-
Brand Factory (ब्रँड फॅक्टरी)
‘ब्रँड फॅक्टरी’ या आजच्या काळाचा वेध घेणार्या कथा आहेत. आजच्या काळातील सामान्य माणसांच्या या कथा आहेत. जागतिकीकरणातून अवतरलेल्या बाजारयुगाच्या भूलभुलैय्यात माणसं हरवली आहेत. एकीकडे स्वप्नांची झगमगती दुनिया आहे, चमकदार जगण्याची मोहिनी पडली आहे. जगण्याचं मान बदललेलं आहे आणि त्यात जगण्याचं भान हरवून गेलं आहे. जणू तारा अगदी हाताशी आहे, पण तो हातात येत नाहीये, अशी अवस्था! त्यासाठी जीवघेणी स्पर्धा, प्रचंड दमछाक आणि घुसमट! जगण्याचा झगडा तीव्र झाला आहे आणि त्यात केवळ फरफट दिसत आहे. या सगळ्या उलथापालथीत माणसातून हरवत चाललेला ‘माणूस’ या कथा अधोरेखित करीत आहेत. या कथा विचारत आहेत, आपण अजून ‘माणूस’ आहोत ना? आपला ‘ब्रँडेड रोबो’ तर झाला नाही ना? मनोहर सोनवणे यांच्या लिखाणात प्रचारकी थिल्लरपणा नाही. ते तटस्थ आहेत अन संवेदनशीलही. त्यामुळे ‘ब्रँड फॅक्टरी’ला कलात्मक मूल्य प्राप्त झालंय, यात शंका नाही. – अंबरीश मिश्र मनोहर सोनवणे यांचं लिखाण म्हणजे एका संवेदनशील मनाने आपला भोवताल टिपल्यानंतरची स्पंदनं आहेत. त्यात आपल्या भोवतालाचं सूक्ष्म निरीक्षण आहे आणि त्या भोवतालात गुंतलेल्या आर्थिक-सांस्कृतिक धाग्यांची खोल जाणीवही आहे. – वसंत आबाजी डहाके
-
Fakiriche Vaibhav (फकिरीचे वैभव)
लेखक शेतजमीन नांगरावी तसं आपलं आयुष्य नांगरतो. आयुष्य नांगरताना बहुजीवांचं जगणं उलगडत जातं. त्यातलं काय पकडू आणि काय सोडू असं होतं. तरीही उपेक्षितांचा, विस्थापितांचा अंतर्दाहच आपलासा वाटत राहतो. त्यातूनच चुंबकाप्रमाणे वेदना मनाला खेचून घेते. मग तीच वेदना शब्दातून पाझरू लागते. तिफणीतून बियाणं पेरत जावं तसं अक्षरांच्या ओळी कागदावर पेरल्या जातात. शब्द घेऊन त्या उगवतात आणि फकिरीचे वैभव काय असतं याचं दर्शन घडवतात. कार्यकर्ता जेव्हा सर्वस्वी स्वतःला झोकून देत दुःखीतांचं दुःख हलकं करण्यासाठी झटतो तेव्हा तो खर्या अर्थाने उपेक्षित-पीडितांच्या वेदनांनी होरपळून निघतो. पण वेदनांची ही धग त्याला आणखी बळ पुरवते आणि तो पुन्हा पुन्हा नव्या जोमाने लोकांसाठी झटत राहातो... स्वतःला फकीर बनवत... कारण ही फकिरी त्याला श्रीमंत करत राहाते माणूस म्हणून... कार्यकर्ता म्हणून... त्याचसाठी भूकेलेल्या एका कार्यकर्त्याचं हे वेदनाकथन... त्याच्यातल्या वैभवसंपन्न फकिराचं दर्शन घडवणारं... एकदा वाचायलाच हवं असं सत्यकथन!
-
Bhangar (भंगार)
मी अशा समाजात जन्माला आलो होतो, की जिथल्या लोकांचं उकिरडा हेच जीवन होतं. मी उकिरड्याशेजारीच जन्मलो, तिथंच वाढलो, त्यातलं उष्टं, शिळं, इतरांनी फेकलेलं अन्न उचलून ते पोटात ढकलत, भंगार गोळा करून, ते विकून त्यावरच शाळेसाठी एक-एक पुस्तक-वही गोळा करत शिकत गेलो. ते शिक्षण घेणं सोपं नव्हतंच. अंधश्रद्धा, रूढी-परंपरांशी, जातपंचायतीशी लढा देत आज इथपर्यंत पोहोचलो. भंगार गोळा करून शिक्षण घेतलेला गोसावी समाजातला मी पहिला शिक्षक. आपली कहाणी एखाद्या चित्रपटाला साजेशी आहे. बाबांना आपला अभिमान वाटतो तो, समाजाने वाळीत टाकले असतानाही आपल्यातील ‘विद्यार्थी’ लुप्त न होता सदैव सजग राहिला, बहिष्काराची तमा न बाळगता प्राप्त परिस्थितीवर जिद्दीने मात करत आपण आपले शिक्षण पूर्ण केलेत, याचा. विशेष म्हणजे, शिक्षकी पेशा स्वीकारून शिक्षणाच्या प्रसारासाठी आपण जे प्रयत्न केलेत, त्याची तुलनाच होऊ शकत नाही. - डॉ. विकास आमटे ‘भंगार’ हे आत्मचरित्र गोसावी समाजाचं चित्र आपल्यापुढं ठेवतं. गोसावी समाजाचं भटकं जीवन, तीन दगडांची चूल, तीन थामल्यांवर (काठ्यांवर) उभी पालं, भंगार गोळा करण्यातील मरण यातना, कोंडाळ्याचे तीन भागीदार (माणूस, कुत्रं नि डुक्कर), जातपंचायतीचा बडेजाव, स्त्रीचं अस्तित्वहीन जगणं. मुलांचं जन्मत: नि जन्मभर वंचित जगणं, हे सारं शब्दबद्ध करणारं ‘भंगार’ वाचकाला गोसावी समाजाचं भंगारपण समजून घ्यायला भाग पाडतं. - डॉ. सुनीलकुमार लवटे