-
The Magic Of Thinking Big (द मॅजिक ऑफ थिंकींग बिग)
द मॅजिक ऑफ थिंकींग बिग' हे पुस्तक वाचून जगभरातल्या लक्षावधी लोकांनी आपल्या जीवनात सुधारणा घडवून आणलेली आहे. प्रेरणा (motivation) या विषयावरचे एक आघाडीचे तज्ज्ञ म्हणून मान्यता असलेले डॉ. श्वार्त्झ, तुम्हाला अधिक चांगली विक्री करण्यासाठी, अधिक चांगलं व्यवस्थापन करण्यात, अधिक पैसा मिळवण्यात आणि सर्वांत महत्वाचं म्हणाजे अधिक समाधान आणि मन:शांती मिळवण्यामध्ये, या पुस्तकाद्वारे मदत करतात. 'द मॅजिक ऑफ थिंकींग बिग' या पुस्तकात तुम्हाला निव्वळ पोकळ आश्वासनं नाही, तर व्यवहार्य, प्रत्यक्ष करून पाहण्याजोग्या पद्धती सापडतात. यातल्या कल्पना आणि तंत्रं इतकी स्वतंत्र प्रत्तेची आहेत, की त्या समजावून सांगण्याकरता लेखकाला एक संपूर्णपणे नवा शब्दसंग्रहच निर्माण करण्याची गरज पडलेली आहे. नोकरी वा उद्योग, वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन आणि सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम या सर्वच बाबतीत भव्य प्रमाणात जगण्याचा एक सुनियोजित कार्यक्रमच डॉ. श्वार्त्झ आपल्यासमोर सादर करतात. आपल्या आसपासच्या इतर लोकांपेक्षा श्रेष्ठ ठरण्यासाठी तुमच्याजवळ अफाट बुद्धिमत्ता किंवा महान प्रतिभा असण्याची गरज नाही. गरज आहे ती यश मिळवून देणार्या पद्धतीनं विचार आणि आचार करण्याची, हे ते सिद्ध करून दाखवतात. आणि हे कसं साध्य करायचं, याची गुपितं हे पुस्तक तुम्हाला पुरवतं !
-
Mazya Baapachi Pend (माझ्या बापाची पेंड)
शेंगदाण्याची पेंड... माझ्या बापाची पेंड बनल्यामुळे उडालेला सावळागोंधळ.... अनंता व केशव या शाळकरी मुलांमध्येही निर्माण झालेली भावकीतली तेढ.... स्वत:च्या अन् दुसर्याच्याही आयुष्याला अर्थ प्राप्त करून देणारी, नाना घोडकेची नव्याण्णवबादची एक सफर.... आई-बापाविना वाढलेल्या सोन्या बामणाची अधोगती.... मुलाच्या मृत्यूनंतरही कोरडा राहणारा रानमाणूस... शिष्याने गुरूलाच व्यावहारिक धडे देणारी व्यंकूची शिकवणी... हरवल्याचा शोध; पण...? आयुष्यातील अशी बोच विनोदी अंगाने मांडणारी द.मा. मिरासदारांची आणखी एक मिरासदारी!
-
Ghartyabaher (घरट्याबाहेर)
पंख न फुटलेल्या चिमुकल्या पाखरांचे घरटे रक्षण करते; पण पंख फुटलेल्या पाखरांना तेच घरटे पिंजर्यासारखे होते. कुटुंब, घर, देव, धर्म, प्रेम, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, इत्यादिकांविषयीच्या आपल्या आजच्या कल्पनांची हुबेहुब हीच स्थिती आहे. मानवजातीच्या बाल्यात या सर्व कल्पना सुंदर होत्या; इतकेच नव्हे, तर समाजाचे संरक्षण करण्याचे आणि सामर्थ्य वाढविण्याचेच काम त्यांनी केले आहे. पण आजच्या यंत्रप्रधान संस्कृतीत या जुन्या कल्पनांचा काडीमात्र तरी उपयोग आहे का ? मध्यम वर्गातल्या बुद्धिवान व कर्तृत्ववान तरूणत्तरुणींची बुद्धी पिंजर्यात अडकून पडली आहे. त्यांचे कर्तृत्व कुटुंबाच्या तुरुंगापलीकडे सहसा जाऊच शकत नाही. मध्यम वर्गाचे हे प्रतिनिधी राजकीय व सामाजिक सुधारणेच्या गोष्टी तोंडाने बोलत असले, तरी वस्तुस्थितीकडे ते डोळेझाक करीत आहेत. शिक्षण, कुटुंबव्यवस्था, संपत्तीची वाटणी, स्त्रीपुरुषांचे संबंध, इ. बाबतींतल्या जुना मार्ग खाचखळग्यांनी भरलेला असून, समाजाच्या गाड्याला त्यामुळे पदोपदी भयंकर धक्के बसत आहेत, हे जाणूनही नव्या पाउलवाटेकडे त्यांचे पाय वळत नाहीत. याचे मुख्य कारण आहे : घरट्याबाहेर न पडण्याची वृत्ती ! वैयक्तिक जीवनाची आसक्ती आणि सामाजिक जीवनाविषयीची उदासीनता.
