-
Vedh Amuchya Itihasacha (वेध अमुच्या इतिहासाचा)
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी, महाराणी ताराबाई, छत्रपती राजाराम, सेनापती संताजी घोरपडे या चरित्रग्रंथांशिवाय डॉ. जयसिंगराव पवारांनी मराठेशाहीच्या कालखंडावरील अनेक ग्रंथांना आपली विद्वत्तापूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. त्यांच्या संशोधन विषयातील विविधता, त्यातून उलगडत जाणारा प्रदीर्घ पट, त्याचे विश्लेषण करतानाची त्यांची बहुआयामी दृष्टी, तसेच भाषिक शैली व ऐतिहासिक संदर्भ यांचा सुयोग्य मिलाफ याची अनुभूती त्यांच्या या प्रस्तावनांच्या संकलनातून येते. या प्रस्तावनांनी इतिहासातील अनेक अंधारे कोनाडे उजळले. त्या घटनेच्या आकलनाच्या वाटा बदलल्या. त्या व्यक्तिरेखांचं चौथं परिमाण मांडलं गेलं. जुन्या गृहितकांना टक्कर देण्यासाठी नव्या अस्मिता निर्माण झाल्या. आणि शेवटी त्यातून त्यांनी प्रबोधन हे अंतिम ध्येय सिद्ध केलं आहे. जयसिंगराव पवारांच्या निवडक प्रस्तावनांच्या संकलनातून घेतलेला इतिहासाचा वेध.
-
Lincoln (लिंकन)
अब्राहम लिंकन हे एक असामान्य व्यक्तिमत्त्व होतं. नेतृत्वगुण आणि अद्वितीय व्यवस्थापनकौशल्य हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे पैलू होते. सदर पुस्तकात त्यांच्या या पैलूंवर विशेषत्वाने प्रकाश टाकला आहे. एक राष्ट्र घडविण्यासाठी जे नेतृत्वगुण आवश्यक असतात, उदा. संयम, ठामपणा, करारीपणा, उत्तम निर्णयक्षमता, विचारात असणारी एकवाक्यता, हे सगळे या महान नेत्याकडे होते. त्याचबरोबर सामान्य व्यक्तीच्या हक्कांविषयी ते जागरूक होते. सर्वसामान्यांविषयी त्यांना कळवळा होता. सदर पुस्तकात नेतृत्वगुण आणि व्यवस्थापनकौशल्य यांच्या अनुषंगाने येणारे लिंकन यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अधोरेखित केले आहेत. आदर्श पुढारी आणि व्यवस्थापक बनण्याच्या दृष्टीने प्रत्येक प्रसंग हा काहीतरी शिकवण देऊन जाणारा आहे. राजकीय क्षेत्रातील नेत्यांना आजही उपयुक्त ठरेल असं हे पुस्तक आहे.
-
Guntavnukbhan (गुंतवणूकभान)
आर्थिक गुंतवणूक हा विनाकारण किचकट बनवण्यात आलेला विषय आहे असं तज्ज्ञ मंडळी म्हणतात. सर्वसामान्य माणसाला चक्रावून सोडणार्या अनेक चित्रविचित्र संकल्पना, घाबरवून सोडणार्या कहाण्या, गुंतागुंतींनी भरलेल्या योजनांचे तपशील हे सगळं त्यात तर असतंच; पण खास करून गुंतवणूकदाराचा फायदा न होता संबंधित योजना चालवणार्या संस्था आणि मधली सल्लागार/दलाल मंडळी यांचा लखलाभ कसा होईल याकडे त्यात जास्त लक्ष दिलं जातं. खरं म्हणजे हा विषय अत्यंत सोपा आणि कुणालाही जमेल असा आहे. केवळ पाच गोष्टी ठरावीक क्रमाने केल्या तर त्यात आर्थिक विषयाचं अगदी जुजबी ज्ञान असलेला माणूसही चांगलं यश कमावू शकतो. याच्या जोडीला काही अत्यंत यशस्वी गुंतवणूकदारांविषयीही वाचायला मिळालं तर किती उत्तम होईल अशा विचारापोटी या पुस्तकात बेंजामिन ग्रॅहॅम, फिलिप फिशर, वॉरन बफे, जॉन टेम्पल्टन, पीटर लिंच, जॉन बॉगल विदेशी आणि राकेश झुनझुनवाला तसंच प्रशांत जैन या भारतीय लोकांच्या यशाच्या कहाण्या दिलेल्या आहेत.
