-
Aai Mazi Ahe (आई माझी आहे)
एक रंगेल तरुण श्रीमंतीत वाढलेला. श्रीमंती सुखं (`ती’ची) त्याच्या नसानसांत भिनलेली असतात... स्त्रीसुख ही त्याच्या दृष्टीने दोन घटकांची करमणूक असते. पावित्र्य, शील, चारित्र्य, सामाजिक आणि कौटुंबिक चौकटीतले संकेत, शिष्टाचार, नातेसंबंध या गोष्टींशी सदानंदाला काहीही देणंघेणं नसतं. सुगंधी फुलाचा वास घेऊन ते चुरगाळून टाकायचं एवढंच त्याला माहीत असतं. हवापालटासाठी थांबलेल्या हॉटेलात, एक कमनीय बांध्याची सुंदर स्त्री, आपल्या बारा वर्षांच्या मुलासह राहायला येते. हवापालटामुळे मुलाच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी इतकाच तिचा उद्देश असतो. पण, वेगळंच घडू लागतं... रंगेल तरुणाची वासना व स्त्रीची हतबलता का दडलेली आशा? एक स्त्री – एक पुरुष मित्र नसू शकतात या वाक्याला पुरक असं हळूहळू घडत जातं का कोणी घडवत जातं? जे घडतं ते स्वप्न का सत्य? आई - मुलगा आणि तो यांच्यात नेमकं कसं नातं तयार होतं? या विचारांना पलटणार्या पानागणिक उत्तरं मिळत जातात आणि ‘आई माझी आहे’ हे सिद्ध होतं.
-
Day Care (डे केअर)
या कथासंग्रहात एकूण सतरा कथा आहेत. ‘...आणि तुम्ही म्हणता’, ‘डे-केअर’, ‘रामायण- रामायण’ या कथा वेगवेगळ्या अंगाने वृद्धांच्या जीवनावर प्रकाश टाकतात. तर ‘क्षण’ या कथेतून प्रकटते माणसाची किळसवाणी लालसा... ‘गाऱ्हाणं’ कथेतील मालकीण आपल्या मोलकरणीसाठी देवीकडे मागते सन्मान. ‘कॉरिडॉर’मधून व्यक्त होते कोमातून बाहेर आलेल्या अरू या नर्सची व्यथा. ‘जजसाहेब’ या कथेतून व्यक्त होतं पत्नीपीडित पुरुषाचं मनोगत. ‘तर्री’ आणि ‘सहज’ दोन कथा फेसबुक मैत्रीवर भाष्य करणाऱ्या आहेत. एका विशिष्ट विषयावर केलेलं भावरूपी, व्यामिश्र चिंतन, अशा सूत्रातून या कथा साकारल्या आहेत.
-
Yugandhar Shreekrushna Ek Chintan (युगंधर श्रीकृष्ण एक चिंतन)
श्रीकृष्ण ही लोकोत्तर व्यक्तिरेखा; पण केवळ चमत्काराच्या चष्म्यातून त्याच्याकडे न बघता, त्याचं लोकोत्तरत्व जाणून घेणं कसं महत्त्वाचं आहे, ते या पुस्तकरूपी चिंतनातून शिवाजी सावंत यांनी अधोरेखित केलं आहे. ‘युगंधर’ ही कादंबरी लिहिण्याआधी त्या कादंबरीतून श्रीकृष्णाचं व्यक्तित्व ते कसं उलगडणार आहेत, याची ही रूपरेषा आहे. खरंच, मराठी साहित्यात आज श्रीकृष्ण आवश्यक आहे काय?, श्रीकृष्णाचं मराठी लोकजीवनाशी असलेलं अतूट, तिपेडी भावनातं, वैज्ञानिक युगाच्या पसार्यात धर्माचं स्थान कोणतं? श्रीकृष्ण धर्मसंस्थापक होता काय? खरंच, बालकृष्ण कसा असेल? ‘युगंधर’ शीर्षकाची पार्श्वभूमी, तसं ‘युगंधरा’चं सार्थ चित्र एक तरी चितारलं गेलंय का?, ‘कृष्णा’चा युगंधर कसा झाला?, कंस ही गुंतागुंतीची व्यक्तिरेखा कशी?, श्रीकृष्णाचं वास्तव बालपण कसं असेल?, गीतोपदेशासाठी अर्जुनाचीच निवड का?, राधा-मीरेपासूनचे श्रीकृष्णभक्त इ. मुद्द्यांच्या आधारे त्यांनी श्रीकृष्णाचा आणि त्याच्या युगंधरत्वाचा वेध घेतला आहे.
