-
Deshodeshichi Khadyasanskriti (देशोदेशींची खाद्यसं
आज जग जवळ आलंय. त्यामुळे भाषा, संस्कृती यांची जशी देवाण-घेवाण होते, तशीच खाद्यसंस्कृतीचीही होते. प्रत्येक ठिकाणची खाद्यसंस्कृती त्या त्या ठिकाणचं हवामान, तिथली पिकं, समुद्रसान्निध्य, डोंगराळ प्रदेश अशा अनेक भौगोलिक गोष्टींवर अवलंबून असते. प्रत्येक देशाच्या वेगवेगळ्या भागांत ती वेगवेगळी असू शकते आणि ती बदलत राहते. अशा प्रकारची देवाण-घेवाण वर्षानुवर्षं होत आलेली आहे. तरीही काही परंपरागत पाककृती तशाच राहतात. इतकंच काय, पण बाहेरून आलेल्या पाककृती, तिथल्या स्थानिक चवीप्रमाणे आणि पद्धतीनुसार बदलतात आणि रूढ होतात. जगाच्या कानाकोपर्यातल्या अशाच विविध खाद्यपदार्थांचा खजिना म्हणजे वसुंधरा पर्वते यांचं ‘देशोदेशींची खाद्यसंस्कृती’ हे पुस्तक. प्रत्येक गृहिणीच्या संग्रही असायलाच हवं.
-
Vikalpa (विकल्प)
‘विकल्प’ या डॉ. अनघा केसकर यांच्या नव्या कथासंग्रहात विविध विषयांवरच्या नऊ कथा आहेत. हा ताजा कथासंग्रह त्यांच्या पूर्वीच्या कथांप्रमाणेच मानवी मनाच्या विविध छटा त्यांच्यातल्या बारीकसारीक कंगोर्यांसकट वाचकांसमोर ठेवतोे. आपल्याच आसपास वावरणारी, आपल्यासारखेच छोटे-मोठे प्रश्न नि समस्या हाताळणारी सामान्य माणसं वाचकाला या कथांमधून भेटतील. आणि म्हणूनच स्वतःच्या अनुभवविश्वाशी कथांतल्या व्यक्तिरेखांचं आणि घटनांचं साधर्म्य शोधण्याचा वाचक अजाणता प्रयत्न करतील. आयुष्याविषयी मुळातून विचार करायला उद्युक्त होतील.
-
Chandrabudhicha Blog (चंद्राबुडीचा ब्लॉग)
कथांचा घाट आणि विषय़ यांचे मोठया प्रमाणात नागरीकरण झालेलं आहे. पण कथांची बीजं छोट्या गावातही असतात. त्यातून विनोदी अंगानी जाणाऱ्या गावातल्या कथा लिहिण्यासाठी केवळ निरीक्षण आणि भाषाशैली पुरेशी नसते; ती भाषा जगलेली असावी लागते. अस्सल वऱ्हाडी भाषा जगणारे आणि ती समर्थपणे उतरवणारे लेखक ही ओळख अशोक मानकरांनी कमावलेली आहे. या कथा लिहिताना ग्रामीण भागावर नव्या तंत्रज्ञानाचा झालेला परिणाम, त्याचं चित्रण करण्यात मानकरांचा हातखंडा आहे. वऱ्हाडी ठेचा आवडणाऱ्यांना आणि त्याची चव न चाखलेल्यांनाही हा कथासंग्रह सारखाच आनंद देईल.
-
Ibru (इब्रु)
प्रियांका पाटील हिच्या कथांमधून भेटणार्या स्त्रिया (आणि पुरुषही) एकविसाव्या शतकातल्या जागतिक मानवी संबंधांच्या परिवर्तनशील पर्यावरणाच्या द्योतक आहेत. हिंदुस्थानात आणि मराठी साहित्यामध्ये तर या लेखिकेच्या काही कथा धक्कादायक व परंपरेला धीटपणे छेद देणार्या ठराव्यात अशाच! लिखाणाची वैशिष्ट्यं पाहता, प्रियांका पाटील ही उद्याची समर्थ कथाकार असू शकेल, हे मी बिनधास्तपणे नमूद करतो. - मधु मंगेश कर्णिक (ज्येष्ठ साहित्यिक) ... नवोदित कथाकारांच्या घोडदौडीत प्रियांका पाटीलचा ‘इब्रु’ हा कथासंग्रह एक वेगळी कथाशैली घेऊन येत आहे, जो माझ्यातल्या वाचकाला स्तब्ध तर करतोच, पण माझ्या आतल्या माणूसपणालादेखील काहीसा अस्वस्थ करून जातो. आपल्यातल्या हरवत चाललेल्या माणूसपणाला साद घालत राहतो. प्रियांका, तुझ्यातल्या व्यथा कथारूपांत येत असताना इतकंच म्हणावंसं वाटतं, की कागद नवा नसेलही, पण शाई नक्कीच नवी आहे! - गजेंद्र अहिरे (निर्माता-लेखक-दिग्दर्शक)
-
Devalacha Wagh Ani Kumaonche Anaki Kahi Narabhaksh
“नरभक्षक वाघाला मारण्याचं काम मनाला अतिशय समाधान देतं, यात शंकाच नाही. ‘जे काम कुणीतरी करणं अत्यावश्यक होतं आणि आपण ते केलं’ याचं ते समाधान असतं. आपण आपल्या बलाढ्य शत्रूला त्याच्याच परिसरात जाऊन मात दिल्याचं समाधान असतं; आणि या सगळ्याच्या पलीकडे, पुतळीसारख्या धाडसी मुलीला वावरण्यासाठी पृथ्वीवरचा लहानसा का होईना, एक कोपरा सुरक्षित केल्याचं समाधान असतं.” नरभक्षक वाघांची प्रचंड दहशत बसलेल्या, दुर्गम म्हणाव्या अशा पूर्वोत्तर राज्यांमध्ये कॉर्बेट यांनी केलेल्या वाघांच्या शिकारींमागची त्यांची ही प्रामाणिक भावना आहे. साहजिकच, या सगळ्या शिकारकथा थरारकच आहेत. मात्र वाघाची शिकार करणार्या या माणसाची माणसाइतकीच वाघाबाबतची संवेदनशीलता अनेकदा रोमांचित करते आणि कॉर्बेट यांचं वेगळेपणदेखील अधोरेखित करते. म्हणूनच ‘शिकार करण्याचा आनंद घेणारा शिकारी’ या घट्ट, निष्ठुर चौकटीत या माणसाला बंदिस्त करता येत नाही. उलट जंगलाचं जिवंतपण, सळसळतेपण आणि रांगडा पण नितळ कारभार हा माणूस ज्या तरलेतेने टिपतो, त्यातून ‘शिकारी’ या काहीशा आक्रमक चौकटीच्या कितीतरी योजनं तो पुढे जातो आणि माणसाच्या ‘विकसित’ म्हणवल्या जाणार्या मेंदूमुळे निर्माण झालेल्या अनेक वर्तन विसंगती, त्याच्या मनातल्या सूक्ष्मात रुतून बसलेलं मतलबी क्रौय यांना सहज, नर्मविनोदीपणे पृष्ठभागावर आणतो. त्यामुळेच ‘थरारक’ म्हणून या कथा आनंद देतातच, पण त्याच वेळी कॉर्बेटबरोबर त्या आपल्यालाही खोल जंगलात उतरायला भाग पाडतात आणि त्याहूनही पुढे जात ‘माणूस’ नावाच्या रसायनाबाबत अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित करतात.