-
Rutuveglare ( ऋतूवेगळे )
स्त्री म्हणून जगताना येणार्या अनुभवांचे आणि प्रश्नांचे विश्लेषण करणारा, स्वातंत्र्योत्तर काळातील एका प्रतिनिधीक वर्गाचे चित्रण करणारा, गत शतकाअखेरीस विज्ञानाने जगण्याचा अर्थच बदलवून टाकला असला तरी माणसांच्या मनातील सनातन संघर्ष मात्र तसाच आहे हे दाखवणारा कथासंग्रह. हे सारे तात्विक वाटत असले आणि ह्यात कथा भरडली गेली असावी, असे वाटत असले तरी तसे झालेले नाही. तिने आपले एक वेगळेच विश्व निर्माण केले आहे न् तिच्या गुंगीतून सावरल्यावर लक्षात येते की लेखिका कळत-नकळत आपल्याला बरेच काही सांगून गेली आहे. ह्या लेखिकेचे शब्द मुळातच नादमधुर असतात, आणि त्यांना संगीताचा साज मिळाल्यावर ते अधिकच लयकारी निर्माण करून जातात ह्याचा प्रत्यय ह्या संग्रहांतील कथा वाचतानाही येतो जसे, "धुवाधार म्हणतात तसला हा पाऊस, मल्हार भराला यावा तसा". शेवटी आपले जीवनतही शिल्पासारखेच, लेखिका म्हणते त्याप्रमाणेच "आपणच आपले सारे संचित, सगळ्या भावना, आनंद, दु:ख या शिल्पात पाहतो आणि त्याला अर्थ देतो".
-
Pratiksha ( प्रतीक्षा )
प्रतीक्षा' ही कादंबरी रणजित देसाईंच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी प्रकाशित झाली. पुनर्लेखनासाठी देसाईंनी ती बाजूला ठेवून दिली होती. परंतू पुनर्लेखन होवू शकले नाही. या कादंबरीत एक भावपूर्ण प्रेमकहाणी चित्रित झालेली असून यातील वातावरण आध्यात्मिक स्वरूपाचे आहे. संपूर्ण कथानक हिमालयाच्या परिसरात घडते. कादंबरीचा नायक अतृत्प आणि असफल प्रेमजीवनातून आलेल्या निराशेपोटी भटकत असतो. खर्या प्रेमासाठी फिरत फिरत हिमालयात येतो आणि येथेच त्याची नायिकेशी गाठ पडते. नायक अतिशय हलक्या व भावपूर्ण अंत:करणाचा आहे. तर नायिका सुंदर, सत्वशील, प्रमळ, संयमी कर्तव्यदक्ष आणि विचारी आहे. अतिशय अलगदपणे या दोघांमधील भावबंध विणले जातात. ती हळूहळू घट्ट होणारी वीण वाचकाला मंत्रमुग्ध करते. प्रेमाचा संयमित आविष्कार हा अधिक शृंगारिक असतो याचा प्रत्यय ही कादंबरी वाचताना येतो. बाबांच्या व्यक्तिरेखेतून पाप, पुण्य, प्रेम जीवन परमेश्वर इत्यादी विषयांची वेगळी पण ठाम मते वाचकांपुढे येतात. कथेला आणि व्यक्तीरेखनाला पुष्टी देणारे विचार म्हणून कादंबरीत त्याला विशेष स्थान आहे. कादंबरीतील वातावरण निर्मिती ही लक्षणीय आहे. निसर्गवर्णनाबरोबरच लोकजीवनाचेही चित्रण येथे आढळते. एखाद्या चित्रपटात शोभेल अशा प्रकारचे रहस्यपूर्ण कथानक रंगवून लेखकाने ही छोटेखानी कादंबरी वाचकांच्या मनाला भिडवण्याचा प्रयत्न केला आहे.
