-
Atmadnyanache Vidnyan (आत्मज्ञानाचे विज्ञान)
या परिवर्तनशाली पुस्तकात आनंदाच्या अमर्याद विश्वाची गुरुकिल्ली सद्गुरू वाचकांचना विविध स्वरुपात देऊ करतात. या पुस्तकात प्रत्येकासाठी काहीतरी अमूल्य आहे. सत्याच्या शोधकांना यांत दैनंदिन जीवनाच्या ताण तणावांनी ओढवलेला क्षीण झटकून त्यांच्या शोधयात्रेचे आनंदयांत्रेत रूपांतर करता येईल. साशंक मनाला अशी काही सोपी साधने मिळतील ज्या द्वारे तर्काच्या मर्यादा उलांडून त्या पलीकडच्या जीवनाच्या उद्दत्तेचे दर्शन होईल. शास्त्रज्ञाला त्याच्या आंतरीक प्रयोगशाळेत स्वतःच नवे नवे प्रयोग करण्यसाठी मार्ग मिळेल. भक्तासाठी गुरूकृपेची जीवनाच्या सध्या आणि दैनंदिन गोष्टींत प्रचीती येऊन जणू पर्मानंदाचे विश्वच खुले होईल. कर्म, विचार, भावना, बुद्धीमत्ता, अन्न, कामवासना, निद्रा, उर्जा, इत्यादी नाना पैलूंवर नव्याने प्रकाश टाकत या पुस्तकात जीवनाच्या अंतिम सत्याकडे आणि अमर्याद आनंदाकडे नेणार्या केवळ कवी कल्पना नसून प्रत्यक्ष आयुष्यात चोखाळण्याजोगा एक मार्ग दाखवला आहे. पुस्तकाचा पहिला भाग या आनंदयात्रेच्या नकाश्याचे विवेचन करतो तर दुसरा भाग त्यावरून प्रयेक्ष चालण्यासाठी साधने आणि मार्ग देतो. या यात्रेवर असताना जीवनाच्या दृष्टीकोनात होणार्या अमुलाग्र बदलांनाच तुमच्या प्रगतीचे द्योतक मानले पाहिजे.
-
Fifty Shades Freed (फिफ्टी शेड्स फ्रीड)
‘फिफ्टी शेड्स फ्रीड’मध्ये अॅनेस्टेशिया (अॅना) स्टील आणि खिश्चन ग्रे यांच्या रंगलेल्या शृंगाराचं वर्णन आहे. ते दोघं विवाहबद्ध होतात आणि त्यांच्या प्रणयाला उधाण येतं. एलिना रॉबिन्सन नावाच्या स्त्रीचा खिश्चनला आलेला मेसेज पाहून अॅना खूप दुखावते. या मेसेजवरून तरी तिला असं वाटतं, की खिश्चनचे आणि त्या स्त्रीचे शरीरसंबंध आहेत. त्याबद्दल जेव्हा ती खिश्चनला विचारते, तेव्हा तो तिला एक धक्कादायक सत्य सांगतो, ज्याचा संबंध त्याच्या कामक्रीडेत डोकावणाNया विकृतीशी असतो. खिश्चनच्या या खुलाशामुळे अॅना आणि खिश्चनच्या संबंधात अधूनमधून येणारा तणाव नाहीसा होतो आणि अॅना मनाने त्याच्या आणखी जवळ जाते. यथावकाश त्यांना पुत्रप्राप्तीही होते आणि त्यांचं कौटुंबिक जीवनही बहरतं. तेव्हा अॅना आणि खिश्चनच्या प्रेमाचा आणि शृंगाराचा हा प्रवास अनुभवण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे.
