-
Sattak (सट्टक)
"सट्टक हा कवी भालचंद्र नेमाडे यांचा काव्यसंग्रह, देखणी (मेलडी आणि देखणी एकत्रित - 1991 (प. आ.)) नंतर तब्बल पस्तिसेक वर्षांच्या अंतराने प्रकाशित होत आहे. कवीच्या उत्तुंग प्रतिभेची साक्ष देणारा हा संग्रह आहे. आधुनिकीकरणाच्या माऱ्याखाली अधोगतीला लागलेल्या स्त्रिया, शेतकरी, कष्टकरी, दुय्यम पातळीवर ढकललेला शोषित जीव हे घटक या कवितेच्या केंद्रभागी आहेत. वास्तविक सट्टक म्हणजे आजच्या मूल्यऱ्हास झालेल्या जगण्यावर ओढलेला प्रखर आसूड आहे. सट्टक मधील कविता चक्रधर, तुकाराम, मुक्ताबाई, जनाई, बहिणाबाई, महात्मा फुले, मर्ढेकर यांच्या गद्य व पद्य परंपरेशी थेट नाते सांगते. सट्टक मधील ‘सरवा’, ‘अस्तुरीमृग’ आणि ‘मृत्यू’ या तीनही विभागांतील प्रत्येक कविता चिरंतन शिल्पासारखी आहे. या सर्व शिल्पांच्या अंतरंगात कधी ठिणग्या तर कधी ज्वाळा धगधगताना आढळतात. कवी आपल्या जगण्याचे कथन कवितेतून मांडत भोवतालच्या परिवेषाचा उभा आडवा छेद कसा घेतो याचे साक्षात रूप म्हणजे सट्टक. ‘घराघरातून’ या पहिल्या कवितेपासून ते ‘स्व’ ह्या अखेरच्या दीर्घ कवितेपर्यंत अस्वस्थ व सळसळते, करुणेने भरलेले कविहृदय प्रत्ययास येते. कवी भालचंद्र नेमाडे यांच्या प्रतिभाशक्तीचा संचार तळागाळापासून ते प्रस्थापित, उच्चभ्रू व्यवस्थेला, कधी पित्तृसत्ताक तर कधी मातृसत्तात्मकतेला कसा भेदत जातो याची येणारी प्रचीती सट्टक मध्ये अधिक तीव्र स्वरूपाची आहे. सत्तात्मक संबंधांतून आकारलेल्या शोषितांच्या वेदनांची कैफियत हा सट्टकचा केंद्रबिंदू असून कवीच्या संचित मनशक्तीतून, अनुभूतींतून, वास्तवाच्या प्रामाण्यातून ह्या कवितांचा आकृतिबंध साकारलेला दिसतो. ‘सरवा’, ‘अस्तुरीमृग’ आणि ‘मृत्यू’ हे तिन्ही विभाग चढत्या क्रमाने वाचकाच्या मेंदूचा कब्जा घेतात. एकूण सट्टक कृषी परंपरेतील जगण्याचा तळ शोधत, भारतीय सामाजिकतेचा, सांस्कृतिकतेचा नवा परीघ अधोरेखित करणारा काव्यसंग्रह आहे. जगण्याच्या संचिताचा चटका लावणारा ‘सरवा’ वेचत स्त्री-पुरुषांतील ठराविक नात्यापलीकडची शुद्ध मोकळीक, माणुसकीची नाती ‘अस्तुरीमृग’ मध्ये साकारतात. प्रस्थापित व्यवस्थेत आकारलेल्या स्त्री-जीवनाची काळजाला घरे पाडणारी वास्तव चित्रे वाचकाला सुन्न करून सोडतात. ‘अस्तुरीमृग’मधील कविता म्हणजे वेदनेचा दुखरा स्वर आहे. तर ‘मृत्यू’ या शेवटच्या विभागात कवी भालचंद्र नेमाडे यांचे श्रेष्ठ कवित्व गूढ उत्कटतेची परिसीमा ओलांडते. सट्टकचा आशय जसा अनवट आहे तसाच आकृतिबंधसुद्धा कोणत्याही परंपरेत बसवता न येणारा स्व-तंत्र आहे. लोकसंगीताची लय अंगात भिनवून ही कविता मौखिक परंपरेला स्वतःशी जोडून घेत संत परंपरेला आपलेसे करून स्वतःचे नवे प्रारूप घडवते. सट्टक हा काव्यसंग्रह मराठी कवितेला नवा आयाम प्राप्त करून देतो हे विशेषत्वाने नोंदवले पाहिजे. — शोभा नाईक "
-
Tikasvayamvara (टीकास्वयंवर)
