-
Aalashipanach Manasshastra (आळशीपणाचं मानसशास्त्र)
वैमानिक व्हायचं असेल तर विमान कसं चालतं, हे आधी समजायला हवं. तसंच जगातील सगळ्यात शक्तिशाली गोष्ट म्हणजेच तुमचं मन. ते नियंत्रित करायचं असेल, तर त्याचं शास्त्र माहिती असायला हवं. • जगातील बहुतांश यशस्वी व्यक्तींसारखं तुम्हीही आठवड्याला १०० तास काम करू इच्छिता का ? • तुम्हाला सतत ऊर्जावान राहण्याची इच्छा आहे का? • कामात परिपूर्णता येण्याची तुम्ही वाट बघताय का? • तुम्ही कामात चालढकल करता का ? • तुम्ही नेहमीच आळस करता का ? • तुम्ही अजूनही ज्यावर काम करायला सुरुवात केली नाही अशी काही तुमची स्वप्नं आणि ध्येयं आहेत का ? असं असेल तर, हे पुस्तक तुमच्यासाठी जादूसारखं काम करेल. आधी लिहिल्या गेलेल्या गोष्टींवर लिहायला मला अजिबात आवडत नाही. हे पुस्तक तुम्हाला स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवण्याचं नवं सूत्र देईलच, आणि कामात चालढकल करणाऱ्यांसाठी तर हे पुस्तक वरदानच ठरेल!
-
Steal Like An Artist (स्टील लाइक ॲन आर्टिस्ट)
सर्जनशीलतेला मुक्त करा. १) कलाकारासारखी चोरी करा. २) तुम्ही कोण आहात है समजेपर्यंत सुरुवात करायला थांबू नका. ३) तुम्हाला वाचायला आवडेल असं पुस्तक लिहा. ४) तुमच्या हातांचा वापर करा. ५) दुय्यम प्रकल्प आणि छंद अत्यंत महत्त्वाचे असतात. ६) महत्त्वाचं गुपित : चांगलं काम करा आणि लौकांना ते सांगा. ७) आता भूगोल तुमच्यावर नियंत्रण गाजवू शकत नाही. ८) चांगले वागा. (जग है एक लहानसं गाव आहे.) ९) कंटाळवाणे व्हा. (काम पूर्ण करण्याचा हाच एक मार्ग आहे. १०) सर्जनशीलता म्हणजे वजाबाकी.
-
Svathashi Khote Bolane Thambava (स्वतःशी खोटे बोलणे थांबवा)
ही अशी कठोर सत्ये आहेत जी कोणीच तुम्हाला सांगणार नाही, पण ती ऐकण्याची, समजून घेण्याची नितांत गरज आहे. तुमच्या जीवनाच्या जोडीदाराच्या वर्तनाबद्दल स्पष्टीकरणे देणे, त्याच्या समर्थनार्थ सबबी सांगणे बंद करा. तुमच्या एखाद्या मित्राने तुमचा अपेक्षाभंग केला असेल, तुम्हाला निराश केले असेल, तर त्याकडे मित्र म्हणून दुर्लक्ष करू नका. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या उत्तम कामाविषयी उगीचच विनम्रता दाखवू नका, त्याविषयी चारचौघांत अभिमानाने बोलायला अजिबात कचरू नका, मागे-पुढे पाहू नका.
-
Keep Going (कीप गोइंग)
आता थांबू नका ! १) प्रत्येक दिवस नकारात्मक पुनरावृत्तीचा असतो. २) निर्भेळ आनंदाचं केंद्र बांधा. ३) नाम विसरून जा, क्रियापद करा. ४) भेटवस्तू बनवा. ५) ऑर्डिनरी + एक्स्ट्रा लक्ष -एक्स्ट्राऑर्डिनरी अर्थात असाधारण ६) कला राक्षसांचं शिरकाण करा. ७) तुम्ही तुमचं मत बदलू शकता. ८) जेव्हा शंका वाटेल, तेव्हा नीटनेटकं आवरा. ९ ) सैतानांना ताजी हवा आवडत नाही. १०) तुमची बाग तुम्ही फुलवा.
