-
Yogache Vishwa-Vishwatla Yog (योगाचे विश्व- विश्वातला योग)
२१जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा व्हायला लागून दहा वर्षे झाली. प्राचीन भारतीय ज्ञान, परंपरा , सौम्य संपदा म्हणून योग जगमान्य होत आहे. त्याचबरोबर काही आव्हाने सुद्धा आहेत. आज जगातला योग कसा आहे व योगाचे जग कसे असायला हवे याबद्दलचा महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे हे पुस्तक. योग हा व्यवसाय म्हणून बाजारपेठेच्या आधीन होणे ,अशा आव्हानांची चर्चा सुद्धा हे पुस्तक करते.. भारतासमोर उभ्या असलेल्या योग अपहरणाच्या धोक्याची स्पष्ट जाणीव सुद्धा या पुस्तकातून होते . वैश्विकरणाच्या युगात योगाचा आर्थिक, सांस्कृतिक , मुत्सद्देगिरी व सौम्य संपदा म्हणून वेध घेणारे मराठी मधले किंबहुना भारतातले हे पहिलेच पुस्तक आहे. म्हणून याचे विशेष महत्त्व. नक्की आपल्या संग्रही ठेवावे, वाचावे इतरांनाही वाचण्यासाठी प्रवृत्त करावे असे हे पुस्तक
-
Turungrang (तुरुंगरंग)
मला ‘अंडरट्रायल` अर्थात कच्चा कैदी म्हणून येरवडा जेलमध्ये काही काळासाठी स्थानबद्ध केलं गेलं होतं. तत्पूर्वी आयपीएस अधिकारी म्हणून आणि कायद्याचा विद्यार्थी म्हणून मी जेलला भेट दिली होती. परंतु त्यावेळी न दिसलेले तुरुंगाचे अंतरंग मला कच्चा कैदी म्हणून वावरताना दिसले. त्याचबरोबर तुरुंगातल्या इतर बंद्यांच्या एका वेगळ्या भावविश्वाचं दर्शन घडलं. त्यातून कैदी जेलच्या कोंडवाड्यामध्ये जगतात कसे, वागतात कसे नि रमतात कसे याचं वास्तव चित्रण शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न मी या ‘तुरुंगरंग`मध्ये केला आहे. अर्थात माणूस गुन्हेगार का होतो आणि समाज म्हणून आपण त्याला गुन्हेगारीपासून कसं परावृत्त करू शकतो हेही मला इथं सांगायचं आहे. इतकंच नाही, तर तुरुंगात कैद्यांचं आयुष्य जसं पणाला लागतं तसंच फौजदारी न्यायप्रक्रियाही कशी कैद होते याची स्पष्ट जाणीव करून देण्याचाही माझा प्रयत्न आहे. वाचक म्हणून आपण माझ्या या पहिल्याच पुस्तकाचं स्वागत कराल अशी आशा. जेल आणि कैदी सुधारणा हा विषय तसा दुर्लक्षित राहिला आहे. जेल सुधारणांसाठी कैद्यांची दुसरी बाजू ऐकणे आणि त्यांच्या मानसिक स्थितीचा उलगडा करणे, हे अत्यावश्यक आहे. मला खात्री आहे की, ‘तुरुंगरंग` हे पुस्तक समाजात जागृती निर्माण करेल. किंबहुना प्रशासन जेलकडे केवळ दंड देण्याची जागा म्हणून न पाहता कैद्यांची वर्तणूक सुधारण्यासाठीचे एक साधन म्हणून बघेल आणि त्या अनुषंगाने नीती आखेल. ज्ञानेश्वर पाटील आयएएस (मध्य प्रदेश कॅडर) रवींद्रनाथ पाटील यांच्यातील उत्कृष्ट मार्गदर्शक, अधिकारी आणि प्रशासकही आम्ही यापूर्वी बघितला आहे. आता या पुस्तकाच्या निमित्तानं त्यांच्यातल्या उत्कृष्ट लेखकाचं दर्शन घडतंय. त्यांचं हे अत्यंत वेगळ्या विषयावरचं पुस्तक प्रत्येकानं वाचावं असंच आहे. डॉ. शिवानंद बिडवे तहसीलदार, महाराष्ट्र राज्य
