-
Matikhalchi Mati ( मातीखालची माती )
ग्रामीण जीवनातील हे विविध दर्शन अस्सल शैलीतला हा आविष्कार. मातीवर उगवलेल्या कोवळ्या अंकुराइतकीच लेखकाच्या मनाला मातीतल्या गहिर्या थरांची ओढ लागली आहे. ही विविध व्यक्तिचित्रे संवेदनशील मनाने टिपली आहेत. यातला प्रत्येक माणूस जिताजागता वाटतो... आणि त्यासोबत वाचकांच्या मनालाही अंकुर फुटतो. सभोवारच्या माणसांचेही 'माणूसपण’ त्याच्या मनाला जाणवू लागते. ती जाणीव मनातल्या मातीत रुजते, बहरते. असे हे जिवंत पुस्तक आणखीही खूपसे पालवून जाते !
-
Vaishakh ( वैशाख )
रणजित देसाई हे एक बहुआयामी साहित्यिक आहेत. त्यांच्या सुरुवातीच्या काळातील हा संग्रह. ग्रामीण जीवनाचा वेध घेणार्या कथांमध्ये माणसांतला कोरडेपणा वैशाखाच्या उन्हाप्रमाणेच मनाला चटका देऊन जातो. लालित्यपूर्ण शैलीतल्या या कथा वाचून आणि अनुभवून रणजित देसाई हे आपल्या काळातील एक थोर साहित्यिक आहेत याचा उत्कट प्रत्यय वाचकांना येईल.
-
Prapaat ( प्रपात )
देसाईंच्या कथा खर्या अर्थानं फुलल्या त्या ऐतिहासिक वातावरणात व अस्सल ग्रामीण ढंगात, परंतु सूक्ष्म निरिक्षणशक्ती आणि अत्यंत संवेदनशील मन यामुळं त्यांना शहरी जीवनातील मर्मभेदी सत्य दर्शनानं अस्वस्थ केलं. यातूनच "प्रपात’ च्या कथांचा जन्म झाला. देसाईंच्या नेहमीच्या कथांपेक्षा या कथा वेगळ्या आहेत. जीवनातील विशिष्ट क्षणांविषयी, नाट्याविषयी, शहरीजीवनात हरघडी अनुभवायला येणार्या कठोर, रूक्ष क्षणांविषयी विचार करायला लावणार्या आहेत. या कथा अभिजात, संतुलित रूपात्मक जाणिवेच्या आहेत. "स्पर्श’ या कथेत नोकरी करणार्या शहरातील स्त्रीला ज्या बिभित्स नजरा, ओंगळवाणे स्पर्श व त्याच त्या किळसवाण्या भावनांच्या प्रवाहातून दररोज जावे लागते, यामुळं तिच्या मनावर उठणार्या ओरखड्यांचे चित्रण आहे. तर "मृद्गंध’ मध्ये एका वारांगनेच्या मनाची हळूवार ओळख आहे. कथा जसजशी वाचत जावी तसतसा वाचक त्यात गुंतत जातो आणि कथेचा शेवट त्या विचारांना चालना देतो.
-
Sanket ( संकेत ).
वैजूनं चिमणी पेटवली. ती हातात धरून सारी झोपडी निरखली. सापांच्या पेट्या व्यवस्थित होत्या. नागिणीच्या टोपलीवरचा दगड तसाच होता. मग मुंगसाला घाबरायला काय झालं ? वैजू मुंगसाजवळ गेला. त्याच्या पाठीवरून हात फिरवला. नेहमी जवळ जाताच कुशीत चढणारं ते मुंगूस वैजूच्या हातून सुटण्याची धडपड करीत होतं. भीतीनं त्याचं अंग फुललं होतं. वैजूच्या मनात एक अनामिक भीती तरळून गेली. त्यानं झोपडीचं दार उघडलं आणि मुंगसाला तो शांत करू लागला; पण मुंगसाची धडपड वाढली होती. अशाच धडपडीत एका हिसक्याबरोबर मुंगसाची कडी तुटली आणि सुटलेलं ते मुंगूस झोपडीच्या दरवाजातून पळालं. त्याला हाक मारत वैजू दरवाजापर्यंत गेला. त्याच वेळी त्याच्या कानांत ती दीर्घ शीळ आली. उभ्या जागी वैजू खिळून राहिला. झोपडीतून तशीच शीळ उठत होती. वैजूनं धीर करून मान वळवली. नागिणीच्या