-
Dusare Jagatik Mahayuddha (दुसरे जागतिक महायुद्ध)
पहिल्या महायुद्धानंतर दोस्त राष्ट्रांमुळे जर्मनीची दुर्दशा झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर जर्मन तरुणांच्या मनात सुडाचा अंगार पेटला होता. अशा परिस्थितीत नॅशनल सोशालिस्ट जर्मन वर्कर पार्टीची स्थापना झाली. त्याचा पुढारी म्हणून हिटलरची निवड झाली. त्याने कपटाने जर्मनीचं अध्यक्ष आणि पंतप्रधानपद मिळवलं. त्याच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. हॉलंड, बेल्जियम, इटली, आफ्रिका इ. अनेक राष्ट्रांचा युद्धात सहभाग होत गेला. ते युद्ध कशा तर्हेने झालं, कोणाची सरशी झाली, कोण हरलं, त्या त्या युद्धाचे त्या त्या देशावर, बेटावर किंवा एखाद दुसर्या शहरावर काय परिणाम झाले, या युद्धाशी संबंधित प्रमुख व्यक्तींनी (जर्मनचा राष्ट्राध्यक्ष हिटलर, इटलीचा पंतप्रधान मुसोलिनी इ.), त्यांच्या स्वभावानुसार, आजूबाजूच्या परिस्थितीनुसार त्या त्या वेळी घेतलेले निर्णय आणि त्यांचे झालेले चांगले/वाईट परिणाम, सागरी लढाई, विमानातून झालेली लढाई, जमिनीवरील लढाई अशा तीन प्रकारे झालेल्या लढाईचे आकडेवारीनिशी संदर्भ इ. माहिती इत्थंभूतपणे देणारं पुस्तक आहे ’दुसरे जागतिक महायुद्ध.’
-
Pahile Jagatik Mahayuddha (पहिले जागतिक महायुद्ध)
ऑस्ट्रियाच्या युवराजाचा बोस्नियन तरुणाने केलेला खून ही घटना पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडण्यास कारणीभूत ठरली. ऑस्ट्रिया आणि जर्मनी या दोन्ही देशांना ऑस्ट्रियाच्या युवराजाच्या खुनाचा आळ सर्बियावर आणून तो देश घशात घालायचा होता, तसेच रशियन रेल्वे पूर्ण होण्यापूर्वी फ्रान्स आणि रशिया या दोन्ही देशांशी युद्ध करून त्यांचा पराभव करायचा होता; पण ऑस्ट्रिया व सर्बियादरम्यान छोट्या प्रमाणावर सुरू झालेले हे युद्ध त्या दोन देशांपुरते मर्यादित न राहता संपूर्ण युरोपभर पसरले. तसेच पुढे युद्धाची खुमखुमी, युद्धठास्त देशांना पाठिंबा आणि विरोध, या व अशा इतर अनेक कारणांमुळे त्या युद्धात तुर्कस्तान, इटली, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी व अमेरिका आदी देशांचाही प्रवेश झाला. हे युद्ध जरी युरोपात झाले असले तरी जगातील बहुतेक सगळ्याच देशांना त्याची या ना त्या कारणाने झळ पोहोचली. पहिल्या जागतिक महायुद्धाची पार्श्वभूमी व कारणे, नानाविध कारणांमुळे त्यात सहभागी झालेले लहान-मोठे देश, लढाईचे वैविध्यपूर्ण प्रासंगिक वर्णन आणि परिणामांचा सार्थ आढावा.