-
Krantikaal (क्रांतीकाल)
`स्वातंत्र्यप्राप्तीसाठी १८५७साली भारतात पहिला देशव्यापी उठाव झाला. तेव्हापासून क्रांतिकाल प्रारंभित झाला असं मानायला प्रत्यवाय नाही. त्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत हा क्रांतिकाल संपला नव्हता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५२साली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत या क्रांतिसंस्थेचा पुण्यात मोठ्या थाटामाटात सांगता समोर झाला.’ याच इतिहासास साक्षी ठेवून केवळ भारतीय क्रांतीविषयीच नव्हे, तर जगातील अन्य क्रांतिकार्यांचीही दखल यात घेतलेली आहे. `ते सारे लेख क्रांतीचं मूळ सूत्र धरून, प्रस्तुत पुस्तकात एकत्र गुंफले आहेत. अर्थात देशाप्रमाणे व काळाप्रमाणे क्रांतीचं स्वरूप भिन्न होतं जातं; परंतु `क्रांती’ या शब्दाचाच अर्थ ‘आमूलाग्र बदल’ असा घेतला, तर या सर्व देशांतून क्रांतीचं ते सूत्र समान होतं. हा कोणत्याही एका राष्ट्राच्या क्रांतीचा समग्र इतिहास नव्हे!’ भा. द. खेरांच्या या लेखणीचा अनुभव हे पुस्तक वाचल्यावरच येतो.
-
Smashanvasi Aghori (स्मशानवासी अघोरी )
सुमन बाजपेयी लिखित या पुस्तकात अघोरी साधूंच्या गूढ, अनेकदा गैर समजल्या जाणाऱ्या आणि अतिशय दुर्मीळ अशा आध्यात्मिक परंपरेचे सखोल व अभ्यासपूर्ण चित्रण केले आहे. शिवभक्त असलेले हे साधू स्मशानभूमीत वास करून जीवनमृत्यू, शुद्धअशुद्ध आणि सामाजिक नियम, टॅबू यांच्या पारंपरिक सीमा जाणूनबुजून ओलांडत, आध्यात्मिक मुक्तीच्या शोधात कठोर साधना करतात. शरीरावर भस्म धरणे, मानवी अस्थी वा कवटींचा उपयोग करणे आणि सामान्यांना अतिशय टोकाचे वाटणारे इतर विधी हे सर्व त्यांच्या उच्च चेतना प्राप्तीच्या मार्गातील अविभाज्य घटक असल्याचे लेखिका विवेचनात्मक पद्धतीने स्पष्ट करतात. नागा साधूंसारख्या इतर संन्यासी परंपरांपासून अघोरींच्या तत्त्वज्ञानातील व साधनापद्धतीतील वैशिष्ट्यपूर्ण भेदही त्यांनी सूक्ष्मपणे मांडले आहेत. इतिहास, अध्यात्म, सांस्कृतिक अभ्यास आणि मानवी वर्तनशास्त्र यांच्या संतुलित मिश्रणातून बाजपेयी अघोरी परंपरेचे एक आदरपूर्ण, संवेदनशील आणि विद्वत्तापूर्ण चित्र उभे करतात ज्यात अघोरी हे विचित्र वा अघोरीपणाचे प्रतीक म्हणून नव्हे, तर मोक्ष आणि आत्मोद्धाराच्या कठोर मार्गावर निघालेले गंभीर आणि समर्पित साधक म्हणून उलगडतात.
