-
Shelka Saj (शेलका साज)
हा आहे ‘मृत्युंजयकार’ शिवाजी सावंत यांच्या विविधरंगी ललितलेखनाचा संच : ‘शेलका साज’! इथं सावंतांच्या खास रसश्रीमंत शैलीत वेध घेतलेले महाराष्ट्रवैभव कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जसे भेटतील, तसाच लेखकाला चकवा देऊ बघणारा वाचक अशी झूल पांघरलेला लपंगाही भेटेल. छ. शिवराय, शंभूराजे, महाराणी येसूबाई, सरलष्कर संताजी घोरपडे यांच्या जीवनझुंजीतील आजवर मराठी वाचक मनाला अज्ञात राहिलेल्या मनामनांच्या अणीदार वंगोऱ्यांना केलेला रसबाळा, तरल ललितस्पर्श भेटेल. तसाच कसा होता - असेल शिवकालीन रणसंमुख सामान्य मावळा यावर टाकलेला डोळस व वास्तव प्रकाशझोत असेल. इथं आर्य चाणक्याचा वेगळ्याच दृष्टीनं केलेला विचार दिसेल, तसंच, दीनदलितांना ‘आधारवड’ झालेल्या राजर्षी शाहूंचं क्षणदर्शन घडेल. सावंतांनी कथा मोजक्याच बेतल्या. मालिश, भिजाणे यांतून त्यांचं या आकृतिबंधाचं बळ दिसेल. ‘मुकी’ ही कथा तर अल्बर्ट कामूची आठवण करून देईल - यासाठीच या संचाचं शीर्षक : शेलका साज!!
-
Moravala (मोरावळा)
हा आहे ‘शब्द- मोरावळा’. लेखक मनोगतात म्हणतो : शरीरस्वास्थ्याच्या शास्त्राप्रमाणं साधा आवळा अति गुणकर असतो, हे सिद्ध झालंय. हा तर आहे साखरेच्या मधुर पाकात अंगभर मुरलेला मोरावळा. गुणकर, तसाच तुरटपणा टाकून चविष्ट झालेला. त्यातही हा शब्दमोरावळा, साहित्यिकमोरावळा आहे. मानवी मनाचा सारा अहंपणा, मत्सर, द्वेष अशा षड्रिपूंचा बेचव तुरटपणा टाकून ललितरम्य भाषेत सादर केलेला. श्री. शिवाजी सावंत यांच्या सशक्त भाषाशैलीत हा ‘शब्दमोरावळा’ साकारला आहे, त्यांच्या खास कोल्हापुरी बाजात नि ढंगात. इथं सावंतांच्या जीवनयात्रेत भेटलेली राजकारण, शिक्षण, प्रकाशन व साहित्य अशा विविध क्षेत्रांतील बलदंडांची आखीव रेखांकने आहेत. त्यांत एक-दोन खास ठाामीण अफलातूनही भेटतात. मोरावळ्याचा पहिलाच तुकडा जिभेवर ठेवताच खरा रसज्ञ मिटकी मारत नकळतच म्हणतो, ‘व्वा!’ तसंच काही हा ‘शब्दमोरावळा’ चाखताना रसिक वाचकाला वाटलं, तर आश्चर्य वाटायला नको!!
-
Prematun Premakade (प्रेमातून प्रेमाकडे)
मैत्री, प्रेम यावर जग जगात असते. मैत्रीत वयाचे बंधन नसते; पण मैत्रीलाही काही वेळा समाजबंधन असते. विशेषतः मैत्री स्त्री - पुरूषांमधील असेल तर हे नाते नितळपणे सांभाळावे लागते. सार्वजनिक क्षेत्रातील थोरामोठ्यांचे अतिशय नाजूक संबधातील मैत्र अरुणा ढेरे यांनी 'प्रेमातून प्रेमाकडे ' मधून वाचकांपुढे उलगडले आहे. मार्गारेट नोबेलने विवेकानंद यांना प्रथम पहिले तेव्हाच त्यांना जीवन समर्पण करण्याच्या निश्चय केला. स्वामींनी समाजकार्यासाठी निवेदिताच्या रुपात तिला शिष्यत्व बहाल केले. निवेदिता व गोपाळ कृष्ण गोखले यांचे सौहार्दाचे मित्रत्व, गोखले व सरोजिनी नायडू यांचे स्नेहसंबंध, 'वंदे मातरम्' या राष्ट्रगीताला स्वररचना देणाऱ्या व महात्मा गांधी यांची अधार्मिक प्रेरणा बनलेल्या सरलादेवी घोषाल, ब्रिटनमधील मेडेलिन स्लेड उर्फ मीरा बेन हिची गांधीजींवरील उत्कट प्रेमभक्ती, रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेतून व्यक्त झालेली अॅना उर्फ नलिनी तसेच त्यांची वहिनी कादंबरी, रवींद्रनाथांसाठी काहीही करण्यास तयार असणारी व्हिक्टोरिया ओकॅम्पो, सुभाषचंद्र बोस व एमिली यांचा विवाह, सेनापती बापट व त्यांची रशियन मैत्रीण अना, डॉ. आंबेडकर व फॅनी यांच्यातील नाते, यावर यात प्रकाश टाकला आहे.