-
Fifty Shades of Grey (फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे)
‘फिफ्टिी शेड्स ऑफ ग्रे’ ही अॅनेस्टेशिया (अॅना) स्टील आणि खिश्चन ग्रे यांची कथा आहे. अॅनाची पत्रकारितेच्या क्षेत्रात असलेली मैत्रीण केट, अॅनाला एकदा प्रसिद्ध उद्योगपती असलेल्या खिश्चन ग्रेची मुलाखत घ्यायला पाठवते. पहिल्याच भेटीत खिश्चन आणि अॅना एकमेकांच्या प्रेमात पडतात; पण अॅना थोडीशी लाजरी असल्यामुळे आपल्या मनातली ग्रेविषयीची प्रेमभावना स्वीकारायला संकोचत असते; पण ग्रेच्या देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे ती त्या प्रेमभावनेला रोखू शकत नाही आणि ग्रेच्या प्रेमप्रस्तावाला होकार भरते. कौमार्य अबाधित असलेल्या अॅनाला खिश्चन शरीरसंबंधाचे धडे द्यायला लागतो; मात्र कामक्रीडा करताना त्याच्या काही अटी असतात. त्या अॅनाला जाचक वाटायला लागतात आणि हळूहळू त्यांच्यात दुरावा निर्माण व्हायला लागतो. शेवटी ते वेगळं व्हायचं ठरवतात. एक यशस्वी उद्योजक आणि चांगला माणूस असलेला ग्रे कामक्रीडेच्या वेळी विकृत होतो. त्याच्यातला माणूस आणि त्याच्यातला कामविकृत पुरुष यांच्यातील द्वंद्व अॅनाला अस्वस्थ करत असतं. ते द्वंद्व जाणून घेण्यासाठी ‘फिफ्टिी शेड्स ऑफ ग्रे’ वाचलंच पाहिजे.
-
Sachin Tendulkar Chase Your Dreams (सचिन तेंडुलकर
अवघ्या अकराव्या वर्षी सचिनच्या क्रिकेटची सुरुवात झाली तेव्हा त्याला तरी कुठे माहीत होतं, की पुढील २४ वर्षं २२ यार्डांच्या खेळपट्टीशी आपलं नातं जोडलं जाणार आहे. ‘प्लेइंग इट माय वे’ या सचिनच्या आत्मचरित्राची (क्रिकेटचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या) तरुणांसाठीची आवृत्ती असंच ‘चेस युअर ड्रीम्स’या छोट्या आत्मचरित्राचं स्वरूप आहे. या छोट्या चरित्रातून सचिन आपली अवघी कारकीर्द... आपला अवघा जीवनपट वाचकांपुढे मांडतो. ‘प्लेइंग इट...’मधून दिसणारा सचिन या पुस्तकातूनही तितकाच उत्कटपणे दिसतो. सुरुवातीच्या काळी इतर देशांची काहीशी कुाqत्सत धारणा होती, की भारतीय संघ जलदगती गोलंदाजीपुढे नांगी टाकतो... बचावात्मक खेळतो. अजित वाडेकरच्या नेतृत्वाखालील संघाने विंडीजला त्यांच्याच मातीत धूळ चारत चमत्कारसदृश विजय मिळवले. लिटिल मास्टर सुनील गावसकरने आपल्या तंत्रशुद्ध सरळ बॅटच्या फलंदाजीने तेज बोलर्सना निष्प्रभ करीत भारतीय संघाची प्रतिमा उजळवली. गावसकरची हीच शास्त्रशुद्ध फलंदाजी सचिनसाठी प्रेरणा होती. सीमारेषा खुणावत असली तरी चांगल्या चेंडूला मान देत त्याने आपल्या नैसर्गिक फटकेबाजीला मुरड घातली. चकवणाऱ्या चेंडूना बॅकफूटवर जात सीमारेषा दाखवण्याची त्याची शैली प्रक्षणीय असायची. स्ट्रेट ड्राइव्ह, कव्हर ड्राइव्ह, फ्लिक, हुक, रिव्हर्स स्वीप अशी सर्व अस्त्रं त्याच्या भात्यात होती.
