-
Cheers
वपु म्हणजे एका वेगळ्याच संवेदनशील नजरेनं जग पाहणारा मनस्वी माणूस. भेटलेल्या प्रत्येक माणसातला खास वेगळेपण वपु एक वपुंनी लिहिलेली व्यक्तिचित्रं सामान्य माणसाचीच पण तरीही स्वप्नील दुनीयेतील वाटतात. कारण त्याकडे पाहण्याची वपुंची दृष्टीच मुळी विशाल आणि फक्त सुंदर ते टिपणारी असते. नाना नेरुरकर हे आज आख्ख्या मुंबईतच काय महाराष्ट्रालाही माहीत असलेले व्यक्तिमत्त्व पण वपुंच्या नजरेतून घडलेलं नेरूरकरांचं दर्शन लाजजवाब ! सुधीर मोघ्यांच्या कवितांनी, गाण्यांनी भारून जाणारे अनेक रसिक असतील पण कवितेतून त्याच्यातला 'माणसाचा’ शोध घेणारे व त्यांच्या भेटीसाठी तळमळणारे फक्त वपुच ! 'चिअर्स’ मधून आपल्याला अशीच माणसं भेटतात वपुंशी त्यांचं असलेलं सुंदर, निर्मळ नातं आपल्याला सुखवून जातं. असं नातं, अशी माणसं आपल्यालाही भेटावी अशी इच्छा वाचताना निर्माण होते. माणसाचे विविध रंग, छटा, यांचं इंद्रधनुष्यी दर्शन घडणारे पुस्तक.
-
Vapurza
व. पु.काळे ह्यांचे हे पुस्तक. कथा-कादंबरी वगैरे कोणत्याही प्रचलित साहित्यप्रकारात बदलता येणारे नसले तरी वपुस्पर्श झालेला हा वैविध्यपूर्ण लेखनगुच्छ असा आहे की वाचकांनी भरभरून दाद दिल्याने गेल्या बावीस वर्षांत त्यांचे सतरा वेळा पुन:पुन्हा मुद्रण करावे लागले आहे. एकाचा दुसर्याशी संबंध नसलेल्या तरीही त्यांच्यात एक धागा असलेल्या अनेक ढंगी परिच्छेदांची सुरेख गुंफण ह्या पुस्तकात गुंफण्यात आली आहे. त्यामुळेच आपल्या इच्छेनुसार हाताला लागेल ते पान उघडावे आणि त्या पानावरील लिखाणात मग ती एखादी छोटीशी गोष्ट असो वा मोजक्या शब्दात सांगितलेला तो एक विचार असो रंगून जावे असे हे पुस्तक आहे. हा एक मुक्त आनंद आहे म्हणूनच त्याला शीर्षक-क्रमांक-संदर्भ वगैरेचे बंधन नाही.
-
Khilli
"प्रस्तुत पुस्तकातल्या सर्व व्यक्ती व प्रसंग काल्पनिक आहेत. प्रत्यक्षातल्या व्यक्तीशी अगर प्रसंगांशी साम्य आढळल्यास तो योगायोग मानावा." अशी एक पळवाटवजा सूचना पुष्कळ नाटक-कादंबर्यांत असते. ह्या पुस्तकातल्या लेखात आलेले प्रसंग काल्पनिक असले तरी व्यक्ती काल्पनिक वगैरे नाहीत. वास्तवातल्याच आहेत. आता त्यांच्यापैकी बर्याच जणांना लाभलेलं मोठेपण अवास्तव आहे ही गोष्ट निराळी. तेव्हा त्या लेखात आलेल्या व्यक्तींचे प्रत्यक्षातल्या माणसांशी वाचकांना साम्य आढळले तर तो अकल्पित योगायोग वगैरे मानू नये. अतिशयोक्ती हे विनोदाचे महत्त्वाचे अंग मानले जाते. पण ह्या