टोपलीतूनच तो आवाज येत होता. शीळ थांबताच त्या टोपलीतून भुसकारे उठत होते. वैजूनं गडबडीनं झोपडीचं दार लावलं आणि तो अंथरुणावर जाऊन कुडाला टेकून बसला. शिळेचे साद वाढत होते. जवळ जवळ साद येत होती. वैजूला वाटलं की, जेव्हा आपण दारात होतो तेव्हाच पळून जायला हवं होतं... पळून जायचा विचार पक्का झाला. धीर करून वैजूनं झोपडीचं दार उघडलं आणि एकदम मागे सरला. दारात उभा राहिलेला नागाचा फणा डोलत होता. वैजू मागं वळला. भिंतीचा कूड गाठून तो बसला; पण त्याची नजर दाराशी डुलणार्या त्या आकृतीवर खिळली होती. टोपलीतल्या नागिणीची धडपड वाढली होती. टोपलीवरचा दगड हेलकावे घेत होता. दारातल्या नागानं आपला फणा मिटला आणि ते मोठे धूड वळवळत झोपडीत शिरलं. नाग सरळ त्या टोपलीकडे जात होता. टोपलीजवळ जाऊन त्यानं फणा मिटला आणि ते मोठे धूड वळवळत झोपडीत शिरलं. नाग सरळ त्या टोपलीकडे जात होता. टोपलीजवळ जाऊन त्यानं फणा उभारला. टोपलीवर तो डुलत होता. त्याच्या भुस्कार्याला टोपलीतून प्रतिसाद येत होता. झाकणाला आतून धक्के बसत होते आणि त्या हादर्यांनी डुलणारा वरचा दगड कोलमडला...
-
Mekh Mogri ( मेख मोगरी )
मेखमोगरी, सूरसिंगार आणि शेवट शिवाजी, संस्कार, मोकळं आकाश या पाच कथांचा समावेश असलेला कथासंग्रह. यातील तीन ऐतिहासिक स्वरूपाच्या, एक आध्यात्मिक व एक कौटुंबिक वळणाची आहे. प्रत्येक कथा स्वत:च्या वैशिष्ठ्यानं वाचनीय झाली आहे. "मेखमोगरी’ ही कथा पहिल्या दर्जाची प्रेमकथा होय. ऐतिहासिक पार्श्वभूमी, पात्रानुसार ग्रामीण व नागर भाषा, उत्कंठापूर्ण घटना प्रसंग व रेखीव व्यक्तीरेखा यामुळं ही कथा वाचनीय ठरते. सुरशृगांर ही सुद्धा ऐतिहासिक पार्श्वभूमीची कथा. संस्कार ही अध्यात्मिक वळणाची कथा आहे. एका विख्यात किर्तनकाराचा मुलगा भटकत भटकत विश्वंभरांच्या घरी येतो. त्यांची सून त्याच्यावर सतत संशय घेते. परंतु नंतर त्याच्यावरच्या सुसंस्काराची तिला प्रचिती येते. अशा आशयाची ती भावपूर्ण कथा आहे. या कथा संग्रहातील कथा या भावनिक उंची गाठणार्या, मनाला हेलावून टाकणार्या आहेत.
-
Aalekh ( आलेख )
'आलेख' हा रणजित देसाईंचा ग्रामीण जीवनावर आधारित कथांचा संग्रह. गाव वरवर जरी शांत वाटले तरी अंतरंगात कितीतरी घडामोडी चाललेल्या असतात. गावची चावडी, पार, हिरवेगार मळे, चिरेबंदी वाडे, गरिबाची झोपडी, डोंगरमाथे, करवंदांच्या जाळ्या ही घटनांची केंद्रस्थळं. गावातली तर्हेवाईक, इरसाल, बेरकी, गरिबीने गांजलेली, देवभोळी, अंधश्रद्धाळू माणसं ! निसर्ग आणि जनावरं यांच्याशिवाय त्यांच्या जीवनाला पूर्णत्व येतच नाही. ही माणसं त्यांच्या ईर्षा, त्यांचा बाणेदारपणा, यातना, मुलांवरची माया, शहरवासीयांशी त्यांचे येणारे संबंध, सर्व सच्चेपणाने जगतात, निभावतात. निसर्ग आणि जनावरांशी एकरूप झालेली ही माणसं त्यांच्या रंगरेषांसह देसाई यांनी आपल्या लेखणीतून तितक्याच सच्चेपणाने चितारलेली आहेत.