-
Fifty Shades Darker (फिफ्टी शेड्स डार्कर)
‘फिफ्टिी शेड्स डार्कर’ ही अॅनेस्टेशिया (अॅना) स्टील आणि खिश्चन ग्रे यांची प्रेमकहाणी आहे. अॅना आणि खिश्चन यांच्यात प्रेमबंध आहे; पण खिश्चनची अधिकार गाजवण्याची वृत्ती आणि काही वेळेस वेदनादायक ठरणारा त्याचा प्रणय यामुळे ती नाराज होते आणि खिश्चनपासून दूर होण्याचा निर्णय घेते. ते परस्परांपासून दूर होतातही; पण दोघांनाही एकमेकांशिवाय चैन पडत नसतं. खिश्चनचं बालपण त्याच्या आईच्या वासनांधतेमुळे करपलेलं असतं. त्यामुळे प्रणयात तो काही वेळेला विकृत पातळीवर जातो. ही विकृती आणि हक्क गाजवण्याची वृत्ती जर खिश्चनने त्यागली तर मात्र ती परत त्याच्याकडे जायला तयार असते. मग ते परत एकत्र येतात आणि त्यांचा प्रणय रंगायला लागतो आणि ते विवाह बंधनात अडकायचं ठरवतात. तेव्हा शरीराकडून मनाकडचा किंवा शरीर-मन या द्वंद्वातून पुढे सरकणारा या युगुलाचा हा प्रवास अनुभवण्यासाठी ‘फिफ्टिी शेड्स डार्कर’ अवश्य वाचलं पाहिजे.
-
Tarang.. (तरंग)
नेताजी पालकर यांच्या जीवनावर ‘अग्निदिव्य’ ही विलक्षण कादंबरी लिहिणारे कल्याणीरमण बेन्नुरवार यांचा ‘तरंग’ हा विविध सत्य घटना, आठवणी आणि शीतल व दाहक अनुभवांवर आधारित वैशिष्ट्यपूर्ण असा कथासंग्रह आहे. बेन्नुरवार यांच्या बालपणापासून आतापर्यंतच्या विविध कडू-गोड कौटुंबिक आठवणींबरोबरच त्यांना आयुष्यात भेटलेले चित्र-विचित्र तऱ्हेचे नानाविध लोक तसेच सामाजिक जीवनातील अनेक छोट्या-मोठ्या, बऱ्या-वाईट नाट्यपूर्ण घटना-प्रसंगांवर आधारित असा हा कथासंग्रह आहे. यामध्ये सत्याला दिलेली कल्पिताची चपखल अनुषंगिक जोड यातून कथा साकारते. सत्य आणि कल्पित दोन्हींचे अनोखे मिश्रण असलेल्या या विविध उत्कंठावर्धक कथा अत्यंत वाचनीय आहेत.
-
Democracy Eleven (डेमेक्रसीज इलेव्हन)
स्वातंत्र्योत्तर सुरुवातीच्या काळात भारतीय क्रिकेट हा खेळ तत्कालीन संस्थानिक, अभिजन, श्रीमंत अशा विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असायचा. ‘शाही रंजन’ असेच क्रिकेटचे स्वरूप होते. संस्थाने खालसा झाल्यानंतर कालौघात बदलत्या राजकीय परिस्थितीशी समांतर क्रिकेटची व्याप्ती इतरेजनात वाढत गेली. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक स्थित्यंतर होत असताना भारतीय क्रिकेटमध्ये विकासात्मक परिवर्तन होत गेले. त्या काळापासून ते आजच्या ‘नं-१ पोझिशन’पर्यंत यायला काही दशकांचा कालावधी उलटावा लागला. याच काही दशकांच्या कालावधीत अनेक गुणी खेळाडूंनी क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव कोरले. ‘प्रिंट व इलेक्टॉनिक मीडिया’चे नामवंत पत्रकार आणि माजी कसोटीपटू दिलीप सरदेसाई यांचे चिरंजीव राजदीप सरदेसाई यांनी आजवरच्या क्रिकेटपटूंमधील आदर्श ११ जणांची निवड केली (खरेतर बहुतांश वाचकांच्या मनातले हेच आदर्श