-
Mauli (माऊली)
।। माऊली ।। ‘माऊली’ ही अगदीच वेगळी कादंबरी. तिची नायिका आहे एक मांजरी; लेखकाने माया लावलेली. या मायेच्या पसायात लेखकाचे कुटुंबीय, स्नेहीसोबती आणि त्या क्रूर काळ्या बोक्यासह मांजरीचा गोतावळाही समाविष्ट होतो आणि कादंबरीची वीण एक वेगळं रंगरूप घेऊ लागते. यादवांचे निरीक्षण वाचकाला स्तिमित करील असे आहे. हे निरीक्षणच त्यांना एक रस्ता सापडवून देते. स्वत:चे भान शाबूत ठेवून यादव हळूहळू मार्जारविश्वाचा शोध घेऊ लागतात. साधा वाटेल अशा तपशिलाची पेरणी करीत या शोधवाटेने लेखक स्वरक्षण आणि स्ववंशवर्धन या दोन मजबूत पख्यांवर विसावलेल्या निसर्गसिद्ध आदिम प्रेरणेशी वाचकाला नेऊन भिडवतो तेव्हा वाचक पछाडल्यागत होतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्याच फक्त अंकित असलेले एक थेट असे नरमादीच्या नात्याचे अस्तित्व न्याहाळताना आदिनिरणाच्या वाटेकडे वळतो. मग मांजरी ही मांजरी राहत नाही; तिथे साकारत जाते आदिमायेचेत्या जगन्माऊलीचे आत्मजन्मा नि आत्मभोगी असे कृतार्थ रुपडे. चिंतनगर्भ जीवनेच्छेचा कलारूप आविष्कार म्हणजे ‘माऊली.’ दार्शनिक तत्त्वज्ञान, लोकसाहित्यपरंपरा, सनातन भारतीय समाजमन यांचा हळुवार आणि तलम स्पर्श झालेली मराठी भाषेतील ही पहिलीच साहित्यकृती असावी, इतकी ती वेगळी आहे. – प्रा. अरविंद वामन कुलकर्णी
-
The Picture Of Dorian Gray (द पिक्चर ऑफ डोरियन ग्र
डोरियन ग्रे...अंतर्बाह्य सुंदर असलेला विशीचा तरुण... बेसिल हॉलवर्ड या चित्रकाराने डोरियनचं चित्र रेखाटलंय...बेसिलचा मित्र लॉर्ड हेन्री आणि डोरियनची भेट होते... डोरियन हेन्रीच्या प्रभावाखाली येतो...तो नाटकात काम करणाऱ्या सिबिलनामक सुंदर युवतीच्या प्रेमात पडतो. तिच्याशी लग्नही ठरवतो...पण एका प्रयोगात सिबिल खूपच वाईट अभिनय करते आणि तो प्रचंड संतापतो...तिच्याशी भांडून थिएटरमधून बाहेर पडतो...त्याच रात्री सिबिल आत्महत्या करते...ती बातमी कळल्यावर डोरियन विव्हळ होतो...पण काहीच क्षण...या प्रसंगानंतर सुरू होते डोरियनची आत्मिक अधोगती...काही लोकांच्या विनाशाला, आत्महत्येला तो कारणीभूत ठरतो...व्यसनं आणि स्त्रियांच्या मोहपाशात गुरफटतो...चिरतारुण्याचा वर मिळाल्यामुळे ही अधोगती चालूच राहते...इतकी की तो बेसिलचाही खून करतो...त्याच्या या अधोगतीचे पडसाद त्याच्या चित्रावर उमटतात...त्याचा चित्रातला चेहरा विद्रूप होतो...मनोवास्तवाचं प्रभावी चित्रण द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे.