-
Basvanna (बसवण्णा)
गावकुसाबाहेरच्या वस्तीत जन्मलेल्या हुशार बसवण्णाचं स्वप्न असतं शिक्षक होऊन खूप शिकण्याचं; पण त्याच्या होणार्या पत्नीला, चिन्नीला तिची जोगतीण आत्या देवदासी बनवते. देवदासी प्रथेच्या विरोधात काम करणार्या डॉ. दीक्षितांच्या संपर्कात येऊन बसवण्णाही त्यांच्या कार्यात सामील होतो; पण जोगतिणीचे लोक त्याच्या जिवावर उठतात. जीव वाचवण्यासाठी त्याला कबरीत लपावं लागतं, नंतर मुंबईला धारावीत जाऊन राहावं लागतं, किराप्पा मोईली या गुंडाकडे. किराप्पा त्याच्या रखेलीच्या मुलीशी बसवण्णाचं लग्न ठरवतो आणि बसवण्णा तिथून गायब होऊन एका स्मशानात आश्रय घेतो, जवळजवळ दहा वर्षं. नंतर त्याच्या बालमित्राच्या मदतीने त्याला सरकारी नोकरी लागते, चिन्नीशी प्रतीकात्मक विवाह होतो, नंतर सुभद्राशी लग्न होऊन, मुलं होऊन, तो सर्वसामान्य आयुष्य जगतो; पण स्मशानात राहत असताना थोडीफार अघोरी विद्या शिकलेल्या बसवण्णाचा मृत्यू फार विचित्र पद्धतीने होतो. अंगावर शहारे आणणारी सत्यकथा
-
Part Of The Pride (पार्ट ऑफ द प्राइड)
प्राणीशास्त्रज्ञ आणि प्राणी वर्तनशास्त्रज्ञ म्हणून दक्षिण आफ्रिकेतील एका सिंह उद्यानात काम करणार्या तरुण मनुष्य प्राण्याची ही अनोखी कहाणी. लहानपणापासून छोट्या-मोठ्या प्राणी–पक्षी(घरात पाळता येतील) अशांना पाळून, त्यांचं संगोपन करून- त्यांचं बारकाईनं निरिक्षण करण्याची त्याची सवय त्याला सिंहाच्या मनीचे भाव वाचायला मदत करते. मनुष्य प्राण्याचे दैनंदिन काम म्हणजे - जगातील सर्वांत भयानक-घातक जंगलचा राजा असणार्या सिंहाच्या डोळ्यांना डोळा भिडवून स्वत:च्या हाताने खाऊ घालायचं, सिंहिणींनी वाळीत टाकलेल्या बछड्यांना स्वहस्ते बाटलीतून दूध पाजायचं, त्यांच्यासमोर बसून-त्यांच्या पाठीवर झोपून वेळ काढायचा, त्यांच्याशी कधी गवतावर- मोकळ्या जागेत खेळायचं; तर कधी तळ्यात मनसोक्त डुंबायचं आणि जर सिंहाचा मूड असेल तर, कधी कधी त्या सामान्य माणासांसाठी असणार्या भयानक प्राण्यांच्या नाकांचे चुंबन घेऊन त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करणारा अशक्य असा मनुष्य प्राणी आहे ‘केव्हिड रिचर्डसन..!