क्रिकेटर आहेत) आणि प्रत्येक खेळाडूची कारकीर्द वाचकांपुढे मांडली आहे. या ११ कीर्तिमान खेळाडूंची चरित्रकहाणी राजदीप यांनी शब्दबद्ध केली आहे. प्रस्तुत पुस्तकात त्यांची कारकीर्द आकडेवारीसह येतेच, पण त्यांचे मैदानावरील आणि मैदानाबाहेरील आयुष्याचे उद्धृत केलेले संदर्भ संक्षिप्त तरीही परिपूर्ण वाटतात. त्या त्या खेळाडूच्या खेळातील व खेळाबाहेरील गुणदोषांचे सटीक आणि सटीप विश्लेषण राजदीप करतात. या खेळाडूंच्या आयुष्यातील क्रिकेटचा ‘उपोद्घात’ (अर्थात प्रारंभ) आणि ‘सिंहावलोकन’ (अर्थात निवृत्ती) असा सर्वसमावेशक तपशील वाचकांना अवगत होतो. राजदीप स्वत: क्रिकेट खेळले आहेत. आनुवंशिक वारसा म्हणून क्रिकेट त्यांच्या रक्तातच आहे. म्हणूनच त्यांचे क्रिकेटविषयीचे विश्लेषण अनुभवाच्या मुशीतून आलेले आहे. एखाद्या खेळाडूविषयी लिहिताना क्रिकेटमधले धुरीण, बुजुर्ग आणि समकालीन क्रिकेटपटूच्या मतमतांतराची पुस्तकात असलेली पखरण हा तर खास ‘राजदीप टच’ म्हणावा लागेल. एखाद्या खेळाडूचे फक्त गुणवर्णन, त्याचे विक्रम आणि आकडेवारी, त्याची विश्वस्तरीय कामगिरी, त्याची शैली, त्याचे कौशल्य, देशातील आणि जगभरातील लोकप्रियता याचेच वर्णन पुस्तकात येते असे नाही. तर त्या खेळाडूचे दोष, त्याच्या चुका, त्याच्या वर्तनातील विसंगती, त्याचे फसलेले निर्णय, त्याच्याविषयीचे प्रवाद आणि समज, त्याच्या व्यक्तिमत्त्वाची ‘दुसरी’ बाजू असे समग्र चित्र उभे करताना राजदीप शब्दांची कंजुषी करत नाहीत. उलट त्यांच्या लिखाणाला परखडतेची धार येते. राजदीप यांची भाषा प्रवाही आहे. त्यात लालित्य आहे आणि सौंदर्यही... विषयाच्या ओघात आलेली त्यांची काही पल्लेदार वाक्ये पाहू : त्या सभ्य काळाचं दिलीप सरदेसाई हे ‘पॉडक्ट’ होतं... भविष्याच्या पोटात उमेदीचा गर्भ श्वास घेऊ लागला... त्याच्या बॅटमधून धावांचे झरे फुटत होते... आक्रमण हाच बचावाचा उत्तम मार्ग असतो... रिचर्ड्सच्या उंच उडालेल्या चेंडूवर कपिलची नजर रुतलेली होती... ज्या वयात गणित शाळकरी मुलांना घाम फोडतं, त्या वयात हा मुलगा नवीन समीकरणं जुळवत होता... ‘तो’ षटकार म्हणजे आपल्या आगमनाचा तेंडुलकरी ऐलानच होता... याच काळात क्रिकेटचं कॉमर्सशी लग्न झालं... विकासाच्या वाटेत इंडिया पुढे निघून गेला; भारत मात्र मागेच राहिला... पुस्तकात ठायी ठायी असलेली अशी वाक्यं राजदीपच्या प्रतिभेची, लेखनकौशल्याची आणि कल्पनाविलासाची प्रचिती देतात. चिवडा खाताना घासात काजूचा तुकडा यावा, अशीच ही खुमासदार वाक्यं आहेत. मेघना ढोके यांचं अनुवाद कौशल्य लाजबाब आहे. अस्सल मराठीकरणाचा हा उत्तम नमुनाच आहे. राजदीपच्या लेखनाची खुमारी मेघनाने दुणावली आहे. आजच्या काळात क्रिकेट न आवडणारा विरळाच. पण असलाच, तर त्याने हे पुस्तक आवर्जून वाचावे. कदाचित त्याला क्रिकेट श्वासाइतकेच महत्त्वाचे वाटू लागेल...