नेतेमंडळींची वक्तव्ये आणि कृती ह्यातली अफाट विसंगती पाहिल्यावर कितीही अतिशयोक्ती केली तरी थिटीच पडेल अशी भीती वाटते. ह्या व्यक्तीच आता कल्पनेतून वास्तव्यात उतरलेल्या चालत्या-बोलत्या व्यंगचित्रांसारख्या दिसायला लागल्या आहेत. ह्या पात्रांमुळे सार्या सार्वजनिक जीवनाचंच एक विराट प्रहसन झालं आहे. ह्या नित्य नव्या ढंगात चाललेल्या प्रहसनाच प्रहसन कसे लिहायचे ? बरे, सतत खुर्चीबाजीत दंग असलेल्या ह्या भिडूंचे आणि त्यांच्या आचार, विचार आणि उच्चाराच्या लीळांचे रंग हे तेरड्या-सरड्यालाही लाजवणारे. त्यामुळे त्यांच्या क्षणोक्षणी बदलत्या कर्तृत्वाची चित्रेही रांगोळीसारखी फुंकरीसरशी उडून जाणारी. त्यातून पब्लिकची आठवणही फारशी टिकाऊ नसते. त्यामुळे तात्कालिक राजकीय संदर्भ असलेले हे लेखन वर्तमानपत्री लिखाणासारखे. यातले बरेचसे लेख महाराष्ट्र टाइम्समधून प्रसिध्द झाले आहेत. असल्या अल्पजीवी व्यंग-लेखांच्या पानांची जुडी बांधावी की बांधू नये हेही ठरवता येईना. वास्तविक यापूर्वीच तराजूवत तोलून रद्दीवाल्यांनी त्यांचं मूल्यमापन केलं आहे. आता पुस्तकरूपाने ते लेख आल्यावर रद्दीवाल्यांना पुन्हा एकदा पर्वणी आली असं न वाटो हीच इच्छा. मधुकाका कुलकर्णी ह्यांनी या लेखांना ग्रंथरूप द्यायची जोखीम पत्करल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.
-
Purvrang
९६३ साली ‘पूर्वरंग’ची पहिली आवृत्ती प्रसिध्द झाली. आणि आता श्रीविद्या प्रकाशनतर्फे तिसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे. तिसर्या आवृत्तीच्या निमित्ताने माझे हे पुस्तक वाचताना वाटले की पुन्हा एकदा ह्या देशांतून हिंडून यावे. ज्या स्थळांची मनावर त्या काळी उमटलेली चित्रे आजही ताजी आहेत ती स्थळे पुन्हा एकदा पाहून यावे. पण असेही वाटले की न जाणो मनावर उमटलेली त्या काळातली चित्रे आणि बदललेल्या परिस्थितीत आज ती ठिकाणे ज्या स्वरूपात उभी आहेत ती चित्रे जर एकमेकांशी जुळली नाहीत तर उगीचच खंत वाटेल. ती ठिकाणे बदलली तसा गेल्या पंधरा-सोळा वर्षांच्या काळात मीही बदललो असणार. आज ही ठिकाणे पाहणार्यांना माझ्या पुस्तकातून येणारा प्रत्यय प्रत्यक्षात येणारही नाही कदाचित ! पण त्याला इलाज नसतो. म्हणून त्या काळी पाहिलेले ते ते देश, ती ती स्थळे आणि तिथे भेटलेली माणसे ह्या पुस्तकात तशीच राहू देणे चांगले असे मला वाटते. असो. ह्या नव्या आवृत्तीचे प्रकाशक श्री. मधुकाका कुलकर्णी यांचा मी आभारी आहे.