-
Ukhadleli Zade(उखडलेली झाडे)
उखडलेली झाडे` या संग्रहात आनंद यादवांची कथा विकासाच्या एका विशिष्ट टप्प्यावर भेटते. ग्रामीण भागातील वर्तमान वास्तवाचे, समाज मनाचे, शहर व खेडे यांच्या अनेकविध संबंधांचे यादवांचे भान इथे प्रखर आणि मर्मभेदी झालेले जाणवते. ग्रामीण भागात सुधारणांच्या हेतूने आलेले शिक्षण, उद्योगीकरण, विकास योजना, पाणी योजना, पंचायतपरिषदा, ग्रामविकास, शेतीविकास इत्यादींचा ग्रामीण जीवनावर प्रत्यक्षात कसा विपरीत आणि विकृत परिणाम होत चालला आहे आणि त्यात सगळा अधस्तरीय ग्रामीण समाजच कसा पिळून, भरडून निघत आहे, कायमचा उखडला जात आहे याचे अस्वस्थ करणारे अतिशय कलात्म दर्शन ते घडवीत आहेत. याचबरोबर एकूण मराठी समाजातील जाती-वर्गांचे परस्पर संबंध, शहर आणि खेडे, बुद्धीजीवी मध्यम वर्ग यांचे सांस्कृतिक नातेही ते शोधू पाहत आहेत. त्यांचा हा संग्रह म्हणजे `वर्तमान मराठी खेड्यावरचे` आणि त्या संदर्भात एकूणच मराठी समाजावरचे प्रातिनिधिक भाष्य वाटावा, अशा योग्यतेचा आहे. - डॉ. दत्तात्रय पुंडे.
-
Panbhavare (पाणभवरे)
‘पाणभवरे’ मधील ‘मी’चे लक्षात घेण्याजोगे वैशिष्ट्य हे की, हा ‘मी’ आत्मचरित्रात्मक असूनही तो आपल्या नजरेत कधीच खुपत नाही. जे उघडउघड आत्मचरित्रात्मक, ते आत्मप्रदर्शनात्मक होण्याची भीती असते. अलिकडच्या आत्मचरित्रात्मक लेखनातून अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. यादवांच्या लेखनात आत्मप्रदर्शनाचा हा भाव किंचितही आढळत नाही. या ‘मी’चे व्यक्तित्व भडक नाही. ते लाजरे, बुजरे, पापभीरू, माणसांवर नितांत प्रेम करणारे, निर्सगाची विलक्षण ओढ असणारे आहे. यादव जीवनानुभवाचे दर्शन घडवीत असताना कलार्थाने ‘मी’ला विसरतात. शिवाय लेखनात बदलत्या वास्तवाचे भान आहे. आधुनिक जीवनातील मानसिक गुंतागुंत आहे. सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेतल्यावरही क्षणोक्षणी जाणवणारी असुरक्षितता आहे, धपापलेपण आहे. सामान्य माणसाची दैनंदिन जीवनातली साशंक भीती आहे. यांत्रिक जीवनातली कृत्रिमता आहे. पांढरपेशी प्रतिष्ठा जपताना होणारी मनाची तगमग आहे. संस्कारांची गिरवलेली, न पुसली जाणारी वलये आहेत. वास्तवाचे निदान करणारी शोधदृष्टी आहे. तरल, भावस्पर्शी संवेदनेची वीण आहे. यांत्रिकतेने जखडलेल्या शहरातील हे विविध अनुभव, आज माणसाला प्राप्त झालेल्या ‘प्रलयपुरातील बाहुली’च्या स्वरूपाची जाणीव करून देतात... संवेदना, काव्यात्मता, तरलता, अनुभवातील चैतन्य यादवांची भाषा उत्तमपणे पेलू शकते, असा अनुभव या लेखनामधून येतो. (आलोचना)
-
Aadital.. (आदिताल)
‘पृथ्वीवर येणाऱ्या युगारंभीच्या पहिल्या वसंत ऋतूच्या पाऊलस्पर्शासारखी ती त्याला भासली. तिचं धडधडतं हृदय त्याच्या कानापाशी होतं... जगाच्या आरंभी सुरू झालेला ताल. काळाला स्पर्श करत सतत युगानुयुगे सनातनपणे चाललेला धिनतिक. या तालातूनच निर्माण झालेली सृष्टीची लयकारी... त्याला आदिताल सापडल्यासारखं वाटलं.’
