-
Karyarat
अनिल अवचट यांचे `कार्यरत’ हे सोळावे पुस्तक. कार्यहीनता, भ्रष्टाचार, अविवेकी राजकारण यांनी काळोखलेल्या वातावरणात हे काही आशेचे किरण. या पुस्तकातील माणसे समाजातल्या प्रश्र्नांवर सर्वस्व झोकून देऊन काम करणारी. प्रसिद्धीच्या झोताबाहेर राहून समाजासाठी वेगळ्या वाटा शोधणारी.आदिवासींमधे काम करणारी सुरेखा दळवी, विंचूदंशावर इलाज शोधणारे बावस्कर, तुंगभद्रा नदीच्या पर्यावरणाच्या नाशाविरुद्ध लढणारे हिरेमठ, दुष्काळी भागात प्रतिसृष्टी निर्माण करणारे अरुण देशपांडे आणि काका चव्हाण, आणि गडचिरोलीतील आदिवासींमधल्या आरोग्याच्या प्रश्र्नांवर उत्तर शोधणारे अभय व राणी बंग, यांच्या कामाकडे, चारित्र्याकडे पाहिलं तर जगायची नवी उभारी येते. सर्वच काही संपलं नाही, याची ग्वाही, या पुस्तकातली माणसं पानापानावर, वाक्यावाक्यात देत राहतात.
-
Vanat Janat
जवळच्या टेकडी परिसरात फिरायला जायचो, तेव्हा तिथल्या झाडांशी, वेलींशी, पायवाटेशी मी मनातल्या मनात बोलू लागलो आणि त्याची गंमत वाटू लागली. या झाडांच्या, वेलींच्या, दगडांच्या, कोळीकीटकांच्या दृष्टीने जग पाहू लागलो. मी त्यांना शब्द दिले, संवाद दिले, ते माझ्याशी बोलू लागले. खरं तर मीच माझ्याशी बोलू लागलो होतो. लहान मुलांमध्ये जशी `फॅंटसी’ असते, तिने उतारवयात माझ्यात प्रवेश केला आणि मीही परत लहान झालो. या गोष्टींनी मला खूप खूप दिलंय. बालपण तर दिलंच. माणसांच्या सुखदुःखांकडे आजवर पाहत होतो आता त्या पलीकडच्या सृष्टीला काय म्हणायचंय तो आवाज ऐकू लागलो आणि भराभरा लिहीत गेलो. `सृष्टीत… गोष्टीत’ या पहिल्या गोष्टींना छान प्रतिसाद मिळाला. नंतरच्या काळात लिहिल्या गेलेल्या या पन्नास गोष्टी. त्याही तुमच्यापुढे ठेवीत आहे.
-
America
अमेरिकेहून आल्यावर वाटलं, बरं झालं आपण जाऊन आलो ते. वेगळा समाज, वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली. वेगळा पाया, वेगळे संकेत असलेला समाज अस्तित्वात असू शकतो. हे आधी जाणवलं नव्हतं. वाटायचं, आपल्यासारखंच तिथं. फक्त जरा श्रीमंती थाटाचं. पण तसं ते नव्हतं. ते वेगळंच होतं आणि ते पाहणं फार आवश्यक होतं. कारण ते आपल्याकडे येऊ घातलंय आणि तेही अधिक विकृत स्वरूपात. उद्या आपल्याकडे काय प्रश्र्न असणार आहेत, याचा अंदाज आजची अमेरिका पाहून लावता येतो.
-
Sonayachya Dhurache Thaske
सौदी अरेबियासारख्या अत्यंत प्रतिकूल हवामानाच्या, कट्टर इस्लामी राज्यात उपेक्षा, अन्याय नि हालअपेष्टा सहन करत, आयुष्यातील उमेदाची पंचवीस वर्षे वास्तव्य करणार्या डॉ. उज्ज्वला दळवी यांनी त्या देशाच्या अंतरंगात शिरून, ते उकलून आपल्यापुढे ठेवले आहे. सहजसुंदर लिखाणामुळे वाचकप्रिय ठरले आहे.
