-
Rayan (रायन)
घरात एखादा पाळीव प्राणी असला तर घरातील वातावरण बदलून जाते. असे घर आनंदी असते असे म्हणतात. प्रतिभा देशपांडे यांचे घर म्हणजे 'अॅनिमल किंग्डम'च म्हणावे लागेल. पँडी, ब्रँडी, निमो, सोनं, विठ्ठल अशी प्राणी मंडळी, तसेच गल्लीतील श्वान मंडळी रोजच्या जीवनाचा भाग होते, याचा अनुभव 'रायन'च्या येण्याने त्यांच्या कुटुंबात आला. डॉबरमन असलेल्या या श्वानाने या घरावर प्रेम केले. कुटुंबातील सदस्यांशी त्याची जवळीक, त्याचे खेळणे, त्याचे बागडणे हे सर्वांना आनंददायी होते. त्याने घराला जे दिले ते 'रायन'मधून लेखिकेने व्यक्त केले आहे. एका कुत्र्याचे हे आत्मवृत्त असले तरी ते एखाद्या माणसाचा जीवनपट वाचतोय असे वाटते. त्यातील प्रसंग, घटना या कुत्र्याशी निगडीत असल्या तरी आपणही त्यात गुंतून जातो व रायन आपल्या अवतीभवती असल्याचा आभास होतो.
-
Mrudgandh (मृदगंध)
या लेखांना एक प्रकृती आहे. आमच्या लहानपणी कोकणात गूळपाण्याने स्वागत व्हायचे, पण त्यातला आपलेपणा, गोडवा आणि सांस्कृतिक सहजता फार भावायची. त्या गूळपाण्याच्या गडव्याच्या नुसत्या दर्शनाने सात-आठ मैल चालून आल्याचे श्रम पार पळून जायचे. तसे काहीतरी या लेखांत आहे. 'लळा गोजिरा पाखरांचा’ हा लेखच, पाहू या. पाखरांची ओळख आईच्या मांडीवर ("इथं इथं बैस, रे, मोरा") अशी सुरुवात करण्याची कल्पना किती लेखिकांना तरी सुचेल? अशी सुरुवात झालेला लेख या अंगानेच पुढे जातो. "येरे येरे काऊ..." तुळशी कट्ट्यापासची दगडी खल, "विजेत्या तारांच्या तोरणमाळा...." हा लेख नुसताच पाखरांना भेटत जात नाही. तुमच्या जीवनातल्या अनेक सूक्ष्म स्मृती फुलवत जातो, आणि असा जातो, की असे काही होत आहे, याची त्याला जाणच नसते. पाखरांना स्वत:च्या उडण्याची जाण असते का! नसावी - म्हणूनच त्यांची हवेतली आंदोलने इतकी गोड वाटतात. खोलीत अडकलेली चिमणी बाहेर सटकण्यासाठी न सापडणारी वाट शोधते, तेव्हा तिची ती भ्यालेली जाणीव तिच्या उडण्यातले सारे सौंदर्य हिरावून घेत असते- नाही का? तसे, पाखरांच्या साहजिक उडण्यासारखे हे लेख वाटतात...
-
Prvartan (प्रवर्तन)
दारिद्र्याची/वेदनांची भीषण वर्तनं इथून पुढच्या काळातही येतील. तो सारा संताप समजून घेऊयाच. परंतु आता तेवढ्यावरच थांबता येणार नाही. आणि थांबता कामाही नये. सर्वहारा समाजाने जीवनसंघर्षात फोडलेले आर्त टाहो ऐकून एकीकडे हळहळायचे आणि दुसरीकडे ज्या व्यवस्थेने हे उध्वस्त-बेचिराख-भयाण जीवन त्यांच्या पदरात घातले, त्याच व्यवस्थेचे लाड-कौतुक आणि भरणपोषण करायचे, तीच धार्मिक-सांस्कृतिक व्यवस्था अबाधित कशी राहील याची बेमालूम काळजी घ्यायची, माजघरात त्याच संस्कृतीची निष्ठा राखायची, हा दुटप्पीपणा पुरे झाला. माणसाला अमानुष पातळीवर आणणाऱ्या संस्कृतीची उगमस्थानं आता खणून काढली पाहिजेत. आता मुळालाच हात घातला पाहिजे.
