-
Soneri Swapna- Bhangleli (सोनेरी स्वप्नं-भंगलेली)
नानासाहेब, खरं सांगू, सामाजिक अन्यायाच्या बाबतीतली तुमची पोटतिडीक पाहून मला तुमचा हेवा वाटतो. माणसानं जगावं तर असं जगावं असं मनात येतं. पण लगेच दुसरं मन म्हणतं, तुम्ही मागच्या पिढीची माणसं एका सुंदर स्वप्नात जगत होता. समाजातले सारे बदल सहज व सुरळीतपणानं होतील असं मानीत होता. पण गणिताचे नियम मानवी जीवनाला लावून चालत नाही. माझ्या मनात येतं, युगधर्म बदलला आहे. मघाशी नीतिमूल्यांविषयी तुम्ही बोललात. कृषिप्रधान जीवनपद्धतीतल्या मूल्यांचे संस्कार तुमच्या मनावर लहानपणापासून झाले आहेत. आजची पिढी निराळी आहे. ती यंत्रप्रधान औद्योगिक संस्कृतीत वाढत आहे. पूर्वीच्या लोकांनी देवधर्माच्या भीतीनं अनेक कृत्रिम नीतिमूल्यं पाळली. तरुण पिढीला आता त्यांची गरज वाटत नाही. शेवटी माणसाचं काय होतं चिमूटभर राखच ना. मग जिवात जीव आहे तोपय|त दोन्ही हातांनी जेवढं सुख ओरबाडून घेता येईल तेवढं घ्यायचं याखेरीज तिच्यापुढं कुठलंही ध्येय नाही. तुमचं म्हणणं तात्त्विक दृष्टीनं अगदी बरोबर आहे. पण आजच्या व्यवहारी जगात तत्त्वांना विचारतो कोण?
-
Dhgaadche Chandane (ढगाआडचे चांदणे)
खांडेकर म्हणतात "...कथाबीजं दाही दिशांनी मनात येऊन पडतात-- प्रत्यक्ष अनुभवलेल्या एखाद्या भावनेच्या छटेपासून ती सहजगत्या कानांवर पडलेल्या एखाद्या चार-दोन ओळींच्या घटनेपर्यंत. अशा अनेक अनुभवांत कथाबीजं लपलेली असतात; पण ती सारीच फुलवण्याचं सामर्थ्य पुष्कळांच्या अंगी नसतं. झोपलेलं माणूस एकदम काही तरी टोचल्यामुळं जागं व्हावं, त्याप्रमाणं ज्या अनुभूतीनं संवेदना सचेतन होते आणि कल्पना, भावना आणि विचार यांच्या त्रिवेणी संगमानं न्हाऊ लागते, तीच पुढं स्वत:ला हवं तसं कथारूप धारण करू शकते. अशा रीतीनं गेली पन्नास वर्ष मी कथापंढरीचा वारकरी राहिलो आहे. पहिल्या दहा-वीस वर्षात मी तरुण वारकरी होतो. चालण्यात काय किंवा अभंग आळवण्यात काय, माझ्या ठिकाणी दुर्दम्य उत्साह होता. आता त्या उत्साहाची अपेक्षा करणं सृक्रिमाला धरून होणार नाही. तथापि, गेल्या काही वर्षांत ज्यांचा कथारूपानं माझ्या हातून आविष्कार झाला, असे काही अनुभव या संग्रहात प्रतिबिंबित झाले आहेत... या संग्रहातील कथांनी कुणाचं थोडं सात्त्विक रंजन केलं, कुणाला थोडा वाङ्मयीन आनंद दिला, एखाद्याला त्यात दिलासा सापडला, तर त्या लिहिताना मला जो आनंद झाला, तो केवळ वैयक्तिक नव्हता, या जाणिवेनं माझं लेखन सफल झालं, असं मी मानेन.’