-
How Starbucks Saved My Life (हाऊ स्टारबक्स सेव्ह्ड
अत्यंत सधन कुटुंबात जन्मलेले मायकेल गेट्स गिल तडजोडी आणि दुःख यांपासून नेहमीच लांब होते. लग्नानंतरही उपनगरात प्रशस्त घर, पत्नी, चार मुले, जाहिरात क्षेत्रात उच्च पदावर नोकरी, सहा आकडी पगार असं सुखी आयुष्य ते जगत होते. त्याच दरम्यान अचानकपणे त्यांना एका मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं. त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. अशा परिस्थितीचा त्यांनी कधीही विचारच केला नव्हता. त्या दृष्टीनं त्यांनी कधी काही तजवीजही करून ठेवली नव्हती. त्याचदरम्यान त्यांचा घटस्फोट झाला. त्यांनी दुसरं लग्नही केलं. परंतु आर्थिकदृष्ट्या मात्र ते सावरू शकले नाहीत. त्याच वेळी त्यांच्या मेंदूमध्ये एक छोटी गाठ असल्याचं त्यांना समजलं. आर्थिक तंगी आणि आरोग्यविम्याअभावी उपचार घेणं त्यांना शक्य नव्हतं. परंतु एक दिवस ‘स्टारबक्स’ कॉफी शॉपमध्ये बसलेले असताना तिथल्या व्यवस्थापनाचं काम सांभाळणाऱ्या क्रिस्टल नावाच्या एका कृष्णवर्णीय मुलीनं त्यांना ‘स्टारबक्स’मध्येच नोकरी देऊ केली. ज्या ठिकाणी कॉफी प्यायची त्याच ठिकाणी मायकेल आता लोकांना कॉफी देण्याचं काम करू लागले. गौरवर्णीय मायकेल आता एका कृष्णवर्णीय मुलीच्या आज्ञा पाळू लागले. प्रसाधनगृहाची साफसफाईही करू लागले. स्टारबक्समध्ये काम करणारे सर्वच जण एकमेकांना भागीदार किंवा पार्टनर अशी हाक मारत असत. सर्व जण समान आहेत ही भावना मायकेलमध्येही दृढ झाली. ‘श्रमप्रतिष्ठा’, ‘विनम्रता’ या मूल्यांचं महत्त्व त्यांना समजलं. सहकाऱ्यांमधील आपुलकीनं त्यांच्यात मोठं परिवर्तन घडवून आणलं. जीवन जगण्याची नवी दृष्टी ‘स्टारबक्स’नं त्यांना दिली. आयुष्यात पैसा सर्वकाही नाही, तर त्याशिवायही अनेक गोष्टींनी जीवन समृद्ध करता येतं, हे त्यांना समजलं. जिवाभावाचे मित्र आणि क्रिस्टलसारखी मार्गदर्शिका यांनी त्यांना जगण्याचं बळ मिळालं. गमावलेला आत्मविश्वास त्यांना परत देण्याचं काम ‘स्टारबक्स’नं केलं, हे मायकेल गेट्स गिल मान्य करतात.
-
Shesh (शेष)
भूक माणसाला किती लाचार बनवते! आम्ही सगळ्या बहिणी दोन वेळचं पोटाला काही मिळावं म्हणून वणवण करत होतो. वय लहान, आणि भूक मोठी. जेवणाच्या वेळेला कुणाच्या तरी दारात जाऊन उभं राहायचं. नाइलाज म्हणून त्या घरातली बाई आत बोलवायची आणि मग तिच्या रागासकट, तिच्या जिव्हारी लागणार्या शब्दांसकट जे पानात पडेल ते गिळायचं. त्या घरातल्या पुरुषाची नजर अंगावरून फिरत राहायची. किळस यायची- जणू ती नजर नग्न करत आहे. पण निर्लज्ज व्हायचं; कारण पोटात भुकेचा वणवा पेटलेला असायचा. आणि तोच वणवा त्या पुरुषाच्या नजरेत पेटलेला असायचा. दोन्ही भुका शारीरिक.....एक भूक वणवा शमवणारी आणि एक भूक वणवा अजून चेतवणारी...