-
Ashihi Heraferi (अशीही हेराफेरी)
प्रत्यक्ष घटनेतील फक्त प्रसंग उचलून त्यावर स्वतःच्या कल्पनांचे मनोरे रचून हसवाहसवीतील काही वेचक तुकडे. ताणतणाव दूर करून नकळत हसायला लावणारे विनोदी लेखन.
-
sthanbhrshta (स्थानभ्रष्ट )
मुलांवर अतिविश्वास ठेवणाऱ्या माझ्यासारख्या भोळ्या (बावळट) वृद्धांना त्यांच्या जीवनाची अंतिम वर्षे दुःखात भिजून जाऊ नयेत, यासाठी सावध राहण्याचा मी सल्ला देतो. 'जे न देखे रवी ते देखे कवी' त्याच्यापुढे जाऊन म्हणावेसे वाटते, की 'जे न देखे कवी ते देखे अनुभवी!' म्हणून मला आलेल्या अनुभवांना शब्ददेह देऊन मी जिवंत उदाहरण समाजासमोर ठेवत आहे. हे कथन असले तरी ही कथा नाही. काही स्वजनांच्या बर्यावाईट कृत्यांची नोंद केल्याविना ते सादर होऊ शकत नाही, म्हणून त्यात तशा काही प्रतिक-प्रसंगाचे सविस्तर आलेखन आहे. ते केवळ वास्तवदर्शन घडवण्यासाठी आणि माझ्या सल्ल्यास वजन प्राप्त करून देण्याच्या हेतूने केले आहे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा हे स्मरून मी भविष्यातील वृद्धांचे जीवनमान बिघडू नये, या हेतूने ही 'ठेच'; नव्हे, अनेक ठेचा सादर केल्या आहेत. आपल्या मुलांवरील प्रेमापोटी कमी-अधिक चुका प्रत्येकाकडून घडतात, पण या चुकांचा अतिरेक मुर्खपणा ठरतो. आपल्या मुलाची पत्नी वा मुलीचा नवरा यांच्या, आपल्याच मुलांना वश करण्याच्या क्षमतेस कमी लेखू नये. शक्य तो पायाखालची सरावाची जमीन सोडू नये.
-
Prasthapitanchya Bailala ( प्रस्थापितांच्या बैssला
लोकेश शेवडे यांच्या या लेखसंग्रहात रोजच्या आयुष्यातील विसंगती आणि काही खटकणाऱ्या गोष्टींवर मार्मिक भाष्य करण्यात आले आहे. राजकारणी मंडळी आणि आपल्या लोकशाहीतील अनेक गमती जमती यावर भाष्य टाकत बोचऱ्या शैलीत शोवडे भाष्य करतात. स्थानिक स्वराज्य संस्था आणि काही व्यवसायावर त्यांनी केलेल्या कोट्या अफलातून. उपरोधिक शैलीत लिहिणं अवघड; पण शेवडे यांना ही किमया साध्य झाली आहे.
-
Swapnanchi Baag (स्वप्नांची बाग)
प्रसिद्धी माध्यमे कसाही अन् काहीही प्रचार करू देत, पण आजही सार्या जगाचे डोळे अमेरिकेवर असतात. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी तिथे गेलेले व अमेरिकन झालेले नागरिकही 'आता, पूर्वीची अमेरिका राहिली नाही' असं म्हणतात! पण बुद्धी, शिक्षण आणि मेहनत ह्यांची तयारी असणार्या प्रत्येकालाच वाटते की, स्वप्ने प्रत्यक्षात पाहायची असतील तर जावे अमेरिकेसच! ११ सप्टेंबरच्या स्फोटानंतरही आपल्याकडे अमेरिकन कॉन्सुलेटसमोर 'व्हिसा' मिळवण्यासाठी लांबच लांब रांग असतेच की! अशा स्वप्नांची बाग फुलवणाऱ्या देशात राहण्याचा योग आला. अमेरिकेची भव्य-दिव्यता, तेथील स्वच्छता-शिस्त-विपुलता यावर तर खूप वाचलं होतं. ह्या देशातला साधारण माणूस कसा असतो हे पाहण्यासाठी फेरफटका सुरु केला आणि विलीफ्रान्सिस दिसली. त्यामधून स्फुरलेल्या ह्या कथा...