-
Guinnnessgatha (गिनीजगाथा)
राजेश पांडे यांचं ‘गिनीजगाथा’ हे पुस्तक म्हणजे प्रत्येकाला दिशादर्शक ठरणारं पुस्तक आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून मजल दरमजल करत केलेली देशसेवेच्या कार्याची सुरुवात, बारा विश्र्वविक्रमांपर्यंत येऊन पोहोचली आहे. हे बारा विश्र्वविक्रम करताना त्यांना प्रत्येक पावलागणिक विविध अडचणींचा सामना कसा करावा लागला आणि हार न मानता एकजूट होऊन प्रत्येक विश्र्वविक्रम कसा सध्या केला याची स्थल-कलासहित मांडलेली कहाणीच आहे. ‘तरुणांना सशक्त करणं, म्हणजेच राष्ट्राला सशक्त करणं’ या विचारानं चालणारे राजेश पांडे यांनी तरुणांच्या साथीनं सांधलेले हे बारा विश्र्वविक्रम प्रत्येक वाचकाला आपणही हे साध्य करू शकतो ही जाणीव करून देणारे आहेत.
-
Leading From The Back (लीडिंग फ्रॉम द बॅक)
सुपरस्टार लीडर’ बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी तुम्हाला या पुस्तकात मिळतील. तुम्ही तुमच्या टीममधील लोकांकडून आदर कसा मिळवू शकाल हे तुम्हाला या पुस्तकातून शिकता येईल, तसेच ‘असाध्य ते साध्य’ करण्यासाठी तुम्ही त्यांना कशा प्रकारे मदत करू शकता हेही तुम्हाला या पुस्तकात समजेल. त्यासाठी नेतृत्वविषयक असंख्य सिद्धान्त व नियम शिकण्याची गरज नाही, फक्त या पुस्तकात सांगितलेले तीन भागांचे मॉडल पुरेसे आहे, ज्याची आश्चर्यकारक यशस्विता सिद्ध झालेली आहे. उद्योग जगतातील तज्ज्ञ रवि कांत, हॅरी पॉल व रॉस रेक यांच्या अनुभवसंचितातून साकारलेल्या या अत्यंत अभ्यासपूर्ण व उपयुक्त कथारूप पुस्तकाचा सुप्रिया वकील यांनी अत्यंत सुबोध व ओघवता अनुवाद केला आहे.
-
Ain Baharat Kaif Kaharat (ऐन बहरात कैफ कहरात)
पारध’ कथेतील गुलछबू युवकाला एक युवती शिकवते चांगलाच धडा... ‘शेंगा’ कथेतील दरिद्री कुटुंबातील दोन निष्पाप जीवांनी महत्प्रयासाने मिळवलेल्या शेंगा पाण्यात वाहून जातात आणि त्यांची शेंगा खायची तीव्र इच्छा अपूर्णच राहते...‘एका शिष्ट मुलीची गोष्ट’ मधल्या संस्कारी, स्वावलंबी तरुणीची प्रेमकहाणी अधुरी राहून तिचा झालेला मृत्यू मनाला चटका लावून जातो... ‘सांवट’ कथेतील विवाहित नायक दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडतो... त्याच्या बायकोची संमती असते या प्रेमाला... ‘खोंबारा’ कथेतील म्हादूच्या काळजाला हौशी लग्नाआधीच विधवा झालीय हे ऐकून खोंबारा लागतो...मनाचा ठाव घेणाऱ्या कथांचा संग्रह
-
Gayguli (गायगुली)
‘गायगुली’ या कथासंग्रहातील ग्रामीण भाग आणि त्यातील वास्तव यामुळे या घटना आताच घडल्या आहेत असं वाटण्याइतपत जिवंत आहेत. उदा: ‘नातं’ कथेतील दळप घेऊन येणारा ‘कोकण्या’ असुदे किंवा ‘एक होता सखा’मधला ‘सखा’- दोघांच्याही आयुष्याचं गणित त्यांना न सोडवता आल्यामुळे त्यांचंच मातेरं होतं. ‘तिची गोष्ट’मध्ये ‘सावी’ या जोगतीण तिच्या रटाळ आयुष्याला कंटाळून ती गुन्हेगार कशी होते? आणि याउलट ‘शिकार’मधली ‘ती’ सावज असूनही शिकाऱ्याची- म्हणजे तिचा गैरफायदा घेणाऱ्याची धिटाईनं शिकार कशी करते हा फरकही वाचकाला जगण्यासाठी खूप काही देऊन जातो.