-
Apurvai
आजवर कुठल्याही शिंप्याने माझे कपडे बिघडवल्याचे माझ्या स्मरणात नाही. कारण कपडे बिघडतात म्हणजे नक्की काय होते हे मला कपडे घालायला लागल्यापासून इतकी वर्षे लोटूनदेखील अजूनही उमगले नाही. परंतु इंग्लंडमध्ये कपड्यांच्या बाबतीत दक्षता घेतली पाहिजे हे असंख्य लोकांनी बजावल्यामुळे जाणकार मित्रांच्या सल्ल्याने चिनी चांभाराच्या नजीकचाच, फक्त विलायतेला जाणार्या लोकांचे कपडे शिवणारा शिंपी शोधावा लागला. ह्या सदगृहस्थाची माझ्या बाबतीतली भावना काही निराळीच दिसली. प्रथम मी विलायतेला जाणाऱ्या मंडळीपैकी आहे ह्या घटनेवर त्याचा विश्वासच बसेना. दुसरी गोष्ट विलायतेला त्याने शिवलेले सूट हिंडत असल्याच्या जोरावर तो कापड फाडल्यासारखे इंग्रजी फाडत होता. मी त्याच्याशी हिंदी बोलत असूनही त्याने इंग्रजी आवरले नाही. अर्थात माझे हिंदी त्याच्या इंग्रजीइतकेच बिन अस्तराचे होते हा भाग निराळा ! तीसरी गोष्ट म्हणजे त्याने प्रथम मापाला हात घालण्याऎवजी लंडनला आपले सूट अनेकांनी काय काय अभिप्राय व्यक्त केले आणि पिकॅडिली. सर्कसवाले शिंपीदेखील आपण शिवलेला सूट घातलेल्या हिंदी तरुणांना वाटेत अडवून शिंप्याचे नाव कसे विचारतात इत्यादी गोष्टी काही कारण नसताना सांगितल्या. (अनुभंवाती हे खोटे ठरले.) मी त्याचा सूट घालून पिकॅडीच्या शिंप्याचा दुकानांपुढून अनेक वेळा गेलो! मला फक्त त्याने शिवलेला काळा जोधपुरी कोट घालून जाताना एका गोर्या कामगाराने काळा पाद्री समजून हॅट काढून नमस्कार केला! मापे घेताना तर ह्या विलायती सुटाच्या तज्ज्ञाने माझे खांदे कसे वाकडे आहेत, (असतील, पण हे सांगण्याची गरज काय होती?) माझे पोट व छाती एकाच मापाची कशी आहे, माझ्या मानेला ‘शेप’ कसा नाही व चालताना माझ्या त्या शेप नसलेल्या मानेला पोक कसे येते, वगैरे फालतू परिक्षणे केली. अनेक वेळा मला ‘ट्रायल’ला बोलावले. इंग्रजीत गुन्हेगाराच्या चौकशीला ‘ट्रायल’ हाच शब्द का वापरतात हे मला इतक्या वर्षानंतर ह्या शिंपीदादाच्या दुकानात कळले. प्रत्येक ‘ट्रायल’ म्हणजे ट्रायलच होती. दर वेळी तो माझ्या अंगावर काही ठिगळे चढवी आणि ‘नो नो, युवर ट्मी ! ओ ---- युवर लेफ्ट शोल्डर शॉर्टर दॅन राइट...’ असे पुटपुटून माझ्या अंगावर आपल्या हातातल्या खडुने रेघोट्या ओढी ! शेवटी एकदाचा सूट झाला. तो मी अंगावर चढवून अपराध्यासारखा त्याच्यापुढे उभा राहिलो आणि.... ‘तुमचे सगळे डिफेक्टस मी खुबीने झाकले आहेत; आता खुशाल हा सूट घालून लंडनमध्ये फिरा तुम्हाला मरण नाही’--- असा निकाल देऊन जवळजवळ अर्धसहस्त्र रुपयांनी माझा जुना खिसा रिकामा केल्यावर त्याच्या आत्याची शांती झाली आणि एकदाचा मी ‘सुट’लो.
-
Chakatya (चकाटया)
शिवाजीमहाराजांच्या हस्ताक्षराने मास्तर व बाबांकडून खिंडीत सापडलेला मोरेश्वर... जगबुडीचा प्रलय आला; पण तो गावापर्यत पोहचलाच नाही... भुतालाही न घाबरणारे बाबा उंदराला घाबरतात तेव्हा... दगडू व बाबूचा फोटो तर काढला, पण त्यांची छबी त्यात उमटलीच नाही... ‘स्वभाव’ तो कोणाचाही असो, मग तो शेजारणीचा असेल तर... जागेवर न जाता केला जाणारा पोलीसतपास... घराला रंग दिला; पण तो पेंटर नव्हे?... शेतातून नवा रस्ता जाऊ नये म्हणून एकनाथला करावी लागलेली तडजोड... ढग कसे तयार होतात?... ग्रहण म्हणजे काय?... या सोप्या प्रश्नांची उत्तरं ‘बाबांच्या अभ्यास’ मध्ये मिळतात. अशा गावगप्पांमधून तयार झालेला ‘गावरान मेवा’ द.मा. मिरासदारांनी आपल्या खास विनोदीशैलीतून ‘चकाट्या’ मध्ये मांडला आहे.
