास उलगडणारी एकमेव कादंबरी!
-
Odh Ishanyechi - Bhag 2 (ओढ ईशान्येची - भाग २)
ज्योतीने हिमालय-सह्याद्री विविधांगांनी पाहिले, परंतु ती इशान्येच्या राज्यांमध्ये गेली नव्हती. तेव्हा तिने आसामच्या दिशेने झेप घेतली. ही गोष्ट सप्टेंबर २०११ ची. तेथे तिला वनवासी कल्याण आश्रमवाले भेटले आणि ती 'स्वयंसेवक' झाली. तिचे कार्य त्यांच्या प्रेरणेने सुरू झाले. तिने नागालँडच्या पेरीन जिल्ह्यांत तीन वर्षे तेंनिग येथील शाळेत शिकवले-मुलींचे होस्टेल सांभाळले. ती २०१५ मध्ये मणिपूरला गेली, २०१७ मध्ये अंदमानला तेथे तिने दोन वर्षे काढली. कोरोनानंतर २०२२ पासून ती जम्मीच्या वेगवेगळ्या वीस खेड्यांत मुलांना विशेषतः मुलींना शिकण्यास प्रवृत्त करत आहे. शिकवत आहेच. तेथेच कुटुंबांत राहत आहे. ज्योतीने या सर्व ठिकाणी काय केले नाही असेच विचारावे लागेल, इतके विविधांगी कार्य. बालविकास व कुटुंबस्वास्थ्य या क्षेत्रांत जे जे गरजेचे ते ते वेळोवेळी केले. बायांना संस्कार, हस्तकला व उद्योग, 'कुकिंग', शिवणकाम, भरतकाम, कृत्रिम दागदागिने, वस्त्रसुशोभन... असे सर्व प्रशिक्षण दिले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुलींना व स्त्रियांना आधुनिक जगण्यासाठी बळ दिले. ज्योती ज्या ज्या प्रदेशात या कामानिमित्ताने राहिली, तो प्रदेश अस्वस्थ- अशांत आहे, पण मौज अशी, की तेथील नित्याचे जनजीवन शांत, बरेचसे नियमित असते. ती मणिपूरमध्ये असताना तिने क्षोभ अनुभवला. तिच्या खोलीच्या खिडकीची काच भेदून बंदुकीची गोळी आत आली. ज्येष्ठांच्या सल्ल्याने ती तेथून निघाली आणि नागालँडमध्ये येऊन राहिली. त्या प्रत्येक ठिकाणचे तिचे स्नेहीजन अजून तिच्या संपर्कात असतात. विशेषतः ज्या मुलींच्या मनाने अधिक शिक्षणाची, पुढे जाण्याची उबारी घेतली त्या मुली भारतीय शहरांत पुढील शिक्षण घेण्यासाठी ज्योतीच्या मदतीने येत असतात. ज्योतीची या साहसातील निरीक्षणे प्रत्यक्षदर्शी असल्यामुळे बोलकी आहेत. तिने तिच्या आयुष्यातील या नव्या अध्यायाच्या पहिल्या टप्प्यावर 'ओढ ईशान्येची' असे पुस्तक लिहिले होते. ते त्या प्रदेशातील जीवनाचे बरेचसे सरळ निवेदन आहे. पण ज्योतीचा त्यानंतरचा तेथील काळ उग्र आहे; विशेषतः ३७० कलम रद्द केल्यानंतर सुप्तावस्थेतील हिंदू-मुस्लिम संघर्ष भारतात कृतक जाणवतो, परंतु ज्योतीच्या बोलण्यातून मात्र जम्मूमधील ते भय भेदक भासते !
-
A Life the The Shadows (ए लाइफ इन द शॅडोज)
ए लाइफ इन द शॅडोज वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याच्या जीवनातील स्मृतीचित्र काही झालं तरी आम्ही गुप्तचर अधिकारी संत असण्यापेक्षाही पातक करणारेच अधिक असतो. आम्ही आमच्या मित्रांशी बोलत असतोच, पण त्याहीपेक्षा शत्रूशी अधिक बोलत असतो. गुप्ततेच्या छायेत राहून दीर्घकाळ ‘आय. बी’मध्ये कार्यरत आणि पुढे ‘रॉ’च्या प्रमुखपदाची धुरा वाहणारे अमरजित सिंग दुलत हे सर्वश्रुत आहेत. त्यांचं हे स्मृतिचित्रपर पुस्तक म्हणजे, वाचकांसाठी अनेक अर्थाने वेगळा अनुभव होय. त्यांच्या वरील उद्धरणावरून ते लक्षात येईलच ! ए. एस. दुलत यांनी आपल्या वैयक्तिक जीवनातील काही निवडक गोष्टींसह देशात व परदेशात विविध ठिकाणी त्यांना आलेले अनुभव आणि नामांकित नेत्यांबाबतची त्यांची निरीक्षणं असं सर्वच मोठ्या रोचक पद्धतीने कथन केलं आहे. १९८०-९०च्या दशकात काश्मीरमध्ये जहालमतवादाचं राजकारण विकोपाला पोहोचलेलं असताना दुलत यांनी बजावलेली भूमिका महत्त्वाची ठरली आणि पुढे, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या काळात त्यांच्या सल्ल्याने काश्मीर समस्येबाबत वेगळी संवादाधारित नीती अवलंबली गेली. ‘काश्मीर मॅन’ दुलत यांनी कथन केलेले तेव्हाचे अनुभव, तसेच भारत-पाकिस्तान संबंध आणि कलम ३७० यांबाबतचं त्यांचं आगळं विश्लेषण हे सर्वच विचारप्रवृत्त करणारं असं आहे. ते म्हणतात, ‘साध्य-साधनाचा विचार करता, काश्मीरने मला शिकवलेल्या महत्त्वाच्या आणि क्रूरकठोर धड्यांपैकी पहिला धडा म्हणजे, उद्देश साध्य करण्यासाठी बंदूक हे नेमका उलट परिणाम निष्पन्न करणारं साधन ठरतं. एक आगळी जीवनकहाणी वाचण्याचा अनुभव… ए लाइफ इन द शॅडोज.
-
Jivanache Nave Marg (जीवनाचे नवे मार्ग)
ओरिसन स्वेट मार्डेन यांच्या 'द न्यू वेज ऑफ लाईफ' या इंग्रजी पुस्तकाचा भावानुवाद.