-
Sukhacha Shodh (सुखाचा शोध)
मानवी जीवन हा एक प्रकारचा त्रिवेणी संगम आहे. स्वत:चे सुख आणि विकास ही या संगमातील पहिली नदी. कुटुंबाचे ॠण फेडणे हा त्यातला दुसरा प्रवाह आणि ज्या समाजाचा घटक म्हणून समाजाच्या प्रगतीला हातभार लावणे ही या संगमातील गुप्त सरस्वती. व्यक्तिगत ॠण आणि समाजॠण ही तीनही सर्वसामान्य माणसाच्या जीवनात अविरोधाने नांदू शकली तरच हे जीवन यशस्वी झाले असे म्हणता येईल. मानवी जीवनाचे रहस्य सांगणारे हे क्रांतिकारी विचार वि. स. खांडेकरांनी 'सुखाचा शोध' या कादंबरीतून मांडले आहेत. "त्यागातच सुख असते" ही परंपरागत जीवनमूल्ये प्रमाण मानणारा 'आनंद', एकावरच संसाराचे ओझे लादणारी 'अप्पा आणि भय्या' ही कर्तृत्वहीन माणसे, मनामनाची मिळवणी करण्यात असमर्थ ठरलेली सुशिक्षित 'माणिक' आणि भावनातिरेक व भावनाशून्यता या दोन्ही विकृतींपासून अलिप्त असलेली 'उषा'. ही सर्व पात्रे हेच सांगतात की, "परंपरागत आदर्श आंधळेपणाने पाळणे हे व्यक्तीच्या तसेच समाजाच्या दृष्टीनेही अहितकारक ठरते. मानवी मूल्यांच्या दृष्टीने भोगापेक्षा त्याग श्रेष्ठ आहे; परंतु त्याग कधीही कुपात्री होता कामा नये." १९३९ साली मांडलेले हे विचार आजच्या समाजालाही उपयुक्त ठरावे.
-
Bandhara (बंधारा)
"मग कोन कोन हैत घरात?'" "घरात शेतीबिती असंल ?" "तुमचा देवाधर्मावर इस्वास हाय का न्हाई ?" "बगा ही अंगडी टोपडी. अहो, नवसासायासायनं झालाय मग हौस नको करायला ?" "घ्या, डिंकाचा लाडू घ्या. आईनं मुद्दाम सुनंसाठी दिल्यात." "थांबा हं, तुमाला एक वस्तू अशी दावतो कशी, अगदी बगण्यालायक!'" एक मोठं गोल फिरणारं प्लॅस्टिकचे हत्ती, घोडे असलेलं खेळणं काढलं. खेळणं फिरत होतं, आणि ते फिरवून दाखवणा-याच्या डोळ्यांत वात्सल्याचा आनंद उसळत होता. तो पाहून त्या सहप्रवाशाचे डोळे तरारले. आपल्या खिशातला रुमाल काढून तो आपले डोळे टिपत म्हणाला, "किती हौशी आहात हो ?" ..... अडीच तीन तासांचा त्याचा सोबती हे सारं थक्क होऊन बघत होता. इतका वेळ बाड बाड करणारी त्याची जीभ लुळी झाली. हातातलं ओझं पेलवेना झालं. गेलं माणूस कुणाचं कोण, पण त्याचा गळा दाटून आला. हुंदके अनावर होऊन आवर कसा घालावा हे कळेना झालं. तो तिथंच थोडा वेळ उभा राहिला. कढ जाऊ दिला आणि जड पावलं उचलत पुढे निघाला. बंधारा फुटावा तसं घडलं.
-
Tajmahalamadhye Sarpanch (ताजमहालमध्ये सरपंच)
ताजमहालमध्ये सरपंच' हा कायम टवटवीत राहतील अशा कथांचा संग्रह. या कथा म्हणजे खुसखुशीत विनोदाआडून घडवलेलं वास्तवदर्शनच ! शंकर पाटील यांनी कथा, कादंबरी, ललित लेख, वगनाट्य असे विविध साहित्यप्रकार हाताळले असले तरी ग्रामीण कथाकार म्हणूनच ते अधिक लोकप्रिय झाले. या संग्रहातील कथांमधून ग्रामीण राजकारण, जीवनौली तसंच समाजातील काही नमुनेदार नगांचं चित्रण आढळतं. प्रत्येक कथा चटपटीत संवाद आणि चुरचुरीत विनोद ल्यालेली दिसते. ती ठरवून लिहिलेली नाही तर उलगडत गेलेली आहे. सहजता आणि सोपेपणा या वैशिष्ठयांमुळे या कथा वाचकाच्या मनाला भिडतात.