-
Ravan (रावण)
आपल्या भावांप्रति असलेल्या प्रेमाबाबत राम आणि रावण यांच्यात काय फरक होता ? शूर्पणखेने रावणाविरुद्ध कशा प्रकारे षड्यंत्र रचलं ? कोण होती रावणाची बहीण कुंभिनी ? बौद्ध परंपरेत रावणाविषयी कोणती समजूत आहे ? रामायणातील खलनायक लंकाधिपती रावण याच्याविषयी असे अनेक प्रश्न भारतीय जनमानसात उपस्थित होत राहतात. हे पुस्तक भारतातील सर्वांत विख्यात महाकाव्य रामायण आणि रावण यांचं विस्तृत विश्लेषण करत, रावणास सविस्तरपणे जाणून घेण्याची वाट मोकळी करतं. या ज्ञानी आणि महान राजाच्या कर्मांमुळे त्याचं राज्य आणि परिवार यांवर आपत्ती कोसळली. आधुनिक काळात पौराणिक गाथांच्या प्रासंगिकतेविषयी तर्कपूर्ण रीतीने लेखन करणारे देवदत्त पट्टनायक यांचं हे पुस्तक रावणाच्या पतनाची कारणं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतं. इथे रावण एक मनोवैज्ञानिक अवस्थेचं रूपकही आहे. रावणाला समजून घेताना आपण स्वतःला आणि आपल्या व इतर लोकांच्या आत दडलेल्या रावणाला समजून घेऊ शकतो.
-
Mahanayak Karna (महानायक कर्ण)
महाभारतातील एक महानायक म्हणजे कर्ण. त्याचं नाव घेताच मनामध्ये अनेक परस्पर विरोधी प्रतिमा उभ्या राहतात – इंद्राला आपली कवचकुंडलंही दान करणारा कर्ण कधी दानशूरतेच्या सर्वोच्च शिखरावर असतो, तर कधी तो दुर्योधनाच्या दरबारामध्ये द्रौपदी वस्त्रहरणाच्या घृणास्पद कृत्यात सहभागी होतो. या कादंबरीचा निवेदक कर्णाचा बालपणीचा मित्र आणि हितचिंतक आहे. सूतपुत्र असल्याने कर्णाला भोगावे लागलेले अपमान तसंच सर्वोत्तम धनुर्धर म्हणून झालेला त्याचा विकास यांचा तो साक्षीदार आहे. तो केवळ त्याच्या वीरत्वाचे, दानशूरतेचे प्रसंग कथन करत नाही, तर तो कर्णाचं पतन झाल्यामुळे मित्र म्हणून त्याला होणाऱ्या यातनाही झेलतो. पाप-पुण्य यांच्यात दुभंगलेलं जीवन कर्ण बेधडकपणे जगतो खरा, परंतु अंतिमतः तो मृत्युशय्येवर असताना पाप-पुण्याच्या पारड्यांतील कोणतं पारडं जास्त जड आहे हे ठरवण्याची जबाबदारी श्रीकृष्णावर येते. तेव्हा तो जे उत्तर देतो, ते चिंतनीय तर आहेच, परंतु कर्णाच्या जीवनाच्या कहाणीचा सर्वोच्च शिखरबिंदूही आहे.
-
Vivahsanstha,Kutumbsanstha Aani Streemukti (विवाहसंस्था, कुटुंबसंस्था आणि स्त्रीमुक्ती)
दिवाकर मोहनी ह्यांनी १९९२ ते २००१ या काळात ‘आजचा सुधारक’ ह्या मासिकात लिहिलेल्या लेखांचे हे संपादित संकलन आहे. ह्यात मोहनींनी विवाहसंस्था, कुटुंबसंस्था आणि स्त्रीमुक्ती ह्यांसंदर्भात अभिनव मांडणी केली आहे. विवाहसंस्था, कुटुंबसंस्था आणि स्त्रीमुक्ती ह्यांना परस्परांपासून वेगळे करताच येत नाही. किंबहुना, विवाहसंस्था आणि कुटुंबसंस्था ह्यांच्यातील जे नाते आतापर्यंत विविध विचारप्रणालींनी गृहीत धरले आहे, त्यालाच हे पुस्तक छेद देते. स्त्रियांच्या लैंगिक स्वातंत्र्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या व तेवढ्याच नाजूक-निषिद्ध विषयाला ह्या पुस्तकातून मोहनींनी हात घातला आहे. ह्या विचारांवर जी साधकबाधक चर्चा घडली, तिचाही ह्या पुस्तकात समावेश केलेला आहे. मोहनींची मांडणी रूढ विचारांना धक्का देणारी असली, तरी त्यावर विचारविमर्श करण्यास अजूनही जागा आहे. त्यामुळे सुजाण वाचकांनी आपापले पूर्वग्रह दूर ठेवून समाजहिताच्या दृष्टिकोनातून ह्या पुस्तकाचे वाचन, त्यावर चिंतन व मुक्त चर्चा करावी, असे आमचे त्यांना नम्र आवाहन आहे.