-
Gappangan (गप्पांगण)
गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार वरचा माणूस खाली येतो; पण खालचा मनुष्य एकदम वर जातो, तो फक्त – सिनेमातच! गागाभट्टांनाही अवकाशात पाठवण्याचे सामथ्र्य एकाच व्यक्तीत असू शकते, तो म्हणजे – ‘मंत्री’! श्रोते नसले तरी वक्ता हा असतोच; अशी एकच सभा असते – निवडणुकीची! रम्य बालपणात ही विलक्षण सृष्टी आपण पाहत बसतो. नव्हे, त्याच जगात आपण जगत असतो, ती दुनिया असते – भुतांची! जुन्या कादंबरीत आढळणाया या देवीची आराधना आपल्या प्रत्येकालाच करावी लागते, ती म्हणजे – निद्रादेवीची! शहाण्या माणसाने ही पायरी कधी चढू नये असे म्हणतात; ती म्हणजे – कोर्टाची! या कलेचे एक शास्त्र असते, नियम असतात, ती कला म्हणजे – लाच देणे! हे सर्वश्रुत अनुभव; लेखांच्या माध्यमातून द. मा. मिरासदारांनी वाचकांसमोर मांडले आहेत. वाचकांशी साधलेला हा संवाद; हेच या ‘गप्पांगण’चे विशेष आहे.
-
JawaiBapunchya Goshti (जावईबापूंच्या गोष्टी)
जावईबापू म्हणजे राजबिंडेच! पण त्यांच्या डोक्यात काय भरले होते, कुणास ठाऊक! कांदे-बटाटे की नर्मदेतले गोटे? अशा ह्या उडाणटप्पू जावईबापूंचे एकदाचे लग्न झाले. दिवस पालटू लागले. दिवाळी आली. आणि जावईबापूंना सासर्यांकडून दिवाळसणाचे आमंत्रण आले. वडिलांनी त्याला सांगितले, ङङतू त्यांचा जावई आहेस ना? दिवाळसण गेण्यासाठी त्यांनी तुला बोलावलं आहे.छछ जावईबापूंच्या रिकाम्या डोक्यात एकदम बत्ती पेटली. आपल्या अकलेचे दिवे तो पाजळू लागला. वडिलांनी त्याला पढवून-पढवून सासुरवाडीला पाठवले. त्यानंतरच्या झालेल्या धमाल गोष्टी वाचा जावईबापूंच्या गोष्टी मध्ये.
-
Navetil Tin Pravaci (नावेंतील तीन प्रवासी)
रूटीन लाईफमुळे आलेला कंटाळा घालविण्यासाठी तीन मित्र एक अनोखी योजना आखतात... नावेतून प्रवास करण्याची. या नावेतून प्रवास करताना, आपल्याला केवळ भौगोलिक स्थित्त्यंतरंच जाणवतात असे नव्हे; तर निसर्गातील विविध रंगछटा, मानवी स्वभावातील वौविध्य आणि वौगुण्यामुळे होणारी फजिती... या सर्वांची अनुभूती मिळते; नावेतील सहप्रवासी बनून!
-
Sarmisal (सर मिसळ)
महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यात जसे एक मारुतीचे देऊळ असते, एक पार असतो, एक ओढा असतो, त्या मातीत पिकणारे खास पीक असते; तसा गावरान विनोदही असतो. गावओढ्यासारखाच तो सतत खळाळत असतो आणि हरेक पाण्याची चव वेगळी, तशी या विनोदाची चवही वेगळी असते, खास असते. भंपक माणसांनी मारलेल्या बढायांतून, अडाण्यांच्या आणि अश्रापांच्या सहज वागण्यातून, बेरकी लोकांच्या गप्पांतून, जुन्या माणसांच्या आठवणींतून, तरण्यांच्या हुंदडण्यातून विनोद उसळ्या घेत असतो. रोज हसावे असे काही घडत असते. उत्तम म्हणून गाजलेल्या मिरासदारांच्या कथांतून हा गावरान विनोद अगदी जसाच्या तसा आढळतो.