-
The Right Choice (द राईट चॉईस)
करिअरच्या दरम्यान लोकांना अनेकदा ज्या पेचप्रसंगाना सामोरे जावे लागते, त्यांचा सखोल अभ्यास द राईट चॉइस हे पुस्तक करते. इंडिया इंकमधील सर्वांत जास्त काळ सेवा देणारे सीइओ म्हणून कार्यरत असणारे शिव शिवकुमार आपल्या देदिप्यमान करिअरच्या दरम्यान मिळवलेले ज्ञान व अनुभव या पुस्तकातून आपल्यापुढे मांडतात. हे दहा पेचप्रसंग सोडवण्यासाठी आवश्यक असलेली शिकवण आणि धडे त्यांचे वैशिष्ट्य असलेल्या त्यांच्या थेट आणि स्पष्ट शैलीत ते आपल्याला देतात. उच्च अनुभव असलेल्या चोवीस व्यावसायिकांकडून मिळणारी अंतर्दृष्टी आणि वेगळे विचार यांचा देखील या पुस्तकात समावेश आहे. यशस्वी करिअर ही कधीच एका रेषेत नसते; त्यामध्ये अशी असंख्य वळणे आणि तिढे असतात जिथे तुमच्यासमोर निवड करताना अडचणी उभ्या ठाकतात. अत्यंत व्यावहारिक आणि प्रेरक असलेले द राईट चॉइस आपल्याला या कठीण परिस्थितीतून मार्ग काढायला आणि यशस्वी करिअरमध्ये मदत करते.
-
Dalal's Street (दलाल्स स्ट्रीट)
"एका इंडियन बिझिनेस स्कूलच्या तरुण पदवीधारकांचा गट गलेलठ्ठ पगार देऊ करणार्या ट्रेडिंग कंपनीच्या नोकरीकडे आकृष्ट होतो. स्टॉक ब्रोकिंगसारख्या अत्यंत गतिमान आणि भयानक स्पर्धात्मक जगात यशस्वी होण्याकडे या बॅचमधील मित्रांचं सगळं लक्ष एकवटलेलं असतं. हाव, लबाडी, आणि संपत्ती ही या जगात टिकून राहण्याची आणि यशस्वी होण्याची पहिली पायरी असते. जे अस्तित्व टिकवून ठेऊ शकत, ते विजेते ठरत. हा आर्थिक थरार या कादंबरीत डार्क ह्युमरमध्ये रंगवलेला अनुभवायला मिळतो. इथे अस्तित्वाच्या लढाईत जिवलग मित्र कट्टर प्रतिस्पर्धी बनतात, प्रत्येक उपहासात्मक हास्यामागे एक धमकी असते, आणि व्यापार-खेळासारखा पैसा आणि भविष्य सर्वच पणाला लावून दुसर्यावर कुरघोडी करून झटपट जिंकायचं, ही या जगाची रीतच असते. शेअर्सच्या किंमतीतील चढ आणि उतारांचं अधिराज्य असलेल्या या बाजारातल्या मानवी संबंधातील गुंतागुंतीच्या क्रिया-प्रतिक्रिया आणि डाव-प्रतिडाव यांचा ‘दलाल्स स्ट्रीट’ शोध घेतं आणि सर्व अग्निपरीक्षांतून पार होणार्या नायकाच्या उदयाचं चित्र कोरून समोर ठेवतं. "
-
Kya Haal Sunava (क्या हाल सुनावॉ)