-
The Big Bull Of Dalal Street (द बिग बुल ऑफ दलाल स्ट्रीट)
बाजाराचा आदर करा. मोकळे मन ठेवा. काय भाग घ्यायचा हे जाणून घ्या. तोटा कधी घ्यायचा हे जाणून घ्या. जबाबदार रहा,' असे भारतातील प्रतिष्ठित शेअर बाजार गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला अनेकदा म्हणत असत. 'बिग बुल' म्हणून विख्यात असलेल्या राकेश झुनझुनवाला यांच्यावर माणूस आणि गुंतवणूकदार अशा दोन्ही बाबतींबाबत हे पुस्तक प्रकाश टाकतं. हे पुस्तक म्हणजे, त्यांचं चरित्र नसून त्यांना लखलाभ ठरणाऱ्या गुंतवणुकीचं ते विस्तारानं विवेचन करतं. दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे, शेअर बाजारातल्या टाळता येण्याजोग्या चुका, कर्ज घेऊन केलेली गुंतवणूक अशा आणि इतरही मुद्द्यांचा समावेश आहे.
-
Mithakanpasun Vidnyanaparyant (मिथकांपासून विज्ञानापर्यंत)
विज्ञान आणि धर्माच्या मध्ये ‘वास्तविकतेची’ सीमारेषा विज्ञान आणि धर्म हे एकमेकांचे विरोधक आहेत की एकमेकांना पूरक ? एक अत्यंत धार्मिक व्यक्ती, चांगली वैज्ञानिक असू शकते का? विज्ञान हे लोकांना धर्मभ्रष्ट करतं का? एखाद्या अत्यंत धार्मिक समाजात, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढू शकतो का ? आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक असलेल्या, कवीमनाच्या गौहर रझा ह्यांच्यासमोरसुद्धा हे प्रश्न अनेकदा उपस्थित झाले. कधी कुंभमेळ्याच्या गर्दीत, तर कधी विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारताना. ह्यांपैकी काही प्रश्न आपल्याला विज्ञानाकडे आणि काही धर्माकडे घेऊन जातात. ह्या प्रश्नांची उत्तरं एका कवीमनाच्या वैज्ञानिकाने शोधायला सुरुवात केली, तेव्हा मिथकं आणि कहाण्यांबरोबरच धर्म, तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि विज्ञानाचे अनेक पैलू पुढे आले. हे पुस्तक ब्रह्मांडाच्या आणि जीवसृष्टीच्या विकासाची बदलती कहाणी सांगताना ‘विज्ञाना’ची व्याख्या करण्याचा एक प्रयत्न आहे. इतिहासाची पानं उलटत-उलटत यात सांगितलं गेलंय, की विज्ञान आणि धर्म ह्यांच्यामध्ये ‘वास्तविकते’ची सीमारेषा आखणं आवश्यक आहे. ही गोष्टसुद्धा पावला-पावलांवर स्पष्ट होत जाते, की तार्किक दृष्टी, वैज्ञानिक पद्धती आणि मानवी संवेदना या परस्परपूरकच आहेत.
-
Ramrao Kahani Bhartachya Sheti Sankatachi (रामराव कहाणी भारताच्या शेती संकटाची)
शेतकरी आत्महत्यांसाठी ओळखल्या जाणार्या महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील कापूस उत्पादक रामराव पंचलेनीवार यांनी २०१४ मधील एका सकाळी दोन बाटल्या कीटकनाशक प्राशन केले. जर आत्मघाताचा त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला असता तर शेतकरी आत्महत्येच्या आकड्यांमधील ( आता अप्रकाशित ) इतरांसारख्या एक आकडा बनून राहिले असते. कारण भारतात प्रत्येक तीस मिनिटाला एक शेतकरी आपले प्राण गमावतो. केवळ महाराष्ट्रातच गेल्या दोन दशकांत अशा ६० हजार आत्महत्या झालेल्या आहेत. पण चमत्कार व्हावा तसे रामराव यातून बचावले. रामरावांच्या माध्यमातून त्यांनी शेती संकट सोप्या शब्दांत मांडले आहे. या माध्यमातून त्यांनी भारतीय शेतकर्याचे दैनंदिन आयुष्य आणि त्यातील आव्हाने जशीच्या तशी वाचकांसमोर उलगडली आहेत. त्यांचा संघर्ष आणि अनेक बाबतींत येणारे अपयश, दलदलित फसावे अशा समस्यांना त्याचे तोंड देणे आणि या सगळ्याचा शेवट करण्यासाठी त्याला टोकाचा निर्णय घ्यावा लागणे हा सगळा पटच वाचकांसमोर उभा राहतो.