-
Bendbaja (बेंडबाजा)
अडाणीपणा, बेरकीपणा, मूर्खपणा, भोळसरपणा इ. माणसांचे "सदगुण` म्हणजे विनोदी लेखनासाठीचा कच्चा मालच. ग्रामीण आणि नागर दोन्ही भागात हा कच्चा माल भरपूर प्रमाणात असतो. प्रत्येक विनोदी लेखकामागे एक मिश्किल माणूस दडलेला असतो आणि तो हा कच्चा माल बरोब्बर हेरून त्यातली विसंगती खेळकर पद्धतीने शब्दबद्ध करतो. पंढरपूरसारख्या अर्धग्रामीण भागात बालपण घालवलेल्या द..मा. मिरासदारांना असा कच्चा माल भरपूर प्रमाणात गवसला असल्यास नवल नाही. अशा "सदगुणी` माणसांचे वेचक अनुभव ते आपल्या खुमासदार शौलीत कथन करतात. तेहा सामान्यांना अगदी साध्या सुध्या वाटणाया"ना सुद्धा मजेशीर परिमाण घेऊन आपल्यासमोर येतात. द.मां.च्या लेखनाचे एक वौशिष्ट्य असे की ते केवळ इतरांच्याच अनुभवाकडे मिश्किल नजरेने पाहतात असे नहे, तर स्वत:चीही फिरकी घेतात. अशा स्वत:च्या घेतलेल्या अनेक फिरक्यांचे हसवणारे सूर या "बेंडबाजा` मधुन ऐकू येतील.
-
Khade Aani Orakhade (खडे अणि ओरखडे)
राजकारण हे काही मिरासदारांचे क्षेत्र नाही. दैनंदिन राजकारणाशीही त्यांचा संबंध नाही. दैनंदिन वृत्तपत्रे वाचून आणि क्वचित प्रसंगी राजकीय नेत्यांची भाषणे ऐकून सामान्य माणसाला जे काही राजकारणाचे ज्ञान होते, तेवढेच त्यांचे ज्ञान आहे; पण पिंड विनोदी लेखकाचा आहे. माणूस नावाच्या प्राण्याबद्दल प्रचंड कुतूहल आहे. राजकारणातील माणसाकडेही याच कुतूहलाने ते पाहतात. त्यामुळे या क्षेत्रातल्या अनेक प्रकारच्या विसंगती आणि हास्यकारक घटना, वक्तव्ये याकडे त्यांचे लक्ष जाते. त्यातूनच या स्वरूपाच्या लेखनाचा किंवा टीकाटिप्पणीचा जन्म झाला. विडंबन, उपहास, अतिशयोक्ती, उपरोध या विनोदाच्या भात्यातील अस्त्रांचा वापर यात त्यांनी विपुलतेने केला आहे.
-
Sutti Ani Itar Ekankika (सुट्टी अणि इतर एकांकिका)
शाळेतील शिक्षक खोली मधल्या सुट्टी पूर्वीचा तास, शिक्षकांमध्ये चाललेले संभाषण. कोणीतरी मेल्याची बातमी येते आणि मधल्या सुट्टीच्या घंटेपर्यंत शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या तर्कवितर्काना कसे तोंड फुटते ते पाहा "सुट्टी` या एकांकिकेत. दवाखाना थाटला, पण रोगीच नाहीत. का येत नाहीत? कोणामुळे येत नाहीत. की गावात सर्वजण निरोगी आहेत? आपल्याला सापडतील, याची उत्तरं "निरोगी दवाखान्यात`... फर्स्ट क्लासच्या वेटिंग रूममध्ये प्रा. डोके प्रवेश करतात निवांत वाचन किंवा झोपण्यासाठी. पण त्यांना असा वाचनासाठी निवांतपणा, झोपण्यासाठी शांतपणा मिळतो का? पाहा "फर्स्ट क्लास वेटिंग रूम`मध्ये ... तालुक्याच्या शाळेचा निकालाचा दिवस. मुख्यायापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांना भेटायला येणाया माणसांकडून कशा निकालाबाबतच्या मागण्या असतात. वाचा "निकाल`मध्ये.