-
Chicken Soup For The Mother's Soul ( चिकन सूप फॉर
पृथ्वीतलावरच्या आपल्या पहिल्यावाहिल्या श्वासापासून आपल्या सोबत असणारी व्यक्ती म्हणजे आई... आणि त्यानंतर आयुष्यानं कशीही वळणं घेतली तरी सदैव त्याच भूमिकेत आपली प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सोबत करणारी व्यक्ती म्हणजेही आईच. आई या विलक्षण शब्दाभोवती गुंफलेल्या या कथा स्थळ, काळ सार्या भेदांपलीकडं जाऊन आईच्या त्याच वात्सल्याचा स्पर्श घडवतात. फक्त आणि फक्त प्रेम, माया, आस्था, जिव्हाळा, जपणूक या आणि अशाच भावभावनांचे रेशीमधागे गुंफणार्या या कथा साध्या साध्या प्रसंगांतून अतिशय लोभस भावनेचं दर्शन घडवत आपल्याला आपल्या आईची आठवण करून देतात.
-
Rang Manache ( रंग मनाचे )
अकरा कथांचा संग्रह. कथा जरी अकराच असल्या तरी व. पु. काळे ह्यांच्या चुरचुरीत लेखनाची खुमारीच ही आहे की आजूबाजूचे सारे विश्व ह्या ना त्या प्रकारे त्यात टिपले गेलेले असते. वपु नेमकेपणा टिपणारे छायाचित्रकारही होते. तोच गुण त्यांच्या लेखणीतही उतरला आहे म्हणूनच 'गॅरण्टी’, 'बघतात तुला, पण...’, 'आणि तसं झालं तर...’ सारख्या ह्या संग्रहातील कथा 'असंही असू शकतं’, 'हे असंच आहे’ असे वाटायला लावणार्या आहेत. हे सारे वपुंच्या शैलीत वाचणे हा एक वेगळा आनंद आहे. वपु केवळ मिस्कील लेखक नाहीत तर विचार करायला लावणारे मिस्कील लेखक होते ह्याची प्रचिती यावी असा हा मनाच्या रंगाची उधळण करणारा कथासंग्रह.
-
Abhogi ( अभोगी )
'अभोगी'चा अभ्यास करताना कथानक, व्यक्तिचित्रण, वातावरणनिर्मिती, भाषाशैली यापेक्षा प्रामुख्याने रचनापद्धतीचा विचार प्रकर्षाने करावा लागतो. कारण रणजित देसाईंच्या इतर कादंबर्यांच्या तुलनेत या कादंबरीची रचना वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. फ्लॅशबॅक पद्धतीने कथानक उलगडत जाण्याचे तंत्र लेखकाने अवलंबले आहे. "नियतीने लादलेल्या, काहीवेळा स्वेच्छेने स्वीकारलेल्या जीवनातल्या अपूर्णतेचा डोळस स्वीकार आणि कलेपेक्षा माणुसकी श्रेष्ठ ठरवणारा मूल्यविचार हे या कादंबरीचे प्रमुख सूत्र आहे" अशा नेमक्या आणि समर्पक शब्दात दीपक घारे यांनी व्यक्त केलेला अभिप्राय 'अभोगी' चे नेमके स्वरूप स्प करणारा आहे. महेश आणि कैलास या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून लेखक स्वजीवनातील घटना, आवडीनिवडी, मृत्यूविषयीचे चिंतन, कलावंत म्हणून वाट्याला आलेले अनुभव याविषयीचा तपशील मोठ्या कौशल्याने मांडताना दिसतो. प्रकृती स्वास्थासाठी घटप्रभेला काही काळ राहणे, मंगेशीवरील श्रद्धा, संगीताविषयीची आवड, गायकांवरील निष्ठा व जवळीक, कलेसाठी त्याग करण्याची वृत्ती, उतरत्या वयातील एकाकीपणाचे शल्य, जीवनातील जोडीदारांविषयीचे संमिश्र अनुभव इत्यादी बाबतीतील साम्य सहज लक्षात येण्याजोगे आहे. "दादांच्या एकाकी जीवनाचं प्रतिबिंब डॉ. कैलासमध्ये सरळ सरळ दिसतं", या आनंद यादवांच्या विधानातूनही याला पुष्टी मिळते. 'अभोगी' हे या कादंबरीचे शीर्षक अर्थपूर्ण व सूचक आहे. किंबहुना आशयानुरूप सार्थ शीर्षक ही या कांदबरीची एक जमेची बाजू आहे. कादंबरीच्या शेवटी महेश कैलासला 'अभोगी' ऐकवतो. त्यात मनमुराद जागा घेतो. तेव्हा कैलास त्याविषयी समाधान व्यक्त करतो. महेशला सूर सापडल्याबद्दल त्याचा ऊर भरून येतो. "सप्तसुरांतून गाणं कधीच उपजत नसतं. ते मनातून उपजावं लागतं. त्या कल्पनेनं मी अस्वस्थ होत असे. मी अनेक प्रकारची भजनं ऐकली. अनेक तालसुरांचे ढंग पाहिले आणि अचानक मला माझा सूर गवसला. मी जाताना तुम्हाला वचन दिलं होतं. त्याचमुळं तुमच्यासमोरा अभोगी गायलो." (पृ.२३६) अशा शब्दात महेश 'अभोगी' ची सार्थकता स्पष्ट करतो. शोकात्म भाव, प्रेमातील विव्हलता, तळमळ, अंत:करणातील भावपूर्णतेचे प्रकटीकरण होण्यासाठी 'अभोगी' हा राग उपयुक्त मानला जातो. या कसोट्यांवर प्रस्तुत कादंबरीची सरसता आणि सकसता लक्षात घेणे संयुक्तिक वाटते.