-
Osarlele Vadal (ओसरलेले वादळ)
आपल्या मनोविश्वात अशी गर्दी करणाऱ्या सगळ्याच माणसांच्या स्मरणखुणा राहत नाहीत. काहींची मिथकेच असतात. काहींचे फक्त गूढ, तर काहींचा शतकानुशतके प्रभाव. ज्यांनी ‘ज्ञानेश्वरी’ वाचलेली नाही त्यांच्यावरही ज्ञानेश्वरांचा अप्रत्यक्ष संस्कार होतो. ज्यांनी शेक्सपिअरची नाटके वाचलेली नाहीत, त्यांनाही शेक्सपिअरबद्दल कुतूहल असते. ज्यांनी कार्ल मार्क्स किंवा सिग्मंड फ्रॉइड यांच्या विचारांचा अभ्यास केलेला नाही, त्यांनाही त्यांचा प्रभाव असल्याचे भासत राहते. ज्यांना आपण प्रत्यक्ष पाहतो वा ज्यांच्या प्रभावाखाली थेट येतो त्यांचे अनेक कंगोरे आपल्याला कळतात. काहींच्या मर्यादा लक्षात येतात, तर काहींचे अथांगपण जाणवते. पत्रकारांवर एक सांस्कृतिक जबाबदारी असते. समाजावर प्रभाव टाकणाऱ्या अशा काही माणसांची भेट वाचकांबरोबर घडवून आणणे हे त्यांचे एक कर्तव्य असते. ही भेट कधी मृत्युलेखाद्वारे घडवायची असते, तर कधी जन्मशताब्दीच्या निमित्ताने. कधी एखादा पुरस्कार मिळाला म्हणून तर कधी त्यांच्या साहित्यकृतीचा गौरव होतो म्हणून. या माणसांनी आपल्या मनात वादळे उत्पन्न केलेली असतात. त्या वादळांनी आपल्या मनात झालेली उलथापालथ आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देते. कधी आपल्या मनात नाही, पण समाजात त्यांनी घडवून आणलेली उलथापालथ इतिहास घडवून जाते. ती वादळे ओसरल्यानंतर आपल्याला त्यांचा प्रभाव वेगळ्या प्रकारे जाणवू लागतो. आपल्या मनात वा समाजात ते झंझावात चालू असतात, तेव्हा त्यांचा वेग व व्याप्ती लक्षात येत नाही. आपण स्वतःला सावरून घेत असतो म्हणून किंवा उन्मळून पडतो म्हणून. या पुस्तकात अशा वादळी माणसांवर मी लिहिलेले लेख-अग्रलेख संग्रहित केले आहेत. ते ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये मी संपादक असताना लिहिलेले आहेत. काही अग्रलेख मी ‘लोकमत’चा संपादक असताना लिहिलेले आहेत. वृत्तपत्रीय लेखनाला दोन मर्यादा असतात. पहिली जागेची आणि दुसरी वेळेची. दीड-दोन तासांत आणि मर्यादित शब्दांत त्या माणसांची ओळख वाचकाला करून द्यायची असते. ती ओळख अर्थातच पूर्ण नसते. आपण पूर्णपणे तसे कुणालाच ओळखत नाही आणि तरीही अशी माणसे आपल्या मनाचा व जीवनाचा ठाव घेतात. तो ठाव वाचकांपर्यंत नेण्याचा हा एक प्रयत्न.
-
Vithobha Missing In Pandhurpar (विठोबा मिसिंग इन पंढरपूर)
विनायक होगाडे हा आधुनिक जाणिवेतून परंपरेचा नवा अन्वयार्थ लावत आजचा खारवटलेला काळ पकडू पाहणारा तरुण लेखक आहे, याचा प्रत्यय ‘विठोबा मिसिंग इन पंढरपूर’ या त्याच्या कादंबरीतून येत राहतो. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानला जाणारा विठ्ठल एके दिवशी अनपेक्षितपणे गायब होतो आणि सर्वत्र एकच गहजब उडतो, या भन्नाट कल्पनेचं बोट पकडून विनायक होगाडेने या फॅन्टसीसदृश कादंबरीची रचना केली आहे. काळाची सरमिसळ करत एकाच वेळी केलेले ऐतिहासिक आणि आधुनिक काळातील व्यक्तिरेखांचे कल्पक उपयोजन, तसेच ओघवत्या शैलीत सहजपणे येणारा विठ्ठल, पंढरपूर यांसह वारकरी संतांचा इतिहास, त्यांविषयी लोकमानसात रुजलेली मिथके, कहाण्या, ही या कादंबरीचे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणता येईल. या अद्भुत कथनाच्या माध्यमातून त्याने मराठी समाज आणि संस्कृतीच्या लाजिरवाण्या भूतकाळाची आणि त्याचबरोबर सडत चाललेल्या वर्तमानाची सालपटं काढून आपल्यासमोर मांडली आहेत. हे जितकं धाडसाचं आहे, तितकंच ते समकालाची चिकित्सा करण्याच्या दृष्टीने आवश्यकही आहे. संत विचारांचा आजच्या काळाने केलेला पराभव, त्यातून जाणवणारे नैतिक मूल्यांचे स्खलन आणि संवेदना जिवंत असलेल्या एखाद्या विठोबाची यामुळे होणारी घुसमट, हे सगळे वाचकाला विलक्षण अस्वस्थ करते. आपल्या लेखकत्वाचे भान असलेल्या आणि संत परंपरेतून गवसलेल्या शब्दांचे व मूल्यांचे सामर्थ्य जाणून असलेल्या या लेखकाची ही कादंबरी मराठी कादंबरीच्या वाटचालीत एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, हे निश्चित. - प्रवीण दशरथ बांदेकर.