-
Sangatye Aika
एक प्रकारच्या निरागस वृत्तीने हंसाबाई आपल्या जीवनाकडे पाहात आहेत व त्याचे कथन करीत आहे. ह्या सर्वच कथनातून व्यक्त होणारा उदार समंजसपणा - ह्या समंजसपणाला सर्वत्र दुःखाची किनार आहे- 'सांगत्ये ऐका' या आत्मकथनाची पातळी एक सारखी उंचावीत आहे, बरेचसे अबोल असलेले हे हंसाबाईंचे आत्मचरित्र अत्यंत बोलके आहे. मराठीत आत्मगौरव, आत्मसमर्थन, आत्मस्पष्टीकरण, आत्मप्रदर्शन ह्या उद्देशांनी लिहिलेली आत्मचरित्रे बरीच आहेत. ह्यांतील अनेकातून व्यक्त होते ती विलक्षण आत्मसंतुष्टता. हंसाबाईंच्या आत्मकथनाला आत्मसंतुष्टतेचा दुर्गंध कसा तो येत नाही. सुगंध येतो तो दारुण असमाधानाचा. आपल्याच जीवनाचे सत्य आपणच अवलोकणे सोपे नसते. हे अग्निदिव्य हंसाबाईंनी केले आहे. यशाचा अभिमान नाही. भोगल्याचं दुःख नाही; अशा निःसंग निरामयतेमुळेच काळजाला भिडणारं हंसा वाडकरांचं आत्मचरित्र.
-
Kabuliwalyachi Bangali Bayko
बंगाली ब्राह्मण कुटुंबातील एका सुशिक्षित मुलीनं, सर्वांचा विरोध झुगारून, एक परदेशी मुसलमान तरुणाशी लग्न केलं आणि सासरच्या माणसांना भेटण्यासाठी अफगाणिस्तानातील एका लहानशा गावात ती मोठ्या विश्वासानं गेली. पण तिथं गेल्यावर तिच्या लक्षात आलं की ह्या देशात येण्यासाठी रस्ता आहे. पण जाण्यासाठी नाही. तिथली सगळीच माणसं वाईट नव्हती; पण काही लबाड, स्वार्थी माणसांमुळे तिला तिथं बंदी होऊन राहावं लागलं. आठ वर्षांच्या ह्या बंदिवासात तिला आलेले भलेबुरे अनुभव, तिथलं साकळलेलं जीवन आणि तालिबानसारख्या धर्मांधांबरोबर निकराचा विरोध करून भारतात पळून येताना सोसावा लागलेला भयंकर थरार ह्यांची ही कहाणी. तिच्या जीवनाची ही करुण कहाणी वाचताना आपणही गोठून जातो.
-
Jave Tichya Vansha
मराठीतील जुन्या नव्या कथाकारांच्या गर्दीत काही नावे आरंभापासूनच वेगळी उमटून पडली, त्यात प्रिया तेंडुलकर हे नाव येते. हा त्यांचा तिसरा कथा-संग्रह. ज्याचा त्याचा प्रश्न, जन्मलेल्या प्रत्येकाला हे आधीचे. सहसा पांढरपेशा वाचकाला न भेटणारे अनुभव, त्यांची थेट व आरपार हाताळणी, कथेतील रौद्र नाट्य हेरून ते साक्षात समोर उभे करण्याचे सामर्थ्य आणि मानवी मनातला हळवा गुंता हळुवार हाताने सोडवून तो नेमका मांडण्याचे कौशल्य ही या कथांची वैशिष्ट्ये. मात्र जीवनाकडे - यात स्त्री-जीवन आले - पाहण्याची स्वत:ची एक स्वतंत्र दृष्टी हे या लेखनाचे मोठे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या कथांहून उजव्या कथा मराठीत भेटतील. या कथांहून डाव्या कथांचीही उणीव नाही. मात्र या कथांसारख्या कथा मराठीत फक्त प्रिया तेंडुलकर याच लिहू शकतात म्हणून या कथा-संग्रहाचे महत्त्व.