-
Dhind (धिंड )
"म्या दारूला शिवलो न्हाई. शप्पत सांगतो, मी घेतल्याली न्हाई. उगा इनाकारणी माज्यावर अदावत घेऊ नका." राऊ खोतानं साफ झिडकारलं, तशी ती सारी चावडी खालवर झाली. लोक खदाखदा हसू लागले आणि राऊ खोतच म्हणाला. "हसून दावू नका. खरं सांगतो, मी घेतल्याली न्हाई." रामभाऊ हसून म्हणाले, "गड्या, तुझं डोळं सांगत्यात की रं !" "अण्णा, डोळं काय सांगत्यात ? गप, उगच गप्प बसा." "उतरंस्तवर गप बसावं म्हणतोस व्हय राऊ ?" "अहो, काय चढलीय का मला ?" "अजून चढली न्हाई म्हणतोस ?" "अहो, त्याचं नावसुदिक घेऊ नग. शिवल्याला न्हाई म्या त्याला !" एक सनदी पुढं झाला आणि मोठ्यानं म्हणाला, "शिवल्यालं न्हाईस तर मग दडून का बसला होतास ?" "शेबास ! म्या काय दडून बसलो होतो काय ?" "दडला नव्हतास तर मग माळ्यावर काय करत होतास ?" "माळ्यावर काय करतोय ! गडद झोपलो होतो ?" "मग खाली जागा नव्हती काय ?" "ते तुम्हाला काय करायचं ? आम्ही खाली झोपू न्हाईतर वर झोपू !" राऊ असं आडवं बोलला आणि सबंध चावडी पोट धरून हसू लागली. शंकर पाटलांच्या मराठी मनांवर अधिराज्य करणार्या ढंगदार कथा.
-
Patlanchi Chanchi (पाटलांची चंची)
चंचीच्या कप्प्यातून निरनिराळ्या वस्तू ठेवलेल्या असतात. विडा खाणारा त्या कप्प्यांमधून हव्या त्या वस्तू काढून घेऊन आपला विडा रंगवतो. शंकर पाटलांनी आपल्या मन:कोषात असेच विविध अनुभव जपून ठेवले होते. आणि लेखन रंगतदार करण्यासाठी त्यांनी त्या अनुभवांचाच उपयोग केला. खास कोल्हापुरी शब्दयोजना असलेली पाटलांची ही स्मरणचंची उघडली की वाचनविडा रंगायलाच हवा.
-
Fhakkad Goshti (फक्कड गोष्टी)
पाटलांच्या कथेतील एक स्वर दु:खाचा आहे, तर एक स्वर प्रसन्न हास्य खुलवणारा आहे. तसं पाहिलं तर विनोदी कथा लिहायची म्हणून शंकर पाटील यांनी लिहिलेली नाही. हास्याची अनंत बीजं असणा-या विविध जाणिवांतील गमतीदार विसंगती ह्या त्यांच्या कथांतील मध्यवर्ती घटना आहेत. त्यातच हास्यबीजं ठासून भरलेली आहेत. मराठी कथेत व्यंगचित्राचा घाट लाभलेल्या कथांची भर टाकण्याचे श्रेय शंकर पाटलांनाच द्यावे लागेल. The humorists are the wise men of the world because the most forcible way to impart truth is through laugh. शंकर पाटील या दृष्टीनं एक चतुर, खट्याळ आणि मिस्कील कथालेखक आहेत. त्यांच्याच या फक्कड गोष्टी.