-
Andharyug Bhartatil British Rajvat (अंधारयुग भारतातील ब्रिटिश राजवट)
लोकप्रिय लेखक शशी थरूर यांनी या स्फोटक पुस्तकामध्ये ब्रिटिश राजवट भारताकरिता किती विनाशकारी होती हे तीक्ष्ण युक्तिवाद, अचूक संशोधन, आणि ते ज्याकरिता प्रसिद्ध आहेत ते बुद्धिचातुर्य यांच्या साहाय्याने उलगडून दाखवले आहे. देशातील साधनसंपत्ती ब्रिटनमध्ये नेण्यापासून ते भारतीय वस्त्रोद्योग, लोखंड उद्योग आणि जहाजबांधणी उद्योगाचा विनाश, आणि कृषी उद्योगातील नकारात्मक परिवर्तनापर्यंत, वसाहतकारांनी जितक्या विविध मार्गांनी भारताचे शोषण केले त्याची तपासणी करण्याबरोबरच, त्यांनी ब्रिटिश राजवट भारतासाठी कशी चांगली होती हे मांडणाऱ्या ब्रिटिश साम्राज्याच्या समर्थकांचे युक्तिवादही हाणून पाडले आहेत. ब्रिटिश राजवटीने भारताला लोकशाही आणि राजकीय स्वातंत्र्य, कायद्याचे राज्य आणि रेल्वे या गोष्टी दिल्या आणि म्हणून ती भारतासाठी फायदेशीर होती, या मुद्द्यांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. जे थोडे खरोखरच फायदे म्हणता येतील इंग्रजी भाषा, चहा आणि क्रिकेट त्यांचा प्रत्यक्षात भारतीयांना फायदा होणे अभिप्रेतच नव्हते, तर ते मुख्यतः वसाहतकारांच्या हितासाठीच होते, हे सांगायला ते विसरत नाहीत. अत्यंत प्रभावीपणे केलेली मांडणी आणि उत्कटतेने केलेला युक्तिवाद यामुळे ‘अॅन एरा ऑफ डार्कनेस’ हे पुस्तक भारतीय इतिहासाच्या सर्वांत वादग्रस्त कालखंडापैकी एक असलेल्या ब्रिटिश कालखंडाबद्दलचे अनेक चुकीचे समज दूर करेल यात शंका नाही.
-
House Of Chhatrapati Shivaji (हाऊस ऑफ छत्रपती शिवाजी)
छत्रपती शिवाजी महाराज फक्त धार्मिक किंवा निव्वळ लुटारू अगर हल्लेखोरही नव्हते, कारण कोणताही धार्मिक, लुटारू किंवा हल्लेखोर एका सार्वभौम राज्याची स्थापना करू शकत नाही. हे फक्त एक मुरब्बी आणि मुत्सद्दी राजकारणीच करू शकतो. त्यांनी केलेल्या लढाया आणि डावपेच यांचा परिणाम म्हणून त्यांनी सार्वभौम, स्वतंत्र हिंदू राज्याची स्थापना केली आणि ते स्वतः सार्वभौम राजा झाले- ते छत्रपती झाले. म्हणूनच प्राचीन ग्रीक लोक ज्याला ‘पुरुषांमधील राजा’ म्हणजे अलौकिक बुद्धिमत्तेची दैवी देणगी लाभलेला पुरुषोत्तम राजा म्हणत, तसे शिवाजी महाराज होते, याविषयी शंका घेण्यास मुळीच जागा नाही.