-
Sahityikacha Gaon (साहित्यिकाचा गाव)
समाजात वावरणारं साहित्यिकाचं मन सामान्यांपेक्षा अधिक संवेदनशील,चिंतनशील आणि भावनाशील असतं. त्यामुळं इतरांना साध्या वाटणार्या घटनाही साहित्यिकाला मात्र सामाजिकदृष्ट्या अधिक अर्थपूर्ण वाटतात. त्यांच्यावर तो अधिक गंभीरपणे चिंतन करतो. त्याच्या भावनाशील मनाला त्या अधिक खोलवर भिडतात. पुष्कळ वेळा पारंपरिक संदर्भ असलेल्या, सणादी सांस्कृतिक संदर्भ असलेल्या नेहमीच्या घटनांचा महत्त्वाचा उदात्त संदर्भ जनलोक हरवतात. त्यामुळे त्या सणांना विकृती, विपरीत गती प्राप्त झालेली असते. त्या विकृति-विपरीत गतीच्या पलीकडे जाणीवपूर्वक जाऊन त्या सणांचे मूळ जन्म-प्रयोजन शोधते. प्रयोजन कळले की साधे सणही श्रीमंत आणि जिवंत वाटू लागतात. मग ते हवेहवेसे वाटू लागतात. त्यांचे जिवलग, घनिष्ठ नाते संस्कार हरवलेल्या आपल्या मनाला कळते आणि मनही सजग, समृद्ध होते. चांगल्या साहित्याच्या निर्मितीच्या प्रत्यक्षातील जन्मखुणा, घटना-स्थळे यांच्याविषयीची जिज्ञासा सुजाण-सुशिक्षित माणसाला सतत असते. त्या जिज्ञासापूर्तीमुळे साहित्यकृतींची जन्मरहस्ये कळतात, जन्मदात्या साहित्यिकाच्या वृत्ती-प्रवृत्ती समजतात. जिज्ञासापूतीचा निखळ आनंद मिळतो. प्रस्तुत संग्रहात याच (समाज, संस्कृती आणि साहित्य) तीन पैलूंवर आधारित लालित्यपूर्ण शब्दशिल्पे आणि रंगचित्रे समाविष्ट आहेत. रसिकांना ती अंतर्मुख करतील, जगण्याचे उत्कट क्षण देतील, अनुभवसमृद्ध करतील.
-
Indira ( इंदिरा )
३१ ऑक्टोबर, १९८४... सकाळची वेळ. त्या आपल्या बगिच्यातून चालत निघाल्या होत्या. चेहर्यावर स्मितहास्य. दोन्ही हात जोडून नमस्कार करत.इंदिरा नेहरू गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी हत्या केली.त्यांनी आपलं जीवन जसं व्यतीत केलं, अगदी तसाच मृत्यू त्यांना प्राप्त झाला. माणसांच्या गर्दीत असूनही शेवटी एकाकीच एका महानाट्याचा, एका आयुष्याचा हा असा महाभयंकर शेवट झाला. ज्या युगात भारतीय राष्ट्रवादाने जन्म घेतला त्याच युगात इंदिराजींचा जन्म झाला. त्यांचे पिता जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना 'क्रांतीचे अपत्य' म्हणून संबोधले. शरीर, मनाने कणखर अशा इंदिराजींना स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकारणात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावायची आहे, हे मुळी विधिलिखितच होतं. ही भूमिका अंगिकारताना सुरुवातीला त्या काहीशा कचरल्याही होत्या. एकेकाळी शरीरप्रकृतीने नाजूक व स्वभावाने लाजाळू व अंतर्मुख असलेल्या इंदिराजींनी एकदा राजकारणातील ही आपल्यावर पडलेली जबाबदारी स्वीकारली व त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. जगातील सर्वात सामर्थ्यशाली व महत्त्वपूर्ण नेत्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या त्या पंतप्रधान बनल्या, परंतु येथील समाजात धर्मांधर्मांमध्ये दुफळी माजलेली होती. या अवाढव्य देशातील समाजाची मानसिकता समजण्यास अत्यंत क्लिष्ट होती. येथे पुरुषांचे वर्चस्व होते. जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राचे नेतृत्व ज्या स्त्रीने समर्थपणे संभाळले, विसाव्या शतकाच्या इतिहासात ज्या स्त्रीने आपली नाममुद्रा उमटवली व ज्या स्त्रीला 'वूमन ऑफ द मिलेनियम' म्हणून गौरवण्यात आले अशा एका स्त्रीच्या जीवनाचा मागोवा कॅथरीन फ्रँक यांनी येथे घेतला आहे.