-
Porvay
गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोरांच्या ‘छेलेबेला’ ह्या आत्मकथनाचं ‘पोरवय’ हे मराठी भाषांतर आहे. वयाची ऐंशी वर्षं उलटून गेल्यावर ह्या कथनातून त्यांनी आपलं पोरवय उभं केलं आहे. पोरवयातल्या डोळ्यांनी जे पाहिलं, जे अनुभवलं, त्याची ही संस्मरणं आहेत. त्या काळी त्यांचा ज्यांच्याशी संबंध आला, लोभ जडला, त्या आप्तस्वकीयांची, गुरुजनांची, सेवकांची, जोराशांको येथील त्यांच्या भव्य वास्तूची, तिथल्या पुष्करिणीची, वृक्षलतांची, गच्चीत संध्याकाळी जमणार्या काव्य-शास्त्र-विनोदाच्या मैफिलींची रवीन्द्रांनी हळुवार शब्दांनी रेखाटलेली ही स्मृतिचित्रं आहेत. मराठी वाचकाला पोरवयातील रवीन्द्रांचं दर्शन घडावं ह्या हेतूनं मी हे भाषांतर केलं आहे. हे करताना बंगाली भाषा, साहित्य, संस्कृतीशी एकरूप झालेल्या श्री. अशोक शहाणे ह्यांनी या कामात मला खूप मदत केली. भाषांतर शक्य तितक निर्दोष व्हावं यासाठी त्यांनी कटाक्ष बाळगून मला सतत मार्गदर्शन केलं. हे भाषांतर करीत असताना बंगाली भाषेतील बारकावे समजून घेणं हा एक आनंददायक अनुभव होता. "प्रौढत्वीं निज शैशवास जपणें बाणा कवीचा असे" असं केशवसुत म्हणून गेले. ते जपणं किती हृदयस्पर्शी असतं याचं ‘पोरवय’ हे एक सुंदर उदाहरण आहे.
-
Pu.L.Ek Sathavan
पु. ल. देशपांडे यांच्या उत्कृष्ट साहित्यातून निवडलेले सर्वोत्कृष्ट साहित्य विनोदी लेख / कथा / नाट्य / व्यक्तिचित्रे / प्रवासचित्रे / पत्रे / भाषणे यातले जवळजवळ निम्मे साहित्य पुलंच्या इतर कुठल्याही पुस्तकात प्रसिद्ध झालेले नाही. हे पुस्तक म्हणजे पु. ल. देशपांडे यांचा अभिरुचिसंपन्न, सुखद सहवास.
-
Gun Gayen Aavadhi
माझ्या कुंडलीत ज्योतिष्यांना न दिसणारा एक फार मोठा भाग्ययोग आहे. मला प्रत्यक्ष किंवा असामान्य कर्तृत्वाच्या रूपाने अप्रत्यक्ष भेटलेली माणसे हे ह्याच भाग्ययोगाचे फळ आहे. त्यांपैकी काही माणसांचे हे गुणगायन आहे. त्यांच्या गुणांची आरास माझ्या अंत:करणात सदैव मांडलेली असते. पण ज्याच्यामुळे त्यांचे स्मरण अधिक तीव्रतेने व्हावे, असेही प्रसंग येतात. कधी त्यांच्या निधनाच्या दु:खाने गळणार्या अश्रूंच्या जोडीनेच ते शब्दचित्र रेखाटले जाते, तर कधी त्यांच्या पन्नासाव्या किंवा साठाव्या वर्षगाठीच्या दिवशी त्यांना जाहीर अभिवादन करावेसे वाटते. लोहियांवरचा लेख हा त्यांच्या लेखसंग्रहाला प्रस्तावना म्हणून लिहिला गेला आहे. मात्र हे गुणगान केवळ प्रासंगिक नाही. माझ्या मनाने लावलेल्या निकडीतून ही शब्दचित्रे तयार झाली. ह्यांतली अण्णासाहेब फडक्यांसारखी काही माणसे हयात असताना मी त्यांची शब्दमूर्ती घडवायचा प्रयत्न केला. आता अण्णा नाहीत. भास्करबुवा किंवा गडकरी ह्यांना मी कसा पाहणार? पण माझ्या लेखी मात्र ही सारी माणसे जिवंत आहेत. त्यांतल्या एखाद्याच्या कलेतून, नि:स्वार्थ जगण्यातून, निरपेक्ष स्नेहातून, सुरांतून, ग्रंथांतून, गीतांतून किंवा व्यक्तिमत्त्वाच्या एखाद्या देखण्या पैलूतून मला लाभलेला आनंद जिवंत आहे. त्या अरूप आनंदाला मी रूप देण्याचा प्रयत्न केला आ. ह्या गुणवंतांचे स्मरण मला फार मोठी कृतार्थता देत आले आहे. अशा कृतार्थतेच्या क्षणी मी नतमस्तक होऊन अज्ञाताला विचारीत असतो, की असल्या भाग्याची या जन्मी धणी करून देणारे गतजन्मीचे ते माझे कोणते सुकृत होते ते मला सांग. ह्या जन्मी तसले काही तरी करायचा प्रयत्न करीन, म्हणजे पुढच्या जन्मीच्या ह्या असल्या भाग्ययोगाची पूर्वतयारी तरी करता येईल.