-
Mumbai : Ek Dantkatha (मुंबई : एक दंतकथा)
प्रदर्शनीयता आणि भग्नावशेष यांना सामावून घेणारी मुंबई, ही खऱ्या अर्थाने बहुसांस्कृतिक महानगरी आहे. भारताच्या कानाकोपऱ्यांतून आणि विविध देशांतून आलेले, वेगवेगळ्या वांशिक, भाषिक आणि धार्मिक पार्श्वभूमीचे लाखो लोक, त्यांच्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षा घेऊन या शहराच्या किनाऱ्यावर येऊन विसावले आहेत. ‘मुंबई : एक दंतकथा’ हे पुस्तक येथील रहिवाशांच्या, पत्रकारांच्या, नगररचनाकारांच्या, लेखकांच्या, कलाकारांच्या, चित्रपट-निर्मात्यांच्या आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनांतून या दंतकथा बनलेल्या शहरातील पुराणकथेसमान भासणाऱ्या जीवनाचा शोध घेते.
-
Karjamukta Vha! (कर्जमुक्त व्हा!)
कर्ज : संधी की संकट? तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहात का? कर्ज तुम्हाला तुमच्या स्वप्नांकडे नेत आहे की तणावाच्या गर्तेत ढकलत आहे? जर हे प्रश्न तुम्हाला सतावत असतील, तर ‘कर्जमुक्त व्हा!’ हे पुस्तक तुमच्यासाठी आहे! या पुस्तकात कर्ज लवकर फेडून आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचे सुलभ, व्यावहारिक आणि परिणामकारक मार्ग सहज भाषेत आणि प्रेरणादायी उदाहरणांसह दिले आहेत. कर्ज स्वतः वाईट नसते — त्याचा उद्देश, वापर आणि नियोजनच ठरवते की ते तुम्हाला प्रगतीकडे नेईल की पतनाकडे! आजच ‘कर्जमुक्त व्हा!’ वाचा आणि कर्जाच्या जाळ्यातून मुक्त होऊन तुमच्या आर्थिक भविष्याला नवा आकार द्या. संपत्ती निर्माण करा, आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने पहिले पाऊल टाका! समाधानाने भरलेले चिंतामुक्त जीवन जगा!
-
Lords Of Earth And Sea (लॉर्डस ऑफ द अर्थ ॲण्ड सी)
चोळांचं महान साम्राज्य अनपेक्षितरीत्या निर्माण झालेलं होतं. कावेरीच्या गाळाच्या मैदानात इ.स. सुमारे ८५०च्या आसपास अचानक त्याची उत्पत्ती झाली, तोपर्यंत शतकानुशतकं या प्रदेशात स्वयंशासित ग्रामपंचायतीच होत्या. इथूनच चोळांनी एक विशाल साम्राज्य स्थापन केलं. दक्षिण भारतातील किनारपट्टीच्या प्रदेशातील साम्राज्य हे भारतीय उपखंडातील सर्वांत प्रवळ सत्ता बनण्याची ही पहिली आणि एकमेव वेळ होती; हे स्थान तोवर सहसा दख्खन किंवा उत्तर भारतातील साम्राज्यांनीच राखलेलं होतं, चोळ राजे जितके सृजनशील आणि कल्पनाशील होते तितकेच ते अनपेक्षित कृती करणारेही होते. त्यांनी इजिप्तच्या पिरॅमिडखालोखाल पृथ्वीवरील सर्वात उंच, स्वतंत्रपणे उभी असलेली भव्य मंदिर बांधली. चोळ राण्यांनी नटराजासारखे देव, आणि देवासमोर तमिळ कवितांचे गायन असे उपासनेचे नवीन प्रकार लोकप्रिय केले. त्याचबरोचर, चोळ हे आश्चर्यकारकपणे धाडसी होते. त्यांनी केवळ शक्तिशाली दख्खन आणि उत्तर भारतावरच नव्हे; तर आग्नेय आशिया आणि श्रीलंकेवरही हल्ले केले. हे राजघराणं इतके प्रभावशाली आणि आज इतकं लोकप्रिय असूनही त्याची खरी ऐतिहासिक कामगिरी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत विसरली गेली हेही एक आश्चर्यच कारण त्या सगळ्या गोष्टी मिथक आणि दंतकथेत विरून गेल्या. या पुस्तकात पुरस्कार विजेते इतिहासकार अनिरुद्ध कनिसेट्टी चोळांच्या या जगाला जिवंत करतात. केवळ राजे आणि राण्या, सेनापती आणि ‘सेवा