-
Pakalya (पाकळ्या)
आपण जिला शहरी संस्कृती म्हणतो, तिचा अभिजात वाङ्मयाशी अभेद्य असा संबंध असतो, ही धारणा मुळातच चुकीची आहे. शब्द हे वाङ्मयाचे माध्यम असल्यामुळे रसिकतेचा शिक्षणाशी निकटचा संबंध असला पाहिजे, असे आपण गृहीत धरतो. पण शिक्षण अनेकदा पढीक रसिक निर्माण करते. तंत्राचा, शास्त्राचा आणि तशाच प्रकारच्या शेकडो प्रश्नांचा काथ्याकूट करण्यातच अशा पढीकारांचा वेळ जातो. सवयीने त्यांना त्यातच आनंद वाटतो; पण खरी रसिकता असल्या गोीचे स्तोम माजवीत नाही. ती वाङ्मयाच्या आत्म्याकडेच धाव घेते. विद्यार्थ्यांच्या ठिकाणी ललित वाङ्मयाचा आस्वाद घेण्याची शक्ती फार मोठ्या प्रमाणात असते. वाङ्मयाच्या जगाशी एकरूप व्हायला लागणारी स्वैर कल्पकता हा कुमारवयाला मिळालेला एक वर आहे. मुक्त आणि अनंत अशा आकाशाच्या पोकळीत उडत जाण्यात त्यांच्या मनांना आनंद होतो. अशा विद्यार्थ्यांसाठी कै. वि. स. खांडेकरांनी स्वत:च्या दीड-दोनशे कथांमधून पंधरा कथा साक्षेपाने निवडून काढल्या आणि त्या संग्रहाला अन्वर्थक नाव दिले : "पाकळ्या’
-
Nangarni (नांगरणी)
प्रत्येकाची आपली अशी एक वाट असते. काहींची सरळ, धोपट, काहीची वळणावळणांची अडीअडचणींची लेखकाचीही आपली एक वाट काट्याकुट्यांनी भरलेली. दगडधोंडे आडवे येणारी. तरीही पुढे जायला प्रवृत्त करणारी. पुढे जायचंच या कल्पनेने झपाटलेला जीव काटेरी मार्गाची वाट त्या झपाटलेपणामुळं सहज पार करतो. आणि इच्छा आकांक्षांची पूर्ती; हवं ते मिळवल्याचं मनभरून राहिलेल्या समाधानानं, तृप्तीनं मागं वळून बघतानाचा क्षण, आयुष्याच्या वळत्या वाटेवरचं उमलण्याच्या कल्पनेनं झपाटणं, फुलार, बहरणं, आठवणींचे दवबिंदू पानावरून ओघळले तरी पानांच्या अंगोपांगी असलेलं ओलेपण जपणार्या स्मृतीची सहज उलगड जाणारी मालिका म्हणजे नांगरणी एस. एस. सी. पूर्वीचा काळ यादवांच्या 'झोंबी’मध्ये चित्रित झाला आहे. नांगरणी मध्ये त्या पुढील कॉलेज शिक्षणाचा काळ आला आहे. व्यक्तीत्वाचं रोपटं बहरावं म्हणून परिस्थितीच्या मातीची मशागत करताना, संकटाची तण उपटून फेकताना आलेले कडू गोड अनुभव, सहज सुलभ शैलीत मांडण्याचा यशस्वी प्रयत्न लेखकाने केलेला आहे. झोंबीपेक्षा नांगरणीतला लेखकाचा दृष्टीकोन अधिक व्यापक आहे. प्रतिकूल परिस्थितीच्या विरोधात उभा असलेला लेखक हा नांगरणीचा गाभा आहे. सहजसुलभतेने उलगडत जाणारी उत्कट आत्मकथा !
-
Karunashtak (करुणाष्टक )
ही आहे एक कुटुंबकहाणी- दादा, आई, सहा मुलं आणि दोन मुली यांची. आईचा कडक स्वभाव आणि फाड फाड बोलणं यामुळं दादा तिला म्हणायचे, ‘फौजदार’, पण सगळ्या कुटुंबाला सावली देणारं घर जळलं, दादा खचले, वारले. आणि आई अबोल झाली. स्वत:च्या संसारात अलिप्तासारखी वागू लागली. मुलं मोठी होत होती. या मुलांच्या रुपानं आईपुढं आठ समस्या उभ्या राहिल्या. जणू ही आठ मुलं म्हणजे नियतीनं आईला घालून ठेवलेली आठ कोडी. हेच तिचं करुणाष्टक. खरं म्हणजे, कोण्याही आईचं. कारण, वाट चालताना ओझं वागवणं हे स्त्रीच्या भाळी अगदी इतिहासपूर्व काळापासून आलेलं आहे. तेव्हापासून, आपल्या स्त्रीत्वाला आलेलं फळ-मूल हेसुद्धा आईला ओझंच होऊन राहिलं असलं पाहिजे.