-
Lokskha Dnyaneshwar ( लोकसखा ज्ञानेश्वर )
स्वजातीतून कायमचे बहिष्कृत केलेल्या मातापित्यांच्या पोटी जन्माला येऊनही आत्मविश्वासाच्या जोरावर स्वकर्तृत्वाने जीवनाचे सोने करणारा, शेकडो वर्षे सोवळ्या वर्णवर्चस्ववाद्यांनी कर्मकांडात्मक ज्ञानाच्या आणि धर्माधिकाराच्या आधारे शोषण करत उपेक्षित ठेवलेल्या जनसामान्यांच्या समाजाला विधायक नेतृत्व देणारा डोळस नेता, बहुजन समाजाच्या सांस्कृतिक जीवनाला अर्थपूर्ण प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा द्रष्टा, ब्राह्मणापासून भटक्यापर्यंतच्या सर्व समाजाचे कल्याण साधणारे तत्त्वज्ञान निर्माण करणारा ऋषितुल्य तत्त्वज्ञ, निरनिराळ्या जातिजमातींतून संत-संघटक निर्माण करू पाहणारा आणि त्या सर्वांना एकत्र आणून त्यांना आध्यात्मिक शक्तीचे बल बहाल करणारा महात्मा, वर्ण, जाती, कुल इत्यादी भेदभावांच्या, उच्चनीचतेच्या भिंती खिळखिळ्या करू पाहणारा आणि नवसमाज घडवू पाहणारा क्रियावान सुधारक, जनसामान्यांच्या प्राकृत बोलीला साहित्यसिंहासनावर स्वकर्तृत्वाने बसवू पाहणारा श्रेष्ठ साहित्यिक ... म्हणजे 'लोकसखा ज्ञानेश्वर’ !
-
Shekra ( शेकरा )
रणजित देसाईंची अखेरची लघुकादंबरी जंगलातील जीवन हा लघुकादंबरीचा विषय असून शेकरा हा यातील मध्यवर्ती प्राणी आहे. किंबहुना शेकर्याच्या नजरेतून वनजीवन रेखाटणे हे लेखकाचे उद्दिष्ट आहे. शेकरा हा खारीसारखा दिसणारा त्यापेक्षा मोठा असणारा शाकाहारी प्राणी. वनजीवनातील विविध प्राण्यांचे जीवननाट्य न्याहाळत तो जगत असतो. जंगलातील विविध प्राणी, त्यांच्यातील परस्परसंबंध, संघर्ष, सवई, छंद, गुण, दोष इत्यादींच्या सहाय्याने जंगली विश्व साकार होते. या जीवन प्रवासाचा वेध घेत घेत लेखक हळुवारपणे भोवतालच्या रौद्र वास्तवाचा, क्रौर्याचा आणि भीषण नाट्याचा अनुभव घेत राहते. कादंबरीत कोठेही माणसाचा किंवा मानवी जीवनाचा उल्लेख नसूनही मानवी जीवनातील एका भीषण सत्याचे कलात्मक दर्शन वाचकाला घडते.
-
Kachvel ( काचवेल )
सुप्रसिद्ध लेखक आनंद यादव ह्यांच्या संकलित आत्मचरित्रात्मक लेखनाच्या झोंबी, नांगरणी, घरभिंतीनंतरचा हा अखेरचा टप्पा. ह्या लेखनाची पहिली आवृत्ती १९९७ मध्ये प्रसिद्ध झालेली आहे. जवळजवळ तोपर्यंतच्या तत्पूर्वीच्या त्यांच्या जीवनातील वीस-एक वर्षांचा कालखंड ह्या लेखनात आला आहे. म्हणजे जीवनसंघर्षाचा हा उत्तरार्ध आहे. त्यात काहीशी जीवनस्थिरताही आहे. आणि भविष्यवेधही. यादव प्रतिकूलतेतून अनुकूलतेत आले आहेत आणि वाचकांनी भरभरून दाद दिली असे त्यांचे लेखनही झाले आहे, यादव नुसते लिहीत बसले नाहीत तर साहित्यविश्वही ढवळून काढले आहे. त्याचे मनोज्ञ दर्शन ह्या लेखनात घडते आहे. जे आपण बघितले, अनुभवले ते नेमके काय ह्याचा आनंद देणारे हे आनंद यादव ह्यांचे लेखन आहे. सोप्याच्या भुईवर ग्रामीण भागात काकणांच्या काचकुड्यांनी 'काचवेल’ काढण्याची एक लोकप्रथा आहे. ग्रामीण भागातून आलेल्या आनंद यादव हयांनीही आपल्या स्वकहाणीबद्दल हे असेच 'मनोहर’ काम केले आहे.