डॉ. नरेन्द्र मोहन यांच्या आत्मकथेची ही पुढील कडी ‘स्व’च्या परिघात फिरणारी - त्यांच्या वैयक्तिक जीवनातली सुख-दु:खे-कटुता - समाज आणि राजकारणातल्या कठीण प्रश्नांचा ऊहापोह - सखोल आत्मविश्लेषण - दोन आणीबाणींमधल्या कालखंडाचे चित्रण – बालपण-तारुण्य-दुसऱ्या आणीबाणीपर्यंतचा वैयक्तिक-कौटुंबिक त्रास आणि तणाव – दहशतमय वातावरणात सुन्न झालेला देश या सोबतच त्यांच्या आयुष्यातल्या व्यक्ती, प्रसंग घटना, प्रवास आणि आठवणींची शृंखला - सुख आणि दु:ख, आनंद आणि वेदनेचीही शृंखला काल-यात्रीची साथ करत स्मृतींच्या अवकाशात भरारी घेते. ‘कमबख्त निंदर’मधला निंदर इथेही आहे; परंतु तो लपाछपी खेळतो आणि प्रश्नात टाकत जातो. या सगळ्या भावानिक गदारोळात डॉ. नरेन्द्र मोहन यांचे आंतर-बाह्य होणारे हाल अंतर्मन पोखरतात. सर्वांनी निश्चितच वाचावी अशी एक उत्कृष्ट आत्मकथा आपल्या भेटीला! "
-
Phutkya Madakyatale Pani (फुटक्या मडक्यातलं पाणी)
हे पुस्तक आहे आठवणींचं. हे पुस्तक आहे- तळमळीचं- आपलं काहीतरी मोलाचं हरपलं आहे, अशा भावनेचं आणि सरतेशेवटी सगळ्या गोंधळातून बाहेर पडत स्वत:ला शोधण्याचंही; कारण मानसिक-भावनिक गोंधळ हा तर जातीयतावादी समाजाचा भागच असतो. दलित म्हणून भारतातील जातीयतावादी समाजात जन्मल्यावर कोणकोणत्या प्रकारच्या अनुभवांना सामोरं जावं लागतं, समाज दलितांना कसं अदृश्यच करून टाकतो, त्यांना आपल्या आठवणींत, आपल्या कहाण्यांत स्थान कसं नाकारतो, हे एका नव्या पिढीच्या मनस्वी तरुणानं लिहिलेलं आत्मकथन सर्वांनीच वाचण्यासारखं आहे. जातिभेद माणसांना कसे अमानुष बनवतात त्याची आणि आपल्या सगळ्या समजुतींना मुळापासून हादरा बसवणारी गाथाच आहे ही.
-
The Fourth Protocol (द फोर्थ प्रोटोकॉल)
अशी एक कादंबरी जी ब्रिटन, सोव्हीएट युनियन व काही प्रमाणात साउथ आफ्रिका या देशांतील घटनांवर आधारित आहे. आंतरराष्ट्रीय हेरगिरी, वेगवेगळ्या नेत्यांचे नानाविध मनसुबे आणि ते साध्य करण्यासाठी केल्या जाणाNया गुप्त योजना, देशद्रोही माणसांचे अंतरंग, सत्ताधाऱ्यांचे अधिकाधिक सत्ता मिळवण्यासाठी चाललेले जीवघेणे उद्योग, त्यामध्येच एक हुशार रशियन गुप्तहेर अत्यंत गुप्त पद्धतीने एका भयंकर विध्वंसक अस्त्राची आखणी करत असतो; तेवढ्यात ब्रिटिश मंत्रालयाच्या M१५ विभागाला खबर लागते व त्यांचा चाणाक्ष अधिकारी होणारा विध्वंस कसा थांबवतो? तो आपल्या अथक प्रयत्नांनी धडक मोहीम राबवत त्या भयानक अस्त्राचा शोध कसा लावतो? त्याच्या कामाचा हुरूप, चिकाटी व आत्मविश्वास पाहून त्याचे अधिकारी त्याला कसा पाठिंबा देतात व ब्रिटिश साम्राज्यावरील एक संभाव्य संकट तो कसे दूर सारतो? आणि हे सगळं कोणत्या क्रमाने आणि किती गुंतागुंतीसह घडत-बिघडत जातं याचा वाचनिय अनुभव देणारे - ‘द फोर्थ प्रोटोकॉल..!’