लवाजम्या तल्या खिया यांच्याविषयी लेखक आपल्याला सांगत नाही, तर सर्वसामान्य म्हणजे लहान लोकांच्या कथादेखील सांगतात, ज्यांची आयुष्यं मोठमोठ्या घटनांमुळे हेलकावे खायची तर कधी उध्वस्त व्हायची. तमिळ किनाऱ्यावरून आग्नेय आशिया आणि चीनकडे जाणाऱ्या व्यापारी जहाजांवरचं जीवन कसं असायचं? मंदिरांमध्ये भक्तांना आणि युद्धाच्या वेळी सैनिकांना कोणत्या प्रकारचं जेवण दिलं जायचं? रागाच्या भरात आपल्या भावाची हत्या करणाऱ्या भूमिहीन शेतकऱ्याचं पुढे काय झालं? एक श्रीमंत घराण्यातली खी डोक्यावर लिंबू ठेवून सती का गेली? हजारो शिलालेख आणि शेकडो दुय्यम स्त्रोतांवर आधारित, सखोल संशोधन केलेलं हे पुस्तका केवळ राजे आणि राण्यांच्या चमकदार कथा आपल्याला सांगत नाही, तर ते आपल्याला हजारेक वर्षांपूर्वीच्या शेतकरी वस्त्यांमध्ये घेऊन जाणाऱ्या प्रवेशद्वाराचंही काम करतं. या पुस्तकात कनिमेट्टी तथ्य आणि काल्पनिक गोष्टी यांना वेगळं करण्याचं महत्त्वाचं काम करतात, आणि आपल्याला मानवी इतिहासातील एक असामान्य अशी कहाणी सांगतात.
-
Tine Gilile Suryashi (तिने गिळिले सूर्याशी)
लक्ष्मी मुडेश्वर-पुरी लिखित ‘तिने गिळिले सूर्याशी’ ही कादंबरी म्हणजे प्रीती, शौर्य आणि भारतीय स्वातंत्र्यलढा यांचा तीन पिढ्यांतील स्त्रियांच्या विशेषतः धाडसी व संस्मरणीय तरुण नायिका मालतीच्या नजरेतून घेतलेला अद्भुत शोध आहे. ही कादंबरी आधुनिक भारतीय इतिहासाच्या कोलाहलपूर्ण काळातील उत्साहवर्धक आणि निराशाजनक स्पंदनांचा वेध घेते. निर्भयता आणि अटळ निर्धार या गुणांच्या जोरावर मालती तत्कालीन समाजात प्रचलित असलेल्या, स्त्रियांना जखडून ठेवणाऱ्या, पितृसत्ताक चालीरीतींना झुगारून तिला दडपून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना प्रखर विरोध करते उत्कृष्टपणे सांगितलेली, कल्पनारम्य व लक्षवेधी असणारी ‘तिने गिळिले सूर्याशी’ ही कादंबरी अस्सल व रोमांचक आहे. खेरीज मागील काही वर्षात पदार्पणातच अत्यंत संस्मरणीय ठरलेल्या कादंबऱ्यापैकी ती एक आहे.
-
Yuval Noah Harari Unstoppable Us Vol-2 (युवाल नोआ हरारी अनस्टापेबल अस खंड-२
"लाखो लोक काही थोडक्या नेत्यांचं म्हणणं का ऐकतात ? आपल्यातले काही जणच जास्त श्रीमंत का असतात? १० हजार वर्षांपूर्वी, काहीतरी विचित्र गोष्ट घडली आणि सारं काही बदलून गेलं…. अनेक जण म्हणतात- हे जग न्याय्य नाही, पण ते न्याय्य का नाही ? हे शोधण्यासाठी, राजे आणि राज्यांच्या, योद्धे आणि पुजाऱ्यांच्या, धर्मांच्या आणि अगदी पहिल्यावहिल्या शेतकऱ्यांच्या इतिहासात डोकावलं पाहिजे. आपण कुत्रे, कोंबड्या आणि गाई यांसारख्या प्राण्यांना नियंत्रित करण्यास कसे शिकलो, याची ही खरीखुरी गोष्ट आहे…. आणि काही मूठभर लोक सगळ्यांना नियंत्रणात ठेवायला कसे शिकले याचीही ही गोष्ट आहे. हे पुस्तक संपूर्ण रंगीत चित्रांच्या मदतीने तुमच्यासमोर मानवी इतिहासातले महत्त्वाचे टप्पे उलगडून दाखवतं"
-
Digital Minimalism (डिजिटल मिनिमलिझम)
