-
Basvanna (बसवण्णा)
गावकुसाबाहेरच्या वस्तीत जन्मलेल्या हुशार बसवण्णाचं स्वप्न असतं शिक्षक होऊन खूप शिकण्याचं; पण त्याच्या होणार्या पत्नीला, चिन्नीला तिची जोगतीण आत्या देवदासी बनवते. देवदासी प्रथेच्या विरोधात काम करणार्या डॉ. दीक्षितांच्या संपर्कात येऊन बसवण्णाही त्यांच्या कार्यात सामील होतो; पण जोगतिणीचे लोक त्याच्या जिवावर उठतात. जीव वाचवण्यासाठी त्याला कबरीत लपावं लागतं, नंतर मुंबईला धारावीत जाऊन राहावं लागतं, किराप्पा मोईली या गुंडाकडे. किराप्पा त्याच्या रखेलीच्या मुलीशी बसवण्णाचं लग्न ठरवतो आणि बसवण्णा तिथून गायब होऊन एका स्मशानात आश्रय घेतो, जवळजवळ दहा वर्षं. नंतर त्याच्या बालमित्राच्या मदतीने त्याला सरकारी नोकरी लागते, चिन्नीशी प्रतीकात्मक विवाह होतो, नंतर सुभद्राशी लग्न होऊन, मुलं होऊन, तो सर्वसामान्य आयुष्य जगतो; पण स्मशानात राहत असताना थोडीफार अघोरी विद्या शिकलेल्या बसवण्णाचा मृत्यू फार विचित्र पद्धतीने होतो. अंगावर शहारे आणणारी सत्यकथा
-
Tarang.. (तरंग)
नेताजी पालकर यांच्या जीवनावर ‘अग्निदिव्य’ ही विलक्षण कादंबरी लिहिणारे कल्याणीरमण बेन्नुरवार यांचा ‘तरंग’ हा विविध सत्य घटना, आठवणी आणि शीतल व दाहक अनुभवांवर आधारित वैशिष्ट्यपूर्ण असा कथासंग्रह आहे. बेन्नुरवार यांच्या बालपणापासून आतापर्यंतच्या विविध कडू-गोड कौटुंबिक आठवणींबरोबरच त्यांना आयुष्यात भेटलेले चित्र-विचित्र तऱ्हेचे नानाविध लोक तसेच सामाजिक जीवनातील अनेक छोट्या-मोठ्या, बऱ्या-वाईट नाट्यपूर्ण घटना-प्रसंगांवर आधारित असा हा कथासंग्रह आहे. यामध्ये सत्याला दिलेली कल्पिताची चपखल अनुषंगिक जोड यातून कथा साकारते. सत्य आणि कल्पित दोन्हींचे अनोखे मिश्रण असलेल्या या विविध उत्कंठावर्धक कथा अत्यंत वाचनीय आहेत.