-
Corpokshtera (कॉर्पोक्षेत्र)
महाभारताच्या कथेला आधुनिक साज चढवत व्यावसायिक पार्श्वभूमीवर ‘कॉर्पोक्षेत्र’ ही कथा घडते. त्यामुळे जुन्या हस्तिनापूर साम्राज्याचे रूपांतर ‘हस्तिनापूर एन्टरप्रायझेस’मध्ये होते. धृतराष्ट्र हा त्याचा अध्यक्ष बनतो. कृष्ण हा आधुनिक काळातला व्यवसाय सल्लागार म्हणून सामोरा येतो. वारणावत हे स्थळ ‘फॅमिली हॉलिडे होम`चे रूप घेते आणि हे सर्व नाट्य घडते ते व्यवसायातल्या भागभांडवलावर हक्क सांगण्यासाठी! हस्तिनापूर एन्टरप्रायझेसभोवती फिरणारं हे नाट्य महाभारतातील व्यक्तिरेखांची स्वभाववैशिष्ट्यं कायम ठेवत घडतं. त्यामुळे महाभारतातील गुंतागुंत याही पुस्तकात प्रभावीपणे चित्रित झालेली दिसते.
-
Yashasvi Netrutva (यशस्वी नेतृत्व)
जगातल्या राजकीय आणि व्यावसायिक घडामोडींमधून आपल्याला नेतृत्वाचे महत्त्व उलगडते. जेव्हा ते नसते, तेव्हा सारे अस्ताव्यस्त होते. जेव्हा ते प्रेरित करते, तेव्हा गोष्टी सुधारतात. या पुस्तकाचा हेतू हा चांगल्या लोकांना मूळ तत्त्व सादर करून नेता होण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. टप्प्याटप्प्याने प्रवेश करत, प्रशिक्षण आणि प्रयत्नांनी कौशल्य प्राप्त करण्याचा मार्ग हे पुस्तक दाखवते. नम्रपणा, अननुभव किंवा साशंकता जरी मार्गात येत असली, तरी कुणीही नेता बनू शकते. या पुस्तकात सांगितलेला हा सात दिवसांचा कार्यक्रम वाचकांना त्यांची बलस्थाने ओळखून त्यावर निर्भर राहण्याचे मार्गदर्शन करतो. तसेच तो त्यांच्या कमतरतांवर लक्ष केंद्रित करून त्यावर चांगल्या पद्धतीने मात करण्यास मदत करतो. तथापि, जबाबदारी अंगावर घेणे, हे कधीच सोपे नसते. आठवडाभराच्या या कार्यक्रमात प्रत्येक दिवशी नेतृत्वापुढील आव्हाने आणि फायदे यांचे स्वरूप विशद केले आहे.
-
Kasheer (कशीर)
काश्मिरच्या धगधगत्या होमकुंडाला कथात्म साहित्यात गुंफत ही कादंबरी देशातला एक महत्त्वाचा विषय कुशलतेने हाताळते. एके काळी भारतीय संस्कृतीचं समृद्ध स्थळ असलेलं काश्मीर तेजोहीन होऊन आज म्लेछ धर्मापुढे का शरणागत झालं आहे, या तपशिलाचा शोध ही कादंबरी घेते. बशीर अहमद, त्यांचा मुलगा अन्वर, ड्रायव्हर सलीम यांसारखी धर्माच्या सीमा ओलांडून पाहणारी पात्रं, पुरातन वेदान्तात आजच्या समस्येवरचं उत्तर शोधणारे हृदयनाथ पंडित; काश्मीर सोडून जम्मूला आलेल्या बांधवांना लुटणारे हिंदू घरमालक, अशा अमानवी परिस्थितीत दांपत्य-जीवनाची फरफट होत असतानाही दांपत्य-जीवनातलं मूल्य जपणारे संजीव आणि आरती कौर अशा पात्रांच्या माध्यमातून काश्मीर नव्याने समजत जातो.
-
Asa Asava Baap (असा असावा बाप)
सर्वोत्तम पिता बनण्यासाठीचं मार्गदर्शन हे पुस्तक करतं. पिता होण्याचा खराखुरा अर्थ...माता-पित्याच्या संगोपनातील फरक... मुलांच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांचं संगोपन कसं करावं... आर्थिक स्थिती आणि मुलांचं संगोपन...मुलांना वेळ देण्यासाठी काय करावं...आई-वडील विभक्त झाल्यामुळे मुलांच्या मनावर होणारा परिणाम... पितृत्वाचा आनंद कसा उपभोगावा इ. मुद्द्यांसह या पुस्तकात सर्वोत्तम पिता बनण्यासाठी सखोल मार्गदर्शन केलं आहे आणि ते उपयुक्त आहे.
