-
Selective Memories
शोभा डे हे नाव बहुचर्चित. कोणत्या ना कोणत्या जगावेगळ्या वागण्यामुळं शोभा डे नेहमीच वादग्रस्त ठरल्या आहेत. 'स्फोटक आणि खळबळजनक’ या शिक्याआड दडलेल्या एका संवेदनशील सच्च्या व्यक्तीचं दुर्मिळ दर्शन 'सिलेक्टिव्ह मेमरी’मधून वाचकांना घडत जातं. अपरिचित वाटांवर हट्टानं, आत्मविश्वासानं पाय रोवणारी, आपल्या व्यक्तिमत्त्वाला नवनवे आयाम जोडणारी खंबीर, आत्मनिर्भर स्त्री वाचकांना झपाटून टाकते. एका ग्लॅमरस व्यक्तीचं विलक्षण पारदर्शी रूप वाचकांना नाविन्याचा अनुभव देते. शोभा डे यांच्या मूळ पुस्तकाचा आत्मा ओळखून आपल्या स्वतंत्र भाषेत अपर्णा वेलणकर यांनी त्याचा अत्यंत रसाळ अनुवाद मराठी वाचकांसाठी सादर केला आहे. शोभा डे यांच्या या मोजक्या अघळपघळ आठवणीत मॉडेलिंगच्या करिअरमधील लोक विलक्षण अनुभव आहेत. 'स्टारडस्ट’ चालवताना दिसलेली नटनट्यांच्या स्वभावप्रवृत्तीची विविध रूपे आहेत. कौटुंबिक जीवन, वृत्तपत्र स्तंभलेखन, कादंबरीलेखन याबाबतचे कसदार अनुभव आहेत. आपले सर्व अनुभव अलिप्तपणे परंतु रंजकतेने सांगण्याची भाषिक क्षमता असल्याने 'सिलेक्टिव्ह मेमरी' विलक्षण भावनांचा पट वाचकांपुढे खुला करते. या स्मरणयात्रेत विविध क्षेत्रातील दंभ, ढोंग उघड झालेले आहे. आपल्या निर्भिड, रोखठोक शैलीत स्वत:चा व अनुभवलेल्या सर्व मार्गाचा घेतलेला वेध म्हणजे 'सिलेक्टिव्ह मेमरी'.
-
Agatha Christie And The Eleven Missing Days
रहस्यकथांची सम्राज्ञी अगाथा ख्रिस्ती यांचं हे चरित्र आहे. मात्र ते केवळ तिच्या आयुष्यातल्या अकरा दिवसांविषयीच आहे. रहस्यकथांची सम्राज्ञी अगाथा ख्रिस्ती यांचं हे चरित्र आहे. मात्र ते केवळ तिच्या आयुष्यातल्या अकरा दिवसांविषयीच आहे. हे अकरा दिवस अगाथा आपल्या घरातून बेपत्ता होऊन एका हॉटेलमध्ये गुपचूप राहिली होती. अगाथा बेपत्ता का झाली आणि सापडली कशी याची कहाणी सांगणारी अनेक पुस्तके लिहिली गेली. पण जेरेड केड यांनी या पुस्तकातून अगाथाच्या बेपत्ता होण्यातलं खरं रहस्य शोधून काढलं. या पुस्तकावर बीबीसीने लघुपटही केला होता. नव-याशी होऊ घातलेल्या फारकतीमुळे रागावून त्याच्यावर सूड उगवण्यासाठी अगाथाने बेपत्ता होण्याचे नाटय़ रंगवले खरे, पण त्यात तीच फसली. कारण त्यावर ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी मोठी खळबळ उडवून दिली. अगदी संसदेतही त्यावर प्रश्न विचारले गेले. हे पुस्तक जेरेड यांनी भरपूर कष्ट घेऊन आणि संधोधन करून लिहिलं असलं तरी मूळ घटना एवढी छोटी आहे की, त्यासाठी पुस्तकाचा खटाटोप जरा जास्त वाटू शकतो. शिवाय ज्यांना अगाथा माहीत आहे, त्यांनाच या पुस्तकाबाबत विशेष आस्था असू शकते. अंबिका सरकार यांचा अनुवाद मात्र अतिशय नेमका आणि सफाईदार झाला आहे.