-
Ugvati Mane (उगवती मने)
मानवी जीवनात ‘मूल’ या घटनेला एक अजोड स्थान आहे. वंशसातत्याचं मूळ रुजणं म्हणजे मूल असणं. मूळ म्हणजेच मूल. ते असेल तरच संसारवृक्ष बहरतो, फुलतो आणि फळाला येतो. नसेल तर कोमेजतो, वाळतो, निष्पर्ण होऊन शेवटी नष्ट होतो. मूल असणं म्हणजे स्वत:च पुन्हा नव्यानं जन्माला येणं. नवं शरीर, नवं मन घेऊन पुन्हा जगण्यास प्रारंभ करणं. कुणाचं तरी आईबाप, बहीणभाऊ होऊन जगणं, हे आपल्या सड्याफटिंग, एकट्या जगण्यापेक्षा किती वेगळं असतं, याचे पडताळे येऊन आपण रसिक इथं थरारून जातो; समृद्धही होतो.
-
Akherchi Ladhai (अखेरची लढाई)
अखेरची लढाई ही कादंबरी सवाई माधवराव पेशवे आणि नाना फडणीसांच्या जीवनातील विविध घटना-प्रसंगांवर आधारित आहे. नाना फडणीस उणीपुरी दोन तपे पेशवाईच्या कारभारात होते. सवाई माधवराव पेशव्यांच्या माता-पित्याचे अकाली निधन झाल्यानंतर पेशवाईचा वारस म्हणून त्यांनी सवाई माधवरावांची डोळ्यांत तेल घालून काळजी घेतली. त्यांचा आपल्या पुत्राप्रमाणे सांभाळ केला. माधवराव लहान असल्याने नानाच पेशव्यांच्या वतीने सर्व निर्णय घेत आणि राज्यकारभार पाहात असत. याच कालावधीत मुजोर झालेल्या निजामाला अद्दल घडविण्यासाठी नानांनी युद्ध पुकारले आणि आपल्या चातुर्याने (व दैवाची साथ लाभल्याने) ते जिंकून निजामाला सर्व अटी मान्य करायला लावून, शरण येण्यास भाग पाडले. पेशवे आणि दौलतीसाठी नाना फडणीसांना असाच परकीयांचा आणि स्वकीयांचाही सामना करावा लागला.
-
Bhumikanya (भूमिकन्या)
ह्या कथा जनसामान्य स्तरातील स्त्रीचे सर्वांगीण दर्शन घडविणाऱ्या, वास्तवाचे प्रखर भान असलेल्या, आशयसमृद्ध आणि कलासंपन्न स्वरूपाच्या आहेत. भूमिकन्यांचे शोषण त्यांच्या जन्मापासूनच सुरू असते. "मुलगी जन्मल्याचे" दु:ख घरादाराला मनोमन होते. तेव्हापासूनच मुलगीच्या आयुष्याची काळजी तिच्या आईला विशेष घेरते. अपुऱ्या जीवनसुविधांच्या कुटुंबात तर बालिका, कुमारी, युवती, गृहिणी, वृद्धा या सर्वांनाच अपुरेपणाची, अभावग्रस्ततेची आणि त्यामुळे होणाऱ्या मानसिक व शारीरिक उपासमारीची झळ सतत आणि जास्तीत जास्त सोसावी लागते.
-
Khalal (खळाळ)
आनंद यादव यांनी कथालेखनाला प्रारंभ केला तेव्हा त्यांची बरीचशी काव्यरचना झालेली होती. कविप्रकृतीचे ग्रामीण कथाकार असा त्यांचा पिंड बनला. त्यांची ग्रामीण जीवनाची आत्मानुभूती, दीनदुबळ्यांबद्दलची कणव, मातीची ओढ हे सर्व गुण जातिवंत व कसदार होते पण त्याचबरोबर गुणांना व जाणिवेला कलात्मक संघटन व आकार प्राप्त करून द्यावा असा उत्कट ध्यासही त्यांना होता. या कलात्मकतेसाठी ग्रामीण बोली भाषेच्या सामथ्र्यांची कसोशीने व कल्पकतेने उकल करावी असे त्यांच्या मनाने घेतले. या तन्मयतेत व तंद्रीत खोलवर शिरताना चिंतनालाच एक नाद व लय असते याचा शोध त्यांना लागला. या शोधाच्या आधारे ग्रामीण दु:खाच्या चिंतनात्मक निवेदनाचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्यांनी आपल्या कथांतून केला. या प्रयोगातून ग्रामीण जीवनाचे जे दर्शन घडले ते अभिनव, रोमांचकारी वाटले. मराठी ग्रामीण कथेच्या विकासातला हा महत्त्वाचा टप्पा आहे....’’ प्रा.म.द. हातकणंगलेकर