-
Kanya Zali Ho (कन्या झाली हो)
भारतीय समाजाने स्त्रियांवर हजारो वर्षे अनन्वित अत्याचार केले. याविरूद्ध राजाराम मोहनरॉय, महात्मा फुले वगैरेंनी आवाज उठवला आणि स्त्रियांच्या प्रगतीचा मार्ग हळूहळू मोकळा होत गेला. मात्र विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात असं लक्षात आलं की स्त्रियांवर अन्याय फक्त भारतातच होतात असं नाही, युरोप/अमेरिकासारखे प्रगत देशसुद्धा याला अपवाद नाहीत. ही वस्तुस्थिती लक्षात घेत संयुक्त राष्ट्रसंघाने १९७५-१९८५ हे 'स्त्रीमुक्तीचे दशक' म्हणून घोषित केले. यामुळे स्त्रीमुक्तीला जागतिक आयाम प्राप्त झाला. याचे जगभर परिणाम झाले तसेच पडसाद उमटले. असेच पडसाद मुंबईच्या उपनगरात राहणाऱ्या, एका विवाहित, मध्यमवयीन, लेकुरवाळ्या, ब्राह्मणेतर, प्राथमिक शाळेत शिकवत असलेल्या स्त्रीच्या जीवनात उमटले. स्त्रीमुक्तीच्या या जागतिक वाऱ्यांनी तिच्या आयुष्याची दिशाच बदलली. त्याची ही कहाणी.
-
Bharat Pakistan yudha -1965(भारत पाकिस्तान युद्ध -१९६५ )
1965 साली झालेलं भारत पाकिस्तान युद्ध इस्लामिक स्टेट ऑफ पाकिस्तानने भारतीयांवर लागलेल्या अनेक युद्धांपैकी एक युद्ध होतं. या युद्धात आपल्या सेना दलाने अत्यंत पराक्रम आणि सर्वोच्च बलिदान करून लष्करी विजय मिळवला. भारतीयांचं मनोबलही काही पटीने उंचावण्यास हातभार लागला हे त्रिवार सत्य आहे. त्यावेळी पंतप्रधान असलेल्या आदरणीय लाल बहादूर शास्त्रीजी आणि संरक्षण मंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी पाकिस्तानी इस्लामिक स्टेट च्या सशस्त्र आक्रमणाला सशस्त्र प्रतिकाराने उत्तर देण्याचा निर्णय घेतला हेही उत्तमच झाले. त्याच 1965 च्या युद्धाची तोंड ओळख करून देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. सर्वांच्या संग्रही असावे असे हे ५७६ पानी पुस्तक.
-
Jungle Lor Aani Tree Tops (जंगल लोर आणि ट्री टॉप्स)
आता माझ्यापासून वीस यार्डांवर एक वाघ उभा होता. त्याच्या त्या सुंदर, चमकदार त्वचेवर हिवाळ्यातलं ऊन पडून ती आणखी चमकत होती. असं छायाचित्र मिळवण्यासाठी मी एरवी कुठेही गेलो असतो आणि काहीही दिलं असतं. मी अनेकदा तासन्तास किंवा दिवसच्या दिवस वाघाच्या मागावर राहिलो आहे आणि तो दिसल्यावर रायफल उंचावून, काळजीपूर्वक नेम धरून ती तशीच खाली घेतली आहे. नंतर त्या वाघाचं लक्ष वेधून घेऊन, डोक्यावरची टोपी उचलून त्याला अभिवादन केलं आहे. मला त्याला पाहण्याचा मिळालेला आनंद मी या पद्धतीने व्यक्त केला आहे. रूढार्थाने ‘शिकारी’ असणार्या या माणसाचा प्रवास म्हणूनच शूटिंगपासून शूटिंगपर्यंत (शिकारीपासून चित्रीकरणापर्यंत) पोहोचल्याचं लक्षात येतं. शिकार करण्याने त्याला सावध, अभ्यासू आणि चिकित्सक केलं असलं, तरी हे सजगपण त्याला केवळ निसर्गाचा उपभोग घ्यायला शिकवत नाही... उलट ही त्याच्या निसर्गात विरघळत जाण्यासाठीची नांदी ठरते.