-
Khekada ( खेकडा )
'खेकडा' या कथासंग्रहातील बहुतेक सर्वच कथांमधून जे भय दाटून राहिलेले आहे, ते वाचकाला कडकडून दंश करणारे आणि जिव्हारी झोंबणारे आहे. या भयात वाचकाचे अवघे मनोव्यापार झपाटून टाकण्याची शक्ती आहे. या कथा वाचून अंगावर जो सरसरून काटा उभा राहतो तो दीर्घकाळ तसाच टिकून राहतो, कारण या कथा मूलभूत वास्तवाला कधी विसरत नाहीत. जसे 'तुमची गोष्ट' आरंभीच लेखक सांगतो, "ही तुमची गोष्ट आहे म्हणजे तुमच्याही बाबतीत घडू शकेल अशी" आणि शेवटीही निक्षून सांगतो, "तुमची म्हणून सांगितलेली ही गोष्ट तुमची नव्हेच. एक आपली शक्यता सांगितलेली एवढेच". पण तरीही या कथेत ज्या थरारक अनुभवांचे निवेदन आहे, त्याचा प्रभाव इतका विलक्षण आहे की अपराधाचा स्पर्श तुमच्या मनीमानसी नसूनही तुमच्या गळ्याभोवती फासाचा स्पर्श झाल्याची भावना तुम्ही अनुभवता. रत्नाकर मतकरी हे एक सिद्धहस्त कथाकार आहेत आणि या कथासंग्रहातील कथा मराठी भाषेत तरी दुर्मिळ अशा आहेत. या कथांचे अन्य भाषांतून अनुवाद झाले तर ते फक्त मतकरींचेच प्राप्त यश वृद्धिगंत करतील असे नव्हे, तर परिणामी मराठी भाषेलाही ललामभूत ठरतील.
-
Madhumati ( मधुमती )
"रणजित देसाई’ यांची लघुकथा सर्वसामान्य मराठी लघुकथेपेक्षा निराळी आहे. अद्भुतरम्य वातारणात वावरण्याची तिला हौस आहे. निळ्या, सुंदर स्वप्नात ती रंगून गेलेली आहे. तिचे स्वरूप महाराष्ट्रीय असण्यापेक्षा अखिल भारतीय स्वरूपाचे आहे. वास्तवापेक्षा इतिहास तिला अधिक रुचतो. संगीत व शृंगाराच्या रसात ती नखशिखान्त नाहून निघाली आहे... रसिक मनाची नादि पात्रे त्यांच्या कथेत स्वप्नातल्याप्रमाणे वावरत आहेत. कलेसाठी आणि प्रेमासाठी ती आपले जीवन उद्ध्वस्त करून घेतात; आणि त्याची मुळीच खंत मानीत नाहीत. रणजित देसाईंच्या कथांत वावरणार्या स्त्रिया रूपवान, नाजूक, कलावंत आणि त्यागी आहेत. नायकीण असो, गाणारी असो वा कुलवती असो, त्यांनी तिच्या स्त्रीमनाचा, तिच्या मृदुलतर भावनांचा आविष्कार करताना आपली लेखणी मुलायमपणे वापरली आहे. रणजित देसाईंच्या लेखणीत प्रसाद आहे, माधुर्य आहे; वाचकाला रम्य वातावरणात नेऊन वास्तवता विसरावयास लावणारी जादू आहे. आपल्या कथेची पार्श्वभूमीही ते मोठ्या कल्पकतेने, कथेतली स्वप्नमयता वाढावी, अशा तर्हेने वापरतात. त्यांच्या अवलोकनशक्तीचे आणि कल्पकतेचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे. त्यांच्या कथांतील वातावरण वास्तवापेक्षा अद्भुततेकडे झुकणारे असले, तरी पण त्यातून आकाराला येणार्या व्यक्ती मात्र मानवी जगातल्या आहेत. आपल्या सुखात रंगणार्या अन् आपल्या दु:खात पिचणार्या, त्यांच्या कोमल हृदयाचे त्यांनी केलेले चित्रण इतके जिवंत आणि चटकदार आहे, की ते अवलोकिताना वाचक हसावा नि रडावा...’