-
The Litigators (द लिटिगेटर्स)
ऑस्कर फिनले, अॅड. वॉली फिग – भागिदार व रोशेल गिब्सन मदतनीस - शिकागोच्या साउथ साइडमधील एक नावाजलेली(वेगळ्या अर्थाने) लॉ-फर्म ‘फिनले अॅन्ड फिग’ - रुग्णवाहिकेचा पाठलाग करून मृताच्या नातेवाइकांकडून केसेस मिळवणे हा आघाडीचा धंदा – घटस्फोटाच्या केसेसमधेही समझोता करणं आणि घटस्फोट घडवून आणणं हा मार्ग - अशातच अॅड. डेव्हिड झिंकचे आगमन होते व फिनले-फिगच्या रटाळ आयुष्यात छोटीशी चेतना येते – डेव्हिडच्या आधी हाती घेतलेली एक औषध वंâपनीच्याविरुद्धच्या केसमध्ये दावा ठोकण्यासाठी तयार असलेली फर्म ही डेव्हिडसाठी व त्याच्या भविष्यासाठी एक मोठ्ठं वळण ठरते - रोगन रोथबर्गसारख्या उच्च दर्जाच्या लॉ-फर्मला कायमचा रामराम ठोकल्यानंतर डेव्हिड या कर्जात डुबलेल्या लॉ-फर्ममध्ये येतो काय आणि स्वत:मधला गमवलेला विश्वास परत मिळवून स्वबळावर पहिली जिंकतो काय हे सर्व अविश्वसनीय आहे. अशा विचित्र वकिलांची चढाओढ दर्शवणारी कादंबरी ‘द लिटिगेटर्स..!’
-
A Long Way Gone (अ लॉँग वे गॉन)
ईश्माईल बाह या बालसैनिकाचं हे आत्मकथन. बंडखोरांनी त्याच्या गावावर केलेल्या हल्ल्यामुळे बंदुकीच्या गोळ्यांपासून जीव वाचवत, उपाशीतापाशी, कधी संशयावरून मार खात, कधी शेतात काम करत, उन्हापावसात अनवाणी पायांनी आपल्या भाऊ आणि मित्रांसह या गावातून त्या गावात भटकंती करणारा ईश्माईल... भाऊ आणि मित्रांशी त्याची चुकामूक झाल्यावर जंगलात एकटाच राहणारा ईश्माईल... कुटुंबाच्या सुखरूपतेची बातमी कळल्यावर कुटुंबाला भेटायला गेलेला आणि कुटुंबाची भेट न होता, बंडखोरांच्या अग्निकांडात कुटुंबं गमावलेला ईश्माईल...आर्मीत भरती होऊन बंडखोरांना कंठस्नान घालणारा ईश्माईल...युनिसेफने पुनर्वसन केल्यानंतरचा आणि त्याच्या अंकलचा आधार गवसलेला ईश्माईल...बालसैनिकांच्या व्यथा जगासमोर मांडणारा ईश्माईल...या त्याच्या प्रवासात तो पावलोपावली पाहतो मृत्यूचं तांडव, प्रचंड रक्तपात, अमानुष क्रौर्य आणि वारंवार अनुभवतो मृत्यूची दाट छाया...अंगावर शहारे आणणारं आत्मकथन
-
Daav Mandala (डाव मांडला)
`या वेळी’, `या खेपेला’ किंवा `या डावात’; या अर्थाने लहानपाणीच्या वापरातील शब्द ‘आजुखेले’ – बालपणीपासून होत जाणारी शब्दांशी ओळख – काळाबरोबर मागे पडणारे शब्द – काही वाक्यं–काही वचनं – काही ओळींचा स्मृतीपटलावर असून नसल्यासारखा वावर – हेच सर्व शब्दबद्ध करत आयुष्यातील खेळ आणि खेळातील आयुष्य यांचा हा मांडलेला सारिपाट – लेखकाने पाहिलेल्या, अनुभवलेल्या, जीवनातल्या साध्यासुध्या सौंदर्यांची केवळ वर्णनं यात आहेत - भाषा, लय, भेटलेली माणसं, चराचर सृष्टी, दृष्टीस पडलेली अगाध सुंदरता यांचा संगम यात आहे – आयुष्याच्या प्रवाहात वाहत राहून ‘खेळायला’ उतरताना आलेल्या मौजेची ही कहाणी आहे. प्रसंगाला सामोरं जाताना त्यातली गंभीरता काढून कसं पुढं जावं हे स्वानुभवातून व खेळाला वय नसतं हे सांगत शब्दांमधून बोलणारी कहाणी ‘डाव मांडला..!’