-
Buddhimatehun Adhik Mahatvachi Bhavnik Buddhimatta (बुद्धिमतेहून अधिक महत्वाची भावनिक बुद्धिमत्ता)
भावना जाणण्याची, मूल्यांकन करण्याची, व्यक्त करण्याची आणि नियंत्रित करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता (इक्यू). केवळ बौद्धिक क्षमता (आयक्यू) आयुष्यात यश मिळवण्यासाठी पुरेशी नाही. आयक्यू आणि इक्यू एकमेकांना पूरक ठरतात, तेव्हाच ते प्रभावी असतात. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे, भावनांना प्रभावीपणे समजून घेण्याची आणि त्यांचं व्यवस्थापन करण्याची क्षमता. कामाच्या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वपूर्ण फायदे मिळवून देऊ शकते आणि अधिक चांगले संबंध निर्माण करण्यासाठी, तसंच सकारात्मक वातावरण-निर्मितीसाठी मदत करू शकते. भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वाची आहे, कारण ती वैयक्तिक आणि व्यावसायिक असे दोन्ही प्रकारचे संबंध सुधारण्यासाठी मदत करू करते. सामाजिक गुंतागुंतीतून मार्ग काढण्यासाठी, नेतृत्व करण्यासाठी, करिअरमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी उच्च भावनिक बुद्धिमत्ता मदत करू शकते. सदर पुस्तकात लेखकाने मेंदूचं कार्य आणि त्यामागची भावनिक आणि तार्किक प्रक्रिया सोप्या शब्दांत मांडलेली आहे. तसंच भावनिक बुद्धिमत्तेचं संगोपन कसं करता येऊ शकतं आणि ती कशी वृद्धिगंत करता येऊ शकते, हे दाखवून दिलं आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात हमखास यश मिळवण्यासाठी सदर पुस्तक वाचकांना निश्चितच उपयुक्त ठरेल.
-
Manus Navacha Sundar Shilpa (माणूस नावाचं सुंदर शिल्प)
एक मानव जन्माला येतो. जसजशी त्याच्या शरीराची वाढ होते, तसतशी त्याच्या मनाची, बुद्धीची, भावनांची खोली आणि रुंदी वाढत जाते. त्याच्या वाढीला दिशा, रूप-रंग येत राहातात. पण त्या बुद्धी-भावनांच्या खोलीला, रुंदीला, रंगारूपाला, आणि त्याच्या कर्तृत्त्वाला सार्थकी लावण्यासाठी त्या मानवाला योग्य दिशेनं घडवण्याची आवश्यकता असते. तरच तो मानव या जगासाठी आणि स्वतःसाठी उपयुक्त होऊ शकतो. ही घडवण्याची क्रिया म्हणजे एखाद्या शिल्पकारानं घडवलेल्या एका सुंदर शिल्पाची प्रक्रियाच असते. आणि, मानवाच्या घडणीचे शिल्पकार म्हणजे त्याचे जन्मदाते आईवडील, शिक्षक (गुरू), समाज आणि तो मानव स्वतः. एक नवजात बालक कच्च्या मातीच्या खंडाप्रमाणे असतो, ज्यावर अनेक कलाकार वेगवेगळ्या प्रक्रिया करत असतात. त्या प्रक्रिया अखंड चालू असतात. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. ते मानवी शिल्प किती सुंदर घडतंय, यावर त्या मानवी जीवाचं सार्थक ठरतं. या घडणावळीचे पैलू अत्यंत गुंतागुंतीचे असतात. कधी एकमेकांना पूरक तर कधी परस्परविरोधी. या सगळ्या पैलूंचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. तरच आपला समाज, मानवी क्षमता, संस्कृती आणि हे विश्व संतुलित राहू शकतील. हाच या पुस्तकाचा गाभा आहे.