डॉ. भालचंद्र नेमाडे यांना १९९१चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याचे समजले. टीकास्वयंवर हा समीक्षालेखांचा ग्रंथ १९९० साली प्रसिद्ध झाला. त्यातील लेखांवरून व मुलाखतीवरून डॉ. भालचंद्र नेमाडे यांची साहित्यविषयक भूमिका नेमकेपणाने समजण्यास मदत होते. त्यांची मते किती मूलगामी आणि प्रक्षोभक असू शकतात, याची आता मराठी वाचकांना चांगली कल्पना आलेली आहे... आज त्यांचे टीकालेखन महत्त्वाचे काम करीत आहे. एकूण डॉ. भालचंद्र नेमाडे साहित्य व्यवहाराकडे अत्यंत गांभीर्याने पाहणारे समीक्षक आहेत. त्यांचे विचार प्रक्षोभक, बंडखोर, प्रस्थापितांचे वेळोवेळी वस्त्रहरण करणारे असले तरी आजच्या वाङ्मयीन संस्कृतीचे कुंठितपण घालविण्यासाठी आणि तिला योम्य दिशा कोणती व का हे समजावून देण्यासाठी त्यांचा फार मोठा उपयोग होणार आहे, यात शंका नाही. त्यांना अभिप्रेत असलेली भाषिक कृती डॉ. नेमाडे आपल्या कादंबऱ्यांतूनच नव्हे तर आपल्या समीक्षाविचारांतून जबाबदारीने व चोखपणे करीत आहेत. - म. द. हातकणंगलेकर रविवार सकाळ, २२ डिसेंबर १९९१ रा. श्री. जोग स्मृति पुरस्कार १९९० ह. श्री. शेणोलीकर पुरस्कार १९९० साहित्य अकादमी पुरस्कार १९९१
-
Hindu (हिंदू)
कित्येक शतकांपूर्वी सिंधु नदीच्या तीरावर आर्यांच्या आगमनाबरोबर एका संस्कृतीची पाळेमुळे रुजली. आणि नंतरच्या काळात संपूर्ण भारतीय उपखंडात 'हिंदू संस्कृतीची' म्हणून ती अनेक अंगांनी बहरली. वेगवेगळ्या काळातील समाजरचनेच्या गरजांनुसार आणि अनेक विचारवंत, तत्त्वज्ञांनी मांडलेल्या तात्त्विक विचारधारांमुळे यात नवनवी भर पडत गेली, बदल होत गेले. संस्कृतीची मूळ बैठक कायम राहिली तरी येणारी प्रत्येक नवीन विचारधारणा सामावून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे संस्कृतीची वीण बहुरंगी होत गेली आणि रूढी, परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा, चालीरीती, कुटुंबव्यवस्था, परस्पर नातेसंबंध यांचा एक पट निर्माण होत गेला. शतकानुशतके या संस्कृतीने माणसांचे अवघे जीवन व्यापून टाकले. या संस्कृतीचा सगळा पसारा, अनेक चांगल्या वाईट गोष्टींची ही अडगळच माणसाचे आयुष्य समृद्ध करीत असते. म्हणूनच ही 'जगण्याची समृद्ध अडगळ' असे नेमाडे यांनी म्हटले आहे. या 'समृद्ध अडगळीचे' चकित करून सोडणारे सुरम्य दर्शन 'हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीतून घडते. जीवनाची व्यापकता, व्यामिश्रता यांचे दर्शन घडवणे जसे महाकाव्याकडून अपेक्षित आहे तसेच ते कादंबरीकडूनही अपेक्षित असते. 'कोसला' आणि नंतरच्या 'चांगदेव चतुष्टय' मधल्या 'बिढार', 'हूल', 'जरीला', 'झूल' प्रमाणेच ही कादंबरीदेखील ही अपेक्षा पूर्ण करते. आणि 'हिंदू चतुष्टया' तील पुढच्या प्रत्येक कादंबरीविषयची उत्सुकता निर्माण करते. वाचनाचे समाधान देतानाच वाचकाला जीवनाच्या अनेक अंगांचा नव्याने विचार करायला लावण्याचे सामर्थ्य या कादंबरीत आहे. मुखपृष्ठावरचे सुभाष अवचट यांचे उत्कृष्ट पेंटिंग, पुठ्ठा बांधणी, उत्तम छपाई ही या कादंबरीची बाह्य वैशिष्ट्ये म्हणता येतील.