-
Gavati Samudra (गवतीसमुद्र)
‘द सी ऑफ ग्रास’ या इंग्रजी कादंबरीचा ख्यातनाम कवयित्री आणि अभ्यासू लेखिका शान्ता शेळके यांनी केलेला ‘गवती समुद्र’ हा हृद्य अनुवाद आहे. ही साधी-सोपी गोष्ट आहे अमेरिकेतील सॉल्ट फोर्वÂ या गावातली. ल्यूटी कॅमेरॉन- जॉय ब्यू्रटन-जिम ब्य्रूटन या तीन प्रमुख पात्रांभोवती ही कथा गुंफली आहे. जॉय ही कथा आपल्याला निवेदन करतो. कर्नल जिम उंचापुरा- भारदस्त- शिस्तप्रिय- सर्वांवर करडा वचक असलेला सदगृहस्थ असतो. विस्तीर्ण पसरलेल्या गवताच्या कुरणात जॉयच्या काकाचा पशुपालनाचा व्यवसाय असतो. हे कुरण जिमने निर्वासितांच्या वसाहतीसाठी द्यावे, यासाठी कोर्टात केस सुरू असते. सरकारी वकील ब्राइस चेम्बरलेन याने अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडे हे विशाल कुरण निर्वासितांच्या वसाहतीसाठी देण्यासंबंधी सूतोवाच केलेले असते. जॉयच्या काकाचे- कर्नल जिमचे- ल्यूटीशी लग्न होणार असते. ल्यूटी शिक्षणासाठी जॉयला शहरात पाठवण्याची व्यवस्था करते. त्यामुळे जॉयच्या मनात होणाऱ्या काकूविषयी गैरसमज निर्माण होतो. काकाच्या आदेशानुसार तो तिला आणायला रेल्वे स्टेशनवर जातो. ल्यूटीची साधी, सुंदर छबी आणि मनमोकळा स्वभाव पाहून जॉयच्या मनात तिच्याविषयी आदरयुक्त आकर्षण निर्माण होते. कुरणाविषयी कोर्टात सुरू असलेली केस सुरुवातीला कर्नल जिंकतो. दरम्यान कर्नल-ल्यूटीच्या संसारवेलीवर ब्रॉक-जिमी ही दोन मुले आणि सारा बेथ ही मुलगी अशी तीन फुले उमलतात. कर्नलचा कुरणावरील वसाहतीला विरोध पाहून ल्यूटी घर सोडण्याचा निर्णय घेते. आपले मातृवत छत्र दुरावल्यामुळे जॉयला दु:ख होते. कर्नल मात्र निर्धाराने हा धक्का पचवतो. बघता बघता १५ वर्षे उलटतात. कर्नलची मुले मोठी होतात. थोरला ब्रॉक बेफिकीर वृत्तीचा... आईसारखा देखणा असतो. त्याला जुगार आणि दारूचे व्यसन जडते. जॉय मेडिकलचे शिक्षण पूर्ण करून डॉक्टर होतो. रुग्णांची सेवा करण्यासाठी तो गावी परततो. जुगाराच्या पबमध्ये झालेल्या भांडणात ब्रॉककडून एकाचा खून होतो. जज्ज झालेला चेम्बरलेन त्याला जामिनावर सोडवतो. चेम्बरलेन आणि ब्रॉकमधील साम्यामुळे ल्यूटी आणि चेम्बरलेन यांच्याविषयी प्रवाद निर्माण झालेला असतो. डॉ. जॉयला एका अत्यवस्थ रुग्णावर उपचारासाठी बोलावण्यात येते. तो ब्रॉक असतो. पुÂप्पुÂसात गोळी घुसल्यामुळे तो अखेरच्या घटका मोजत असतो. अचानक ल्यूटी परत येते. जॉयच्या दृष्टीने तो सुखद धक्का असतो. तिचा मुलगा ब्रॉक याच्या मृत्यूची बातमी तिला कशी सांगायची, कठोर काका कर्नलची ल्यूटी परत आल्यानंतरची प्रतिक्रिया कशी असेल, १५ वर्षे आपण कोठे होतो यावर ल्यूटीचे स्पष्टकरण कसे असेल, असे थरारक प्रश्न जॉयपुढे निर्माण होतात. पुढे काय होते, या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी कवयित्री असलेल्या शान्ताबार्ईंच्या हळुवार लेखणीतून उतरलेली ‘गवती समुद्र’ ही कादंबरी वाचायला हवी... नातेसंबंधामधील गोडवा काव्यमय गद्यातून वाचकांना अनुभवायला मिळेल, यात शंकाच नाही...