-
Chhota Desh ( छोटा देश)
बुरुंडी आणि रवांडा येथे घडणारी ही कादंबरी दहा वर्षांच्या गॅबीची कहाणी आहे, जो आपल्या फ्रेंच वडिलांसोबत आणि रवांडाच्या आईसोबत बुजुंबुरा या जिल्ह्यात राहतो. गॅब्रिएलच्या सुखासीन आयुष्यामुळे त्याला हुतू बहुसंख्य आणि तुत्सी अल्पसंख्याक यांच्यातील वाढत्या तणावाची जाणीव नसते. पण रवांडात पेटलेलं गृहयुद्ध आणि नरसंहाराच्या उद्रेकाची झळ बुरुंडीमध्ये पसरते, आणि गॅबी व त्याच्या मित्रांचं स्वास्थ्य हरवतं. ही कादंबरी बुरुंडीमध्ये वाढलेल्या गेल फेयच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारित आहे; पण ती आत्मचरित्रात्मक नसल्याचे लेखकाने ठामपणे स्पष्ट केले आहे.
-
Nirjan Pool (निर्जून पूल)
राजकीय इतिहासाची एक अशी तप्त आत्म कहाणी जिने तेलुगू साहित्य विश्वात वादळ निर्माण केले. आंध्रप्रदेशातील माओवादी चळवळीचे संस्थापक दिवंगत कोंडापल्ली सितारामय्या यांची पत्नी कोंडापल्ली कोटेश्वराम्मा यांची ही आत्मकथा आहे. भारतीय स्वातंत्र्यलढा त्यानंतर कम्युनिस्ट पक्षाचा उठाव आणि आंध्रप्रदेशमधील नक्षल चळवळ हे सर्व जवळून पाहिलेल्या, अनुभवलेल्या, या सगळ्याचा एक भाग असलेल्या अशा या लेखिका आहेत. चाळीसच्या दशकात त्या भुमीगत आयुष्य जगू लागल्या. त्यांचे पती कोंडापल्ली यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि साथीने कोटेश्वराम्मा यांना जगण्याची आणि लढण्याची ताकद मिळाली. पण नंतर जेव्हा ते कोटेश्वराम्मा यांना सोडून गेले तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसला. पुढचा एकटीचा वेदनादायी प्रवास कोटेश्वराम्मा यांनी धाडसाने आणि मानाने केला. त्या शिकल्या, नोकरी करू लागल्या. आपल्या नातवंडांना त्यांनी वाढवलं. त्या कविता लिहू लागल्या. एक वैचारिक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी स्वतःचे अस्तित्व स्वत: निर्माण केले. ही त्यांची आत्मकथा म्हणजे अतिशय बिकट परिस्थितीमधील त्यांच्या धाडसाचा आणि दृढतेचा पुरावा आहे. त्यांना जाणवलेल्या माणसांच्या आणि राजकीय संस्थांच्या वृत्ती त्यांनी यात मांडल्या आहेत. भारतीय स्त्रिया कठीण परिस्थितीचा सामना करतात हे सर्वश्रुत आहेच. पण त्या कोटेश्वराम्मा यांच्यासारख्या यशस्वी सुद्धा होतात हे सांगणारी ही आत्मकथा आहे.
-
Mark Twainchya Nivadak Katha (मार्क ट्वेनच्या कथा)
‘लाखाची गोष्ट’ या कथेतील कंगाल नायकासमोर आव्हान आहे लंडनसारख्या शहरात दहा लाख पौंडाच्या नोटेच्या आधारे एक महिना तग धरून राहण्याचं. तो यशस्वी होतो का? ‘ऑनलाइन शुभमंगल’ कथेत अमेरिकेतील दूरदूरच्या दोन टोकांच्या शहरातील युवक-युवती एकमेकांना न पाहता टेलिफोनवरून माध्यमातून एकमेकांच्या प्रेमात पडतात; पण त्यांच्या प्रेमात कोणीतरी बिब्बा घालतं. काय होतं पुढे? ‘परतीची वाट’ या कथेतील हेन्री आपल्या घरात आलेल्या अतिथीला आपल्या माहेरी गेलेल्या बायकोविषयी सांगत असतो. तिच्या येण्याची अतिथीही औत्सुक्याने वाट पाहत असतो. येते का ती?... ‘एक डाव भुताचा’ ही कथा पुतळ्याच्या भुताभोवती फिरते... ‘मृत्यूची गोल चकती’ ही कथा, आपल्या पित्याला फाशीच्या शिक्षेपासून वाचवणाऱ्या निरागस मुलीची आहे...मार्क ट्वेनच्या रंगतदार शैलीतून साकारलेल्या आणि अंतर्मुख करणाऱ्या कथांचा संग्रह.
-
Runanubandh (ऋणानुबंध)
दुसऱ्यांच्या घरात केअरटेकर म्हणून राहताना नावाच्या आणि मुलाच्या प्रेमाला पारख्या झालेल्या नीलाताई...आईच्या अंत्ययात्रेत परक्यासारखं सामील व्हावं लागलेले गणेश जोशी...आयुष्यभर अहंकाराने पछाडलेले आणि जीवनाच्या संध्याकाळी नात्यांचं महत्त्व पटलेले डॅडा...स्वार्थी मुलाला धडा शिकवणारी लक्ष्मी... ‘डिव्होर्स’ घेता न आल्याचं शल्य आयुष्यभर मनात बाळगणारी निमाकाकी...जीवनभर दु:ख सोसल्यानंतर वृद्धपणी समाजाची वेगळ्या प्रकारे सेवा करणारे दादा...गर्भश्रीमंत तरुणाला नाकारणारी अनाथाश्रमातील बाणेदार सरिता...विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून मानवी मनाचा वेध घेणाऱ्या , मानवी जीवनाचं यथार्थ चित्रण करणाऱ्या कथा
-
Marathi Daulatanche Nari Shilpa (मराठी दौलतीचे नार
जिजाबाईंच्या शिवरायांनी स्थापन केलेली मराठी दौलत ते ‘मेरी झांसी नहीं दुंगी’ म्हणणारी मराठमोळी राणी. या संपूर्ण मराठी दौलतीच्या कारकीर्दीमध्ये अनेक स्त्रियांचा अनन्य साधारण हातभार आहे. महाराष्ट्र विकास सेवा वर्ग १ चे निवृत्त अधिकारी, कथालेखक, इतिहास अभ्यासक-लेखक गोपाळ देशमुख यांनी अशी मराठी दौलतीची नारी शिल्पं या पुस्तकात रेखाटली आहेत. भोसले राजघराण्यातील जिजाऊ, येसूबाई, ताराबाई, सरदारांतील उमाबाई दाभाडे, दर्याबाई निंबाळकर, पेशव्यांमधील गोपिकाबाई, पार्वतीबाई , रमाबाई ते अहिल्याबाई होळकर. पुस्तकातील पंधरा प्रकरणांतून मराठी सत्तेतील धडाडीच्या स्त्रियांची कर्तबगारी अभ्यासपूर्वक, ओघवत्या आणि प्रेरणादायी भाषेत सांगितली आहे.