मागील दोन दशकांत तंत्रज्ञानाने आणि विशेषतः डिजिटल तंत्रज्ञानाने आपले संपूर्ण जगच व्यापले आहे. ते इतके की आपण सारेच त्याच्या अक्षरशः आहारी गेलो आहोत. तंत्रज्ञान आपल्या सोयीसाठी आहे की आपण तंत्रज्ञानासाठी आहोत? असा प्रश्न आता प्रत्येकाला पडायलाच हवा ! डिजिटल उपकरणे, साधने आणि समाज माध्यमांनी मानवी जीवन-संबंधांचा, मनांचा ताणाबाणा पार विस्कटून टाकला आहे. या वातावरणात शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या नव्या प्रश्नांनी डोके वर काढावे, यात नवल ते काय. कॉम्प्युटर्स, लॅपटॉप, मोबाईल, टॅब यांसारख्या उपकरणांच्या माध्यमातून सर्वप्रथम समाज माध्यमांचे बोट धरणाऱ्या अमेरिका किंवा युरोपच्या पाश्चात्त्य जगताला या समस्येचे चटके थोडे अगोदर जाणवले आहेत. लेखक कॅल न्यूपोर्ट यांनी ते अतिशय प्रभावीपणे या पुस्तकात मांडले
-
KGB (केजीबी)
विसाव्या शतकातील बहुतांश काळ, सोव्हिएत युनियन हे कम्युनिस्ट पक्ष आणि केजीबीसारख्या गुप्तचर सेवांद्वारे संचालित गुप्ततेच्या आणि दडपशाहीच्या लोखंडी पडद्यामागे झाकलेले होते. परदेशातील लोक केजीबीला बाहेरच्या देशांमध्ये पाळत ठेवणारी एक गुप्तहेर संस्था म्हणून ओळखत होते, परंतु सोव्हिएत सीमेच्या आत असलेल्यांनी त्याची व्यापक अशी दडपशाही अनुभवली होती ज्यापासून बाहेरील जग अनभिज्ञ होते.
-
CIA (सीआयए)
अमेरिकन गुप्तचर संस्थांमधील एक महत्त्वाचा घटक असलेल्या सीआयएने २०व्या आणि २१व्या शतकांतील आंतरराष्ट्रीय राजकारणात काही अतिमहत्त्वाच्या घटनांमध्ये बहुतांश वेळा पडद्याआड राहून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. दुसऱ्या महायुद्धात नाझी संघटनेत घुसखोरी करण्यापासून ते शीतयुद्धादरम्यान क्युबाच्या फिडेल कॅस्ट्रो राजवटीला कमकुवत करण्यापर्यंत ही संस्था त्या वेळच्या आवश्यकतेनुसार राजकीय मुत्सद्दीपणा तसेच कुटिल कारस्थानांचा अवलंब करीत कार्यरत होती. सीआयएबद्दलची सार्वजनिक धारणा खलनायकी ते सनसनाटीपूर्ण कारवाया करणारी गुप्तहेर संस्था अशी राहीली आहे. शिवाय, या समजुतीत हॉलीवुड चित्रपटांनी आणखी भरच टाकली आहे.
-
FBI (एफबीआय)
अमेरिकेच्या इतिहासात ‘फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ला एफबीआयला – एक विशेष स्थान आहे. गुन्हेगारांना शोधणे, हेरगिरीचे प्रयत्न उलथवून लावणे, दहशतवादाशी लढणे अशा गोष्टी आंतरराष्ट्रीय पातळीवर करणे आणि त्यात सन्माननीय आणि संस्मरणीय असे यश मिळवणे, यामुळे एफबीआय ही कोणालाही धाक वाटावा अशी एक प्रभावी शक्तीच आहे. अमेरिकेच्या कायदापालनाच्या इतिहासात अनेक यशोगाथांच्या स्वरूपात एफबीआयने गेली शंभर वर्षे स्वतःचे असे एक अलौकिक तेजोवलय निर्माण केले आहे. जरा खोलात शिरून, या शक्तीचे, तेजोवलयाचे खरे अंतरंग कसे आहे हे दाखवणे हा या पुस्तकलेखनाचा हेतू आहे.
-
Mossad (मोसाद)
जगभरात सतत भूराजकीय घडमोडी घडत असतात. त्यात सर्वच राष्ट्रांचा मुत्सद्देगिरीच्या नाजूक धाग्यांवर कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे नाच सुरू असतो. मात्र, या जगाचा डोळा चुकवून काम करणारे एक गोपनीय जग अस्तित्वात आहे. हे आहे इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेचे विलक्षण जग! या पुस्तकात मोसाद गुप्तचर संस्थेचा इतिहास तर समजेलच; त्याचबरोबर ही संस्था आपल्या देशाच्या छत्रछायेखाली गोपनीय पद्धतीने कसे काम करते आणि आपल्या अत्यंत जोखमीच्या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे या संस्थेने विविध देशांवर प्रभाव कसा टाकला, याची माहितीही मिळेल.