-
Soneri Swapna- Bhangleli (सोनेरी स्वप्नं-भंगलेली)
नानासाहेब, खरं सांगू, सामाजिक अन्यायाच्या बाबतीतली तुमची पोटतिडीक पाहून मला तुमचा हेवा वाटतो. माणसानं जगावं तर असं जगावं असं मनात येतं. पण लगेच दुसरं मन म्हणतं, तुम्ही मागच्या पिढीची माणसं एका सुंदर स्वप्नात जगत होता. समाजातले सारे बदल सहज व सुरळीतपणानं होतील असं मानीत होता. पण गणिताचे नियम मानवी जीवनाला लावून चालत नाही. माझ्या मनात येतं, युगधर्म बदलला आहे. मघाशी नीतिमूल्यांविषयी तुम्ही बोललात. कृषिप्रधान जीवनपद्धतीतल्या मूल्यांचे संस्कार तुमच्या मनावर लहानपणापासून झाले आहेत. आजची पिढी निराळी आहे. ती यंत्रप्रधान औद्योगिक संस्कृतीत वाढत आहे. पूर्वीच्या लोकांनी देवधर्माच्या भीतीनं अनेक कृत्रिम नीतिमूल्यं पाळली. तरुण पिढीला आता त्यांची गरज वाटत नाही. शेवटी माणसाचं काय होतं चिमूटभर राखच ना. मग जिवात जीव आहे तोपय|त दोन्ही हातांनी जेवढं सुख ओरबाडून घेता येईल तेवढं घ्यायचं याखेरीज तिच्यापुढं कुठलंही ध्येय नाही. तुमचं म्हणणं तात्त्विक दृष्टीनं अगदी बरोबर आहे. पण आजच्या व्यवहारी जगात तत्त्वांना विचारतो कोण?
-
Dhgaadche Chandane (ढगाआडचे चांदणे)
खांडेकर म्हणतात "...कथाबीजं दाही दिशांनी मनात येऊन पडतात-- प्रत्यक्ष अनुभवलेल्या एखाद्या भावनेच्या छटेपासून ती सहजगत्या कानांवर पडलेल्या एखाद्या चार-दोन ओळींच्या घटनेपर्यंत. अशा अनेक अनुभवांत कथाबीजं लपलेली असतात; पण ती सारीच फुलवण्याचं सामर्थ्य पुष्कळांच्या अंगी नसतं. झोपलेलं माणूस एकदम काही तरी टोचल्यामुळं जागं व्हावं, त्याप्रमाणं ज्या अनुभूतीनं संवेदना सचेतन होते आणि कल्पना, भावना आणि विचार यांच्या त्रिवेणी संगमानं न्हाऊ लागते, तीच पुढं स्वत:ला हवं तसं कथारूप धारण करू शकते. अशा रीतीनं गेली पन्नास वर्ष मी कथापंढरीचा वारकरी राहिलो आहे. पहिल्या दहा-वीस वर्षात मी तरुण वारकरी होतो. चालण्यात काय किंवा अभंग आळवण्यात काय, माझ्या ठिकाणी दुर्दम्य उत्साह होता. आता त्या उत्साहाची अपेक्षा करणं सृक्रिमाला धरून होणार नाही. तथापि, गेल्या काही वर्षांत ज्यांचा कथारूपानं माझ्या हातून आविष्कार झाला, असे काही अनुभव या संग्रहात प्रतिबिंबित झाले आहेत... या संग्रहातील कथांनी कुणाचं थोडं सात्त्विक रंजन केलं, कुणाला थोडा वाङ्मयीन आनंद दिला, एखाद्याला त्यात दिलासा सापडला, तर त्या लिहिताना मला जो आनंद झाला, तो केवळ वैयक्तिक नव्हता, या जाणिवेनं माझं लेखन सफल झालं, असं मी मानेन.’
-
Pakalya (पाकळ्या)
आपण जिला शहरी संस्कृती म्हणतो, तिचा अभिजात वाङ्मयाशी अभेद्य असा संबंध असतो, ही धारणा मुळातच चुकीची आहे. शब्द हे वाङ्मयाचे माध्यम असल्यामुळे रसिकतेचा शिक्षणाशी निकटचा संबंध असला पाहिजे, असे आपण गृहीत धरतो. पण शिक्षण अनेकदा पढीक रसिक निर्माण करते. तंत्राचा, शास्त्राचा आणि तशाच प्रकारच्या शेकडो प्रश्नांचा काथ्याकूट करण्यातच अशा पढीकारांचा वेळ जातो. सवयीने त्यांना त्यातच आनंद वाटतो; पण खरी रसिकता असल्या गोीचे स्तोम माजवीत नाही. ती वाङ्मयाच्या आत्म्याकडेच धाव घेते. विद्यार्थ्यांच्या ठिकाणी ललित वाङ्मयाचा आस्वाद घेण्याची शक्ती फार मोठ्या प्रमाणात असते. वाङ्मयाच्या जगाशी एकरूप व्हायला लागणारी स्वैर कल्पकता हा कुमारवयाला मिळालेला एक वर आहे. मुक्त आणि अनंत अशा आकाशाच्या पोकळीत उडत जाण्यात त्यांच्या मनांना आनंद होतो. अशा विद्यार्थ्यांसाठी कै. वि. स. खांडेकरांनी स्वत:च्या दीड-दोनशे कथांमधून पंधरा कथा साक्षेपाने निवडून काढल्या आणि त्या संग्रहाला अन्वर्थक नाव दिले : "पाकळ्या’