-
Kanbakth Nindar (कमबख्त निंदर)
साहित्यिक नरेन्द्र मोहन यांची ही आत्मकथा त्यांचं लौकिक, व्यावसायिक जीवन उलगडते. आई-वडील, दोन भाऊ अशा कुटुंबासमवेतचं बालपण...तेराव्या वर्षी फाळणीमुळे अमृतसरला निर्वासितांच्या छावणीत स्थलांतर...या घटनेने बदललेले आयुष्य आणि भावविश्व...अर्थात हा प्रवास ते चित्रित करतात निंदर (त्यांची आई त्यांना लाडाने ‘निंदर’ असं म्हणत असे) या व्याQक्तरेखेच्या माध्यमातून...त्यांच्या मनाला पडलेला पीळ, अस्वस्थता व्यक्त करताना ते निंदरचा आधार घेतात आणि या आत्मकथेला कलात्मकतेच्या पातळीवर नेऊन ठेवतात...निंदर ते साहित्यिक नरेन्द्र मोहन हा महत्त्वपूर्ण प्रवास यात येतो...फाळणीच्या आणि १९७५च्या आणीबाणीच्या वेदना या आत्मकथेतून जाणवतात...लौकिक आणि व्यावसायिक जीवनातील वादळांचा, आनंदक्षणांचा, त्या त्या वेळच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीचा अभ्यासपूर्ण, व्यामिश्र आविष्कार
-
The Missing (द मिसिंग)
शाळकरी डर्बी मॅककॉर्मिथ आणि तिच्या दोन खास मैत्रिणी. जंगलात पार्टीचा बेत आखतात. पार्टीसाठी प्रत्यक्ष जंगलात पोहचतातही. पण तिथं एक जीवघेणा थरार त्यांची वाट पाहत असतो. कुणीतरी खुनशी मारेकरी एका बाईचा खून करतो. या खुनाची साक्षीदार असलेली डर्बी आणि तिच्या मैत्रिणी कसाबसा जीव वाचवून पळतात. या घटनेच्या तब्बल पंचवीस वर्षानंतर डर्बी एक धाडसी पोलीस अधिकारी झालेली असते. तिच्याकडं एका हत्यासत्राची सुत्रं सोपवली जातात. मध्यरात्री गायब होणाऱ्या बायका आणि त्यांचा मागमूसही मागं न ठेवणाऱ्या एका सायको किलरला शोधण्याचं काम सुरू होतं. आणि त्याचवेळी तिला भविष्यातलं अराजकही थांबवायचं असतं. या शोध मोहिमेत डर्बीचा वर्तमानकाळ तिच्या भुतकाळातल्या अनुभवांशी थरारक नाळ जोडू लागतो.
-
Amatya Hegris Malaykeshiraj (अमात्य हेग्रीस मलयकेश
आप्पासाहेब राजवाडे एक थोर इतिहास संशोधक . आयुष्यभर इतिहासाच्या वेडाने झपाटलेले गड , किल्ले , जंगलवाटा , जुनी कागदपत्रे यातच रममाण होणारे . दहाव्या अकराव्या शिलाहार राजवटीचा अभ्यास करताना "अमात्य हेग्रीस मलयकेशीराज " याचा ओझरता उल्लेख असलेली जुनी कागदपत्रे त्यांच्या वाचनात आली . त्यातील "हेग्रीस "या विचित्र नावामुळे त्यांची उत्सुकता वाढली . पुढं त्याने बांधलेल्या गूढ छायामंदिरांच्या ओझरत्या उल्लेखाने तर ते झपाटल्याप्रमाणेच इतिहासात शोध घेऊ लागले. आप्पांच्या या शोधकार्यात त्यांना गुप्तलिपीतज्ञ असलेली "संजीवनी "आणि अंतराळ संशोधक असणारा त्यांचा नातू "विनय "यांची साथ मिळते . या तिघांच्या शोधप्रवासाची कहाणी म्हणजेच "अमात्य हेग्रीस मलयकेशीराज "ही कादंबरी होय.