-
Knife (नाइफ)
12 ऑगस्ट 2022 च्या सकाळी, सलमान रुश्दी शॅटॉक्वा इन्स्टिट्यूशनच्या स्टेजवर उभे होते. ते लेखकांना हानीपासून सुरक्षित ठेवण्याच्या महत्त्वावर व्याख्यान देण्याच्या तयारीत होते, तेव्हाच काळ्या कपड्यांमध्ये आणि काळा मास्क घालून एक व्यक्ती त्यांच्या दिशेने चाकू घेऊन धावत आली. त्यांचा पहिला विचार होता: “म्हणजे तूच आहेस. तू आलास.” यानंतर जे घडलं, ते एक भीषण हिंसक कृत्य होतं, ज्याने साहित्यविश्वाला आणि त्याहीपलीकडच्या जगाला हादरवून टाकलं. आता, प्रथमच आणि विसरता न येणाऱ्या तपशिलात, रुश्दी त्या दिवसाच्या भयावह घटनेचे आणि त्यानंतरच्या काळाचे स्मरण करतात — शारीरिक पुनर्प्राप्तीचा त्यांचा प्रवास, आणि त्यांच्या पत्नी एलिझा, कुटुंबीय, डॉक्टर आणि फिजिओथेरपिस्ट्सच्या सैन्यामुळे व जगभरातील वाचकांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे शक्य झालेल्या बरे होण्याच्या प्रक्रियेचं कथन करतात. हे पुस्तक म्हणजे वेदना, प्रेम, आणि पुन्हा उभं राहण्याच्या ताकदीची साक्ष आहे – एक प्रेरणादायी आणि थेट मनाला भिडणारी कहाणी आहे
-
Vrukshsangini (वृक्षसंगिनी)
१४ वर्षांची मीना आणि तिच्या जीवनातील संघर्षांची ही कथा. मीना, बिहारच्या दरभंगातील मीनाचे २१ वर्षांच्या नेपाळी मनमोहनशी लग्न लावले जाते. लग्नानंतर, तिला बालपणाचे घर सोडून, नेपाळमधील तिच्या पतीच्या कुटुंबात सामील व्हावे लागते. मनमोहन शिक्षणासाठी काठमांडूमध्ये असतो, त्यामुळे मीना तिच्या कडक सासूच्या देखरेखीखाली एकटीच राहते. तिच्या सासूच्या कठोरतेमुळे, मीना तिच्या जिवलग जाऊबाईकडे आधार शोधते. मीना आणि तिच्या मुलीच्या दृष्टिकोनातून, लेखकाने स्त्रियांच्या जीवनातील संघर्ष, ओळख, परंपरा आणि सांस्कृतिक समावेश यांचा सखोल अभ्यास केला आहे. कथा तीन पिढ्यांतील स्त्रियांच्या अनुभवांवर आधारित आहे: कावेरी, मीना आणि प्रीती. कादंबरीत नेपाळमधील मधेशी आणि पहाडी समुदायांमधील सामाजिक-राजकीय संघर्ष, स्त्रियांच्या स्वातंत्र्याची मर्यादा, आणि त्यांच्या आत्मशोधाचा प्रवास प्रभावीपणे मांडलेला आहे.