-
Full Black (फुल ब्लॅक)
अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांमधील चित्रपटगृहांवर, विमानतळांवर वगैरे एकाच वेळी आत्मघातकी दहशतवाद्यांचे हल्ले होत होते. काही काही शहरांवर तर पुनःपुन्हा वेगेवगळ्या तऱ्हेचे हल्ले होत होते. सुप्रसिद्ध सिनेनिर्माता लॅरी सालोमन याच्यावर त्याच्या राहत्या घरी जीवघेणा हल्ला झाला, त्याचा मित्र ल्यूक रॅल्स्टन याने त्या खुनी टोळीचा निःपात केला खरा; पण त्या आधीच त्यांनी त्याच्या घरामध्ये एक डॉक्युमेंटरी बनवणाऱ्या दोघा निर्मात्यांचा खून पाडलेला असतो. वेगवेगळ्या फाउंडेशन्सनी जमा केलेला पैसा शेवटी खरोखर कशासाठी वापरला जातो हे चुकूनच त्यांच्या ध्यानात आलेले असते आणि म्हणून शोध घेत ‘वेल इन्डाउड’ या नावाची डॉक्युमेंटरी ते बनवत होते. त्यांनी शोध लावला होता की, अमेरिका संपूर्ण उद्ध्वस्त करण्याची ‘प्रोजेक्ट ग्रीन रॅम्प’ या नावाची योजना कार्यान्वित होते आहे. खुनी भाडोत्री टोळीमध्ये पूर्वीची रशियन स्पेशल फोर्सेसमध्ये असणारी माणसे होती हे कळल्यावर रॅल्स्टनच्या लक्षात येते की, फारच उच्चपदस्थ अशा कुणाचा तरी या हल्ल्यात हात असणार. कार्लटन ग्रुप फक्त एक ध्येय समोर ठेवून काम करत होता. दहशतवाद्यांना शोधा, गाठा आणि ठार करा. पूर्वी सील टीम-२ चा सदस्य असणारा स्कॉट हॉर्वाथ त्यांचा सर्वात यशस्वी असा एजंट होता. काही अपवादात्मक हल्ले सोडता वेगवेगळ्या शहरांमधील विमानतळांवर होणारे हल्ले थोपविता आल्यावर स्कॉट हॉर्वाथ शोध घ्यायला लागतो. ल्यूक रॅल्स्टनलाही स्पेशल ऑपरेशन्स फोर्सेसमधला अनुभव होता. उच्च दर्जाचा डेल्टा ऑपरेटर. दोघे आपापल्या पद्धतीने तपास करत असताना एकत्र येतात आणि त्यांच्या लक्षात येते की, सर्व हल्ले हे सर्वंकष युद्ध या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका योजनेचाच भाग आहेत. ही त्यांच्या तपशीलवार शोधाची आणि अपराध्याला त्यांच्या दृष्टीने योग्य तीच शिक्षा देण्याची कथा आहे.
-
Lalitkalechya Sahawasat (ललितकलेच्या सहवासात)
‘ललितकलेच्या सहवात’ हे पुस्तक पुरुषोत्तम श्रीपत काळे (‘वपुं’चे वडील) यांनी विसाव्या दशकाच्या पूर्वार्धात (४०-५० दशकात) लिहिले आहे. ते स्वत: चित्रकार होते. केशवराव भोसले यांच्या ‘ललितकलादर्श’ नाटक मंडळीत ते पडदे रंगविणे, नैपथ्यरचना अशी कामे करीत. चित्रकार असूनही शब्दांवर आणि एवूâणच लेखनकलेवर त्यांची हुकमत होती, हे पानोपानी जाणवते. सुमारे ऐंशी वर्षांहून अगोदरच्या काळात मराठी भाषेवर संस्कृतचा प्रभाव होता. शब्दोच्चार आणि लेखनही अनुनासिक होते. अशा काळात लिहिलेले असूनही त्यांची शब्दरचना लालित्यपूर्ण आहेच, शिवाय आशयघन आणि वास्तवदर्शी आहे. हा ‘ललितकलादर्श’चा छोटेखानी इतिहासच म्हणता येईल.