-
Bidhar
बिढार' आत्मचरित्र व कादंबरी यांच्या समन्वयाने बनवलेला साहित्यप्रकार आहे. एका सीमित जगाचा घेतलेला अनुभव नेमाड्यांनी अतिशय नेटकेपणाने, प्रभावीपणाने पुढे मांडला आहे, हे या कादंबरीचे यश आहे. साहित्य जीवनानुगामी आहे, असे आवर्जून म्हणणारे काही लेखक जीवनातील घाणच उपसत बसतात, तिरकस शैलीदारपणे आपण काही वैशिष्ट्यपूर्न सांगतो आहे असे भासवतात. नेमाड्यांनी असे काहीच केलेले नाही. पण जीवन व साहित्य यांच्यामधली दरी एका बाजूने नष्ट करून, दुसर्या बाजूने जीवन अधिक सामर्थ्याने व खोलपणे प्रस्तुत करून नेमाड्यांनी खूपच उंच झेप घेतली आहे यात शंका नाही. कितीतरी प्रसंग इतके प्रभावशालीपणे त्यांनी रेखाटले आहेत की, शिल्पचित्रांची मूर्तता, भरीवपणा त्यात येऊन दृक्प्रत्यय येतो. अनुभवाला विकृत करणारे, भडक करणारे, कृतिमता आणणारे साहित्याचे संकेत एकीकडे त्यांनी तोडले आहेत, पण ते तोडतांना कुठेही अतिरेकीपणा केलेला नाही. प्रदर्शन केलेले नाही. ही एका मनाची मोडतोड व जडणघडण आहे, असे एकाच वेळी 'बिढार' वाचतांना वाटते.
-
Kosla
पद्मश्री सन्मान प्राप्त, प्रा. भालचंद्र नेमाडे हे मराठी साहित्यविश्वातील मोठं विलक्षण असं व्यक्तिमत्त्व आहे. १९६०च्या दशकात त्यांची ' कोसला ' ही कादंबरी आली आणि एकच खळबळ उडाली. साऱ्या प्रस्थापित जाणीवा आणि व्यवस्था यांना छेद देणारी ही कादंबरी होती; पण तेवढ्यापुरतेच या कादंबरीचं महत्त्व नव्हतं. " कोसला " प्रकाशित होऊन आज अर्धशतक उलटले, तरीही तितक्याच उत्साहाने, उत्कटतेने त्या कादंबरीवर लिहिले / बोलले / चर्चिले जाते यातच तिचे आगळेवेगळेपण ठासून दिसते. विशीतील ज्या वाचकांनी त्या कादंबरीची पहिली आवृत्ती वाचली होती ती पिढी आता सत्तरीत आली आहे, पण " कोसला " म्हातारी व्हायला तयार नाही. या कादंबरीवर बराच काळ चर्चा होत राहिली आणि नेमाडे हे नाव गाजत राहिलं. त्यानंतर “ कोसला ” इंग्रजी, हिंदी, गुजराती, कन्नड, आसामी, पंजाबी, बेंगाली, उर्दू, ओरिया, अशा विविध भाषांमध्येही अनुवादित झाली.