-
Jambalache Diwas (जांभळाचे दिवस )
जांभळाचे दिवस हा प्रसिद्ध कथाकार व्यंकटेश माडगूळकर यांचा कथासंग्रह वेगवेगळ्या ललित कथांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्त्री रूपांना वाचकांच्या भेटीला आणतो. ग्रामीण आणि शहरी भागातील ही स्त्री रूपे वाचकांना नक्कीच भावतील.
-
Sattantar (सत्तांतर )
काळाप्रमाणेच संघर्षही सतत वाहतच असतो. त्याला खंड असा नसतोच. असलीच, तर भरती असते, पूर असतो. जेव्हा जेव्हा खाणारी तोंडं भरमसाट वाढतात, गर्दी होते. तेव्हा तेव्हा संघर्ष बळावून उठतो. जेव्हा उपलब्ध अन्नात, भूमीत वाटेकरी निर्माण होतात, तेव्हा संघर्ष उचल खातो. जेव्हा अस्थिरता निर्माण होते, एखादी जात धोक्यात येते, बाहेरून परकं कोणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं. तेव्हा संघर्ष उतू जातो. ज्यांना बोलता येतं, ते हा राग, उद्दामपणा, संघर्ष शब्दांतून दाखवतात. ज्यांना बोलता येत नाही, त्यांचे राग-लोभ प्रेम हावभावांतून, स्पर्शातूनच सांगितले जातात. संघर्ष पेटला, की शस्त्रास्त्रं वापरली जातात ज्याना शस्त्रास्त्र माहीतच नसतात, ते सुळे, नख वापरतात. संघर्ष सर्वत्र भरून राहिलेला असतो.
-
Jangalatil Diwas (जंगलांतील दिवस )
...मी माणदेशातल्या लहानशा खेड्यात जन्मलो आणि तिथंच, वाढलो. खेडं सोडून मी शहरी वातावरणात राहू लागलो, त्याला आता चाळीस वर्षं होत आली, तरीही मी मनानं माणदेशातल्या रानावनांतच असतो. मी एक छांदिष्ट माणूस आहे. जनलोकांतून थोडं बाजूलाच असावं, काही नाद लावून घ्यावा आणि त्याचा पाठपुरावा करीत राहावं, यात मला विशेष आनंद वाटतो. आपल्या जीवनाला फुरसदीचा एक लांबलचक, भरजरी पदर असावा, असं मनापासून वाटत असलं, तरी चरितार्थ चालविण्यासाठी कामधंदा करण्यातच आपण फार खर्ची पडतो. आपलं सगळं जीवन एका विलक्षण यांत्रिक गतीनं झपाटून टाकलं आहे. कधी अंगावर चांदणं पडत नाही, कधी झाडाच्या पानांची सळसळ ऐकू येत नाही, कधी ओढ्यात अंघोळ होत नाही, कधी उताणं झोपून चांदण्यांनी गच्च भरलेलं आभाळ पाहता येत नाही. मी कुणी मृग-पक्षी-शास्त्रवेत्ता नव्हे किंवा वनशास्त्राचा अभ्यासकही नव्हे. परंतु तरीही रानावनांतील अद्भुत जगाविषयी माझ्या छांदिष्ट मनात जे अनिवार आणि न संपणारं कुतूहल आहे, त्यामागं लागून, रोजच्या यांत्रिक धावपळीतून एखादी झुकांडी मारून, चौर्याहत्तर सालापासून चौर्याऐंशी सालापर्यंतच्या दहा वर्षात मी कुठं कुठं हिंडलो, मला काय काय दिसलं, काय काय जाणवलं, त्याचा हा वृत्तान्त आहे. जंगलांतल्या दिवसांच्या या कहाण्या वाचून कुणी वाचक रानभैरी झाला आणि त्यानं निसर्गाची भव्यता, श्रीमंती व सौंदर्य यांचा आनंद घेतला, तर बरंच आहे......’