-
Black List (ब्लॅक लिस्ट)
माहिती तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेऊन अमेरिकेचं ( आणि पर्यायाने तेथील प्रत्येक नागरिकाचं) अस्तित्वच धोक्यात आणण्याचं एटीएस या कंपनीचं जबरदस्त नियोजन असतं. हे नियोजन नक्की काय आहे, हे जाणून घ्यायचा प्रयत्न कार्लटन ग्रुप करत असतो; कारण एटीएस कंपनी जे काही करते आहे, ते देशाच्या विरोधात आहे, याची कुणकुण कार्लटन ग्रुपला लागलेली असते. हा ग्रुप दहशतवादाच्या विरोधात काम करत असतो. दहशतवाद्यांना आणि त्यांच्या नेत्यांना शोधा, गाठा आणि ठार करा, अशी त्यांची कार्यपद्धती असते. तर असा हा ग्रुप आपली योजना उधळून लावू शकतो, याची कल्पना एटीएस कंपनीला असते. त्यामुळे कार्लटन ग्रुपच्या सदस्यांना ठार मारण्याचा सपाटा एटीएस कंपनीने लावलेला असतो. एटीएस आणि कार्लटन ग्रुप यांच्यामधील जीवघेणा संघर्ष ‘ब्लॅक लिस्ट’ या कादंबरीत रंगवला आहे.
-
Japun Tak Paul (जपुन टाक पाऊल)
पुरुषोत्तम काळे- ‘वपुं’चे वडील यांनी चाळीस वर्षे रंगभूमीसाठी पडदे रंगविण्याची सेवा केली. रंगभूमीविषयक काही कार्य व्हावं आणि तेही ‘ललितकलादर्श’साठी, ही ‘वपुं’ची फार दिवसांची इच्छा होती. भालचंद्र पेंढारकरांच्या नाटकीय कारकिर्दीच्या अनुभवांचं शब्दांकन करण्याचं काम ‘वपुं’कडून घडलं, तर ‘ललितकलादर्श’साठी काही कार्य केल्याचं समाधान मिळून, तीही एका अर्थानं रंगभूमीची सेवाच होईल, या भावनेनं त्यांनी हे लिहिलं. पेंढारकरांनी त्यांच्या गतजीवनातले प्रसंग सांगितले, पण त्यांची तेव्हाची मनःस्थिती कशी असेल, हे हेरून ‘वपुं’नी ते आपल्यापुढे आणले आहे.
-
Return Of A King (रिटर्न ऑफ अ किंग )
शहाशुजा उल्-मुल्कला तरुण वयातच आजोबा अहमदशहा अब्दाली यांनी स्थापन केलेलं दुर्राणी साम्राज्य वारसाहक्कानं मिळालं. जगातला सर्वांत मोठा हिरा कोह-इ-नूर - कोहिनूर, (प्रकाशाचा पर्वत) आणि ‘फखाज’ (पुष्कराज!) नावाचं माणिक ही या घराण्यातली दोन अत्यंत मौल्यवान नाहीशी झालेली रत्नं शहाशुजाने विश्वासातल्या माणसांकरवी परत मिळवली. शहाशुजा हा उच्चविद्या विभूषित, हुशार, निश्चयी आणि अविचल वृत्तीचा आणि मित्रांशी असाधारण निष्ठेनं वागणारा होता. संपूर्ण आयुष्यात त्याला वारंवार गंभीर आपत्तींना सामोरं जावं लागलं; परंतु तो कधीही खचला नाही किंवा निराशही झाला नाही. त्याच्या संपूर्ण आयुष्यात आशावाद हेच त्याचं बलस्थान ठरलं. शुजाच्या अंगी अनेक दोष होते आणि त्यानं अनेकदा चुकीचे निर्णय घेतले; परंतु जेव्हा नोव्हेंबर १८४१ मध्ये बंड उसळून दाराशी संकट येऊन उभं राहिलं, तेव्हा कार्यक्षमतेनं त्याचा लष्करी प्रतिकार करणारा संपूर्ण काबूलमधला एकमेव माणूस फक्त शहाशुजा होता. ‘अकार्यक्षम ब्रिटिश आश्रयदात्यांच्या सेनेवर अवाजवी भिस्त टाकणं, ही त्याची सर्वांत मोठी चूक ठरली.’ शुजाचं खूपसं आयुष्य जसं अपयशाच्या छायेत व्यतीत झालं; त्याच पद्धतीनं त्याच्या वादळी आयुष्याची अखेर झाली.
-
Pratiroop (प्रतिरूप)
‘प्रतिरूप’ हे पुस्तक म्हणजे पारंपरिक पद्धतीचे "self help" पुस्तक नाही. हे पुस्तक म्हणजे असंख्य मानसिक, आध्यात्मिक अडथळ्यांवर मात करीत मिळवलेल्या विजयाची गोष्ट आहे. नेदरलँडला लेखिका स्वशोधाकरिता एकटी जाते. तेथे शमन्स जमातीच्या विधींमध्ये सहभागी होते आणि तेथून तिचा अंतर्मनातील प्रवास सुरू होतो. तिच्या प्रवासात आपण प्रवासी म्हणून कधी सामील होतो, हे कळतच नाही. या पुस्तकात प्रत्येक विधीचे एक प्रकरण आहे. सर्वच विधी अंतर्मुख करायला लावतात. प्रत्येक विधीतून ईश्वरीय सत्य उलगडत जाते. जीवन अनेक शक्यतांचे बनले आहे. सर्वच शक्यतांचा प्रवास आपण करू शकत नाही; पण या पुस्तकाद्वारे सर्व शक्यतांचे ज्ञान मात्र होऊ शकते. जर आपले अंतर्मन योग्य दिशेने नेले, तर बाह्य जगात कोणतीच गोष्ट चुकीची नाही. लेखिका महिनाभर नेदरलँडच्या रहिवाशांबरोबर तसेच चौथ्या पिढीतील शमन्सबरोबर होती. शमन्स ही प्राचीन जमात आहे, जी आध्यात्मिक उत्क्रांती आणि मुक्तीसाठी काही आध्यात्मिक क्रिया करते. भौतिक आणि आध्यात्मिक जगातील दुवा म्हणून शमन्सकडे पाहिले जाते. ‘शमनीझम’ हा आध्यात्मिक ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. असे म्हणतात की, शमन्स आत्म्यावर उपचार करतात. उपचार करून तुमच्यातून नष्ट झालेली ऊर्जा ते परत मिळवून देतात. लेखिकेच्या वैयक्तिक पातळीवरील प्रवासात आपण पुस्तकरूपाने सहभागी होतो; पण आपल्या लगेच लक्षात येते की, हा फक्त लेखिकेचा वैयक्तिक प्रवास नाही; लेखिकेच्या प्रवासात आपण सर्वच सहभागी आहोत. ‘मी म्हणजे दुसरे तुम्हीच!’ हे पुस्तकाचे नाव या दृष्टीने सार्थ ठरते. या पुस्तकातून अनेक सनातन मूल्यांचा शोध लागतो. आपल्या नियतीला आपणच आकार देऊ शकतो. गुरू आपल्यातच असतो. निराश होणे अथवा आनंदी राहणे हे पर्याय आहेत. कोणता पर्याय निवडायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. याचक आणि गुरू यामध्ये फरक नसतो. फरक दृष्टिकोन आणि प्रवृत्तीचा असतो. आपणच गुरू असतो आणि शिष्यही! आयुष्य आपणास दोन्ही बाजूंनी शिकवते. अशी अनेक सनातन मूल्ये आपणास जागोजागी भेटतात. अनेक लहानसहान रोचक प्रसंग लेखिकेने शब्दरूपाने फुलवले आहेत. प्रत्येक प्रकरण वाचकाला नवीन अनुभव देऊन जाते. प्रत्येक वेळी नवीनच सत्य समोर येते. मानवधर्म हा वैश्विक आहे. प्रत्येक मनुष्य सारखाच आहे आणि वैयक्तिक पातळीवर त्याचा झगडाही सारखाच आहे. या सर्व झगड्यांतून जात असताना हाती येणारे वैश्विक सत्य चिरंतन असते आणि हाच धागा पकडून लेखिकेने आपल्या समर्थ शैलीने फार नाजूकपणे विणला आहे.